कचऱ्यातून पैसे मिळवणारे देशातले पहिले स्टार्टअप

कचऱ्यातून पैसे मिळवणारे देशातले पहिले स्टार्टअप

Tuesday April 26, 2016,

6 min Read

गेल्या महिन्यात मुंबईतल्या देवनार इथल्या कचरा डेपोला लागलेली आग ही घटना मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित करुन गेली. कचरा माफिया आणि बीएमसीतल्या अधिकाऱ्यांच्या साठगाठीतून तयार झालेल्या या भयानक समस्येवर तातडीनं उपाय काढणं गरजेचं आहे. शहरातल्या कचराडेपोत उभे राहणारे कचऱ्याचे डोंगर हे शहराचं स्वास्थ्यच खराब करत नाहीत तर शहराला विद्रुपही करत आहेत. आणि पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे सभोवताल राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत आहेत. हे असं होत असताना कचऱ्याचा सदुपयोग करुन डोंगर सपाट करणाऱ्या बिरजू मुंदडा यांची आठवण होते. त्यांनी ठाण्यात सुमारे १५ वर्षांपूर्वी सुरु केलेला कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प शहरासाठी वरदान ठरत होता. बिरजू मुंदडा यांच्या विनी एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडनं ठाण्यातल्या कचरा डेपोत सुरु केलेल्या या प्रकल्पाला देशविदेशातल्या तंत्रज्ञांनी भेट दिली होती. बायो बॅक्टेरियाचा वापर करुन कचऱ्यापासून खत निर्मिती करुन लाखो रुपये कमावणारे हे अनोखे स्टार्टअप होते, त्याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली. 

image


मुलुंडमध्ये राहणाऱ्या बिरजू मुंदडा यांनी कचऱ्याला आपलं विश्व बनवण्यापूर्वी अनेक छोटेमोठे व्यवसाय केले होते. पण त्यात त्यांना हवं तेवढं यश मिळालं नाही. मग त्यांची भेट झाली शास्रज्ञ डॉ.एस आर माळे यांच्याशी. बिरजू मुंदडा यांनी आपल्याला नवा आणि समाजासाठी उपयोगी असलेला व्यवसाय सुरु करायचा असल्याचं माळे यांना सांगितलं. माळे त्यावेळी घनकचरा व्यवस्थापनावर अभ्यास करत होते. बायो बॅक्टेरीयाची फवारणी करुन कचऱ्याचा ढिग कमी केला जाऊ शकतो आणि त्यातून निर्माण होणाऱ्या खताचा वापर पर्यावरणासाठी होऊ शकतो. याचा प्रयोग माळेंना करायचा होता. यासाठी लागणाऱ्या चाचण्या त्यांनी केल्या होत्या. बिरजू मुंदडा यांना डॉ.माळें यांच्या प्रयोगावर विश्वास होता. त्यांनी स्वत: ठाणे महानगरपालिकेकडे अश्या पध्दतीच्या प्रयोगासाठी जमीन मागितली. तत्कालिन मनपा आयुक्त टी चंद्रशेखऱ यांनी ती दिली. इथं कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प उभा राहिला. आधी या कचऱ्याचं नैसर्गिक पध्दतीच्या फवारणीचा वापर करत निर्जंतूकीकरण करण्यात आलं. जेणेकरुण दुर्गंधीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. “ आम्ही जेव्हा पहिल्यांदा हा प्रयोग करायचा घेतला. तेव्हा आम्हाला फार विरोध झाला. मी कर्ज घेऊन इथं यंत्रणा आणली होती. हातात पैसा नसताना हे सर्व काही सुरु होतं. एक असा प्रयोग जो देशात यापूर्वी कधी झाला नव्हता. पण मला माळे साहेबांवर फार विश्वास होता. ज्या आत्मविश्वासानं ते या प्रयोगाकडे पाहत होते. त्यानं आम्हाला बळ मिळालं. लोकांनी आजूबाजूच्या परिसरात कचऱ्यामुळं दुर्गंधी पसरली असल्याची तक्रार केली. याचं खापर आमच्यावर फोडण्यात आलं. पण आम्ही अगदी नैसर्गिक फवारणीचा वापर करत अगोदर दुर्गंधीवर नियंत्रण मिळवलं. “ बिरजू आपल्या या पहिल्या कचऱ्याच्या स्टार्टअप संदर्भात सांगत होते. दुर्गंधी बंद झाल्यावर त्यावर बायो बॅक्टेरियाची फवारणी करण्यात आली. अगदी नैसर्गिकपध्दतीनंच कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे. त्यासाठी या बायो बॅक्टेरीयाचा वापर करण्यात आला होता. हळू हळू कचऱ्याचा हा डोंगर कमी कमी होत गेला आणि दोन महिन्यात हा डोंगर नष्ट झाला. हे श्रेय होतं डॉ. माळे यांच्या वैज्ञानिकदृष्टीचं आणि बिरजू मुंदडा यांच्या मेहनतीचं. “डंपींग ग्राऊंड हे नाव जरी काढलं तरी लोकांच्या कपाळावर आट्या येतात. त्या डंपींग ग्राऊंडवर जाऊन काम करणारे आम्ही दिवसरात्र इथं राबत होतो. कचरा हेच आमचं आयुष्य झालं होतो. प्रयोग यशस्वी झाला होता. दोन महिन्यात इथल्या कचऱ्यापासून आमच्या कंपनीनं हजारो टन खत बनवलं. खत बनवण्यापूर्वी कचऱ्यापासून तयार झालेल्या मिश्रणातून दगड विटा आणि इतक टाकाऊ जे खतासाठी अजिबात उपयोगात नाहीत त्याचं वर्गीकरण करुन खतांच्या पोती आम्ही शेतकऱ्यांना विकल्या. हे सेंद्रीय खत होतं, अगदी नैसर्गिक. याचा पिकांनाही चांगली फायदा झाला. त्यामुळे कचऱ्यातून असं काही घडू शकतं आणि त्याचा आर्थिक फायदाही होतो हे सर्व अविश्वसनीय होतं. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आमचा आत्मविश्वास दुणावला होता. पैसे मिळाले याचा आनंद होताच पण त्यापेक्षा जास्त आनंद होता समाजासाठी काम केल्याचा. कचरा ही समस्या खूप मोठी आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरात रोज लाखो मेंट्रीक टन कचऱा डम्पींग डेपोत येतो. आम्ही १९९९ मध्ये ठाण्यात हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरु केला. हा देशातला अश्याप्रकारचा पहिलाच प्रयोग होता. मानवनिर्मित कचऱ्याचा वापर खत निर्मितीसाठी करुन थेट निर्सगापासून घेतलेलं पुन्हा निसर्गाला परत देण्याची ही प्रक्रिया खरंच चांगली होती.” बिरजू सांगत होते. या प्रकल्पाची देशभरात वाहवा झाली. देशविदेशातून प्रतिनिधी आले. त्यानी या प्रकल्पाची पाहणी केली. अगदी संयुक्त राष्ट्रसंघापासून ते जपान, चीन आणि युरोपातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी येऊन याचा अभ्यास करुन गेले आणि त्यांनी या संपूर्ण प्रकल्पाची वाहवा केली. 

image


कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी सुरु झालेल्या या प्रयोगासाठी ठाणे महानगरपालिका आणि बिरजू मुंदडा यांच्या विनी एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये करार झाला. त्यानुसार ठाणे महानगरपालिका दररोज ३०० टन कचरा विनी एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देणार होती. ही कचऱ्याची रितसर खरेदी होत होती. त्यावर प्रक्रियाकरुन खत निर्मिती करण्यात येत असे आणि त्यानंतर खत विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातला एक टक्के इतकी किंमत ही ठाणे महानगरपालिकेला रॉयल्टी म्हणून मिळत होती. त्यामुळे सर्वांना फायदा मिळत होता. टाकाऊ कचरा लाखो रुपयांची निर्मिती करत होता.

पण बिरजू यांचा पहिला कचऱ्यापासून खत निर्मितीच्या या पहिल्या स्टार्टअपला राजकारण आणि भ्रष्टाचाराचं ग्रहण लागलं. प्रकल्प काही वर्षे खूप चांगल्याप्रकारे सुरु होता. कचऱ्यातून करोडो रुपये मिळतायत हे लक्षात आल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी अस्वस्थ झाले. त्यांनी बिरजू मुंदडा यांच्या खतनिर्मिती प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली. पालिकेतल्या अधिकाऱ्यांनी संगतमत करुन प्रकल्पाला कचरा कसा मिळणार नाही याची आखणी केली आणि बिरजू यांची कोंडी करण्यात आली. प्रकरण न्यायालयात पोचलं आणि कनिष्ठ न्यायालयानं प्राथमिकदृष्ट्या बिरजू यांच्याबाजूनं कौल दिला. तरीही प्रदीर्घ चाललेल्या या न्यायालयीन प्रक्रियेचा अजून अंत झालेला नाही. या दरम्यानच्या कालावधीत प्रकल्प ठप्प झाल्यानं बिरजू मुंदडा यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. पण तरीही ते झुकले नाहीत. त्यांनी आपली लढाई सुरुच ठेवली. 

image


याच दरम्यानच्या कालावधीत मुंबईतल्या मुलुंड आणि गोराई कचरा डेपोची समस्याही बिरजू मुंदडा यांच्याकडे आली होती. मुलुंडचं प्रकरण पुन्हा एकदा प्रशासकीय वादात अडकलं. पण गोराईतला कचऱ्याचा डोंगर बिरजू यांनी आपल्या मेहनतीनं सपाट केला. त्याचीही दखल घेण्यात आली. सध्या आपला प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी धडपडणाऱ्या बिरजू यांनी नव्यानं ठाण्याच्या आसपासच्या महानगरपालिकांना कचरा मुक्त करण्याचा ध्यास घेतलाय.

बिरजू यांना जम्मू आणि काश्मिर सरकारनंही बोलावलं होतं. डोंगराळ भागातली कचऱ्याची समस्या वेगळी होती आणि कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या विषारीद्रवामुळे पाण्याचे स्त्रोतही खराब होत होते. अशी ही तिथल्या सरकारची समस्या बिरजू यांनी काही महिन्यात सोडवली.

“ मला तिथल्या मौलवींना बोलवलं. त्यांनी माझ्या हाताचं चुंबन घेतलं आणि म्हणाले की मी त्यांना पुन्हा नवसंजीवनी दिली. तिथली नदी प्रदुषित आणि काळी होत चालली होती. ती आता एकदम लख्ख झाली होती. आरपार पाण्याचा तळ दिसत होता, पाणी स्वच्छ झालं होतं. हे सर्व एका प्रयोगामुळे शक्य झालं होतं. डॉ. माळे साहेबांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा हा फायदा होता. मी फक्त निमित्त होतो. मी मेहनत केली आणि जम्मू आणि काश्मिरमधला कचऱा नष्ट केला.” 

image


बिरजू यांच्या मते कचरा ही जागतिक समस्या आहे. ते म्हणतात “ कचरा टाकण्यासाठी आता जागा उरलेली नाही. आपल्या घरातल्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्रत्येकानं खबरदारी घेतली तर डंम्पींग ग्राऊंडवर कचऱ्याचा डोंगर उभा राहणार नाही. घरातला ओला आणि सुका कचरा आधीच वेगवेगळा करायला हवा. स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असल्यास त्याची सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी, स्वत:च्या सोसायटीपासून करावी म्हणजे कचऱ्याची ही समस्या कायमची सुटेल आणि अगदी स्वच्छ आणि निरोगी वातावरणात आपण सर्व आनंदाने राहू शकू.”

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

दहा हजार शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नात ७० टक्क्यांनी वाढ करणारं ‘किसान सुविधा’ अॅप

कचरा टाका आणि पाणी मिळवा... ट्रेस्टरचा अनोखा उपक्रम

कचऱ्याच्या बदल्यात मिळवा चॉकलेट... ‘टेकबीन’मार्फत मिळवा इतरही सुविधा