अस्सल मुंबईकर 'फोगो'

अस्सल मुंबईकर 'फोगो'

Thursday October 15, 2015,

2 min Read

मुंबई आणि स्ट्रीट फूड याचं नातं अगदी अबाधीत आहे. अर्धी अधिक मुंबई या स्ट्रीट फूडवर जगते. तो मुंबईच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण आता लोक आरोग्याबाबत थोडेसे सजग झालेत. रस्त्यावरचे पदार्थ खाल्ल्यानं होणारे वेगवेगळे आजार यामुळं या स्ट्रीट फूडकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय. याला एक महत्वाचं कारण आहे या स्ट्रीट फूड स्टॉल आणि त्याच्या आसपास कमी-अधिक प्रमाणात असलेली अस्वच्छता. यामुळं अन-हायजोनिक या गोंडस नावाखाली या स्ट्रीट फूडवर आजारांचं खापर फोडलं जातं.. मुंबईकर आता आरोग्याकडे गांभीर्यानं पाहतायत असं म्हटलं जातं. अशात जर तुम्हाला अगदी स्वस्त दरात आपल्या आवडीचे पदार्थ खायला मिळाले तर तेही अगदी स्वच्छ आणि हायजेनिक. मग स्वादाची मज्जा डबल होईल की नाही? दहिसर इथं फोगो नावाचा स्ट्रीटफूड ट्रक हेच करतोय.

हॉटेल मॅनेजमेन्ट ग्रॅज्युएट असलेल्या नीरज कांबळीला ही कल्पना सुचली टीव्हीवरच्या परदेशातल्या स्ट्रीट फूड ट्रकच्या कार्यक्रमातून. युरोप-अमेरिकेत हे स्ट्रीट फूट ट्रक चांगलेच प्रसिध्द आहेत. दुपारी किंवा संध्याकाळी काही तासांसाठी लागणाऱ्या या स्ट्रीटफूड ट्रक्सच्या बाहेर खवय्यांची तोबा गर्दी असते हे नीरजनं आपल्या अनेक परदेशवारीत पाहिलं होतं. यातूनच फोगोची संकल्पना पुढे आली. अशा स्वच्छ स्ट्रीट फूड ट्रकमध्ये अगदी लज्जतदार पदार्थ खायला मिळाले तर मुंबईकर त्याचं स्वागतच करतील असं त्याला वाटलं होतं आणि ते खरं ही ठरलं.

image


image


स्ट्रीट फूड ट्रकचं परवाना घेण्यासाठी जेव्हा नीरज मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पोचला तेव्हा त्याला जो अनुभव आला तो फार विनोदी होता. एक तर अशा स्ट्रीट फूड ट्रकची संकल्पनाच त्यांच्यासाठी नवीन होती. त्यासाठी परवाना सोडा पण त्यासंदर्भातले नियमच आपल्याकडे नाहीत याचं नीरजला आश्चर्य वाटलं. अखेर चार-पाच महिन्यानंतर त्याला स्ट्रीट फूड ट्रक सुरु करण्याचा परवाना मिळाला आणि दहिसर इथं फोगो हा दिमाखदार स्ट्रीट फूड ट्रक मे महिन्यात उभा राहिला. सुरुवातीला कुतुहल म्हणून आणि त्यानंतर तिथल्या लज्जतदार पदार्थांची सवय लागल्यानं इथं येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे हे विशेष.

image


आरोग्याविषयी जास्त सजग झालेल्या मुंबईकरांची ‘टेस्ट’ लक्षात घेऊनच फोगो ट्रकचा मेनू तयार करण्यात आलाय. या मेनूत ईस्ट आणि वेस्टचा अनोखा मेल करण्यात आलाय. ओरियंटल मोमोस, ग्रील्ड कबाब, ग्रील्ड सॉसेजेस, ग्रील्ड नगेटस, शिख पाव, सलामी पाव, सॉसेजेस पाव आणि खिमा पाव असं वेस्टर्न-लोकल मिक्स खाद्य पदार्थ इथली स्पेशालिटी आहे. खास तरुण ग्राहकांना आणि पट्टीच्या खवय्यांना लक्षात घेऊन हा मेनू तयार झालाय. शिवाय एक पर एक बर्गर फ्री, सेल्फी विथ फोगो अशा विविध उपक्रमातून फोगोला जास्तीत जास्त हैपनिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. यामुळं फोगो उत्तर मुंबईतलं महत्वाचं इंटींग डेस्टीनेशन बनलंय.