मॉर्निंग फ्रेशः हँगओव्हर घालवून ताज्यातवान्या दिवसाच्या सुरुवातीसाठीचा रामबाण इलाज....

मॉर्निंग फ्रेशः हँगओव्हर घालवून ताज्यातवान्या दिवसाच्या सुरुवातीसाठीचा रामबाण इलाज....

Friday March 18, 2016,

6 min Read

कल्पना करा की तुम्हाला कामाच्या ठिकाणी एक अतिशय महत्वाचे सादरीकरण करायचे आहे आणि नेमक्या त्याच वेळी आदल्या दिवशीच्या पार्टीतील मद्यपानाच्या हॅंगोव्हरमुळे तुमच्या समोरील आकडे अचानक नाचू लागले तर? किंवा लग्नाच्या आदल्या दिवशीच्या पार्टीचा परिणाम म्हणून ऐन लग्न समारंभातच तुम्हाला उलटी झाली तर? कल्पना सुद्धा करवत नाही ना.... आणि आता कल्पना करा की तुम्ही अशी एक निर्मिती करत आहात, जी कोणाचीही अशा लाजिरवाण्या प्रसंगापासून सुटका करु शकते, तर? तर तुम्ही नक्कीच त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न कराल.... नाही का? भारत आणि मिताली टंडन ही बापलेकीची जोडीही नेमकी यासाठीच प्रयत्नशील असून, पार्टी बर्डस् साठी त्यांनी तयार केलेल्या रामबाण औषधात सातत्याने सुधारणा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो – तीव्र हॅंगओव्हर्स वर उतारा असलेल्या या औषधाचे नाव आहे ‘मॉर्निंग फ्रेश’…

image


मिताली टंडन यांनी अगदी तरुण वयातच कामाला सुरुवात केली. महाविद्यालयात असतानाच त्यांनी कर्नाटक स्पॅस्टीक सोसायटीबरोबर स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि ‘यंग एंटरप्राईज’ या गटात त्या सहभागी झाल्या. तसेच बंगळुरुमध्ये प्राईसवॉटरहाऊसकूपर्सच्या न्यायवैद्यक विभागातही त्यांनी काही काळ काम केले आणि कर्नाटकातल्याच संवाद या दलित आणि आदिवासांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसाठी निधी उभारणी व्यवस्थापक म्हणूनही काम केले. दरम्यान प्राणी आरोग्य, बायोटेक आणि औषधनिर्माण क्षेत्रात त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता. यामध्येही त्यांनी याच काळात स्वतःला गुंतवून घेतले.

“ सेरीकेअर ही आमची पालक कंपनी सेरीकल्चरच्या क्षेत्रातील आद्य प्रवर्तक आहे आणि सिल्कचा वापर बायो-मटेरीयल म्हणून करत आहे,” मॉर्निंग फ्रेशच्या संस्थापक आणि सीईओ मिताली सांगतात. “ मला काम करण्यासाठी तर नेहमीच प्रोत्साहन मिळाले, पण त्याचबरोबर स्वंतत्रपणे विचार आणि कृती करण्यासाठीही मला प्रोत्साहन मिळत गेले. संशोधनादरम्यान आम्हाला शोध लागला की सिल्क प्रोटीनमधील काही पेप्टाईडस् ही एडीएचच्या निर्मितीला उत्तेजन देतात. एडीएच हे तुमच्या यकृतामध्ये नैसर्गिकरीत्या असेलेले द्रव्य असते आणि दारुचे विभाजन करण्यामध्ये तेच मदत करते. मात्र अतिरिक्त प्रमाणात दारुचे सेवन केल्यास या द्रव्याचा परिणाम कमी होतो आणि परिणामी हॅंगओव्हर्सचा त्रास होऊ लागतो. मात्र पेप्टाईड या द्रव्याला पुन्हा सक्रीय करतात. या कल्पनेने आम्ही चांगलेच उत्साहीत झालो आणि या गृहितकाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही उंदरांवर प्राथमिक अभ्यास केला आणि आम्हाला जबरदस्त परिणाम दिसले, ज्याने आम्ही खऱ्या अर्थाने आश्चर्यचकीत झालो आणि त्यातूनच आम्हाला हे उत्पादन विकसित करण्याची प्रेरणा मिळाली,” मिताली सांगतात.

त्यांनी मॉर्निंग फ्रेशची निर्मितीच मुळी एक फक्त पोस्ट ड्रींकींग सोल्युशन अर्थात मद्यपानानंतरचा उपाय म्हणून केली, ज्यामुळे मद्य सेवनानंतरच्या दुष्परिणामांपासून सुटका होण्यास मदत मिळते. “ बहुतेक लोक हे घरगुती उपायांवरच अवलंबून असतात. आमच्यासाठी आमचे लक्ष्य हे आरोग्याबाबत जागरुक असे लोक होते आणि त्यामुळे आम्ही हे उत्पादन नैसर्गिक, पोर्टेबल आणि सेवनास सोपे, असेच ठेवण्यावर खास करुन भर दिला,” मिताली विस्ताराने सांगतात. संपूर्णपणे नैसर्गिक असलेल्या या उत्पादनातील महत्वाचे घटक आहेत ते, सिल्क प्रोटीन हायड्रोलिसेट, व्हिटॅमिन सी आणि मलबेरी एक्सट्रॅक्ट. तर ते तीन स्वादांमध्ये निर्माण केले जाते – कोला, मिंट आणि स्ट्रॉबेरी आणि एका बाटलीची किंमत शंभर रुपये एवढी आहे.

धोरण, विस्तार आणि प्रसिद्धी

आपल्या व्यवसायाची उभारणी करताना त्यांनी दर वर्षी दारुच्या घटनांची संख्या आणि दारु पुरुवणाऱ्या बार आणि रेस्टॉरंटस् च्या संख्येच्या आधारावर बाजारपेठेच्या आकाराचे मूल्यांकन केले आहे. सर्वेक्षणातून असे दिसून आले की अतिरिक्त मद्यसेवनाचे प्रमाण वाढत आहे आणि त्याचबरोबर शहरांमध्ये बार आणि रेस्टॉरंटस् ची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यातच तरुणांची जीवनशैलीही वेगवान होत आहे. त्यांचे ग्राहक हे २१ ते ३५ वयोगटातील तरुण व्यावसायिक आहेत. हे ग्राहक प्रामुख्याने सोशल ड्रिंकर्स, पार्टी गोअर्स किंवा खर्च करण्याची ताकद असलेले तर आहेतच पण त्याचबरोबर बहुतेकदा ते आरोग्य आणि शारिरिक तंदुरुस्तीबाबत जागरुकही आहेत.

image


“ आमच्यासाठी लक्ष्य असलेले ग्राहक ज्या ठिकाणी आपला वेळ घालवितात, अशा ठिकाणी मॉर्निंग फ्रेश दिसेल आणि उपलब्ध असेल, यासाठी आमचे मॉडेल हे सतत आणि सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच त्यांची जीवनशैली आणि मनोरंजनाच्या प्राधान्यक्रमांचा एक विशिष्ट प्रकारही दिसून येत आहे आणि त्यामुळे त्यांना जेंव्हा या उत्पादनाची गरज लागण्याची सर्वाधिक शक्यता असते, तेंव्हा ते त्यांच्या आसपास उपलब्ध करुन देण्याची आमची इच्छा आहे. जसे की बारमध्ये बिलाच्या बरोबरच किंवा संगीत किंवा कॉकटेल रिसेप्शननंतर वेडींग प्लॅनर्सच्या मदतीने पाहुण्यांच्या खोल्यांमध्ये किंवा अगदी दारु दुकानाच्या विक्री काऊंटरवरसुद्धा,” मिताली सांगतात.

“ प्रतिसाद देण्यासाठी आम्ही बारा महिने चोवीस तास उपलब्ध असावे, अशी आमच्या ग्राहकांची अपेक्षा असते. मला मध्य रात्री दोन वाजताही अशा ग्राहकांचा फोन आलेला आहे, ज्यांना हे उत्पादन तातडीने हवे होते. मात्र हा एक प्रकारचा व्यावसायिक धोका असल्याची आम्हाला जाणीव आहे, खास करुन ज्या पद्धतीचे हे उत्पादन आहे आणि आता आम्ही यावर काहीतरी शाश्वत उपाय शोधण्याच्या दृष्टीने काम करत आहोत,” त्या सांगतात.

जबाबदार मद्यपानाला पाठींबा देणाऱ्या देशातील पाचशे अव्वल बार आणि रेस्टॉरंटस् नी त्यांच्या मद्यपान संस्कृतीचा भाग म्हणून मॉर्निग फ्रेश उपलब्ध करुन द्यावे आणि त्याद्वारे मॉर्निंग फ्रेश हे जबाबदार मद्यपानाचे प्रतिक ठरावे, अशी मिताली यांची इच्छा आहे. “ त्या संध्याकाळी तुमचे शेवटचे पेय हे मॉर्निंग फ्रेश असावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाली अगदी ताजेतवाने वाटले पाहिजे... त्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी एकदम तयार... अशी नवीन मद्यपान संस्कृती बनायला हवी,” मिताली सांगतात.

हे साध्य करण्यासाठी ते शहरातील विशिष्ट कार्यक्रमांशी सहयोग करत आहेत – जसे की किच्श मंडी, स्ट्रॉबेरी फिल्डस्, स्टेपिंगआऊट फुड फेस्टीव्हल आणि त्याचबरोबर सहजपणे माहिती आणि विक्री उपलब्ध करुन देण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मस् चा वापर करण्यात येत आहे, तसेच बार, रेस्टॉरंटस् आणि वेडींग प्लॅनर्स यांसारख्या वितरण केंद्रांशीही भागीदारी करण्यात येत आहे.

वितरणामध्ये उतरल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या काळात, त्यांनी देवार्स वाईन स्टोअर्स, सेंट मार्क्स रोड, रेड फोर्क आणि हॅंगओव्हर ऍट इंदीरानगर आणि त्याचबरोबर शिरो’ज, युबी सिटी, चर्च स्ट्रीट सोशल यांसारख्या ठिकाणांवरील कार्यक्रमांमध्येही त्यांचे अस्तित्व निर्माण केले आहे. पाचशेहून अधिक वापरकर्ते मिळविण्यात त्यांना यश मिळाले असून त्यांनी आतापर्यंत तीन हजारांवर बाटल्यांची विक्री केली आहे आणि त्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा अनेक कथाही त्यांच्याकडे आता आहेत. “ जेंव्हा आम्हाला ग्राहक फोन करुन सांगतात, की त्यांच्या स्वतःच्या लग्नातदेखील ते मॉर्निंग फ्रेशमुळे उभे राहू शकले आणि त्यांची शेवटच्या क्षणी नोंदविलेली मागणी वेळेत पोहचविल्याबद्दल किंवा वेळेत कामावर पोहचू शकल्याबद्दल किंवा अगदी लवकरचे विमान पकडण्यात यशस्वी ठरल्याबद्दल जेंव्हा ग्राहक आमचे आभार मानतात, तेंव्हा आम्ही योग्य मार्गावर असल्याची आम्हाला खात्री पटते,” मिताली सांगतात.

image


बॉस कोण आहे?

पहिल्यांदा अनुभव घेण्याची आणि नंतर निर्णय घेण्याची इच्छा असलेली पंचवीस वर्षीय लेक आणि त्यांच्या उत्पादनातील मिश्रणासारखाच वैविध्यपूर्ण व्यवसाय असलेले आणि एक अतिशय अनुभवी उद्योजक असे ६२ वर्षीय वडील यांच्यामध्ये नेमके कोण बॉस आहे? “ बायो टेक्नॉलॉजी उद्योग आणि एकूणच व्यवसायाच्या जगात माझ्या वडिलांचे शैक्षणिक ज्ञान आणि व्यावसायिक अनुभव खूपच मोठा आहे. ते या कामासाठी त्यांचा सर्व अनुभव, बायो-टेक्नॉलोजीविषयीचे प्रेम, शहाणपण आणि दूरदृष्टी देऊ करतात तर मी सर्जनशील उर्जा, नवीन तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण विपणन धोरणांमध्ये योगदान देते. आणि तुम्ही अंदाज केला असेलच, रस्सीखेच असते ती बहुतेकदा धोरणांविषयीच.... कारण आम्ही परिणाम साध्य करण्यासाठी पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतो,” मिताली सांगतात.

त्याचबरोबर या क्षेत्रात स्थानिक पातळीवर काही हर्बल कॅप्सूल्स उपलब्ध असल्याची माहितीही मिताली देतात. “ पण आमचे उत्पादन बरेच वेगळे आहे. परदेशात अशी अनेक उत्पादने आहेत, जी एकाच गटाला लक्ष्य करतात, मात्र सिल्क प्रोटीन्सचा सक्रीय घटक म्हणून वापर करुन तयार केलेली पोस्ट ड्रींकींग सोल्युशन्स अगदी मोजकीच आहेत,” त्या सांगतात.

लेखक – बिंजल शाह

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन