पर्सनलाईज्ड गिफ्टिंगकरिता एक उत्तम पर्याय '6ixi Arts'

पर्सनलाईज्ड गिफ्टिंगकरिता एक उत्तम पर्याय '6ixi Arts'

Thursday January 28, 2016,

3 min Read

महाविद्यालयात शिकत असताना अभ्यासक्रमादरम्यान देण्यात येणाऱ्या प्रकल्पावरुन कशाप्रकारे व्यवसायाची कल्पना सुचू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे '6ixi Arts' हा स्टार्टअप. पर्सनलाईज्ड गिफ्टिंगकरिता एक चांगला पर्याय असलेल्या '6ixi Arts'ची स्थापना पाच मित्रांनी मिळून केली आणि या प्रवासात त्यांना मार्गदर्शन मिळाले ते एका मित्राच्या बहिणीचे. सिम्बॉयसिस स्कूल फॉर लिबरल आर्टसमध्ये तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असताना जमीर इफ्तेखारी यांना व्यावसायिक अभ्यासक्रमादरम्यान एक प्रकल्प सोपवण्यात आला. ज्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने घरातून पाच हजार रुपये भांडवल घेऊन तीन महिन्याकरिता एका व्यवसाय कल्पनेवर (बिझनेस आयडिया) काम करायचे होते. तीन महिन्याच्या कालावधीनंतर व्यवसायात होणारा नफा विद्यार्थ्याने स्वतःला ठेवायचा होता आणि भांडवल घरी परत करायचे होते. असा प्रकल्प दिल्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थी कपडे आणि बॅग्स यांसारख्या सर्वसामान्य कल्पनांवर काम करू लागले. कला क्षेत्रात रस असलेल्या जमीर यांना मात्र काहीतरी वेगळे करायचे होते. बराच काळ विचार केल्यानंतर त्यांना या पर्सनलाईज्ड गिफ्टींगची कल्पना सुचली. याबाबत जमीर सांगतात की, 'माझ्या मित्रांमध्ये अनेक चांगली कौशल्ये आहेत. मात्र त्यांना योग्य ते व्यासपीठ मिळत नव्हते. त्यांच्यात खुप चांगल्या क्षमता आहेत आणि त्या दाखवण्याकरिता एका व्यासपीठाची आवश्यकता होती. या व्यवसायाद्वारे त्यांची कौशल्ये एकसाथ धरुन ठेवणारे एक व्यासपीठ निर्माण झाले. मी व्यवसायाची कल्पना त्यांना सांगताच त्यांनीदेखील मला समर्थन दिले आणि '6ixi Arts'ची सुरुवात झाली.' जमीर यांच्यासोबतच हरिशकुमार पिल्ले, ओमकार परब, गोविंद पवार, स्वामी शेट्टी हे या स्टार्टअपचे सह-संस्थापक आहेत. २०१५ साली या स्टार्टअपला सुरुवात केल्याचे ओमकार सांगतात. सुरुवातीच्या दिवसापासूनच हे स्टार्टअप ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून, त्याला लोकांचा प्रतिसाददेखील खुप चांगला मिळत आहे.

image


image


पर्सनलाईज्ड गिफ्टिंगकरिता सर्वोत्तम पर्याय असलेले '6ixi Arts'मध्ये तुम्हाला कि-चेन पासून ते टी-शर्टपर्यंत सर्व उत्पादने मिळतात. विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच एम्बिग्राम कि-चेन्स या स्टार्टअपने उपलब्ध करुन दिल्या आहेत, ज्या संपूर्ण देशभरात कोठेही मिळत नाहीत. याशिवाय पर्सनलाईज्ड लॉकेट, माऊस पॅड आणि इतर गोष्टीदेखील येथे मिळतात. महाविद्यालयीन शिक्षण संपता संपताच मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या स्टार्टअपच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. संस्थापकांपैकी एकाचीही कौटुंबिक पार्श्वभूमी व्यावसायिक नसल्याने त्यांना व्यवसायाबद्दलच्या बाराखडीपासून सुरुवात करावी लागणार होती. सुरुवातीच्या काळात आम्ही दिवसरात्र या स्टार्टअपकरिता मेहनत घेतल्याचे ते सांगतात. व्यवसायाकरिता लागणारे सॉफ्टवेयर शिकून घेणे, भांडवल गोळा करणे, पैसा उभा करणे यांसारख्या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला. अखेरीस घरातून थोडेफार पैसे घेऊन त्यांनी या स्टार्टअपला सुरुवात केली. सध्या ही टीम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी उत्पादनांची ऑर्डर घेते. ऑर्डर घेतल्यानंतर ते तिचे यशस्वी वितरण करेपर्यंत ही टीम कायम ग्राहकांच्या संपर्कात असते. या स्टार्टअपच्या उत्पादनाचे काम भोसरी आणि मुंबई येथे चालते. सध्या तरी मुंबई आणि पुण्यात ही टीम या उत्पादनांचे वितरण करते. या परिसराबाहेरच्या वितरणाकरिता कुरीयरचे वेगळे शुल्क आकारण्यात येते. पाच मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या स्टार्टअपमध्ये त्यांना जमीरची मोठी बहिणी अर्शिया इफ्तेखारी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळते. या व्यवसायातून होणाऱ्या नफ्यातील ६० टक्के भाग शैक्षणिक कार्याकरिता खर्च करण्याचा त्यांचा मानस आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या या व्यवसायाच्या अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण होणार आहे.

image