शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्याकरता सात आकडी पगाराकडे पाठ फिरवणारा अवलिया

शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्याकरता सात आकडी पगाराकडे पाठ फिरवणारा अवलिया

Monday March 07, 2016,

5 min Read

लेविट सोमराजन

लेविट सोमराजन


अमेरिकन नोकरी, जर्मन कार आणि साथ देणारी पत्नी आयुष्यात अजून काय हवं? लेविट सोमराजन यांचीही अशीच काही स्वप्न होती. त्यांना वाटायचं ही स्वप्न साकार व्हायला सुपरफास्ट ट्रेन असायला हवी. त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. पण आपल्या स्वप्नांच्या जवळ जात असतानाच, त्यांना या स्वप्नांमधला फोलपणा जाणवू लागला. आयुष्यात बड्या पगाराची नोकरी, कार हेच काही सर्वस्व नाही. यातून मानसिक समाधान कितीसं मिळणार? याचा इतरांचं आयुष्य घडवण्याकरता काही उपयोग होणार आहे का? या विचारांचं काहूर माजू लागलं.

लेविट म्हणतात,

आयुष्य दुसऱ्या कोणाच्या तरी तालावर नाचत असतं. भारतात तर ९८ टक्के इंजिनिअर्स तर कोणाच्या तरी सांगण्यावरून या क्षेत्रात येतात. आणि हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

लेविटना सात आकडी पगाराच्या नोकरीची संधी चालून आली होती. पण त्यांनी या संधीकडे पाठ फिरवून प्रवास करण्याचं ठरवलं. आपल्या बदललेल्या स्वप्नांचा मागोवा घेत त्यांच्या पूर्ततेकरता प्रयत्न करण्याचं ठरवलं. २० व्या वर्षी जागृती यात्रा या अभियानात सामील झाले. या प्रवासादरम्यान त्यांना भारताची खरी ओळख होत होती. आपला देश खऱ्या अर्थानं जाणून घेता आला. या सर्व प्रवासादरम्यानच त्यांना त्यांचा मार्ग सापडला. हा मार्ग होता शिक्षणाचा वसा. २०११ च्या कोहोर्टमध्ये फेलोचं प्रशिक्षण घेतल्यावर २०१३ मध्ये ते टिच फॉर इंडियामध्ये सामील झाले.

दोन वर्ष त्यांनी वर्गांमध्ये ३० विद्यार्थ्यांना शिकवलं. या दोन वर्षांत मुलांचं मन त्यांना वाचता येऊ लागलं. त्यांचे अंतरंग जाणून घ्यायला खूप मदत झाली. लेविट म्हणतात, “शिक्षण त्रासदायक नसावं. शिक्षक रिंगमास्टर आहेत आणि वर्ग म्हणजे सर्कशीचा तंबू, असं असता कामा नये”.

image


२०१३ मध्ये लेविटनी लाईफ लॅब (Learning Is Fun and Experiential Lab, LIFE Lab) ची स्थापना केली. या लॅबमध्ये प्रात्यक्षिक आणि खेळांद्वारे शिक्षण या संकल्पनेवर आधारित वर्गांची आखणी करण्यात आली आहे. लॅब उभारताना काटेरी वाटेतून मार्ग काढावा लागल्याचं लेविट सांगतात. उपकरणं आणि प्रतिकृती बनवण्याकरता त्यांनी एका चर्मकाराची मदत घेतली.

उपकरण आणि प्रतिकृती बनवण्याच्या कामात अमितची मोलाच

उपकरण आणि प्रतिकृती बनवण्याच्या कामात अमितची मोलाच


हेवलेट पॅकर्ड संस्थेचा शैक्षणिक शोधाकरता असणारा निधी भारतात लेविट आणि त्यांच्या लाईफ लॅबला मिळाल्यावर त्यांची शोधांची आणि यशाची गाडी वेगाने पुढे सरकू लागली.

पुढच्या टप्प्यात त्यांच्या टीममध्ये चीफ मॉडेल डिझाईनर सामील झाला. लेविटच्या बेडरुममध्ये पहिली प्रयोगशाळा उभारण्यात आली. आज, लाईफ लॅबने १४ सीएसआर भागीदार, अनलिमिटेड इंडिया आणि एक्या यांच्या मदतीने ३ कोटी ३७ लाख ६५ हजार एवढा निधी जमवला.

पुरुषोत्तम, लाईफ लॅबचे चीफ मॉडेल डिझाईनर

पुरुषोत्तम, लाईफ लॅबचे चीफ मॉडेल डिझाईनर


लाईफ लॅबचा मंत्र-

लेविट म्हणतात, “भारतात १४ लाखापेक्षा अधिक शाळा आहेत तर ४४ कोटीहून अधिक शालेय विद्यार्थी आहेत. यातल्या ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थांना प्रयोगशील शिक्षण मिळत नाहीत. ३७.२ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणातून रस मिळत नसल्याने शिकायचचं बंद करतात. आपलं अध्यापनशास्त्र हे अपुरं आहे. पाठांवर जोर आणि समीकरणं समजल्याशिवाय घोकंपट्टी याच तत्त्वावर इथले शिक्षणाचे कारखाने सुरू असतात. २००९ मध्ये ओइसीडीने पीआयएसए आणि टेस्टच्या आधारावर एक चाचणी घेतली होती. त्यात जगातल्या ७४ विभागांमध्ये १५ वर्षीय भारतीय विद्यार्थी ७३ व्या स्थानावर आहे. ही चाचणी आपल्या अध्यापनशास्त्रावरच बोट ठेवते”.

