व्यावसायाभिमुख शिक्षण घेऊनही शेतीकडे वळलेल्या युवा शेतकऱ्याची प्रयोगशीलतेतून दुष्काळावर मात

व्यावसायाभिमुख शिक्षण घेऊनही शेतीकडे वळलेल्या युवा शेतकऱ्याची प्रयोगशीलतेतून दुष्काळावर मात

Saturday November 21, 2015,

4 min Read

नैसर्गिक संकटांमुळे शेतीमध्ये होणारे नुकसान पाहून शेतकरी कुटुंबातील तरुण दिवसेंदिवस दुसऱ्या व्यवसायांकडे वळताना किंवा नोकरीचा मार्ग पत्करताना दिसतात. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील एकोडी सागज गावचा संदीप तांबे मात्र याला अपवाद ठरला आहे. २००७ साली १२ वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे कामधंद्याच्या दृष्टीने त्याने डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स केले. मात्र घरची शेती आणि जनावरांमध्येच जीव गुंतलेल्या संदीपने शेतीच करण्याचे निश्चित केले. संदीपने भविष्याचा मार्ग निश्चित केला खरा, मात्र अशातच निसर्गाने दुष्काळाच्या रुपात त्याच्या मार्गात अडथळा निर्माण केला. घरची ३६ एकर शेती होती. यामधील २४ एकर जमिनीवर तांबे कुटुंब हंगामी बागायती करीत होते. तर १२ एकर जमीन केवळ घरच्या जनावरांसाठी चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी वापरली जायची. दुष्काळाने मात्र शेतीच्या नुकसानीबरोबरच जनावरांच्या पोटापाण्याचाही प्रश्न उभा केला. व्यवसायाभिमुख शिक्षण घेतलेल्या संदीपला या परिस्थितीत आपला शेती करण्याचा निर्णय बदलता आला असता. मात्र या युवा शेतकऱ्याने दुष्काळावर मात करण्यासाठी आधुनिकतेची कास धरत आणि परिस्थितीचा विचार करुन शेती आणि शेती संबंधित क्षेत्रातच पुढची पाऊलं टाकायचे ठरविले.

image


दुष्काळी परिस्थितीत शेतीही होणार नव्हती आणि जनावरांसाठी चाराही मिळणार नव्हता. यावर उपाय म्हणून संदीपने त्यावेळी शेळीपालनाचा व्यवसाय करण्याचे ठरविले. मात्र गुरा-ढोरांच्या तुलनेत शेळ्यांना चारा कमी लागणार असला तरी तो मिळवायचा कुठून हा प्रश्न होताच. अशातच संदीपला त्याच्या बहिणीच्या नवऱ्याने एका कृषी प्रदर्शनात पाहिलेल्या चारा निर्मिती तंत्राबाबत सांगितले आणि संदीपने त्या पद्धतीने चारा निर्मिती करण्याचा ध्यास घेतला. “कृषी विज्ञान केंद्रात जाऊन मी चारा निर्मितीच्या तंत्रांबाबत माहिती घेतली. मंडळ कृषी अधिकारी विष्णू मोरे आणि कृषी सहाय्यक मीना पंडित यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. त्याने चारा निर्मितीची तीन तंत्र सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी हायड्रोपोनिक्स, मूरघास आणि ऍझोला पद्धतीने चारा निर्मिती करायला सुरुवात केली. सुरुवातीला हायड्रोपोनिक्स पद्धतीने मका चाऱ्याचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली,” संदीप सांगतो.

यापद्धतीने चारा निर्मितीकरिता आवश्यक रॅक ( मांडणी) तयार करण्यासाठी संदीपने टाकाऊतून टिकाऊचा प्रयोग केला. टाकाऊ लाकडांपासून शेडचा सांगाडा बनवून त्यावर शेडनेटची जाळी लावली. मित्राने भंगारात काढलेल्या रॅकमध्ये ऑफीस ट्रे बसवले, अतिरिक्त पाणी निघून जाण्यासाठी त्यांना सहा-सात छिद्रे पाडली, पाणी फवारणीसाठी शेतातला पंप शेडमध्ये फिरविला आणि संदीपची चारा निर्मितीसाठीची प्राथमिक तयारी पूर्ण झाली. हळूहळू संदीप रॅकचे कप्पे वाढवित गेला. आज या मांडणीच्या आधारावर संदीप दिवसाला ५० किलो चाऱ्याचे उत्पादन घेत आहे. “हायड्रोपोनिक्स पद्धतीने मका चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी दररोज मक्याचे दाणे पाण्यात २४ तास भिजवावे लागतात. त्यानंतर ते अंकुरण्यासाठी २४ -३६ तास गोणपाटामध्ये गुंडाळून ठेवावे लागतात. हे अंकुर त्यानंतर 1x1.5 किंवा 3 x2 च्या ट्रे मध्ये पसरायचे. छोट्या ट्रेमध्ये साधारण अर्धा किलो अंकुरलेला मका पसरविता येतो. 3 x2च्या ट्रेसाठी जवळपास दोन किलो अंकुरलेले दाणे लागतात. या अंकुरलेल्या दाण्यांवर दोन तासांच्या अंतराने दिवसातून सहा ते सात वेळा पाणी फवारायचं. सात ते दहा दिवस पाणी फवारणी केल्यावर छोट्या ट्रेमधून साडे तीन ते चार किलो चारा मिळतो, मोठ्या ट्रेमधून १८ किलोपर्यंत चारा मिळतो. विशेष म्हणजे या चारानिर्मितीसाठी पाणी कमी लागतं. २०० लीटर पाण्यामध्ये १०० किलो चारा निर्मिती होऊ शकते,” असं संदीप सांगतो.

