पंकज नवानी यांच्या ʻबिन्सर फार्म्सʼचा प्रेरणादायी प्रवास

पंकज नवानी यांच्या ʻबिन्सर फार्म्सʼचा प्रेरणादायी प्रवास

Sunday December 27, 2015,

6 min Read

१२० दुभत्या गायींसहित २४० गायींचा कळप सांभाळणारे तसेच दिल्लीतील जवळपास ६०० कुटुंबांना दुधाचा पुरवठा करणाऱ्या बिन्सर फार्म्सचे संस्थापक आणि भागीदार पंकज नवानी हे आहेत. ४० वर्षीय पंकज यांनी बऱ्याच संयमाने या व्यवसायाची धुरा आजवर वाहिली आहे. उत्तरांचलमधील बिन्सर गावाजवळील एका खेड्यात पंकज हे आपल्या आजोबांच्या देखऱेखीखाली लहानाचे मोठे झाले. अशाच समुदायात राहल्याने पंकज यांना लहानपणापासूनच या व्यवसायाचे बाळकडू मिळाले होते. पंकज सांगतात की, ʻमाझे आजोबा पोखरा गटातील गवानी खेड्याच्या हितासाठी काम करत होते. त्यांनी त्यांच्या तीन गरजा पूर्ण केल्या. त्या म्हणजे कन्याविद्यालय, एक माध्यमिक शाळा आणि एक पदवी महाविद्यालय.ʼ काही वर्षांपासून त्यांना या समुदायाची जाण होती आणि त्यांच्या आजोबांच्या याविषयातील भावनिक गुंतागुतीमुळे त्यांनी या व्यवसायाची मालकी घेतली. तिच भावना आणि जबाबदारी पंकज यांच्यात असल्याने त्यांनी आजोबांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे फक्त आपल्या स्वतःच्या शैलीत. इन्स्टिट्युट ऑफ जेनोमिक्स आणि इंटीग्रेटीव बायोलॉजी, येथे पंकज यांची भेट बिन्सर फार्म्सचे भविष्यातील सहकारी दिपक आणि सुखविंदर यांच्याशी भेट झाली. पंकज यांच्या नेतृत्वाखाली हे दोघे ३५ वर्षीय तरुण प्रशिक्षण घेत होते. २००९ साली बिन्सर येथील दुर्गभ्रमंतीदरम्यान बिन्सर फार्म्सच्या व्यवसायाला सुरुवात झाली.

image


पंकज सांगतात की, ʻसुखविंदर, दिपक आणि मी दुर्गभ्रमंतीवरुन परत येताना मार्ग चुकलो होतो. तेव्हा आम्हाला एका दयाळू मेंढपाळाने त्याच्या झोपडीत आश्रय दिला. दुसऱ्या दिवशी तो आम्हाला योग्य मार्ग दाखवणार होता.ʼ पंकज यांचा हा अनुभव आपल्याला काल्पनिक कथेप्रमाणे वाटू शकतो. मात्र या अनुभवाने त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित कलाटणी दिली. मेंढपाळांच्या वस्त्या पाहिल्यानंतर या तिघांनीही उत्तरांचलमधील लोकांकरिता काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. पंकज सांगतात की, ʻआमच्या मनात पहिल्यांदा विचार आला की, डोंगरमाळात राहणाऱ्या या लोकांकडून मसूर डाळ विकत घेऊन ती बाजारात विकावी. मात्र त्यानंतर आम्हाला त्या वस्तीच्या शेजारील वस्त्यांमधूनदेखील सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. ते लोक आम्हाला धान्य, मसूर डाळ, फळे यांचा पुरवठा करत होते, जे अधिकप्रमाणात आरोग्यवर्धक होते.ʼ या दरम्यान हे त्रिकूट नोकरीदेखील करत होते. तसेच त्यांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीकरिता काम करण्यास सुरुवात केली होती. २०११ पर्यंत हे सर्व असेच सुरू होते. मात्र त्यानंतर घडलेल्या दोन गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडल्या. पहिली म्हणजे ते निवडणूक वर्ष होते, त्यामुळे त्यांच्या सर्व कल्पनांना गावपातळीवरुदेखील सहकार्य मिळत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे, पंकज हे डेल कंपनीत कार्यरत असल्याने त्यांना एका प्रकल्पाकरिता न्यूझीलंड येथे पाठवण्यात आले. ʻजेव्हा आमच्यापैकी कोणी कर्मचारी परदेशात जायचे, तेव्हा शेतीसारख्या तिकडच्या स्थानिक गोष्टी शिकण्यासाठीदेखील प्राधान्य द्यायचे. सुदैवाने न्यूझीलंडमध्ये माझी भेट फॉन्टेरा डेयरी ग्रुपचे संस्थापक निर्देशक एर्ल राट्रे यांच्याशी झाली. सध्या ते त्या डेअरीत सल्लागार म्हणून काम पाहतात. त्यांच्यासोबतच्या माझ्या मैत्रीत मी त्यांना माझी उत्तरांचलमधील कथा सांगितली.ʼ माझी कथा ऐकून ते माझ्या बिन्सर फार्म्सच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्याकरिता सहाय्य करण्यासाठी तयार झाले. एर्ल माझ्या या कार्यात सहकारी तसेच गुंतवणूकदार म्हणून काम करण्यास तयार झाले.

