ʻरक्तदान श्रेष्ठदानʼ, गरजूंना मदतीचा हात देणारे खुसरो दांम्पत्य

ʻरक्तदान श्रेष्ठदानʼ, गरजूंना मदतीचा हात देणारे खुसरो दांम्पत्य

Wednesday November 18, 2015,

5 min Read

रक्तदानासारखे चांगले कार्य करण्याच्या उद्देश्याने एका दांम्पत्याने सुरू केलेली रक्तदानासंबंधीची योजना गेल्या १५ वर्षांपासून गरजूंचे प्राण वाचवत आहे. सध्या त्यांनी दोन संकेतस्थळे सुरू केली असून, या योजनेला अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे. या संकेतस्थळांची नावे Indianblooddonors.com आणि Plateletdonor.org अशी आहेत. या संकेतस्थळावर ते रक्तदात्यासंदर्भातील माहिती आणि त्याच्या राहण्याच्या ठिकाणाची माहिती पुरवतात. जेणेकरुन रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रक्तदात्याशी संपर्क साधणे सुकर होते. रक्तदानासारख्या महान कार्य़ात हातभार लावणाऱ्या या पती-पत्नीचे नाव अनुक्रमे खुसरो पोचा आणि फर्मिन पोचा, असे आहे. त्यांच्या संकेतस्थळांच्या सहाय्याने तत्काळ रक्ताची गरज असलेल्या अनेक गरजूंना लाभ झाला आहे. खुसरो पोचा हे भारतीय रेल्वेमध्ये कामाला आहेत, तर फर्मिन पोचा या जे.एन.टाटा पारसी कन्या माध्यमिक शाळेमध्ये नोकरी करतात. नागपूर येथे राहणाऱ्या या दाम्पत्याने १९९९ साली Indianblooddonors आणि २०१२ साली Plateletdonors या संकेतस्थळांची सुरुवात केली.

image


पोचा दांम्पत्याच्या आयुष्यात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे ही संकेतस्थळे सुरू करण्याचा त्यांना विचार आला. ज्याद्वारे ते रक्ताची आवश्यकता असलेल्या व्यक्तीला मदत करू शकत होते. त्यामुळे अनेक जखमी आणि आजारी नागरिकांचे प्राण वाचवता येऊ शकत होते. सप्टेंबर १९९४ मध्ये खुसरो पोचा यांची आजी पडली आणि कोमात गेली. त्यांना तात्काळ नागपूर येथील इंदिरा गांधी चिकित्सा महाविद्यालयात भरती करण्यात आले. तेव्हा एक दिवस दुपारी साडेतीन वाजता महिला वॉर्डमध्ये अचानक गोंधळ सुरू झाला. एका रुग्णाचे नातेवाईक वॉर्डमध्ये रात्री ड्युटी करणाऱ्या डॉक्टरला मारहाण करत होते. त्याबाबत त्यांना विचारले असता, रुग्णाच्या नातेवाईकाने दुःखी होऊन खुसरो यांना सांगितले की, ʻया डॉक्टरने माझ्या पत्नीचा जीव घेतला.ʼ तेव्हा खुसरो यांनी डॉक्टरांकडे याबाबत विचारणा केली असता, डॉक्टरांनी सांगितले की, ʻयांच्या पत्नीमध्ये रक्ताची कमतरता होती. मी त्यांच्या नातेवाईकांना दोन यूनिट रक्त आणण्यास सांगितले. मात्र ते कोणा रक्तदात्याचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे रुग्णाला रक्त पुरवता आले नाही. परिणामी हृदयविकाराचा झटका येऊन रुग्णाचा मृत्यू झाला.ʼ या गोष्टीमुळे खुसरो यांच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचे ते सांगतात. त्यानंतर १९९९ साली अशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेने त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. त्यावेळेस ते एका रुग्णाची मदत करत होते, ज्याला O(-)ve रक्ताची आवश्यकता होती. मात्र नागपूरमधील कोणत्याही रक्त बॅंकेत सदर गटाचे रक्त उपलब्ध नव्हते. दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या रुग्णाची प्राणज्योत अखेरीस रक्त न मिळाल्याने मालवली. तर रक्तदात्याचा शोध घेणारे त्याचे नातेवाईक हताश झाले होते. खुसरो सांगतात की, ʻया घटनेने मला विचार करण्यास भाग पाडले. त्या रुग्णांचे काय होत असेल, जे आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी अनेक अनोळखी शहरांच्या वाऱ्या करतात. जिथे त्यांची मदत कऱण्यासाठी कोणीही उपलब्ध नसते. कर्करोग्यांचे किती हाल होत असतील, ज्यांना रक्त बदलण्याकरिता (ब्लड ट्रान्स्फ्युजन) मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. त्या मुलांचे काय होत असेल, ज्यांना सिकल सेल किंवा थॅलेसेमियासारखे आजार आहेत. त्यांना वारंवार रक्त बदलण्याची आवश्यकता असते.ʼ

