विदेशातील नोकरीसोडून सुरू केली शाळा, शिक्षणासोबतच मुलींना जीवनात उभे करण्यासाठी वयाच्या ७६व्या वर्षीही धडपडणारे विरेंद्र सँम सिंह!

विदेशातील नोकरीसोडून सुरू केली शाळा, 
शिक्षणासोबतच मुलींना जीवनात उभे करण्यासाठी वयाच्या ७६व्या वर्षीही धडपडणारे विरेंद्र सँम सिंह!

Sunday January 03, 2016,

5 min Read

महिला आज सर्वच क्षेत्रात वेगाने पुढे जात आहेत, परंतू शिक्षणाच्या बाबतीत आजही मुलांना मुलींच्या तुलनेत जास्त महत्व दिले जात आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन विरेंद्र सँम सिंह यांनी सुमारे चाळीसवर्ष विदेशात घालवल्यानंतर उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये मुलींसाठी अशी शाळा सुरू केली जी इतरांसाठी एक आदर्श ठरली आहे. या शाळेत शिकणा-या विद्यार्थीनीला पुस्तके, वह्या आणि गणवेश याशिवाय शाळेत जाण्यासाठी सायकल देखील मोफत दिली जात आहे. याशिवाय दररोज त्यांच्या खात्यात दहा रुपये जमा देखील केले जातात. बुलंदशहराच्या अनुपशहर तालुक्यात चालते ‘पणजोबा-पणजी मुलींचे आंतरमहाविद्यालय’ (परदादा-परदादी गर्ल्स इंटर कॉलेज). येथे आज तेराशेपेक्षा जास्त मुली शिकत आहेत. यासोबतच विरेंद्र यांनी गावच्या महिलांच्या उत्थानासाठी एका स्वयंसहायता गटाची देखील स्थापना केली आहे. त्यात सुमारे पंचावन्न गावांच्या बावीसशे महिला जोडल्या आहेत.

image


विरेंद्र सँम सिंह यांचा जन्म युपीच्या बुलंदशहर जिल्ह्यात अनुपशहर तालुक्यातील बिचौला गावात झाला. त्यांचे पणजोबा आणि वडील जमीनदार होते, त्यानंतर त्यांचे वडील बुलंदशहरात वकिली करत होते. विरेंद्र यांनी आपले शिक्षण बुलंदशहरातील एका सरकारी शाळेत घेतले. त्यानंतर त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात प्रवेश घेतला. परंतू त्यांच्या प्राक्तनात काही वेगळेच लिहिले होते. हॉकीचे चांगले खेळाडू असल्याने पंजाब विद्यापीठाने त्यांना अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेण्यासाठी मागणी केली मात्र विरेंद्र यांच्यासाठी हा अवघड निर्णय होता. त्यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, “मी शिक्षणात फारसा चांगला नव्हतो म्हणून द्विधेत होतो की, अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकेन की नाही"

image


ही द्विधा दूर करण्यासाठी त्यांच्या वडीलांनी त्यांना दिग्विजयसिंह बाबू यांचे वर्तमानपत्रातील छायाचित्र दाखवले. त्यात दिग्विजयसिंह लखनौच्या त्या स्टेडियमबाहेर तिकीटाच्या रांगेत उभे होते ज्याला नंतर त्यांचेच नांव देण्यात आले होते. हे छायाचित्र दाखवून विरेंद्र यांचे वडिल म्हणाले की, “ तू चांगला खेळाडू होऊ शकतोस, पण तू कधीच दिग्विजयसिंह बाबू होऊ शकत नाहीस, त्यामुळे तू सातत्याने खेळत राहिलास तर त्यातच तुझे भविष्य तयार होईल” पित्याच्या त्या शब्दांनी त्यांना निर्णय घेण्यास सोपे गेले, आणि त्यांनी पंजाब विद्यापीठात प्रवेश घेतला आणि खेळासोबतच अभ्यासही पूर्ण केला.

image


त्यानंतर विरेंद्र सँम सिंह यांनी बोस्टन येथील एका टेक्साटाइल विद्यापीठात प्रवेश घेतला, मात्र त्यावेळी त्यांच्याकडे इतके पैसे नव्हते की, त्यांना शिक्षण पूर्ण करता यावे. त्यामुळे त्यांनी विभागप्रमुखाना संपर्क केला तर त्यांनी त्यांना नोकरी देण्याबाबत प्रस्ताव दिला मात्र त्यांना तेथील नागरिकत्व घेण्याची पूर्व अट देखील घालण्यात आली. त्यामुळे त्यांनी विरेंद्र यांना त्यांचा मुलगा होण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर त्यांचे नामकरण विरेंद्र सिंह ऐवजी विरेंद्र सँम सिंह झाले. अशाप्रकारे त्यांनी मास्टर्स इन इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांना एका बहूराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. तेथे ते एकमेव भारतीय अभियंता होते. अशाप्रकारे सुमारे चाळीस वर्ष अमेरिकेत राहिल्यानंतर त्यांना जाणवले की, जे कार्य ते अमेरिकेत करत होते तेच काम ते आपल्या मायदेशात परत येऊन सामाजिक कार्यात सहभागी होऊन देशाच्या प्रगतीसाठीही करू शकतात.

image


विरेंद्र खरेतर हे जाणत नव्हते की, ते काय काम करणार आहेत तरीही मार्च२००० मध्ये गांवी परत आले. त्यावेळी त्यांनी असा विचार केला की ते गावच्या महिलांचे जीवन चांगले करतील तर त्या कुटूंबाला अधिक चांगल्याप्रकारे सांभाळू शकतील आणि कुटूंब चांगले राहिले तर समाज चांगला राहिल. परंतू बहुतांश महिला आपल्या मुलींसाठी चिंतीत होत्या की त्यांची लग्न कशी होणार? तेंव्हा विरेंद्र यांनी ठरवले की ते यावर काम करतील आणि या महिलांची अडचण दूर करतील. त्यासाठी त्यांनी त्यांच्यासमोरच एक प्रस्ताव ठेवला. त्यानुसार मुलींच्या खाण्यापिण्यापासून त्यांच्या कपडे आणि शाळेत जाण्या-येण्याचा खर्च ते स्वत: करतील असे ठरले. इतकेच नाहीतर ते प्रत्येक मुलीच्या नावे रोज बँकेत दहा रूपये जमा करतील आणि जेंव्हा त्या बारावीच्या वर्गात उत्तीर्ण होतील तेंव्हापर्यंत त्यांच्या खात्यात चाळीस हजार रूपये जमा असतील. ज्याचा उपयोग त्यांच्या कन्यादानात करता येऊ शकेल.

image


विरेंद्र सँम सिंह यांनी सांगितले की, “ आम्ही अशाप्रकारे जेंव्हा ४१मुलींपासून सुरुवात केली तेंव्हा आठवडाभरात आमच्याकडे केवळ तेराच मुली शिल्लक राहिल्या, कारण बाकीच्या मुलींच्या वडिलांनी त्यांची सायकल, पुस्तके आणि गणवेश कमी पैशात विकून टाकला होता. त्यामुळे आम्हाला धक्काच बसला,परंतू आम्ही हिंमत हारलो नाही. त्यावेळी मी माझ्यासोबत काम करणा-या लोकांना समजावून सांगितले की, “आम्हाला घाबरून चालणार नाही, मुली सोडून गेल्या असतील तरी ज्या शिल्लक तेरा जणी आहेत त्या राहतील आणि त्यात वाढ कशी होईल यावर लक्ष दिले पाहिजे.”

अखेर त्यांच्या प्रयत्नाला यशही आलेच आणि आज तेराच्या तेराशेपन्नास मुली होऊन त्यांच्या शाळेत शिक्षण घेत आहेत.

image


आज बुलंदशहरातील अनुपशहर मध्ये चालते “परदादा-परदादी गर्ल्स इंटर कॉलेज” जेथे मुलींना केवळ मोफत शिकवलेच जात नाही तर त्यांच्या उच्च शिक्षणाची आणि रोजगाराची देखील हमी दिली जाते. त्यासोबतच पाच किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरून येणा-या मुलींना गणवेश आणि पुस्तकांसोबतच सायकलही मोफत दिली जाते. तर यापेक्षा दूरून येणा-या मुलींना शाळेच्या सहा बसमधून येण्या-जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच प्रत्येकीच्या खात्यात दररोज दहा रूपये जमा केले जातात.

image


ही शाळा वर्षांच्या बाराही महिन्यात चालविली जाते. त्यापैकी आठ महिने ही शाळा दिवसाचे दहा तास चालते आणि हिवाळ्यात चार महिने आठ तास चालविली जाते. शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, संगणक प्रशिक्षण आणि इंग्रजीचेही शिक्षण दिले जाते. वर्षातून पंधरा दिवस मुली आपल्या घरच्या कामांसाठी सुटी घेऊ शकतात त्याशिवाय त्यांना आजारी असताना सुटी मिळते, मात्र एखादी मुलगी महिनाभरापेक्षा जास्त सुटीवर असेल तर तिच्या खात्यातून रोज वीस रूपये कापले जातात.

ज्या मुली शिक्षणात चांगल्या असतात आणि इंग्रजीत चांगल्या बोलू शकतात त्यांना येथे एका कॉलसेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. जे गुडगांवच्या एका कंपनीसाठी काम करते. सध्या या कॉलसेंटरमध्ये २१मुली काम करतात. याशिवाय या शाळेत शिकलेल्या सुमारे दीडशेपेक्षा जास्त मुली देशात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत. उच्च शिक्षणासाठी मुलींना कर्जदेखील दिले जाते. शाळेत बहुतांश मुली बालवर्गातूनच प्रवेश घेतात. त्यानंतर पहिले तीन महिने त्यांना शिकवले जाते की स्वच्छता कशी राखायची. दर वर्षी या शाळेत१५० मुलींना प्रवेश दिला जातो.

विरेंद्र यांनी या मुलींनाच नाहीतर त्यांच्या मातांसाठीही ‘परदादा-परदादी स्वयंसहायता’ गटाची स्थापना केली आहे. ज्या मिळून दुधाशी संबंधीत व्यवसाय करतात. सध्या या गटात सुमारे पंचावन्न गावच्या सुमारे बाविसशे महिला काम करतात. १०-१५ महिलांचा एक गट केला जातो. त्या सप्ताहात एकदा बैठक घेतात. जेथे प्रत्येक महिला पंधरा रूपये स्वत:चे जमा करतात. त्यांचे सारे हिशेब एकजण ठेवते आणि एक जण ते सांभाळते तर त्या तिजोरीची चावी तिस-या महिलेकडे असते.जेंव्हा त्यांच्याकडे तीन हजार रुपये जमा होतात तेंव्हा त्या गरजेनुसार अर्धे पैसे उधार घेऊ शकतात. त्यामागचा हेतू हा आहे की, गरजू महिला सावकारांच्या पाशात फसू नयेत. या कामाशिवाय विरेंद्र यांनी आपल्या गावात एक दवाखानाही सुरू केला आहे जेथे सप्ताहात पांच दिवस डॉक्टर बसतात. ही सेवा याच वर्षी जानेवारी महिन्यात सुरू झाली आहे. त्यासोबतच त्यांचा प्रयत्न आहे की, येथे औषधांचे दुकान असावे आणि एक रुग्णालयदेखील सुरू करावे. ७६वर्षांचे विरेंद्र हे सारे केल्यानंतरही मानतात की, “ कोणत्याही चांगल्या कामासाठी वयाची अडचण नसते. बस आपली इच्छा असली पाहिजे”

वेबसाइट : http://www.education4change.org/

लेखक : हरिश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे.