त्या तिघींच्या स्वप्नपूर्तीची गोष्ट : ‘अवर स्टोरी – बिस्ट्रो ऍन्ड टी रुम’

त्या तिघींच्या स्वप्नपूर्तीची गोष्ट :  ‘अवर स्टोरी – बिस्ट्रो ऍन्ड टी रुम’

Saturday October 31, 2015,

4 min Read

आंब्याची झाडे, झोपाळे आणि अशा शांत सुंदर वातावरणात लाकडाच्या चुलीवर बनविलेले चविष्ट जेवण.... जोडीला मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांबरोबर जमविलेला गप्पांचा अड्डा... बालपण आठवले ना? आपल्या बहुतेकांनी पूर्वी कधी ना कधी तरी हा अनुभव नक्कीच घेतलेला असतो. पण या धकाधकाची आयुष्यात आपण आपले हे बालपण हरवून बसलो आहोत... लोकांच्या मनातील हा हळवा कोपरा ओळखून त्यांना त्यांच्या बालपणात घेऊन जाण्याचा सुंदर प्रयत्न म्हणजेच दिल्लीत नुकताच सुरु झालेला ‘अवर स्टोरी – बिस्ट्रो ऍन्ड टि रुम’ हा कॅफे.... या कॅफेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीन बहिणींनी एकत्र येऊन हा कॅफे सुरु केला आहे त्यामुळे एक वेगळाच जिव्हाळाही त्यामध्ये आहे.

मेघना राठोड, मोहिता शाही आणि मौसमी सिंह या तीन बहिणींच्या कल्पनेतून हा कॅफे साकार झाला आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यातून, गर्दीपासून दूर अशा एका शांत जागेची निर्मिती करुन आपल्या आठवणी आणि अनुभव लोकापर्यंत पोहचविण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यातूनच जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अशा चुलीवरील वेगळ्याच सुगंधाचा आणि चवीचा अनुभव देणारा स्वयंपाक ही या कॅफेची खासियत ठरली आहे. या तीन बहिणींची एकमेकींपेक्षा वेगळ्या पण तरीही परस्परपूरक अशा आवडींचे प्रतिबिंब कॅफेच्या मेनूमध्ये आपल्याला पहायला मिळते.. जगभरातील अतिशय उत्तमोत्तम आणि निवडक असे खाद्यपदार्थ येथे खवय्यांना चाखायला मिळतात.

तीन बहिणीःमोहिता शाही, मौसमी सिंह आणि मेघना राठोड (डावीकडून उजवीकडे)

तीन बहिणीःमोहिता शाही, मौसमी सिंह आणि मेघना राठोड (डावीकडून उजवीकडे)


“ या सगळ्याबरोबर आमचे एक भावनिक नाते आहे. कुठेतरी ती आमचीच गोष्ट आहे. याद्वारे आम्हाला पुन्हा एकदा आमच्या मूळांपर्यंत जायचे होते आणि आमच्या पालकांशी पुन्हा एकदा जोडले जाण्याची आमची इच्छा होती आणि आज बघा, आम्ही येथे आहोत, अवर स्टोरीच्या माध्यमातून आम्ही अगदी असेच करण्यात यशस्वी झालो आहोत. येथील वातावरणही असेच आहे की लोकांना त्यांच्या लहानपणीच्या दिवसांची आठवण येते,” अवर स्टोरी – बिस्ट्रो ऍन्ड टि रुम’ च्या संचालक मेघना सांगतात.

एकंदरीतच ही अशा तीन बहिणींची कहाणी आहे ज्यांना आपले अनुभव आणि आवडीनिवडी साऱ्या जगाशी वाटून घ्यायच्या होत्या आणि त्याचबरोबर आपली गोष्ट सांगण्याची इच्छा असणाऱ्या इतरांसाठीही एखाद्या मस्त जागेची निर्मिती करायची होती. मात्र कसा जन्म झाला या स्वप्नाचा आणि प्रत्यक्षात ते कसे साकार झाले, याची गोष्टदेखील खूपच रंजक आहे.

मौसमी सिंह

मौसमी सिंह


उत्तर प्रदेशातील लखनौच्या एका पारंपारिक राजपूत कुटुंबात या तिघींचा जन्म झाला. त्यांचे वडील शेतकरी तर आई गृहिणी होती. लहानपणापासूनच त्यांच्यावर स्वावलंबन आणि स्वतंत्र विचारांचे संस्कार मिळाले. तसेच त्यांचे संगोपनही अगदी आधुनिक पद्धतीने झाले. तिघींमध्ये मेघना या पाककलेतील खऱ्या दर्दी.... पुढे व्यवसायाने शिक्षिका बनलेल्या मेघना यांनी त्यांच्या पिढीजात गावात वयाच्या बाराव्या वर्षापासूनच स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. “ स्वयंपाकाची आवड माझ्यात जागविली ती माझ्या वडीलांनी... उत्तमोत्तम खाद्यपदार्थांची माझ्या कुटुंबियांना प्रचंड आवड होती. सहाजिकच त्यांच्यासाठी नवनविन पाककृती करण्याचे मला चांगलेच कारण मिळाले. माझ्या पाककृती या परिपूर्ण असाव्यात यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असे. आमच्या कॅफेमध्ये सर्व घटक पदार्थ हे ताजे असतात आणि त्या सगळ्यांना वेगळाच स्वाद असतो,” मेघना सांगतात.

मोहिता शाही

मोहिता शाही


लहान असतानाच या बहिणींना स्वतःचे काही तरी सुरु करण्याची इच्छा होती. मात्र अशा प्रकारचा कॅफे सुरु करण्याचे स्वप्न खरे तर मेघना यांचे... आणि ते साकारण्यासाठी त्यांना साथ मिळाली मोहिता आणि मौसमी या बहिणींची.... प्रामुख्याने त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ इतरांना खिलविण्याची – गतकाळातील आणि आजच्या काळातीलही – त्यांची मनापासून इच्छा होता.

मेघना राठोड

मेघना राठोड


“ इतरांनाही आपल्या बालपणात घेऊन जाण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे येथे झोपाळे, आंब्याची झाडे, इत्यादी विविध गोष्टी आहेत, ज्या कुठेतरी प्रत्येकाला आपल्याशा वाटतील आणि या जागेत पाऊल ठेवताक्षणी लोकांच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतील. या जागेबद्दल त्यामुळे त्यांना निश्चितच आपलेपणाची भावना वाटेल,” मेघना सांगतात.

पुढील सहा महिने ते वर्षभरात हा उद्योग स्थिरस्थावर होईल, अशी या भगिनींची अपेक्षा आहे तसेच त्यांच्या आसपासच्या लोकांना त्यांची गोष्ट हळूहळू आवडू लागेल अशीही त्यांना आशा आहे.

मोहिता एक जनसंपर्क व्यावसायिक आहेत. आपले ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही अडचणींशी दोन हात करणाऱ्या त्या लढवय्या आहेत. तर मौसमी यांचा विश्वास आहे सकारात्मक कर्मांवर..... त्या स्वतः एक बुद्धिजीवी विचारवंत आहेत आणि सध्या त्यांनी आपले सर्व लक्ष केंद्रीत केले आहे कॅफेच्या सर्जनशील विभागावर...

या तिघींच्या मते वेळेत काम पूर्ण करणे हे एक मोठे आव्हान असते. पण यामध्ये यशस्वी ठरल्याचा त्यांना निश्चितच आनंद आहे. सध्या जरी याच कॅफेवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले असले, तरी भविष्यात देशातील इतरही शहरांमध्ये शाखा काढण्याचा त्यांचा मानस आहे.

“ आम्ही लोकांना पुन्हा एकदा त्यांच्या भूतकाळात नेण्यात यशस्वी ठरलो, याचा मला विशेष आनंद आहे. जे कोणी येथे येते, त्यांचे येथील कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी तरी नक्कीच नाते जोडले जाते,” मेघना सांगतात.

“ हा कॅफे अशी जागा आहे जेथे काळ थोडासा थांबतो आणि तुम्ही जुन्या आठवणीत रमता आणि खऱ्या अर्थाने मित्र आणि कुटुंबाबरोबर एक मस्त अड्डा जमतो,” त्या पुढे म्हणतात.

    Share on
    close