मानवी हस्तक्षेपामुळे उद्भवलेल्या समस्या सोडविणारी झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती, एक वरदान

मानवी हस्तक्षेपामुळे उद्भवलेल्या समस्या सोडविणारी झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती, एक वरदान

Wednesday March 30, 2016,

6 min Read

रासायनिक आणि सैंद्रिय शेती हे शेतीचे दोन प्रकार आपल्याला आजवर माहिती होते. रासायनिक शेतीमध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे अन्नपदार्थ आणि जमिन दोघांवरही होणारे दुष्परिणाम काही वर्षांपूर्वी आपल्या लक्षात आले आणि बळीराजा हळूहळू सैंद्रिय शेतीकडे वळला. शेणखत, कम्पोस्ट, वर्मीकल्चर यांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या सैंद्रिय शेतीमुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि जमिनीचा पोत राखण्यात मदत होऊ लागली असली, तरी बळीराजाच्या समस्या सुटलेल्या नाहीत. शेतीसाठी लागणारा पैसा आणि निसर्गाची साथ याचं गणित अनेकदा जुळता जुळत नाही आणि शेतकऱ्याच्या हाती लागते ती केवळ निराशा. शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांवर रामबाण उपाय ठरु शकणारा आणि भरघोस, उत्तम दर्जाचे उत्त्पन्न देणारा पर्याय म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेती. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्यांच्या बिकट प्रश्नाला सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्रातल्याच एका शेतकऱ्याने संशोधित केलेले हे लाख मोलाचे तंत्र आहे, ज्याचा उपयोग आज महाराष्ट्रेतर राज्यात सर्रास होताना दिसतोय.

साधारणपणे शेतकरी वर्ग म्हणजे शहरापासून दूर खेड्यात राहून शेतात राबणारे अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. कारण उच्चशिक्षित माणूस शेती करत आहे हे चित्र तसं विरळच. किंबहुना शिक्षण आणि शेती ही दोन टोकं आहेत असं एक अलिखित समीकरण कित्येक वर्षांपासून निर्माण झालेलं आहे. एखादा शेतकऱ्याचा मुलगा खूप शिकला की तो शहराकडे नोकरी शोधायला निघतो. त्याने शेतामध्ये राबणं म्हणजे शिक्षण वाया घालवणं असं समजलं जातं. झिरो बजेट (अध्यात्मिक) शेतीने मात्र आजवर नकळत मांडली गेलेली ही सर्व समीकरणंही बदलून टाकली आहेत. या शेती तंत्रामुळे आणि त्याद्वारे मिळणाऱ्या नफ्यामुळे आज आयटी क्षेत्रामध्ये मोठमोठे पगार घेणारा तरुण वर्गही शेतीकडे वळला आहे, या शेती तंत्राच्या प्रचार-प्रसारासाठी काम करण्याबरोबरच स्वतः शेतात राबत आहे. यामध्येच या तंत्राच्या सफलतेचे परिमाण दडलेले आहे.


image


या शेती तंत्राचे जनक असलेले अमरावती येथील सुभाष पाळेकर हे स्वतः एमएससी (ऍग्रीकल्चर) पर्यंत पदव्युत्तर शिक्षण घेतलेले एक जागृक शेतकरी. सुरुवातीला जवळपास दहा वर्ष प्रचलित पद्धतीने खतांचा वापर करुन त्यांनी शेती केली. मात्र ७-८ वर्ष चांगले उत्पन्न मिळाल्यानंतर उत्पन्नावर परिणाम होऊ लागला. खताची मात्रा वाढविण्याचा सल्ला त्यांना मिळाला, मात्र त्यांना तो पटला नाही. अशातच त्यांच्या मनात जंगलातील झाडांविषयी विचार आला. झाडं अन्नद्रव्यावर वाढतात. मात्र जंगलातील वृक्षवेलींना हे अन्नद्रव्य पुरवायला तिथे माणूस नसूनही ती जोमाने वाढतात. याचाच अर्थ माणूस हा या प्रक्रियेत केवळ सहाय्यक आहे, निर्माणकर्ता नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि निर्माणकर्त्या निसर्गाच्या साथीने शेती करण्याचे त्यांनी निश्चित केले. नैसर्गिकरित्या शेती करण्यासाठी काय करावे लागेल हे शोधण्यासाठी त्यांनी १९८८ ते १९९६ या आठ वर्षात सतत नवनवे प्रयोग केले आणि त्यातूनच निसर्ग, ज्ञान-विज्ञान आणि अध्यात्मावर आधारित झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेतीचे तंत्र उदयास आले. आपल्याजवळ असलेल्या गोष्टींमधूनच उत्पादन मिळवून देणाऱ्या या पद्धतीत प्रचलित शेती पद्धतींच्या तुलनेत १० टक्के पाणी आणि १० टक्केच वीज लागते. जमिनीचा पोत सुधारणाऱ्या, पाणी व वीजेची बचत करणाऱ्या आणि पौष्टीक-सकस अन्नधान्य निर्मितीबरोबरच ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालू शकणाऱ्या या तंत्राचा त्यांनी मानवहिताच्या दृष्टीने प्रचार-प्रसार करायला सुरुवात केली. विविध शिबीरे घेऊन या कृषी-तंत्राबाबत जागृती निर्माण केली. त्यांना त्यांच्या कृषीक्षेत्रातील या योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारही जाहीर झाला आहे.

आज भारतात जवळपास ६० लाख शेतकरी या तंत्राचा वापर करुन शाश्वत शेती करत आहेत. यामध्ये अनेक उच्चशिक्षितांचा समावेश आहे. पुण्यात इन्फोसिसमध्ये टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट म्हणून कार्यरत असलेले संतोष इर्लापल्ले हे अशांपैकीच एक. या शेती पद्धतीविषयी संतोष सांगतात, “ही शून्य खर्चात होणारी शाश्वत शेती आहे. केवळ एका देशी गाईच्या सहाय्याने ३० एकर शेती करता येते. या पद्धतीत देशी गाईच्या शेण आणि गोमूत्राचा प्रामुख्याने वापर होतो. बीजामृत, जीवामृत, वापसा आणि आच्छादन हे झिरो बजेट नैसर्गिक (अध्यात्मिक) शेतीचे चार मुख्य आधारस्तंभ आहेत. देशी गाईचं शेण, गोमुत्र, चुना किंवा चुनखडीपासून बीजामृत तयार केलं जातं. कीड, रोग नियंत्रणासाठी बीजामृताचा उपयोग होतो. देशी गाईचं शेण, गोमुत्र, काळा गूळ, कुठलंही गर असलेलं फळ, बेसन आणि बांधावरची माती वापरुन जीवामृत तयार करतात. हे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. जीवामृत हे खरं तर खत नसून विरजण आहे. जमिनीत साचून राहिलेली रासायनिक आणि सैंद्रिय खतं आणि त्यांचे दुष्परिणाम यामुळे नाहीसे होतात.”

ते पुढे सांगतात, “मृदा आच्छादन, काष्ठा आच्छादन आणि सजीव आच्छादन असे आच्छादनाचे तीन प्रकार आहेत. मृदा आच्छादनामध्ये नांगरणीसारखी जमिनीची मशागत करतात, काष्ठा आच्छादन म्हणजे शेतातील पिकांच्या जमिनीवर पडलेल्या अवशेषांचं पांघरुण आणि सजीव आच्छादन म्हणजे मुख्य पिकामधील आंतरपिकं आणि मिश्रपिकं. आच्छादनामुळे जमीन सुपीक होते, तसेच जमिनीचा ओलावा जास्त काळ टिकून रहातो. त्यामुळे पाण्याची ९० टक्के बचत होते. यामुळेच दुष्काळग्रस्त भागातही शेतीची ही पद्धत टिकाव धरु शकते. या पद्धतीमुळे जमिनीची आणि झाडांची दोघांचीही ताकद वाढते याचा प्रत्यय आम्हाला गारपीट झाली तेव्हा आला. इतर शेतकऱ्यांच्या गव्हाचे नुकसान झाले, मात्र नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गहू त्या परिस्थितीतही ताठ उभा होता.”


image


संतोष यांनी आपल्या पुण्यातील घराच्या परसबागेत या पद्धतीचा प्रयोग करुन बघितला. आज त्यांच्या परसबागेतील एका गुलाबाच्या झाडाला एकाचवेळी आलेली २० हून जास्त गुलाबं, पपईच्या झाडाला लगडलेल्या मोठमोठ्या पपया, लांबलचक दुधी भोपळा, लालबूंद डाळींब सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय आहेत. संतोष यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती पद्धतीच्या सहाय्याने केवळ परसबागच फुलवलेली नाही, तर औरंगाबाद येथे तीन एकर आणि लातूर येथ पाच एकर जमीन विकत घेऊन त्यावर ते शेती करतात. “यावर्षी मी १५ गुंठे जमिनीमध्ये नऊ क्विंटल गव्हाचं उत्पादन घेतलं. त्याशिवाय या पद्धतीने उत्पादित केलेल्या ऊसापासून बनवित असलेल्या गुळालाही बाजारात खूप मागणी आहे. या पद्धतीत आम्ही आंतरपिक घेत असल्यामुळे सुरुवातीला मुख्य पिकासाठी केलेला खर्च सहाय्यक पिकामधूनच निघतो. त्याशिवाय वर्षभर उत्पन्न सुरु रहातं,” संतोष सांगतात.

