तरुण 'फॅशनिस्टा' मासूम मिनावाला

तरुण 'फॅशनिस्टा' मासूम मिनावाला

Thursday October 29, 2015,

5 min Read

एकवीस वर्षीय मासूम मिनावालाची खरी सुरुवात झाली ती एक फॅशन ब्लॉगर म्हणूनच... मात्र नंतर फॅशन हेच आपले आयुष्य असल्याचे मासूमला जाणवू लागले आणि त्यातूनच जन्म झाला तो स्टाईल फिएस्टा या फॅशन पोर्टलचा.... डिजाईन हाऊसेसनी गजबजलेल्या या फॅशन पोर्टल्सच्या जगात, मासूमने तिचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. तिच्या वयाचे तरुणतरुणींपैकी अनेक जण स्वप्नरंजनातच मग्न असताना मासूमने मात्र आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविले आहे. जाणून घेऊ या मासूमची ही रंगतदार कहाणी...

शाळेत असताना जर कोणी म्हटले असते की मासूम फॅशनच्या दुनियेत नाव काढेल, तर त्या व्यक्तीला वेड्यातच काढले गेले असते.... कारण शाळेत असताना मासूम होती एकदम टॉमबॉय... फुटबॉल संघाची कर्णधार असलेल्या मासूमसाठी कपडे मुळीच महत्वाचे नसत आणि ती घरी यायची ती अत्यंत मळलेल्या मोज्यांसह... मात्र साधारण बारावीत असतानाच्या सुमारास मात्र या परिस्थितीत एकदम बदलच झाला. मासूम फॅशनच्या बाबतीत अचानक जागरुक तर झालीच पण याविषयाची तिला विशेष रुचीही वाटू लागली.

ही आवड लक्षात येताच मासूमने त्यामध्येच काही तरी करण्याचा निर्णय घेतला आणि फॅशन डिजायनर असलेल्या तिच्या एका नातेवाईकाकडेच इंटर्नशीपला सुरुवात केली. मात्र त्यावळी तिला आलेला अनुभव तिच्यासाठी अपेक्षित नव्हता.

त्यानंतर मासुमने आपले लक्ष व्यावसायिक बाजूकडे वळविले आणि ब्रॅंड मार्केटींग इंडीयामध्ये विपणन विभागात इंटर्नशीप केली. या काळात तिचा एक संशोधन प्रकल्प हा फॅशन ब्लॉगर्सवर होता. “ यानिमित्ताने पहिल्यांदाच माझी फॅशन ब्लॉगिंग या संकल्पनेशी ओळख झाली आणि खरे सांगायचे तर मी मंत्रमुग्धच झाले,” मासूम सांगते. या अनुभवाने खूपच प्रभावित झालेल्या मासूमने स्वतःचा ब्लॉग सुरु केला. तसेच तिने स्वतःच स्वतःचा कपडेपट डिझाईन करुन त्याचे फोटो सगळ्यांसाठी म्हणून ऑनलाईन टाकायलाही सुरुवात केली. “ ज्या गोष्टीची सुरुवात केवळ एक छंद म्हणून केली होती, त्याला हजारोने हिटस् मिळू लागले, त्यावर अनेक अभिप्राय येऊ लागले आणि खूपच चांगल्या प्रतिक्रियाही मिळू लागल्या. त्यादेखील अगदी अनोळखी लोकांकडून... माझे काम आणि स्टाईल लोकांना आवडल्याचे पाहून मला खूपच मस्त वाटले. मग मी जेवढे शक्य तेवढे ब्लॉगिंग करण्यास तर सुरुवात केलीच पण त्याचबरोबर वाचकांबरोबर एक नाते निर्माण करायलाही सुरुवात केली. माझ्या ब्लॉगवर पोस्ट केल्यानंतर जे समाधान मला मिळते ते दुसऱ्या कशानेही मिळू शकणार नाही.” मासूम सांगते.

image


फॅशन ब्लॉगिंगमध्ये दिड एक वर्ष घालविल्यानंतर हेच आपले आयुष्य असल्याचे मासूमला जाणवले. यावेळी तिने फॅशन या विषयात काहीतरी औपचारीक शिक्षण घ्यावे, असा आग्रह तिच्या वडिलांनी केला. ते मान्य करत तिने लंडन मधून सहा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केले आणि त्यानंतर ती मुंबईला परतली आणि तिने तिच्या ई कॉमर्स संकेतस्थळावर काम सुरु केले. डिसेंबर २०१२ पर्यंत स्टाईल फिएस्टा संपूर्ण जोमाने सुरु झाले होते. “ माझ्या ब्लॉगवरील वाचक मी संकेतस्थळाकडे वळवत होते, थोडक्यात या माझ्या वाचकांचेच परिवर्तन मी माझ्या ग्राहकांमध्ये करत होते,” ती सांगते.

image


आश्चर्य म्हणजे, या दरम्यान तंत्रज्ञान हाच तिच्यासमोरचा सर्वात मोठा अडथळा होता. तिला ई कॉमर्स संकेतस्थळाची उभारणी करण्यापूर्वी चार वेळा त्याचे डेवलपर्स बदलावे लागले. ही सगळी प्रक्रिया कमालीची तणावपूर्ण होती.

हा व्यवसाय सुरु करण्याच्या दरम्यान आलेल्या सर्व अडचणींचा सामना मासूमने स्वतःच्या बळावर केला. ती आत्मविश्वासाने सांगते, “ कोणतीही गोष्ट करताना अपयशाचे भय वाटले आहे, असे झाल्याचे मला आठवतच नाही. जरी माझ्याजवळ एखादी वाईट कल्पना असली, तरी मी स्वतःला म्हणत असे यातून सर्वात वाईट असे काय घडेल.”

image


या आत्मविश्वासातूनच एक यशस्वी पोर्टल ती उभारु शकली. स्टाईल फिएस्टा हे आज एक चमकदार, झोकदार, आगळेवेगळे आणि मुख्य म्हणजे खिशाला परवडणारे आहे. त्याचबरोबर स्वतः निर्मितीच्या कामात असल्याने तिच्या व्यक्तीगत स्टाईलचे प्रतिबिंबही यामध्ये दिसते.

पण तरीही हे सोपे नाही कारण ऑनलाईन फॅशनच्या जगात आज चांगलीच झुंबड दिसून येते. जबॉंग, कुव्हज् किंवा फ्लिपकार्टसारखी फॅशन पोर्टल्स, जिथे मासुमही आपली उत्पादने विक्रीस ठेवते, अशा प्रकारच्या डिझाईन हाऊसेसनी गजबजलेली आहेत. तसेच एकाच प्रकारचा माल अनेक फॅशन पोर्टल्सवर उपलब्ध असल्याने येथे तीव्र स्पर्धा असते. “ स्टाईल फिएस्टा हे केवळ उत्पादनांबाबत नाही तर अनुभवाबाबत आहे. सुंदर आणि स्टायलिश अशा या संकेतस्थळावरुन उत्पादन निवडण्याचा अनुभव यातून तुम्हाला मिळू शकतो. त्याचबरोबर योग्य उत्पादन निवडण्यास मार्गदर्शन करणारा प्रत्यक्ष स्टाईल मार्गदर्शक असो किंवा ज्या वेगाने आम्ही आंतरराष्ट्रीय ट्रेंड भारतात आणत आहोत ही बाब असो, स्टाईल फिएस्टा इतरांपेक्षा नक्कीच वेगळे आहे,” मासूम सांगते. “ आम्ही परिपूर्ण, अद्ययावत आणि अत्यंत फॅशनेबल उत्पादनाची खात्री देतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही त्याकडे आमच्या ग्राहकांच्या दृष्टीकोनातून पहातो आणि त्यानुसार आमच्या पर्यांयांचे मूल्यांकन करतो,” मासूम सांगते.

मासूमने या उद्योग उभारणीसाठी सुरुवातीचे भांडवल आपल्या वडीलांकडूनच घेतले होते. “ सुरुवात केल्यापासून पहिल्या सहा महिन्यांतच आम्ही हे भांडवल वसूल केले आणि त्यानंतर आम्हाला मिळत गेलेला नफा याच उद्योगात गुंतवत आलो आहोत,”मासूम सांगते.

तिची सात लोकांची टीम तिच्या लोअर परेलच्या जागेतून काम करत असते. भारतात कोठेही मोफत शिपिंगची सोय, माल हातात आल्यानंतर पैसे देण्याची अर्थात कॅश ऑन डिलिवरी ही सेवा याशिवाय मोफत रिटर्नस् आणि प्रत्यक्ष स्टायलिस्टची उपलब्धता यामुळे खऱ्या अर्थाने स्टाईल फिएस्टा इतरांपेक्षा वेगळे ठरले आहे आणि त्याचबरोबर खरेदीचा अनुभवही अधिक चांगला ठरु शकतो.

उत्पादनांची श्रेणी अधिक वाढवणे आणि सामान्यांना संपूर्ण फॅशनचा आगळा अनुभव देण्याचे मासूमचे स्वप्न आहे.

पण आज एक यशस्वी फॅशन पोर्टल चालविणाऱ्या मासूमसाठी स्टाईल म्हणजे काय? “ माझ्यासाठी स्टाईल ही नेहमीच माझ्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब राहिलेली आहे. ज्याप्रकारे एखादा कलाकार आपल्या चित्रांतून आपल्या भावना व्यक्त करतो, त्याचप्रमाणे मी देखील माझ्या कल्पना, माझी मते आणि माझे स्वतंत्र व्यक्तित्व माझ्या पेहरावातून दर्शवते. स्टायलिश बनण्याचा नियम क्रमांक एक म्हणजे – स्वतः स्वतःच्या स्टाईलचा शोध घ्या... असे कितीदा तरी होते जेंव्हा योगा पॅंटस् व्यतिरिक्त दुसऱ्या पेहरावाचा मी विचारही करु शकत नाही आणि जगात एकही असा फॅशन गुरु नाही जो मला हे करण्यापासून थांबवू शकतो,” मासूम मोकळेपणाने सांगते.

त्यामुळे तुम्ही तुमच्यासारखेच बना, स्वतःचा स्वतःचे स्टाईल गुरु व्हा, कारण शेवट हे सगळे तुमच्याबद्दलच आहे...

    Share on
    close