image


याबाबत खुसरो यांनी त्यांच्या पत्नीशी चर्चा केली. या विषयावर काहीतरी उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे, यावर त्यांचे एकमत झाले. या समस्येवर काही ठोस उपाय करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र काय करता येऊ शकते, हे चित्र त्यांच्यासमोर स्पष्ट होत नव्हते. त्याकाळी ʻडॉटकॉमʼचे पेव सर्वदूर पसरत होते. खुसरो सांगतात, ʻदररोज कोणी ना कोणी स्वतःचे संकेतस्थळ सुरू करत होते. मी देखील कॅनडा येथे स्थित असलेल्या माझ्या चुलत भावाशी बोलण्याकरिता इंटरनेटचा वापर करणे, सुरू केले होते. त्याकाळी सायबर कॅफेमध्ये इंटरनेटचा दर ताशी १०० रुपये एवढा होता.ʼ एक दिवस मेल तपासत असताना खुसरो यांच्या मनात विचार आला की, आपणदेखील अशाच पद्धतीचे एक व्यासपीठ तयार करू शकतो. त्याद्वारे आपण रुग्ण आणि रक्तदात्यांना एकमेकांच्या संपर्कात आणू शकतो. त्यांच्यासाठी हा क्षण म्हणजे आर्किमिडीजच्या ʻयूरेकाʼ प्रमाणे होता. त्यांनी त्याच क्षणी निर्णय घेतला की, ते आपले एक संकेतस्थळ तयार करतील, जे रक्तदाता आणि रुग्णांमधील अंतर कमी करेल.

image


पोचा परिवाराने आपल्या आयुष्यभराची सर्व पुंजी जेव्हा गोळा केली, तेव्हा त्यांच्याकडे संकेतस्थळ सुरू करता येईल, एवढे पैसे गोळा झाले. या आठवणींबाबत बोलताना खुसरो सांगतात की, ʻसंकेतस्थळ सुरू करण्याबाबत आम्हाला अ आ इ देखील माहित नव्हती. तसेच या कामात किती मेहनत करावी लागते, याची पुसटशी कल्पनादेखील आम्हाला नव्हती. या विषयावर थोडेफार वाचन केल्यानंतर मी माझ्या भावाच्या एका मित्राशी संपर्क साधला. तो एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत होता. आम्ही चांगल्या कामासाठी संकेतस्थळाची निर्मिती करत होतो, त्यामुळे आम्हाला त्याने १५००० रुपयांची सूट दिली. त्यानंतर आम्हाला डोमेन आरक्षित करायचा होता, ज्याचे शुल्क क्रेडीट कार्डद्वारे भरण्यात येणार होते. माझ्याकडे क्रेडीट कार्ड नव्हते. त्यामुळे मी माझ्या चुलत बहिणीला डोमेन आरक्षित करण्यास सांगितले. अशाप्रकारे २७ ऑक्टोबर १९९९ साली आमच्या डोमेनची नोंदणी झाली.ʼ त्यानंतर त्यांना एका होस्टची आवश्यकता होती, जेथे त्यांचे संकेतस्थळ ठेवता येऊ शकत होते. तेव्हा त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला सांगितले की, मी संकेतस्थळाला www.interland.com वर होस्ट करावे. त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना फक्त तीन महिन्यांकरिता एसक्यूएल सर्वरसहित २५० एमबी वाली योजनेचीच परवानगी देत होते, ज्याची किंमत दहा हजार रुपये होती. सर्वात महत्वपूर्ण टप्प्यात जेव्हा काम आले, तेव्हा त्यांना तात्काळ संगणक विकत घेण्याची गरज होती. ज्यावरुन ते घरबसल्या आपल्या संकेतस्थळावर लक्ष ठेऊ शकत होते आणि आलेल्या संदेशांना उत्तर देऊ शकत होते. तेव्हा ते सेकंडहॅंड संगणक विकत घेण्याचा प्रयत्न करत होते. अखेरीस १२ हजार ५०० रुपयांना त्यांना संगणक मिळाला आणि जानेवारी २००० साली त्यांचे संकेतस्थळ प्रसारित होण्यास सज्ज झाले. जाहिरातीच्या क्षेत्रात असलेल्या त्यांच्या एका मित्राने संकेतस्थळाकरिता लोगो तयार केला. त्याशिवाय एक पोस्टरदेखील तयार केले. संकेतस्थळाच्या प्रसारणादिवशी एक जाहिरातदेखील त्यांनी प्रसारित केली. सुदैवाने आज त्यांच्या संकेतस्थळाला भारतातील तीन कंपन्यांची मदत मिळाली आहे.

खाली दिलेल्या पाच पद्धतीने रुग्ण रक्तदात्याशी संपर्क करू शकतात

• गूगल प्ले द्वारे Indian Blood Donors (इंडियन ब्लड डोनर्स किंवा भारतीय रक्तदाता) नामक Android App (एंड्रॉइड एप्लिकेशन) डाऊनलोड करा. या एप्लिकेशनमध्ये रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक त्यांच्या शहरातील रक्तदात्याशी संपर्क करू शकतात.

• आय व्ही आर एस हेल्पलाईन (IVRS हेल्पलाइन) - ०७९६१९०७७६६ वर फोन करा. हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. ही सेवा सर्वसामान्यांकरिता उपलब्ध करण्यात आली आहे, ज्यांना इंटरनेटचा वापर करता येत नाही. तसेच SMS सेवा वापरता येत नाही.

• SMS BLOOD to 55444 (ही सेवा एअऱटेल, एअऱसेल, वोडाफोन आणि टाटा डोकोमो वर उपलब्ध आहे.) आयडीया वापरकर्ते SMS BLOOD to 55777 चा वापर करू शकतात.

• आपल्या शहरातील रक्तदात्याचा शोध घेण्यासाठी ९६६५५००००० वर ʻDONOR (Std Code) (Blood Group)ʼ, असा एसएमएस करा.

• आपल्या परिसरातील रक्तदात्याचा शोध घेण्यासाठी ९६६५५००००० वर ʻDONOR PIN (Six Digit Postal Pin Code) (Blood Group)ʼ, असा एसएमएस करा.

देशभरातील हजारो स्वयंसेवकांनी या संकेतस्थळावरील पोस्टर डाऊनलोड करुन, ते रुग्णालयात प्रसिद्ध केले आहे. ज्यामुळे अनेक गरजूंना या सुविधेची माहिती मिळते. या संकेतस्थळाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. भलेही पोचा दांम्पत्याला यामुळे कोणताही आर्थिक फायदा होत नाही, मात्र अशा चांगल्या कामाची सुरुवात करणे आणि त्यात टिकून राहणे, यामुळे मिळणारे समाधान अमूल्य आहे. पुढील पाच वर्षांमध्ये पोचा दांम्पत्य मोबाईल एप्लिकेशन सुरू करणार आहेत, ज्यामुळे रक्तदाते एकमेकांच्या संपर्कात राहण्यास मदत मिळणार आहे.


लेखक : अजित हर्षे

अनुवाद : रंजिता परब