पवईच्या झुमोटने आणलीय स्वस्त आणि आरामदायी ‘राईड शेअरींग’

पवईच्या झुमोटने आणलीय स्वस्त आणि आरामदायी ‘राईड शेअरींग’

Tuesday December 22, 2015,

4 min Read

सोमवारची सकाळ आहे, अलार्मच बटण बंद करून तुम्ही अजून पाच मिनिटं लोळत पडल्याचा तुम्हाला पश्चाताप होत असतो. कॅब दुप्पट दर आकारत असते आणि प्रचंड ट्रॅफिकमध्ये स्वतः कार चालवणे म्हणजे दिवास्वप्नच असतं. युमीतसिंग, नवनीतसिंग आणि रणदीप सिंग या मुंबईकरांची ही नेहमीचीच अडचण झाली होती. यात भर म्हणजे या तिघांनाही शहराच्या अतिशय व्यस्त रस्त्यावरून रोज प्रवास करायला लागयचा.

तेहतीस वर्षीय नवनीत सांगतात, “सार्वजनिक वाहतूकव्यवस्था गैरसोयीची आणि रेडीओ कॅब्स किंवा काळी पिवळी टॅक्सी हा जरा खर्चिक पर्याय आहे. वेळा जुळत नसल्यामुळे कार पुलींग पर्यायाचा आम्ही विचारही करू शकत नव्हतो”. या परिस्थितीत ते रिकाम्या जाणाऱ्या खूप कार रोज पाहायचे. यातूनच त्यांना कार शेअर करणारी ‘सीट ऑक्युपन्सी सेंसरची’ (Seat occupancy sensors) एक छान पुरक कल्पना सुचली.

पवई कार्यालयात झूमोटची टीम

पवई कार्यालयात झूमोटची टीम


कामकाज

‘झुमोट’ (Zoomot) हे एक राईड शेअरींग अॅप आहे, ज्यात तुम्ही संपूर्ण कार बुक करण्यांपेक्षा फक्त सीट बुक करता. तुमच्या आसपास कार उपलब्ध आहे का? कारमध्ये किती आसनं रिकामी आहेत ? एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं भाड यासर्व गोष्टी या अॅप वरुन आपल्याला कळतात. तुम्ही इथे आगाऊ आरक्षणही (अडव्हान्स बुकींग) करू शकतात. या कॅब्सचा मार्ग आणि वेळापत्रक ठरलेलं आहे.

नवनीत सांगतात, “शेअरींगची किंवा वाटून वापरण्याची प्रक्रिया अधिक संघटीत करुन, तिचा जास्तीत जास्त वापर करून लाभ मिळावा हे आमचे उद्दिष्ट आहे”. युमीत आणि रणदीप यांची आयआयटीच्या माजी पदवीधर संमेलनात ओळख झाली. तर नवनीत यांनी सिंबॉयसिसमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. या तिघांची छान मैत्री आहे. युमीत आणि रणदीपला ‘झुमोट’ची कल्पना सुचल्यावर त्यांनी नवनीतलाही त्यांच्यात सामील करून घेतलं.

या अॅपच्या तांत्रिक बाबी हाताळण्याकरता त्यांनी अॅफिक्सस टेक्नॉलॉजीशी संधान साधलं. या टीमने सूक्ष्म नियंत्रक, गाडी कुठे आहे याची अचूक माहिती कळण्याकरता सेन्सर्स, भाडं आणि आसन उपलब्धता यासर्वाची माहिती सांगणारी एक उत्तम यंत्रणा बनवली. एँड्रॉईड प्ले स्टोअर आणि झुमॉटच्या वेबसाईटवर त्यांचं अॅप ‘कूलशेअर’ (Coolshare) उपलब्ध आहे. ग्राहकांच्या सेवेकरता त्यांनी कॉलसेंटरही सुरू केलं आहे.

गाडी व्यवस्थापन आणि उत्पन्न

संघ बांधणी आणि गाडी व्यवस्थापन ही मुख्य आव्हानं आहेत. या क्षेत्रात नवखे आणि नियमित कार पूलर नसल्यामुळे झुमॉटला अगदी शून्यातून त्यांचं विश्व उभारायला लागलं.

व्यावसायिक टॅक्सी मालकांशी संपर्क साधून त्यांनी गाड्यांचं व्यवस्थापन केलं. त्यांनी प्रति महिना तीन हजार किलोमीटर अंतर आणि ३५ हजार रुपये व्यापाराचा हवाला दिलाय. नवनीत सांगतात, “योग्य करारपत्र आणि लाभाद्वारे आम्हांला गाड्यांना नियंत्रित करणं सोपं जातयं. तरीही, हा काळजीचा एक मुद्दा आहे.” ते भाडेकरूकडून दर आसनी रोख भाडं घेतात आणि गाडी मालकाला दर फेरीप्रमाणे पैसे देतात. ग्राहकाला दर किलोमीटरला साडेचार रुपये आकारले जातात.

गाडीने किती फेऱ्या मारल्या किंवा किती जणांनी त्यातून प्रवास केला याच्या साध्या गुणोत्तरातून उत्पन्न मोजलं जातं. नवनीत पुढे सांगतात, “म्हणजे जर का आम्ही गाडीचा अधिक वापर केला तर याचा फायदा ठराविक भाडं आणि जास्त उत्पन्न मिळवण्यात होईल”.

मुंबई परिवहन विभागाकडून (आरटीओ) आवश्यक त्या परवानग्यांची पूर्तता झाल्यावर, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झुमोटोने पाच गाड्यांनी आपल्या सेवेला सुरूवात केली. ऑक्टोबर अखेरीपर्यंत मोफत फेऱ्यांव्यतिरिक्त दिवसाला २०-३० प्रवाशांनी या सेवेचा उपभोग घेतल्याचा दावा ते करतात.

नोव्हेबर महिन्यात हे प्रमाण १२ गाड्या, किमान ११० रुपये भाडं आणि दिवसाला ४५-५० प्रवाशांवर पोहोचलं. सध्या फक्त ४ मार्गांवर त्यांची सेवा उपलब्ध आहे. या महिन्यात आणखी ६ नवीन मार्गावर ते त्यांची सेवा सुरू करणार आहेत. नवनीत म्हणतात, “पुढील सहा महिन्यात मुंबईत आणखी २० मार्ग आणि १५० गाड्यांचं आमचं उद्दीष्टय आहे”.

प्रवाशांच्या सुरक्षिततेकरता आम्ही ड्रायव्हरची इत्यंभूत माहिती घेऊन पोलीस पडताळणीही करतो. मार्ग ठरलेले आहेत त्यामुळे जर ड्रायव्हर ने मार्ग बदललाच तर जीपीएस यंत्रणा लगेचच आमच्या नियंत्रण कक्षाला सूचित करते. गाडीच्या आतही आम्ही एक आपात्कालीन बटण बसवलयं. त्याद्वारे तुम्ही SOS पाठवू शकता.

तीन महिन्यांच्या प्रशिक्षण काळात टीमची चांगली बांधणी करण्यात आली. एंजल इन्वेस्टरद्वारे त्यांनी ऑगस्ट महिन्यात प्राथमिक भांडवल उभारलं. पुढील व्यवसाय वाढीसाठी आणखीही गुंतवणुकीसाठी ते प्रयत्न करत आहेत.

मुंबईनंतर आता देशातल्या इतर महानगरांकडे आता ते लक्ष केंद्रीत करण्याच्या विचारात आहेत. नवनीत सांगतात, “व्यापारवाढ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याकरता, आमची सध्या १७ आसनी गाड्या सुरू करण्याबाबत बोलणी सुरू आहेत. यात आम्हांला यश मिळाल्यावर आम्ही दुचाकी टॅक्सीचा पर्यायही आणणार आहोत”.


युअरस्टोरी मत

भारतात कारपूलींगचा पर्याय लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्राईसवॉटर कूपर यांच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर या क्षेत्राचा व्यापार ९ अब्ज ९४ कोटी रुपयांचा आहे. २०२५ पर्यंत ही संख्या २२ हजार २११ अब्जांवर पोहोचेल.

विशेषज्ञांच्या मते, या क्षेत्राच्या विकासामुळे भारतीय बाजारात चांगली पत निर्माण होणार आहे. गेल्या काही वर्षात मीबडीज, रायडींगओ, पूलसर्कल, लीफ्टओ आणि कारपूलअड्डा यांनी या क्षेत्रात जम बसवलाय. पण ब्राझीलिअन त्रिपदा आणि फ्रेंच ब्ला ब्ला कार या जागतिक पातळीवरच्या कंपन्यांनी भारतात येऊन स्पर्धेत रंगत आणलीय.

ओलो आणि उबेर या मोठ्या कंपन्याही आक्रमकपणे या क्षेत्रात उतरत आहेत. पण झीपगो, मिनीबस अग्रेगेटर यांना बेंगळूरूमध्ये कठीण प्रसंगांना सामोर जावं लागलं. प्रत्येक राज्याचे नियम वेगळे असल्याने या कंपन्यांच्या विस्तार वाढीच्या चाकांना खिळ बसत आहे. त्यामुळे झुमोट या सर्वातून तावूनसुलाखून कसा विस्तार करणार हे आपल्याला काही दिवसांत कळेलच.


लेखक - सिंधू कश्यप

अनुवाद – साधना तिप्पनाकजे