सुभाष पाळेकर यांनी उभारलेली नैसर्गिक शेतीची चळवळ संतोष आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने महाराष्ट्रात विशेष करुन पुणे आणि औरंगाबाद येथे पुढे नेत आहेत. इन्फोसिसच्या इकोफार्मिंग प्रकल्पाचे सदस्यत्व घेऊन त्याद्वारे कंपनीच्या गच्चीवर नैसर्गिक शेती पद्धतीने बाग फुलविण्याचे कामही संतोष यांनी हाती घेतले आहे. त्याचबरोबर आज पुण्यातील आयटी क्षेत्रातील अनेक तरुणांना या शेती पद्धतीविषयी मार्गदर्शन करुन त्यांना नैसर्गिक शेतीपद्धतीद्वारा शेतीमध्येही लक्ष घालण्यास प्रवृत्त केले आहे.

संतोष सांगतात, “४-५ वर्षांपूर्वी माझ्या आईला कॅन्सर झाला तेव्हा मी त्यामागच्या कारणांचा शोध घेऊ लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की शेतामध्ये वापरली जाणारी किटकनाकं ही अन्नपदार्थांच्या माध्यमातून नकळत आपल्या शरीरात जातात. ज्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्याचदरम्यान नैसर्गिक शेती पद्धतीशी माझी ओळख झाली आणि मी नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याचं आणि या शेती पद्धतीचा प्रचार-प्रसार करण्याचं ठरवलं. दोन वर्षांपूर्वी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा ४०-४५ शेतकरी माझ्याबरोबर होते. आज ही संख्या वाढली आहे. आज पुण्यातले आयटी क्षेत्रातले जवळपास २० -२५ तरुण दर आठवड्याला दोन दिवस आपल्या गावी जाऊन स्वतः शेतामध्ये काम करतात. आयटी इन्जिनिअर्स शेती करु लागले आहेत याहून मोठं काय असावं? या शेतीपद्धतीच्या प्रचार-प्रसारासाठी आम्ही सोशल मीडियाचाही वापर करुन घेतला आहे. आज आमच्या फेसबुक पेजला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. जगभरातून जवळपास २४,००० लोक या पेजशी जोडले गेले आहेत. त्याशिवाय प्रत्येक जिल्ह्यावार आमचा व्हॉट्सऍप ग्रुप आहे. या ग्रुपवरही नैसर्गिक शेतीविषयीची माहिती आम्ही मराठीमध्ये पुरवित असतो. पुण्यातील वॉट्सऍप ग्रुपवर जवळपास १२० सदस्य आहेत. तर औरंगाबादला १०० हून जास्त सदस्यसंख्या असलेले दोन ग्रुप आहेत.”


image


ते पुढे सांगतात, “या शेतीमालाला ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बाजारात विक्रीस आणलेला माल लगोलग विकला जातो आहे. या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचावा, जेणेकरुन ग्राहकांना चांगले अन्नपदार्थ मिळावे आणि शेतकऱ्यांनाही नफा व्हावा याकरिता आम्ही शेतकऱ्यांना थेट विक्री करण्यास प्रवृत्त करत आहोत. त्याकरिता या शेतकऱ्यांसाठी शेतकरी बाजारही सुरु करत आहोत.”

या शेती पद्धतीचे प्रवर्तक सुभाष पाळेकरांविषयी बोलताना संतोष सांगतात, “पाळेकर सरांना आज इतर राज्यात लोक देव मानतात. या शेती पद्धतीविषयी त्यांची नऊ-दहा भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आंध्रप्रदेशमध्ये सरांची अनेक शिबीरं होतात. आंध्रप्रदेश सरकारने तर या शेती पद्धतीला स्टेट मॉडेल म्हणून जाहीर केलं आहे. आंध्रप्रमाणेच केरळ, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश येथेसुद्धा अनेक शेतकरी झिरो बजेट नैसर्गिक शेती पद्धतीने शेती करत आहेत. महाराष्ट्र सरकारने मात्र अजून याची दखल घेतलेली नाही.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आयटी उद्योगातून आलेल्या कर्मचाऱ्यांची शेती उद्योगात यशस्वी इनिंग- अक्षयकल्प फार्म्स

सॉफ्टवेअर अभियंत्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणला आशेचा नवा किरण

एका संगणक अभियंत्याने स्व:बळावर पर्यटनासाठी विकसित केले 'ईको टूरीझम'

    Share on
    close