एखाद्या झापडं लावलेल्या घोड्यासारखं आपले विद्यार्थी शिकत असतात. ते पदवी मिळवतात पण त्यांच्यातल्या क्षमता विकसित होत नाही. नासकॉम मिकिन्सीच्या सर्वेनुसार भारतातील फक्त २५ टक्के तांत्रिक आणि १५ टक्के पदवीधारक रोजगाराकरता खऱ्या अर्थाने प्रवीण असतात.

image


लेविटच्या मते सरकारी शाळांमधील शिक्षकांना चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण दिल्यास, ठराविक अंतराने त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा आढावा घेतल्यास, शिक्षकांमधली शिकवण्याची गोडी वाढवल्यास आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये नवीन गोष्टींचा समावेश केल्यास या सर्वाचा एकत्रित परिणाम विद्यार्थांना चांगलं ज्ञानप्राप्तीत होईल. शिकण्याबाबत त्यांच्यात रस निर्माण होईल.


रबरापासून तयार केलेले जल सनियंत्रक

रबरापासून तयार केलेले जल सनियंत्रक


लेविट यांच्या मते, खेळ आणि प्रात्यक्षिकांद्वारे शालेय शिक्षण हा लाईफ लॅबचा मूलमंत्र आहे. शिक्षण हे आनंददायी असलं पाहिजे. यामुळे प्रत्येक मुलामध्ये कोणता ना कोणता चांगला गुण अथवा क्षमता असतेच. शिक्षण आनंददायी असल्यास त्याच्यातल्या विशिष्ट क्षमतांचा विकास होईल, त्यांच्यातली दरी मिटली जाईल.

विज्ञानाच्या मदतीने लाईफ लॅब शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांमधल्या प्रयोगशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न करते. वर्गांमध्ये शोधांना प्रोत्साहन दिल्यास मुलांमध्ये अभिजात गुणांना उत्तेजन मिळतं. आणि मग ते नवीन गोष्टी धुंडाळू लागतात. नवीन गोष्टींचा मागोवा घेऊ लागतात. कसं, का, केव्हा या प्रश्नांची उत्तर शोधू लागतात.

लाईफ लॅबने तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरता त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारीत आतापर्यंत 180 मॉडेल्स तयार केली आहेत. ही मॉडेल्स बनवताना स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक गरज असल्यास पुन्हा ही मॉडेल्स लाईफ लॅबच्या मदतीशिवाय बनवू शकतात. मुलांमधल्या प्रयोगशीलतेला आणि सर्जनशीलतेला यामुळे वाव मिळतो.

मुलांमधल्या प्रतिभाशक्तिला विकसित करण्याकरता त्यांना डिआयवाय विज्ञान संच देण्यात आला आहे. शिक्षकांना आवश्यक तेव्हा प्रशिक्षण दिलं जातं. शिकवण्याच्या पद्धतीतली गमकं सांगितली जातात. नवीन पद्धतीने शिकवताना काय आव्हानं येऊ शकतात, मुलांच्या क्षमता विकसित करण्याकरता शिकवण्यात काय बदल करावेत या बाबींचं प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येतं.

प्रभाव

तीन राज्यातल्या ७६ शाळांमधल्या साधारण ३६,५०० विद्यार्थ्यांना लाईफ लॅबचा फायदा झाला आहे. १० सीएसआर फाउंडेशनचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. या शाळांमधले ६५ टक्के शिक्षक आता शिकवण्याची पारंपरिक पद्धत सोडून एक्टिविटी बेस शिकवत आहेत. या सगळ्याचं प्रतिबिंब विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकात उमटू लागलयं. बीपीसीएलच्या सर्वेनुसार या पद्धतीमुळे विद्यार्थांच्या विज्ञान विषयातले गुण ६९ टक्क्यांनी वाढले. तर इतर विषयांमधले गुण ४४ टक्क्यांनी वाढले.

image


भविष्यातल्या योजना

पुढील काळात लाईफ लॅब विद्यार्थ्यांकरता व्यंगचित्रांची मालिका, खेळ आणि हास्यचित्र यांच्या माध्यमातून शिकण्यातली गंमत वाढवणार आहेत. तंत्रज्ञानाच्या वापराने डेमो मॉडेल्स बनवून, एक्टिविटी सेटच्या आधारे मुलांना तंत्रज्ञान समजायला सोप करण्याच्यादृष्टीने त्यांचं काम सुरू आहे. लेविट हे एक्युमन संस्थेचे फेलोही आहेत. नुकतीच जानेवारी महिन्यात त्यांना अशोका फेलोशीपही मिळाली आहे. लेविट म्हणतात, “लाईफ लॅब टीमच्या कठोर परिश्रमांमुळेच, आमच्या कामाची दखल घेऊन मला या फेलोशीप मिळाल्या आहेत”. लेविट यांना भारतातल्या प्रत्येक राज्यात लाईफ लॅबला घेऊन जायचं आहे. एक हजार शाळांसोबत काम करण्याचं त्यांचं उद्दीष्ट आहे.

यासारख्याच आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा 

आता वाचा संबंधित कहाण्या :

लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे लक्ष्य

कॉर्पोरेट कारकीर्द सोडून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवण्यास झटणारा अभियंता 'मधूकर बानुरी'

विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारे शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात : 'आयटीच'


लेखिका – स्निग्धा सिन्हा

अनुवाद – साधना तिप्पनाकजे