अप-सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या नव्या वाटेने चालताना...

अप-सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या नव्या वाटेने चालताना...

Thursday March 03, 2016,

6 min Read

आपल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपणच काही तरी केले पाहिजे, ही प्रेरणा वृचा जोहरी यांना मिळाली ती त्यांच्या बेस्ट फ्रेंडकडून... पर्यावरणाप्रती नितांत प्रेम आणि निष्ठा असलेल्या या मित्राला पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी करण्याचीही तीव्र इच्छा होती. हळूहळू वृचा यांनाही या विषयाने असेच झपाटून टाकले. पर्यावरणाच्या रुपाने त्यांना अखेर त्यांचे आवडीचे क्षेत्र मिळाले आणि आज त्या पेनपाल्स (PenPals) सारखी आव्हाने लिलया पेलत, पर्यावरण संवर्धनातील आपला खारीचा वाटा उचलताना दिसत आहेत.

स्वतः एक आई आणि त्याचबरोबर एक उद्योजिकी असलेल्या वृचा या अपसायकलिंगच्या माध्यमातून आपले हे जग वाचविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अप-सायकलिंगमध्ये वाया गेलेल्या वस्तूचा केवळ पुनर्वापरच होत नाही तर त्यापासून मूळ वस्तूपेक्षा वरच्या दर्जाच्या किंवा अधिक मूल्याच्या उत्पादनाची निर्मिती केली जाते.

सुरुवातीची वर्षे

वडिलांनी अनेक नोकऱ्या बदलल्यामुळे, वृचा यांनाही खूप प्रवासा करावा लागला आणि भारतात विविध ठिकाणी त्यांचे शालेय शिक्षण झाले. अभ्यासात सर्वसाधारण असलेल्या वृचा यांचा कल होता तो कला आणि संगीताकडे... त्याचबरोबर वयाच्या अकराव्या वर्षापासूनच व्यावसायिक चित्रपटकर्ती बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते.

हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढील दहा वर्षे त्यादिशेने कामही केले. यादरम्यान त्यांनी पृथ्वी थिएटरच्या संजना कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत रंगभूमीवर काम केले आणि एफटीआयआय (फिल्म्स ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडीया) साठी चांगले गुण मिळविण्याच्या दृष्टीने डेवलपमेंट कम्युनिकेशचा अभ्यासही केला. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना, त्यांना त्यांचा वर्गमित्र प्रक्षलच्या रुपाने त्यांचे सहसंस्थापक भेटले आणि हेच त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरले.

image


द ‘वे’

पर्यावरण संवर्धनाबाबत त्यांच्या मित्राची असलेली आवड पाहून, त्यांनादेखील त्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी सिनेमा क्षेत्राला रामराम ठोकला आणि या नव्या कामाच्या दिशेने त्वेषाने आपला मोर्चा वळविला. मोकळेपणाने व्यक्त होण्याची ताकद आणि संवादकला ही दोन कौशल्य यावेळी त्यांच्या खऱ्या अर्थाने मदतीला आली, ही दोन कौशल्ये म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, “माझ्या रक्तातच आहेत.”

मात्र शिक्षण पूर्ण केल्यानंतर एनव्हायरन्मेंट कम्युनिकेशनच्या क्षेत्रात नोकरी मिळविणे हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरले. हे एक असंघटीत क्षेत्र असल्यामुळे, या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी कोणतीही बाजारपेठ किंवा माध्यमे उपलब्ध नव्हती. खरं म्हणजे, हे संपूर्ण क्षेत्रच मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी कार्यकर्त्यांद्वारेच चालविले जात होते.

“ माझ्या शिक्षणाचा सुयोग्यपणे वापर करु शकतील आणि मलाही कामाचे समाधान देतील अशी पदेच उपलब्ध नव्हती. पण हे आव्हान म्हणजे इष्टापत्तीच होती, कारण त्यातूनच मला माझा स्वतःचा मार्ग शोधण्यासाठी चालना मिळाली,” त्या सांगतात.

त्यातूनच २००७ मध्ये अहमदाबादस्थित वर्ल्ड अराऊंड यु (वे) (World Around You-WAY) या संस्थेची स्थापना झाली. एनव्हायर्न्मेंट कम्युनिकेशन (इसी) या माध्यमाचा वापर करुन ही संस्था शाश्वत विकासासाठी काम करते. वृचा या संस्थेच्या सहसंस्थापिका आहेत. “ आम्हाला समाजासाठी असे नाविन्यपूर्ण उपाय देऊ करायचे होते, ज्या उपायांचा वापर दररोज तोंड द्यावे लागत असलेल्या पर्यावरणीय समस्या सोडविण्यासाठी करता येऊ शकेल,” त्या सांगतात. वर्ल्ड अराऊंड यु मध्ये त्या संपर्क आणि धोरण आखणीची जबाबदारी सांभाळतात.

याबाबत अधिक विस्ताराने सांगताना वृचा म्हणतात की, पर्यावरण संवर्धन हे पारंपारिकरित्या तज्ज्ञांचे कार्यक्षेत्र मानले जाते, जेथे योगदान देण्याएवढे आपण तज्ज्ञ आहोत, किंवा त्यासाठी आवश्यक ती कौशल्ये किंवा शिक्षण आपल्याकडे असल्याचे सामान्य माणसाला वाटत नाही. हेच मत बदलण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. सर्वांनाच हे क्षेत्र आपलेसे वाटावे यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या पद्धती लोकांच्या मनावर बिंबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

आव्हाने

“ एखादा उपक्रम चालविणे हे एखादे मूल वाढविण्यासारखेच आहे. त्या उपक्रमाची वाढ आणि कल्याण यामध्ये तुम्ही महत्वाची भूमिका निभावत असता. मी समाजाला काहीतरी सकारात्मक योगदान देण्यासाठी सक्षम असल्याचे पाहून मलाही शक्तीशाली झाल्यासारखे वाटते,” त्या सांगतात. जरी हा संपूर्ण प्रवास अनेक चढ उतार असलेल्या एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखा राहिला असला, तरी वृचा यांच्यामते तो अतिशय मोलाचा होता.

पेनपाल्स आणि द यलो चेअर (PenPals and Yello Chair)

२०१२ मध्ये मिळालेले एक आव्हान हे पेनपाल्स प्रकल्प सुरु होण्यास कारणीभूत ठरले. वाया गेलेल्या पेन्सबाबत काहीतरी करण्याचे हे आव्हान होते. अहमदाबाद ग्लोबल शेपर्सने वृचा आणि त्यांच्या टीमला हे आव्हान दिले आणि जन्म झाला तो पेनपाल्स प्रकल्पाचा...

स्थानिक पातळीवर ही समस्या समजून घेण्याच्या हेतूने त्यांनी शाळांमधून अशी पेनं गोळा करण्याची चाचणी घेतली आणि त्यातूनच अवघ्या आठ महिन्यांच्या काळातच त्यांच्याकडे वापरुन वाया गेलेली सुमारे पाचशे किलो पेनं एकत्र झाली. “ पेनांचे सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक असलेल्या बिकने २००५ मध्ये त्यांचं १०० अब्जावं पेन विकले. दर वर्षी, जगभरात सहा अब्जापेक्षा जास्त डिस्पोजेबल पेनं वापरली आणि फेकली जातात. या पेनांचा पुनर्वापर होऊ शकत नाही आणि बहुतेकदा ती जमिनीवर, समुद्रात किंवा कचऱ्याच्या भट्टीत येऊन पडतात, ज्यामुळे अंततः प्रदुषणच वाढते. या पेनांचे उत्पादकही हे मान्य करतात, की त्यांची उत्पादने ही पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने तयार केलेली नसतात. पेनं सगळीकडेच असतात आणि त्यामुळे वाया गेलेल्या पेनांची समस्याही, वृचा सांगतात आणि पुढे म्हणतात, “अतिशय प्रगत असे पुनर्वापराचे तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या अगदी स्वीडन आणि अमेरिकेसारख्या देशातही पेनांचा पुनर्वापर केला जात नाही.”

वाया गेलेल्या पेनांचा वापर करुन त्यापासून उपयुक्त अशी डिजाईनर उत्पादने बनविणारा पेनपाल्स हा एक विलक्षण आणि अगदी वेगळा असा उपक्रम आहे. वृचा यांच्यामते कचऱ्याच्या समस्येशी दोन हात करताना अप-सायकलिंग (मूळ स्वरुपात वस्तूचा वापर करुन, जेणेकरुन लाकूड, धातू, इत्यादी कच्च्या मालाचा वापर कमी करावा लागेल) हा रिसायकलिंग अर्थात पुनर्वापरापेक्षा जास्त प्रभावी मार्ग आहे. पेनपाल्स मध्ये पेनांचे रुपांतर उपयुक्त उत्पादनांमध्ये केले जाते, जसे की टी कोस्टर्स, फोटो-क्लॉक्स, बुक-स्टॅंडस्, दिवे, बॉक्सेस, द ब्लॅक बॉक्स चेअर आणि द यलो चेअर.

वृचा जोहरी आणि यलो चेअर

वृचा जोहरी आणि यलो चेअर


द यलो चेअर ही अशी एक कलाकृती आहे, जी तीनशेहून जास्त वाया गेलेल्या पेनांपासून बनवलेली आहे.

ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या लिटर-फ्री-लिटरेट- वर्ल्ड या मिशनच्या अंतर्गत दिले गेलेले पहिलेवहिले गांधी चेंज ऍवॉर्ड वृचा यांच्या प्रकल्पाला मिळाले. तर स्वित्झर्लंडयेथील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, २०१४ मधील वार्षिक बैठक, तसेच स्विडनमधील युथ कनेक्टर्स फॉर फ्युचर प्रोग्रॅम आणि व्हीएतनामध्ये ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या शेप एशिया पॅसिफीक मध्ये ग्लोबल शेपर्स म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधीही या प्रकल्पाला मिळाली.

वाया गेलेल्या वस्तू गोळा करण्यापासून ते संशोधन आणि उत्पादनाचे डिजाईन आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी म्हणून सहा जणांच्या टीमसह त्या काम करत असून, त्यांनी सुरुवातीला तयार केलेली सर्व उत्पादने ही नमुना स्वरुपातच होती. या उत्पादनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणून त्यांनी गेल्याच वर्षी क्राऊड फंडींगची मोहिमही राबवली होती. या निधीचा वापर पुरस्कार स्वरुपात ही उत्पादने देण्यासाठी, अधिकाधिक संस्था- शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांना या विषयाशी जोडून घेण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांच्या कुटुंबांना प्रशिक्षण, तसेच साधनसामुग्री आणि सुरक्षा साधने देऊन मदत करण्यासाठी वापरण्याचे त्यांचे लक्ष्य होते. पेनांशिवाय त्यांनी जुने कपडे, पॅकेजिंग मटेरीयल्स आणि वृत्तपत्रांचे अपसायकलिंग करुन उपयुक्त उत्पादनांची निर्मिती केलेली आहे.

अनेक आव्हानांचा सामना करत असताना, वृचा यांना प्रेरणा मिळते ती त्या करत असलेल्या कामावरील त्यांच्या असलेल्या प्रेमातूनच... त्या सांगतात, “ आजूबाजूला पहाताना आपल्याला जाणावते, की असे पुष्कळ काम आहे जे आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गरजेचे आहे. हा एक सातत्यशील प्रयत्न आहे. दर वेळी जेंव्हा आम्ही काहीतरी संकल्पना करतो आणि त्याची चाचणी घेतो, त्यावेळी लोकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि पाठींबा माझ्या प्रयत्नांवरील माझा विश्वास दृढ करतो आणि मला पुढे जात रहाण्याची ताकद देतो.”

अशाच काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा संबंधित कहाण्या :

१७ वर्षीय तुषारच्या पेन्सील विश्वसंग्रहाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद

गाथाडॉटकॉमः येथील प्रत्येक कलाकृती सांगते एक रंजक कथा 

काशा की आशा : उद्योगजगत महिलांचं. महिलांसाठीचं...

लेखिका – तन्वी दुबे

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन