महात्माजींच्या संकल्पनेतून सुरू झाले आहेत निसर्गोपचार, उरळीकांचनच्या निसर्गोपचार ग्रामसुधार आश्रमाने दिली स्वदेशी उपचार पध्दतींना प्रतिष्ठा !

महात्माजींच्या संकल्पनेतून सुरू झाले आहेत निसर्गोपचार,  उरळीकांचनच्या  निसर्गोपचार ग्रामसुधार आश्रमाने दिली स्वदेशी उपचार पध्दतींना प्रतिष्ठा !

Sunday January 10, 2016,

4 min Read

तो स्वातंत्र्यपूर्वकाळ होता. त्यावेळी महात्मा गांधी सरदार पटेल यांना सोबत घेऊन डॉ दिनशॉ मेहता यांच्या पुण्यातील निसर्ग उपचार केंद्रात उपचारांसाठी आले होते. त्यांनीच मेहता यांच्या सहकार्यातून ‘सोसायटी ऑफ सरवेंटस ऑफ गॉडस’ पुणे रेल्वे स्थानकाजवळच स्थापन केली होती. पुण्यात असताना महात्माजींवर निसर्गोपचाराचा चांगलाच प्रभाव पडला होता, मात्र त्यांनी विचार केला की, पुण्यासारख्या शहरात अशा निसर्गोपचारांची सुविधा देणे सहज शक्य आहे. पण गावखेड्यात जेथे वैद्यकीय सोयीसुविधा नसतात तिथे ही सुविधा असायला हवी असे त्यांनी ‘हरिजन’ मधील लेखात नमूद केले. त्यांनी लिहिले होते, “ मी एक चूक केली मला छोट्या गावात जायला हवे होते जेथे निसर्गोपचाराचा प्रचारही झाला असता, त्यामुळे मला माझी चूक आता दुरुस्त केली पाहिजे”

image


त्यामुळे शोध सुरू झाला. पुण्याजवळच त्यासाठी जागा शोधण्यात आली. कै. बाळकोबा भावे, डॉ मेहता, डॉ. सुशिला नायर, डॉ मणिभाई देसाई ही मंडळी उरळी कांचन येथे आली. मात्र तेथे येऊन त्यांची निराशा झाली, येथील सामाजिक वातावरण निसर्गोपचार करण्यासाठी अजिबात योग्य नव्हते. पण गांधीजीनी आग्रह धरला त्यांना उरळी सारख्याच गावात रहायचे आहे. त्याचे कारणही तसेच होते, त्यांना वाटले की जर ते अशा गावाचा कायापालट करू शकले तरच त्यांना सा-या देशातील त्यांचा लढा यशस्वी करता येणार होता. मग महात्माजी उरळी येथे आले २२मार्च १९४६ मध्ये सायंकाळी चार वाजता. आणि ३०मार्चपर्यंत आठ दिवस राहिले सुध्दा!

image


त्यांनी तेथूनच शेकडो रुग्णांना डॉ मेहता, बाळकोजी भावे, मणीभाई यांच्या मदतीने उपचार देण्यास सुरूवात केली. तीस तारखेला त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले आणि ब्रिटिशांसोबत अखेरच्या टप्प्यातील संघर्षाला सुरुवात झाली. गांधीजीनी एक एप्रिल १९४६रोजी ‘निसर्गोपचार ग्रामसुधार ट्रस्ट’ची स्थापना केली. त्यासाठी स्थानिक महादेव तात्याबा कांचन यांनी जमीन देऊ केली. आणि मग मणीभाईंच्या नेतृत्वात हे केंद्र आकारास आले.

image



गावखेड्यातील गरीबांना परवडेल असे साधे सोपे उपचार देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरू केलेल्या या केंद्राला आता ७५वर्षे होत आली आणि त्याचे महत्व आज चवथ्या पिढीसाठीतर अधिकच प्रकर्षाने जाणवते आहे. महात्माजींच्या ग्रामविकासाच्या संकल्पाला बाजूला करून आम्ही शहरीकरणाला प्राधान्याची जागा दिली. त्यामुळे बदललेल्या जीवनशैलीत आमच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. शुध्द हवा, पाणी, अन्न मिळत नाही, जीवनाच्या जलद राहणीमानाच्या सवयींमुळे अनेक व्याधीनी घेरले आहे, सा-या काही उपचारांच्या सुविधा आहेत पण त्यांच्याने आम्हाला सुख-समाधान निरामय स्वास्थ मिळत नाही हे लक्षात आले. पूर्वी केवळ पन्नाशीनंतर गावातल्या निसर्गोपचारांची गरज आहे असे आम्ही मानत होतो पण आज कालच मिसुरडी फुटलेली पोरेसुध्दा या उपचारांच्या शोधात दिसतात. त्यावेळी महात्माजींच्या या निसर्गोपचारांचे महत्व अधोरेखित झाल्यशिवाय राहात नाही.

image


त्यांनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार केंद्राने गेल्या पन्नास –पंचहात्तर वर्षात खूपच प्रगती केली आहे. या केंद्रातील सध्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ हेगडे गेल्या पस्तिस वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षातील महत्वाचा बदल सांगताना ते म्हणतात की, ‘त्यावेळी निसर्गोपचार घेण्यासाठी येणा-या मंडळीत जेष्ठ नागरिकांची संख्या जास्त होती पण आता ऐन तारुण्यात जीवनाचा सूर बदलत गेल्याने व्याधीग्रस्त होणा-यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसते” देशविदेशातून लोक येथे येतात आणि उपचार कमीखर्चात घेतात, त्यातील अर्थ समजावून घेतात आणि महात्माजींच्या ‘साधी राहणी आणि उच्च आरोग्यश्रेणी’ या नव्या मंत्राशी परिचित होतात.

image


ह्रदयविकार, मधुमेह, दमा, श्वसनाचे विकार ,संधीवात, लठ्ठपणा, इत्यादी शारिरीक व्याधींवर येथे मोठ्या प्रमाणात उपचार केले जातात. सकाळी प्रार्थनेने येथील कामकाजाची सुरूवात होते आणि दररोज किमान दोनशेपेक्षा जास्त गरीब श्रीमंत सा-या प्रकारच्या समाजघटकातील रूग्णांवर उपचार केले जातात.

वनस्पतीविज्ञान या विषयात पदवी घेतल्यानंतर सन१९७४पासून डॉ हेगडे या संस्थेत दाखल झाले. त्यांच्या ‘मदर नेचर’ या पुस्तकाला उत्कृष्ट लेखनाचा एनसीईआरटीचा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या सेवाकार्यासाठीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

image


या आश्रमाच्या कामकाजाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘साधारणपणाने आपण आजारी पडलो की उपचार केले जातात पण आपण आपल्या शुध्द वर्तनातून आहार-विहारातूनच चांगले आरोग्य मिळवू शकतो त्यासाठी निसर्गाच्या नियमांचा वापर करू शकतो त्यालाच निसर्गोपचार म्हटले गेले आहे.’

image


व्यक्तिला मूळ रोगाच्या कारणांपासूनच दूर ठेवले म्हणजे ती निरोगी राहते. त्यासाठी या ठिकाणी पंचभूतांना प्रमाण मानून उपचार केले जातात. त्यासाठी माती, पाणी, अग्नी, हवा आणि मोकळी जागा यांचा खुबीने वापर केला जातो. त्याचबरोबरीने आहाराकडेही लक्ष दिेले जाते. निसर्गोपचाराच्या पध्दतीत काही दुर्धर रोगांवर इलाज करण्यास मर्यादा असल्यातरी त्यांच्या आहारा-विहाराबाबतच्या सवयींवर यातून नियंत्रण करता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे अतिगरीब रुग्णांना या ठिकाणी निशुल्क उपचारही केले जातात. अनेक डॉक्टर्स आजही येथे समर्पित भावनेने काम करत आहेत. त्यामुळे आता येथे फिजिओ थेरपी देखील केली जाते. रुग्णांना मनोरंजनासाठी कँरम बुध्दिबळ अशा खेळांच्या सुविधा दिल्या जातात.

सध्या येथे एका व्यक्तीसाठी, दोन व्यक्तिसाठी अशा सुविधा उपलब्ध आहेत. निवासासाठी प्रति दिन प्रतिव्यक्ती रुपये ११० ते १६००पर्यंत शुल्क आकारण्यात येते. यामध्ये आहार तसेच मालिशचा खर्च वेगळा द्यावा लागतो. या केंद्रात येण्यासाठी [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा.

image


विशेष म्हणजे नव्याने निसर्गोपचार केंद्र सुरु करण्यासाठीही येथे पात्र व्यक्तींना मार्गदर्शन केले जाते.


    Share on
    close