त्याकाळी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचा पराभव झाल्याने लोकांना दिलेली मदतीची आश्वासने एका रात्रीत हवेत विरली. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा जैसे थे राहिल्या. तेव्हा या त्रिकुटाने आपल्या पारंपारिक पुरवठ्याच्या पद्धतीत बदल करण्याचा विचार केला. त्यामुळे पंकज आणि त्यांच्या टीमने त्यांच्या नव्या कार्यपद्धतीवर काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस एर्ल याने त्यांना दुग्धव्यवसायात येण्याचा सल्ला दिला आणि २०१२ साली पंकज, दिपक, सुखविंदर आणि एर्ल या चौघांनी समभागात बिन्सर फार्म्सची स्थापना केली. बिन्सर याचा अर्थ अरुणोदय किंवा प्रारंभ. त्यांनी व्यवसायाला सुरुवात केलेल्या गावाचे नावदेखील हेच होते. दिपक आणि सुखविंदर यांचे या समुदायांशी संबंध फार जुने होते. त्यापैकी सुखविंदर यांच्या पुर्वजांना भारतातील साम्यवादाच्या संस्थापकांपैकी एकाचा दर्जा दिला जातो तर दिपक यांच्या वडिलांच्या मालकीची एक जागा हरियाणामधील सोनेपतजवळ होती. त्यांनी ती १० एकर जागा या लोकांना भाडेपट्टीवर देऊ केली. कारण त्यांच्या मते उत्पादनक्षेत्र हे नेहमीच बाजारपेठेजवळ असायला हवे. ʻऑक्टोबर २०१२ साली आम्ही पहिले वासरु विकत घेतले आणि त्यानंतर उत्पादन सुरू केले. एर्ल याच्या अनुभवी दुग्धव्यवसाय व्यवस्थापनामुळे तसेच तंत्रज्ञानामुळे बिन्सर फार्म्सचे उत्पन्न चहूबाजुंनी सुरू झालेʼ, असे पंकज सांगतात. उदाहरणादाखल पंकज सांगतात की, आम्ही ऊस, मका तसेच अन्य पिकांच्या उत्पादनाची ८० एकर जागा चाऱ्यासाठी घेतली आहे. त्यापैकी ४० एकर जागा आम्ही आमच्या परिसरातील पाच शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देऊ केली आहे. त्यांना आम्ही बियाणे, खते इत्यादींचा पुरवठा करतो. तसेच त्यांनी शेतात उगवलेले पिक आम्ही आमच्या दुग्धव्यवसायाकरिता त्यांच्याकडून पुन्हा विकत घेतो. परिणामी त्या शेतकऱ्यांना एक नियमित उत्पन्न मिळते. त्यामुळे बाजारपेठेतील चढ-उतारांचा त्यांच्यावर सहसा परिणाम होत नाही. या प्रकारच्या नियमित उत्पन्नामुळे ते आपल्या कुटुंबाच्या भविष्याचे तसेच मुलांच्या शिक्षणाचेदेखील नियोजन करू शकतात.

