कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर करणा-या अरूणिमा यांच्या इच्छाशक्तीला सलाम

कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर करणा-या अरूणिमा यांच्या इच्छाशक्तीला सलाम

Thursday October 15, 2015,

10 min Read

भारत सरकारने ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ज्या लोकांची नावे पद्म पुरस्कारांसाठी घोषित केली त्या नावांमध्ये एक नाव अरूणिमा सिन्हा यांचेही आहे. उत्तर प्रदेशच्या अरुणिमा यांची ‘पद्मश्री’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ‘पद्मश्री’ हा भारत सरकारद्वारे दिला जाणारा चौथा सर्वात मोठा नागरी सन्मान आहे. भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण नंतर पद्मश्री हाच सर्वात मोठा सन्मान आहे. कोणत्याही क्षेत्रात असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्म पुरस्कार दिले जातात. क्रीडा क्षेत्रात असामान्य आणि विशिष्ट सेवा दिल्याबद्दल अरूणिमा यांची ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अरूणिमा सिन्हा या जगात सर्वात उंच असलेला एव्हरेस्ट हा पर्वत सर करणा-या जगातील पहिल्या अपंग महिला ठरल्या आहेत. २१ मे २०१३ या दिवशी सकाळी दहा वाजून ५५ मिनिटांनी अरूणिमा यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावून आपल्या वयाच्या २६ व्या वर्षी जगातील सर्वात पहिल्या अपंग महिला गिर्यारोहक होण्याचा मान पटकावला आहे.

क्रीडा क्षेत्रात ज्या प्रमाणे अरुणिमा यांची कामगिरी असामान्य आहे, अगदी त्याच प्रमाणे त्य़ांचे जीवन देखील असामान्य असेच आहे.

अरूणिमा यांना काही गुंडांनी चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिले होते. अरूणिमा यांनी त्या गुंडांना आपल्या गळ्यातील सोन्याची चेन खेचू दिली नव्हती. यामुळे रागावून त्या गुंडांनी त्यांना चालत्या गाडीबाहेरच फेकून दिले. या दुर्घटनेत गंभीरपणे जखमी झालेल्या अरूणिमा यांचे प्राण तर वाचले, मात्र त्यांना जिवंत ठेवता यावे यासाठी डॉक्टरांना त्यांचा डावा पाय कापावा लागला. आपला एक पाय गमावल्यानंतर देखील राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळणा-या अरूणिमा यांनी हार पत्करली नाही. त्यांनी आपल्यातला उत्साह कायम टिकवून ठेवला. भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि सर्वात तरूण गिर्यारोहक अर्जुन वाजपेयी यांच्यासंदर्भात वाचून अरूणिमा यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. त्यानंतर एव्हरेस्ट सर करणा-या पहिल्या भारतीय महिला बछेंद्री पाल यांच्याकडून मदत आणि प्रशिक्षण घेऊन त्यांनी आपली एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली.

एव्हरेस्ट सर करण्याअगोदर अरूणिमा यांनी आपल्या जीवनात अनेक चढउतार पाहिले. अनेक समस्यांचा सामना केला. कितीतरी वेळा अपमान सहन केले. गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून घाणेरडे आणि खोटेनाटे आरोप सहन केले. मृत्यूशी देखील संघर्ष केला. अनेक विपरित परिस्थितींशी दोन हात केले. परंतु, कधीही हार मानली नाही. आपल्या कमतरतांना ही त्यांनी आपली शक्ती बनवली. मजबूत इच्छाशक्ती, परिश्रम, संघर्ष आणि हार न मानण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी हे असामान्य यश प्राप्त केले. आपले मनोबल जर उच्च असेल तर उंचीने काही फरक पडत नाही. माणूस आपल्या दृढ संकल्प, प्रखर बुद्धिमत्ता आणि परिश्रमाने उज्ज्वल यश प्राप्त करून घेऊ शकतो हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखरावर पोहोचून अरूणिमा यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांनी केलेला संघर्ष आणि प्राप्त केलेल्या यशामुळे अरूणिमा जगातील अनेक लोकांसाठी एक प्रेरणा बनल्या आहेत.

image


सर्वसामान्य महिला किंवा तरूणींच्या आयुष्यात घडतात तशा प्रकारच्या सर्वसामान्य घटना अरूणिमा यांच्या आयुष्यात घडलेल्या नाहीत.

आपल्या शौर्याचे अद्भूत उदाहरण जगासमोर ठेवणा-या अरूणिमा यांचे कुटुंब मुळचे बिहारचे. त्यांचे वडिल सैन्यात होते. सहाजिकच त्यांच्या बदल्या होत असत. याच बदल्यांचा एक भाग म्हणून त्यांना उत्तरप्रदेशातील सुलतानपूर येथे यावे लागले होते. परंतु, सुलतानपूरमध्ये अरूणिमा यांच्या कुटुंबावर समस्यांचा डोंगरच कोसळला. अरूणिमा यांच्या वडिलांचे निधन झाले. हसत्या खेळत्या घरात दु:खाची छाया पसरली.

वडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी अरूणिमा यांचे वय साधारण वर्षाचे होते. मुलीचे शिक्षण आणि पालनपोषण करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली. समस्यांनी घेरलेल्या या काळात त्यांच्या आईने कधी हिंमत सोडली नाही. योग्य आणि ठोस निर्णय घेतले. अरूणिमा, त्यांची मोठी बहिण आणि धाकटा भाऊ अशा आपल्या तीन मुलांना घेऊन सुलतानपूरहून त्या आंबेडकर नगरला आल्या. आंबेडकर नगरमध्ये आईला आरोग्य विभागात नोकरी मिळाली. या नोकरीमुळे त्यांच्या मुलांचे पालनपोषण व्यवस्थित होऊ लागले. आपली बहिण आणि भावासोबत अरूणिमासुद्धा शाळेत जाऊ लागल्या. शाळेत असताना अरूणिमा यांना अभ्यासात कमी, परंतु खेळांमध्ये अधिक रस निर्माण झाला. दिवसागणिक त्यांची खेळांमधील रूची वाढत गेली. आता त्या चँपियन बनण्याचे स्वप्न पाहू लागल्या.

ओळखीच्या लोकांनी अरूणिमा यांच्या खेळण्यावर हरकत घेतली. परंतु आई आणि मोठ्या बहिणीने अरूणिमा यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू दिले. अरूणिमा यांना फुटबॉल, व्ह़ॉलीबॉल आणि हॉकी या खेळांमध्ये अधिक रूची होती. जेव्हा संधी मिळायची तेव्हा त्या थेट मैदान गाठून भरपूर खेळत असत. अरूणिमा यांचे मैदानात खेळणे शेजार-पाजारच्या मुलांना मुळीच आवडत नसायचे. ते अरूणिमाला वेगवेगळे टोमणे मारत असत. त्यांना छेडण्याचा देखील प्रयत्न करत असत. परंतु, अरूणिमा सुरूवातीपासूनच हुशार होत्या आणि आईने भरपूर लाड केल्यामुळे बंडखोर स्वभावाच्या देखील झाल्या होत्या. अरूणिमा मुलांना आपली मनमानी करू देत नसत. छेडछाड केल्यानंतर अरुणिमा त्या मुलांना आपले असे काही रूप दाखवायच्या की ती मुले घाबरून दूर पळून जात. एकदा तर त्यांच्या मोठ्या बहिणीची एका व्यक्तीने छेड काढल्यामुळे अरूणिमा यांनी त्याची भर बाजारात चांगलीच धुलाई केली होती.

त्याचे झाले असे, की अरूणिमा आपल्या मोठ्या बहिणीसोबत सायकलने कुठेशा जात होत्या. मध्येच एका ठिकाणी थांबून मोठी बहिण कुणासोबत तरी बोलू लागली. अरूणिमा थोड्या पुढे गेल्या आणि थांबून आपल्या बहिणीची वाट बघू लागल्या. याच दरम्यान काही सायकलस्वार मुले त्यांच्या बाजूने गेली. त्या मुलांनी अरूणिमा यांना त्यांच्यासाठी रस्ता सोडण्यास सांगितले. परंतु, अरूणिमा यांनी त्या मुलांना बाजुच्या मोकळ्या जागेतून जायला सांगितले आणि त्या आपल्या जागेवरच उभ्या राहिल्या. यावरून त्या मुलांमध्ये आणि अरूणिमा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. इतक्यात त्यांची मोठी बहिण तिथे आली. रागाच्या भरात एका मुलाने हात उचलला आणि त्याने अरुणिमा यांच्या मोठ्या बहिणीच्या गालावर थप्पड मारली. यामुळे अरुणिमा यांना भयंकर राग आला. या मुलाला पकडून मारावे असा विचार त्यांनी केला. मात्र गर्दीचा फायदा घेत तो मुलगा आणि त्याचे साथीदार पळून गेले. परंतु आपण त्या मुलाला सोडायचे नाही असा अरूणिमा यांनी निश्चय केला. दोघी बहिणी त्या मुलाच्या शोधात निघाल्या. शेवटी तो मुलगा त्यांना एका पानाच्या दुकानाजवळ दिसला. अरूणिमा यांनी त्या मुलाला पकडून चांगलेच धुतले. या धुलाईमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. अनेक मुलांनी त्याला सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केला. परंतु अरूणिमा मुळीच मानल्या नाहीत. जेव्हा त्या मुलाच्या आई-वडिलांनी तिथे येऊन आपल्या मुलाच्या चुकीबद्दल माफी मागितली तेव्हा कुठे अरुणिमा यांनी त्या मुलाला सोडून दिले. मात्र या घटनेचा परिणाम असा झाला की त्यानंतर मग वस्तीतल्या मुलांनी मुलींसोबत दुर्व्यवहार करणे बंद केले. यानंतर अरूणिमा यांचे शौर्य आणि लढवय्या प्रवृत्तीची चर्चा संपूर्ण वस्तीमध्ये होत राहिली.

दिवस जाऊ लागले. दरम्यानच्या काळात अरूणिमा यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या प्रतिभेने अनेक लोकांना प्रभावित केले. त्या व्हॉलीबॉल आणि फुटबॉल भरपूर खेळल्या. कितीतरी पुरस्कार प्राप्त केले. त्यांना राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्येही खेळण्याच्या संधी मिळाल्या.

दरम्यानच्या काळात अरुणिमा यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले. लग्नानंतर देखील मोठ्या बहिणीने अरूणिमा यांची भरपूर काळजी घेतली. मोठ्या बहिणीने केलेली मदत आणि दिलेल्या प्रोत्साहनामुळेच अरूणिमा यांनी खेळांसोबत आपला अभ्यास सुरू ठेवला. पुढे त्यांनी कायद्याचा अभ्यास करून एलएलबीची पदवी देखील प्राप्त केली.

आपल्या कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषण करण्याच्या कामी आईला मदत करता यावी या उद्देशाने अरूणिमा यांनी आता नोकरी करण्याचा विचार केला. नोकरी मिळावी यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी अर्ज केले.

या दरम्यान त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, अर्थात सीआयएफएसच्या कार्यालयातून कॉल आला. अधिका-यांची भेट घेण्यासाठी त्या नॉयडाला रवाना झाल्या. अरूणिमा यांनी पद्मावती एक्सप्रेस पकडली. एका जनरल डब्यात खिडकीजवळच्या सीटवर त्या बसल्या. काही वेळानंतर काही गुंड तरूण तिथे आले आणि त्यातील एकाने अरूणिमा यांच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी खेचण्याचा प्रयत्न केला. अरूणिमा यांना राग आला आणि त्यांनी त्या गुंडाचा प्रतिकार करणे सुरू केले. त्या गुंडाचे इतर गुंड सहकारी त्याच्या मदतीला पुढे आले आणि त्यांनी अरुणिमा यांना पकडले. परंतु, अरूणिमा यांनी मुळीच हार न मानता त्या गुंडांसोबत झुंजत राहिल्या. परंतु त्या गुंडांनी अरूणिमा यांना आपल्यावर भारी होऊ दिले नाही. इतक्यात त्या काही गुंडांनी त्यांना इतक्या जोरात लाथा मारल्या की त्या चालत्य़ा ट्रेनच्या बाहेर फेकल्या गेल्या. अरूणिमा यांचा एक पाय ट्रेनखाली आला आणि त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. रात्रभर अरूणिमा ट्रेनच्या रूळाजवळच पडून होत्या. जेव्हा सकाळी गावातील काही लोकांनी त्यांना या स्थितीत पाहिले, तेव्हा ते लोक त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. अरूणिमा यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्यांचा डावा पाय कापावा लागला.

या दुर्घटनेची माहिती प्रसारमाध्यामांना मिळाल्यानंतर याबाबतच्या ठळक बातम्या वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सवर आल्या. प्रसारमाध्यमे आणि महिला संघटनांच्या दबावामुळे चांगला इलाज व्हावा यासाठी सरकारला अरूणिमा यांना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवावे लागले.

सरकारतर्फे अनेक घोषणा देखील केल्या गेल्या. तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी अरूणिमा यांना नोकरी देण्याची घोषणा देखील केली. क्रीडा मंत्री अजय माकन यांनी सुद्धा मदतीची घोषणा केली. ‘सीआयएसएफ’ने सुद्धा नोकरी देण्याची घोषणा केली. परंतु, या घोषणांनंतर फार काही होऊ शकले नाही. उलट काही लोकांनी अरूणिमा यांच्याबाबत अनेक प्रकारच्या खोट्या गोष्टींचा प्रचार करणे सुरू केले. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. अरूणिमा या कधीही राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या नाहीत, त्यामुळे त्या सरकारी नोकरीस पात्र नाहीत असे म्हणत काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही, तर अरूणिमा इंटरची परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झालेल्या नाहीत अशी अफवासुद्धा काही लोकांनी पसरवली. दुर्घटना झाली तेव्हा अरूणिमा या कोणाबरोबर तरी ट्रेनमधून पळून जात होत्या अशा प्रकारच्या गोष्टी पसरवून काहींनी तर दुष्टपणाची हद्दच पार केली.

अरूणिमा याचे लग्न झाले असल्याचेही काही गुंडांनी आरोप केले. अरूणिमा यांनी ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेही एका अधिका-याने म्हटले. दुस-या एका अधिका-याने शंका उपस्थित करत म्हटले, की अरूणिमा रूळ ओलांडताना ट्रेनखाली आल्या.

अशा प्रकारची वक्तव्ये प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा येऊ लागली. या अशा वक्तव्यांमुळे अरूणिमा यांना आश्चर्यही वाटले आणि त्यांना त्याचा त्रासही झाला. आरोप लावणारांना त्या आपल्या शैलीत उत्तर देऊ पाहत होत्या. परंतु त्या असहाय्य होत्या. एक पाय कापून टाकण्यात आला होता आणि त्या शारीरिकदृष्ट्या शक्तीहीन होऊन बिछान्यावर पडून होत्या. त्यांना बरेच काही करावे असे वाटत होते. परंतु त्या काहीही न करण्याच्या स्थितीत होत्या.

आई, बहिण आणि तिच्या भाऊजींनी तिची हिंमत वाढवण्याचा प्रयत्न करत आपला छंद, आपल्या आवडीनिवडी कायम जपण्याचा सल्ला दिला.

रुग्णालयात वेळ घालवण्याच्या उद्देशाने अरुणिमा यांनी वर्तमानपत्रे वाचणे सुरू केले. एके दिवशी त्या वर्तमानपत्र वाचत असताना, त्यांची नजर एका बातमीवर गेले. नॉयडामध्ये राहणा-या १७ वर्षीय अर्जुन वाजपेयींनी देशातील सर्वात तरूण गिर्यारोहक होण्याची किर्ती मिळवली आहे अशी ती बातमी होती.

या बातमीने अरूणिमा यांच्या मनात एका नव्या विचाराला जन्म दिला. बातमीने त्यांच्या मनात एक नवा उत्साह निर्माण केला. १७ वर्षे वय असलेला एक युवक जर माऊंट एव्हरेस्ट सर करू शकतो तर मी का नाही ? असा विचार अरूणिमा यांच्या मनात आला.

त्यांचे अपंगत्व त्याच्यासाठी मोठी अडचण बनू शकते असे त्यांना क्षणभरासाठी वाटले. परंतु, त्यांनी आपल्या मनाशी निश्चय केला की कोणत्याही परिस्थितीत आपण माऊंट एव्हरेस्ट हा पर्वत चढायचाच. कँसरशी संघर्ष केल्यानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग पुन्हा मैदानात उतरले ही बातमी सुद्धा त्यांनी वाचली. त्यांचा निश्चय आता ठाम झाला.

दरम्यानच्या काळात त्यांना कृत्रिम पाय सुद्धा मिळाला. ‘इनोवेटीव्ह’ ही संस्था चालवणारे अमेरिकेतील डॉ. राकेश श्रीवास्तव आणि त्यांचे बंधू ड़ॉ. शैलेश श्रीवास्तव यांनी अरूणिमा यांच्यासाठी कृत्रिम पाय बनवले. या कृत्रिम पायाच्या आधारे अरूणिमा पुन्हा चालू लागल्या.

परंतु, कृत्रिम पायाचा वापर सुरू केल्यानंतर देखील अरूणिमा यांच्या आयुष्यात अडचणी सुरूच राहिल्या. अपंगत्वाचे प्रमाणपत्र असताना देखील लोक त्याच्या अपंगत्वाबाबत शंका घेत होते. एकदा तर अरूणिमा या खरेच अपंग आहेत का ते तपासण्यासाठी एका रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने त्यांचा कृत्रिम पाय खोलून ही पाहिला. अशाच प्रकारे अनेक ठिकाणी अरूणिमा यांना अपमान सहन करावे लागले.

तसे पाहिले तर, रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी अरूणिमा यांना नोकरी देण्याची घोषणा केली होती, परंतु रेल्वे अधिका-यांनी या घोषणेवर काहीही कार्यवाही केली नाही. प्रत्येकवेळी अरूणिमा यांना रेल्वेच्या कार्यालयांमधून निराश होऊनच परतावे लागले. भरपूर प्रयत्न करून देखील अरूणिमा रेल्वे मंत्र्यांना देखील भेटू शकल्या नाहीत.

परंतु, अरूणिमा यांनी आपले मनोधैर्य खचू न देता रुग्णालयात केलेला निश्चय पूर्ण करण्याचे प्रयत्न नेटाने सुरू केले. अरूणिमा यांनी सतत प्रयत्न करून बछेंद्री पाल यांना संपर्क केला. बछेंद्र पाल या माऊंट एव्हरेस्ट सर करणा-या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक होत्या. बछेंद्री पाल यांना भेटण्यासाठी अरूणिमा जमशेदपूरला गेल्या. बछेंद्री पाल यांनी अरूणिमा यांना मुळीच निराश केले नाही. त्यांनी अरूणिमा यांना जी जी शक्य आहे ती ती मदत केली आणि नेहमीच प्रोत्साहित केले.

अरूणिमा यांनी उत्तराखंडच्या नेहरू इंस्टीट्यूट ऑफ माऊंटेनरिंग ( एनआयएम) या संस्थेतून २८ दिवसांचे गिर्यारोहणचे प्रशिक्षण घेतले.

त्यांनतर इंडियन माऊंटेनियरिंग फाऊंडेशनने ( आयएमएफ) त्यांना हिमालय चढण्याची परवानगी दिली.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ३१ मार्च २०१२ या दिवशी अरूणिमा यांची ‘मिशन एव्हरेस्ट’ ही मोहिम सुरू झाली. टाटा स्टील अडव्हेंचर फाऊंडेशनने त्यांची ही महत्त्वाकांक्षी मोहिम प्रायोजित केली. या फाऊंडेशनने या माहिमेचे आयोजन करण्यासाठी आणि त्याबाबतच्या मार्गदर्शनासाठी सन २०१२ मध्ये एशियन ट्रॅकिंग कंपनीला संपर्क केला होता.

एशियन ट्रॅकिंग कंपनीने सन २०१२ च्या वसंत ऋतुमध्ये नेपाळच्या एका बेटाच्या शिखरावर अरूणिमा यांना प्रशिक्षण दिले. ५२ दिवसांच्या पर्वतारोहणानंतर २१ मे, २०१३ या दिवशी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी अरूणिमा यांनी माऊंट एव्हरेस्ट पर्वतावर तिरंगा फडकावत २६ वर्षांच्या वयात जगात पहिली अपंग गिर्यारोहक होण्याचा किताब पटकावला.

कृत्रिम पायाच्या आधारे माऊंट एव्हरेस्टवर पोहोचणा-या अरूणिमा सिन्हा याना इतकेच करून थांबायचे नाही. त्यांना आणखीही मोठी कामगिरी करून दाखवायची आहे. शारीरिक रूपाने अपंग असलेल्या लोकांनीही असाधारण यश संपादन करून समाजात मान सन्मान मिळवावेत या दृष्टीने अशा अपंग लोकांना मदत करण्याची अरूणिमा यांची इच्छा आहे.