चित्रकलेच्या कुंचल्याकडून फॅशनच्या कुंचल्याकडे, ज्योती सचदेव अय्यर नाविन्यतेच्या शोधात

चित्रकलेच्या कुंचल्याकडून फॅशनच्या कुंचल्याकडे, ज्योती सचदेव अय्यर नाविन्यतेच्या शोधात

Saturday January 09, 2016,

5 min Read

कपडे जग बदलू शकत नाहीत. पण जी स्त्री ते घालते ती मात्र ते नक्कीच बदलू शकते – ऐन क्लेन

ज्योती सचदेव अय्यर यांच्या लेबलचा हाच तर गाभा आहे. त्यांचं लेबल हे आजच्या स्त्रीसारखं आहे. जिला, तिला काय हवं ते माहित आहे आणि पुढे यायला ती समर्थ आहे. आपली वाट ती स्वतः धुंडाळते, धडाडीने पुढे येते आणि पायंडे घालून देते.

ड्रेप्स आणि पाश्चिमात्य पद्धतीच्या फिकट पार्श्वभूमीवर ठळक छायाकृतींच्या (सिल्हउएटस्) नक्षी हे त्यांच्या लेबलचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कोलकत्त्यातल्या स्टोअरमध्ये अशा प्रकारचे डिझाईन असलेल्या कपड्यांची अगणित मालिकाचं आहे. त्यांच्या डिझाईन्स आणि कपडे नेहमीच महिलांना भुरळ पाडत असतात.

image


ज्योती सचदेव अय्यर यांचं कोलकत्त्यातलं आगमन, त्यांची स्टाईल आणि फॅशन जगतावर ई-कॉमर्सचा परिणाम याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

बेंगळुरू-दिल्ली-कोलकत्ता

ज्योतींनी शालेय शिक्षण आणि कला पदवी बेंगळुरूमधूनच घेतली. त्यांना आपल्या कलात्मक अंगाची जाण होती. पण आपल्याला फॅशनच वेड आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं. त्या सांगतात, “सर्जनशील गोष्टी करण्याकडे नेहमीच माझा कल असायचा. पण कॉलेजमध्ये फाईन आर्टस् ला प्रवेश घेईपर्यंत हे माझ्या लक्षातच आलं नाही”. कॉलेजमध्ये असताना फॅशन हेच आपलं ध्येय असल्याचं त्यांना जाणवलं.

बेंगळुरूमधून फाईन आर्टस् ची पदवी मिळवल्यावर त्यांनी दिल्लीकडे कूच केली. एनआयएफटी मध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी दिल्लीतच पहिला स्टूडिओ उघडला. तिथल्या दोन दशकांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर, चार वर्षांपूर्वी त्या कोलकत्त्यामध्ये स्थायिक झाल्या.

कामामुळे त्यांच्या पतीला कोलकत्त्याला याव लागलं आणि ज्योतींनीही त्यांच्यासोबत तिथे यायचं ठरवलं. नवीन शहरात आल्यावरही त्यांनी त्यांच्या कामाचं बस्तान चांगल बसवलं. कोलकत्त्यातही त्यांनी आता त्यांचा छानसा स्टुडिओ सुरू केलाय.

ज्योती एकटयाच त्यांच्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय शोजचा व्याप सांभाळतात. ला-पेर्ला, फेंडी आणि केंझोसारख्या आंतरराष्ट्रीय डिझाईन हाउससोबत त्यांनी काम केलयं. लंडन, मिलान आणि सिडनीतल्या प्रिमियम आऊटलेटस् मध्ये त्यांनी डिझाईन केलेले कपडे उपलब्ध आहेत.

सिल्हउएटस् आणि स्टाईल

त्या सांगतात, “सिल्हउएटस् हा पूर्णपणे पाश्चिमात्य प्रकार आहे. ज्यात कापडाचे अनेक पदर (ड्रेपिंग) असतात. भारतीय साज चढवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे कापड आणि नक्षीचा उठावदारपणा यांचा सुंदर मिलाफ घालावा लागतो. मला वाटतं, साडी हा ड्रेपिंगमधला सर्वात शानदार पर्याय आहे आणि मला त्यातूनच नेहमी प्रेरणा मिळते”.

ज्योतींना स्वतःला नेहमीच्या वापरात मात्र साधे कपडेच आवडतात. जीन्स आणि टी-शर्ट हा त्यांचा आरामदायी पोषाख आहे. हसत हसत त्या सांगतात, “संध्याकाळी जर बाहेर जायचं असेल तर मला ड्रेस घालायला आवडतो. विशेषतः मी बनवत असलेले पोषाख घालायला आवडतात”.

भारतात कापडांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. यामुळेच त्या प्रत्येक मौसमात वेगळ्या प्रकारच्या कापडावर काम करायला उत्सुक असतात. प्रत्येक स्त्रीकडे त्यांनी बनविलेल्या पोषाखांमधला एक तरी पोषाख असावा अशी त्यांची आंतरिक इच्छा आहे.

स्टाईलबाबत विचार करता ऑडरे हेपबर्नची स्टाईलवर त्या फिदा आहेत. पण आजच्या घडीला त्यांच्या मते एंजलिना जोलीकडे स्टाईलचं उत्तम अंग आहे आणि कोणत्याही स्टाईलमध्ये ती आत्मविश्वासाने वावरते.

image


फॅशन इंडस्ट्री

गेल्या दोन दशकात भारतात डिझायनर्सच्या संख्येत सातत्याने वाढ होतेय. काही वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच लोक होते पण आज ही यादी मारुतीच्या शेपटीसारखी वाढत आहे. नवीन येणाऱ्या प्रत्येकाची आपली अशी वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे. या चांगल्या बदलाबाबत बोलताना त्या म्हणतात, “दिवसेंदिवस जग अधिकाधिक जवळ येत चाललं आहे. प्रत्येक गोष्ट अगदी सहज उपलब्ध होते. तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला सहज डोकावता येतं. यामुळे आपल्याला केवळ प्रवेश नाही तर उत्तम संधीही चालून येतात”.

त्यांच्या मते भारतातल्या ग्राहकवर्गाकडे माहितीही आहे आणि प्रयोग करायला तो उत्सुकही आहे. काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. आपल्या पोषाखावर अधिक खर्च करण्याचा त्यांचा कलही वाढतोय. त्या म्हणतात, “यामुळे डिझायर्नसना अधिकाधिक काम करण्याची संधी उपलब्ध होते आहे”.

त्यांच्या मते फॅशन जगतात प्रत्येक वर्ष हे नवीन आणि वेगवेगळ्या गोष्टींचं असतं, त्यामुळे आपलं काम लोकांच्या नजरेत दिसून येत. त्या म्हणतात, “गेल्या वर्षी हातमागाच्या कापडाने बाजी मारली. या वर्षी असंच दुसरं काही तरी लोक उचलून धरतील”.

आव्हानं

नवीन शहरात येणं, तिथं पाय रोवणे आणि कोलकत्त्यातल्या अवाढव्य मार्केटचा ठाव घेणं हे नक्कीच एक मोठं आव्हान होतं. या सर्व आव्हानांवर मात करत, शहराची ओळख करून घेत ज्योती आपला जम बसवण्यात यशस्वी झाल्या.

चांगले आणि निष्णात कारागीर शोधणे, त्यांना प्रशिक्षण देणे, जुन्या कारागिरांना नवीन कारागिरांना शिकवणं, त्यांच्याशी जमवून घेणं अशा अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं.

यातल्या एकाही अडचणीमुळे त्या डगमगल्या नाहीत. त्या खूप उत्साहाने सांगतात, “प्रत्येक दिवस हे एक नवीन आव्हानं असतं, तुम्ही कारागिरांशी भांडता, तुम्ही सांगितलेल्या डिझाईन्स नीटपणे त्यांना कळत नाहीत, अशा अनेक गोष्टी घडत असतात. पण काहीही झालं तरी तुम्ही नवीन काहीतरी करत राहता. आणि हेच सर्जनशील लोकांचं लक्षण आहे”.

तंत्रज्ञान आणि फॅशन

आधुनिक तंत्रज्ञानामुळे फॅशन जगताची दार सताड उघडी झाली आहेत. त्यामुळे ज्योती यांना त्यांची उत्पादन ऑनलाईन असण्याची गरज भासू लागली आहे. त्या सांगतात, “आम्ही ई-कॉमर्सवर आमची जागा मिळवायला सज्ज झालो आहोत. यामुळे आमचे कपडे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतील. पर्यायाने आमचा व्यापार वाढीस लागेल”.

image


पुढील पाच वर्षाबाबत त्या म्हणतात, “स्वतःचा वेगळा ठसा असणारी डिझायनर मला व्हायचं आहे. वेगवेगळ्या देशांतल्या, प्रांतातल्या कारागिरांना एकत्र आणून स्थानिक झाक असलेली कलाकारी शिकायची आहे. या कलाकारीचा मेळ घालून वेगळं असं काहीतरी लोकांना द्यायचं आहे. खूप काही धुंडाळायचं आहे. मला वाटतं, पुढच्या पाच वर्षात देवाच्या कृपेने मी देशोदेशीच्या जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचेन आणि नवनवीन गोष्टी सादर करेन”.

त्या ‘फॅशन’ जगतात आणि दिवसरात्र त्यातच रममाण होतात, हेच त्यांच्या यशाचं गमक आहे आणि त्यांना ते पुढेही नेत आहे. त्या अतिशय शांतपणे, आत्मविश्वासाने आपल्या समाधानाचं रहस्य सांगतात, “ज्या दिवशी मला वाटेल की, मला नवीन काहीच करता येत नाहीये तो माझ्या व्यवसायातला शेवटचा दिवस असेल. माझ्याकरता प्रत्येक दिवस हा नवीन आणि वेगळ्या आव्हानाचा असतो. मला त्यातूनच खूप प्रेरणा मिळते. माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून मी शिकत असते. यामुळेच माझ्या व्यवसायाची अखंड वाढ होत आहे”.

लेखिका – तन्वी दुबे

अनुवाद – साधना तिप्पनाकजे