image


हायड्रोपोनिक्स तंत्राच्या माध्यमातून संदीपच्या २० शेळ्यांना आज पुरेसा चारा उपलब्ध होत असला तरी संदीप एवढ्यावरच शांत बसलेला नाही. भविष्यात चारा टंचाई भासू नये म्हणून त्याने मूरघास पद्धतीचा वापर केला. “मूरघास पद्धतीमध्ये मक्याच्या हिरव्या पाल्याची कुट्टी करुन ती पॉलिथीन बॅगमध्ये ४५ दिवस भरुन ठेवावी लागते. त्यामध्ये समप्रमाणात गुळाचं पाणी आणि थो़डं मीठ घालून ठेवायचं. हा चारा पुढे ३ वर्षापर्यंत आपण असाच ठेऊ शकतो,”संदीप सांगतो. प्रति बॅग ५०० किलो मुरघास अशा जवळपास सहा बॅग तयार केल्याने संदीपची चाऱ्याची चिंता मिटली आहे.

image


संदीप पुढे सांगतो, “हायड्रोपोनिक्स आणि मूरघासबरोबरच मी ऍझोला तंत्राचाही प्रयोग केला आहे. ऍझोला ही पाण्यावर वाढणारी वनस्पती आहे. कृषी विज्ञान केंद्रामध्ये माहिती घेण्यासाठी गेलो तेव्हा नमुना म्हणून दिलेल्या साधारण २५० ग्रॅम ऍझोला वनस्पतीचाच वापर करुन मी ऍझोला निर्मिती करायला सुरुवात केली. यासाठी 8x3 फूटाचे १ फूट खोलीचे तीन वाफे तयार केले. पाणी जमिनीत जिरु नये म्हणून तळाशी प्लॅस्टीक टाकले. त्यामध्ये आठ ते दहा किलो माती, तीन किलो शेण, २५० ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि ऍझोला कल्चर टाकले आणि त्यामध्ये ६ इंचापर्यंत पाणी भरले. यामध्ये साधारण १५दिवसापासून वनस्पती निर्मिती होते. प्रत्येक वाफ्यातून दररोज १ किलो उत्पादन मिळते. हे उत्पादन सुरुच रहाते. केवळ वाफ्यातले पाणी सहा महिन्यांनंतर बदलावे लागते.” ऍझोला वनस्पती शेळ्या आणि गायींसाठी पौष्टीक असून त्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याबरोबरच त्यांची प्रजनन क्षमता आणि दूध द्यायचे प्रमाण वाढत असल्याचे संदीप सांगतो.

image


संदीप स्वतः चारा निर्मिती करण्याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांनाही चारा निर्मितीबाबत मार्गदर्शन करित असतो. आपल्या शेतकरी बांधवांसमोरचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांना ऍझोला कल्चर मोफत देण्याची तयारी दाखवून संदीप शेतकऱ्यांना चारानिर्मितीसाठी प्रेरित करित असतो. या युवा प्रगतीशील शेतकऱ्याकडून प्रेरणा घेऊन आज परिसरातील १० टक्के शेतकऱ्यांनी चारा निर्मिती सुरु केली आहे.

शेती करताना दूरदृष्टी बाळगणाऱ्या संदीपला येत्या काळात शेळ्यांबरोबरच गोपालन करुन दुग्ध व्यवसाय सुरु करायचा आहे. तसेच उपलब्ध जमिनीवरील ३ एकर जमिनीवर शिवरी लावून त्याची लाकडे एखाद्या कंपनीला विकायची आणि पाला शेळ्यांच्या चाऱ्यासाठी वापरायचा अशीही त्याची योजना आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टी ठेवणारा प्रयोगशील संदीप खरोखरच प्रेरणादायी आहे.

    Share on
    close