सहज सुटसुटीत प्रसुतीचा मॉडर्न पर्याय म्हणजे 'डान्स ऑफ बर्दींग'

सहज सुटसुटीत प्रसुतीचा मॉडर्न पर्याय म्हणजे 'डान्स ऑफ बर्दींग'

Friday January 29, 2016,

4 min Read

बॉलीवूड संगीतामध्ये एक कॅची नंबर किंवा आयटम नंबर म्हणून गणला जाणारा बेली डान्स हा फक्त मनोरंजनासाठीच नाही तर आरोग्यासाठीही हितवर्धक आहे असं जर कोणी म्हंटलं तर आपला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. आणि ही प्रत्यक्षात उतरवण्याची किमया साधलीये ती मुंबईस्थित बेली डान्स प्रशिक्षक चैताली सोपारकर कोहली हिने. बॉलीवूडचा हा हिट नंबर महिलांच्या आयुष्यात विशेषत: त्यांच्या गरोदर काळामध्ये जादू करु शकतो ही गोष्ट चैताली आणि तिचा बेली डान्स सिद्ध करतो.

गरोदरपणात केल्या जाणाऱ्या विशिष्ठ प्रकारच्या बेली डान्सिंगला डान्स ऑफ बर्दींग म्हणतात. यात योगा आणि मेडिटेशनही समाविष्ट असते. “बर्थ म्हणजेच नवा जीव जन्माला येण्याच्या या प्रक्रियेमध्ये बेली डान्सिंगचा हा फॉर्म परिणामकारक ठरतो. गरोदरकाळात साधारणत: तेराव्या आठवड्यापासून तुम्हाला डान्स ऑफ बर्दींग सुरु करता येतं. सर्वसामान्यपणे डॉक्टर्सपण तेरावा आठवडा सुरु झाला की गरोदर स्त्रीला हलका योगा किंवा व्यायाम सुरु करायला सांगतात. डान्स ऑफ बर्दींगही याच काळापासून सुरु केला जातो. तो अगदी शेवटच्या प्रसुतीच्या वेळेपर्यंत तुम्हाला करता येतो” अशी माहिती चैताली देते.


image


चैताली सांगते, “आज गरोदर स्त्रीया नैसर्गिक प्रसुतीचा पर्याय मोठ्या प्रमाणात स्विकारताना दिसतात, त्यांना सिझेरिअन नको असतं कारण नैसर्गिक प्रसुतीनंतर काही दिवसातच त्या पुन्हा चालू फिरु शकतात आणि आपलं आधीचं रुटीन पुन्हा सुरु करु शकतात. डान्स ऑफ बर्दींग यात त्यांना मदत करतं.”

“डान्स ऑफ बर्दींगची ही कला पाश्चात्य देशांमध्ये अधिक लोकप्रिय आणि सर्रास वापरली जाताना दिसते. अगदी पोटातले बाळ जर हलले किंवा गोल फिरले तर त्याला या डान्स फॉर्मने पुर्ववत करता येते. स्ट्रेचिंग, जम्पिंग, स्विंगिग सारखे हाय एनर्जी फॉर्मस या डान्समध्ये अत्यंत हळूवार पद्धतीने शिकवले जातात.”

आज मुंबईत चैताली डान्स ऑफ बर्दींगचे प्रशिक्षण देतेय, पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिने आधी स्वत: याचा अनुभव घेतलाय. दोन मुलींची आई असलेल्या चैतालीची दुसरी मुलगी निआरा आता अकरा महिन्यांची आहे. निआराच्या जन्माआधीपासून ते अगदी तिचा जन्म होईपर्यंत चैतालीने डान्स ऑफ बर्दींग केले होते. “ गरोदर काळामध्ये स्त्रियांचे वेळापत्रक बदलते. म्हणजे रात्री मध्यरात्री अचानक भूक लागणे, झोप व्यवस्थित न होणे असे अनेक बदल या दिवसांमध्ये घडतात.”

“मी जेव्हा निआराच्या वेळेला गरोदर होती तेव्हा मला मध्यरात्री अडिच तीन वाजता जाग यायची, खूप भूक लागायची, काही तरी खाऊन लगेच झोपल्यामुळे मी दिवसाही उशिरापर्यंत झोपून रहायची. यावर उपाय म्हणून हळूहळू मी मध्यरात्री उठल्यावर बेली डान्स करु लागले त्यामुळे मला परत झोप यायची आणि मला झोप पूर्ण झाल्यामुळे मला वेळेत जागही यायची. मी माझे झोपेचे बदललेले वेळापत्रक या बेली डान्सिंगने पूर्ववत केले ज्याचा फायदा माझ्या पोटातल्या बाळालाही झाला. निआरा तिच्या जन्मापासूनच रात्री नीट झोपते आणि दिवसभर ती अॅक्टीव्ह असते. मला माझी मुलगी रिआना आणि निआरामध्ये खूप फरक जाणवतो तो यामुळेच,” ही कबूली चैताली देते.

image


डान्स ऑफ बर्दिंगमध्ये तुम्हाला अत्यंत सॉफ्ट बेली मुव्हज दिल्या जातात. ज्याला बेली डान्सच्या भाषेत तक्सिम असे म्हणतात. ज्यामुळे तुमच्या प्रसुतीशी संबंधित अवयवांवर कुठलाही अतिरिक्त दबाव न येता उलट तुम्हाला प्रसुतीसाठी आवश्यक शक्ती आणि सामर्थ्य यातनं मिळू लागतं. या डान्स ऑफ बर्दींगसाठी विशेष संगीत बाजारात उपलब्ध आहे, जे अधिक सॉफ्ट आणि सुदींग आहे, नेहमीचे बेली डान्सला वापरणारं संगीत यासाठी वापरलं जात नाही. तात्पर्य एवढंच की या संगीतामधून डान्सर्सना सकारात्मक उर्जा मिळते.

फक्त प्रसुतीसाठीच नाही तर एखाद्या स्त्रीला गरोदर व्हायचे असेल तर हे डान्स ऑफ बेदींग फायदेशीर ठरु शकते हे आता वैद्यकीय स्तरावरही सिद्ध झालेय.

चैताली गेली सात आठ वर्ष बेली डान्सिंग आणि हा डान्स ऑफ बर्दींग करतेय आणि त्याचे प्रशिक्षणही देतेय. आज जेव्हा चैताली या क्षेत्रात सक्रीय आहे तेव्हा तिला एक गोष्ट आवर्जुन जाणवते ती म्हणजे लोकांची मानसिकता आणि या डान्स प्रकाराकडे बघण्याचा दृष्टीकोन. “माझ्याकडे येणाऱ्या स्त्रीया या डान्स प्रकाराकडे केवळ एक प्रशिक्षण म्हणून पहातात पॅशन किंवा कला म्हणून नाही, त्यामुळे ते हे प्रशिक्षण काही दिवसच घेऊ इच्छितात. अनेकदा त्यांना ही एक कला म्हणून जोपासण्यामध्ये फारसा रस नसतो. ”


image


चैताली सांगते, “बेली डान्सिंगचे मूळ हे मिडल ईस्ट देशांशी जोडले गेलेय. तिथल्या स्त्रियांना नोकरी व्यवसायाची अनुमती नव्हती अशावेळी एकत्र येऊन एखादा डान्स करावा म्हणून या स्त्रियांनी विशिष्ट प्रकारे शरीराच्या हालचाली करायला सुरुवात केल्या, ज्यात शरीराचा कमरेखालचा भाग गोलाकार फिरवणे, टाचेवर उभे राहून उड्या मारणे सारख्या हालचाली यात होत्या. यातनंच बेली डान्स घडू लागला आणि डान्स साकारत गेल्यानंतर त्याच्याशी निगडीत संगीत तयार झालं. ”

बेली डान्स हा कित्येक वर्षापासून केला जातो पण भारतात आणि खास करुन मुबंईसारख्या महानगरामध्ये आता आता त्याबद्दल जागरुकता होऊ लागलीये. योगा मेडिटेशन या व्यायामप्रकारासोबत झुम्बा, जॅझसारख्या डान्सप्रकारालाही आता खासगी आणि व्यवसायिक स्तरावर प्राधान्य मिळू लागलंय. बेली डान्सही लवकरच या ओळीमध्ये येऊन बसेल अशी आशा चैतालीला वाटते.