image


पंकज सांगतात की, ʻजनावरांच्या चाऱ्याला आम्ही प्राधान्य देतो. आम्ही जास्तीत जास्त नैसर्गिक चारा जनावरांना खायला द्यायचा प्रयत्न करतो. तसेच शेतकऱ्यांना या चाऱ्याची शेती करताना आम्ही किमान खते वापरण्याचा सल्ला देतो. जनावरांच्या छावणीवरील संशोधनाकरिता आम्ही सर्वाधिक वेळ आणि शक्ती घालवली. जेणेकरुन आमच्यासमोर पाणी साचणे, गळणे यांसारख्या समस्या उद्भवू नयेत. अनेक डेअरींमध्ये हिच समस्या भेडसावत असते. गायींच्या पांगळेपणाबद्दल म्हणायचे झाले तर आमच्याकडे फक्त एक टक्का गायी पांगळ्या आहेत, इतर डेअरींमध्ये हेच प्रमाण १२ ते १३ टक्के एवढे असते. गाय जर पांगळी असेल, तर तिचा व्यवसायात जास्त फायदा नसतो. वजन कमी होणे यांसारख्या समस्यांचा परिणाम दुग्धउत्पादनावरदेखील होतो. अनेक भारतीयांना याबाबतीत अल्प ज्ञान आहे, त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी ते सिमेंट कॉंक्रिटच्या छावण्या उभारतात. आम्ही जमिनीवर ʻकुच्चाʼचा वापर करतो, जेणेकरुन जनावरांच्या पायावर कमी ताण येतो.ʼ या उत्पादकांची उर्वरित गुंतवणुक गायींच्या देखभालीकरिता तसेच पालन पोषणाकरिता खर्च होते. या व्यवसायातील एक व्यवसाय रणनिती आखण्याचा ते प्रय़त्न करत आहेत, जेणेकरुन नव्याने व्यवसाय करू पाहणाऱ्याला काही मदत होऊ शकते. ६०० जनावरे राहू शकतील, अशा दुसऱ्या छावणीच्या उभारणीचे काम सध्या जोरात सुरू असल्याचे ते सांगतात. पंकज, सुखविंदर आणि दिपक सध्या स्थानिक शेतकऱ्यांना या गायी दान करण्याचा विचार करत आहे. त्यानंतर ते त्यांना या व्यवसायाबद्दलचे ज्ञान देणार असून, त्यांच्याकडून दुधाची खरेदी करणार आहेत. या व्यवसायाचा त्या स्थानिकांच्या आय़ुष्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे.

image


पंजाब आणि हरियाणा येथील जवळपास १२ इतर दुग्धव्यवसायिंकासोबत बिन्सर फार्म सध्या काम करत आहे. जेणेकरुन सहकार्य़ाच्या वातावरणात प्रमाणित दुध आणि दुग्धसंबंधी इतर पदार्थ जसे की, दही, तूप, पनीर वैगरेची निर्मिती करता येईल, असा पंकज खुलासा करतात. बिन्सर फार्म्सप्रमाणेच या छोट्या दुग्धव्यावसायिकांची कथा आहे. त्यापैकी काहीजण कॉर्पोरेटमध्ये काम करतात. प्रयत्न करत असताना शिकण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते. मात्र सहकार्याच्या भावनेतून आपण शिस्तबद्ध काम करू शकतो, एकत्र येऊ शकतो तसेच आपले अनुभव सांगू शकतो. अशाप्रकारच्या वातावरणात आपण सर्वोत्तम काम करू शकतो तसेच प्रमाणित उत्पादने तयार करू शकतो. सध्या आम्ही आमचे तंत्रज्ञान एका वेगळ्या डेअरीत वापरुन पाहिले. तेथे आम्हाला एक हजार लीटर दुध मिळाले. त्याचा दर्जा बिन्सरप्रमाणेच होता. त्याची चव बिन्सरप्रमाणे करण्यात आम्हाला अडचणी येत होत्या. सध्या आम्ही त्यावर संशोधन करत आहोत, असे ते सांगतात.

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले हे तिघेहीजण दुग्धव्यवसायात आपले नशीब आजमवत आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी कथेवरुन हेच सिद्ध होते की, आजच्या पिढीकरिता पैसा हेच सर्वस्व नाही, ध्येयपूर्तीसाठी झटणारी ही पिढी आहे. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, हेच या प्रेरणादायी कथेतून शिकण्यासारखे आहे.

लेखक - इंद्रजित चौधरी

अनुवाद - रंजिता परब