गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजीचा वर्ग- डोंबिवलीतील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजीचा वर्ग- डोंबिवलीतील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

Sunday January 03, 2016,

4 min Read

इंग्रजी ही भाषा आपल्याला येणारच नाही या भीतीने एक प्रकारचा न्यूनगंड अनेकांच्या मनात निर्माण होतो. याचबरोबर आजच्या सोशल मिडियामुळे इंग्रजीचा र्‍हास होत आहे. मेसेजिंग लँग्वेजमुळे अनेक भाषांची सरमिसळ करून वाक्य लिहिली जात आहेत. पण त्यामुळे इंग्रजी वाक्यरचनेचा बेसच अनेक मुलांच्या लक्षात येत नाही. इंग्रजी वाचत नाहीत, लिहित नाहीत आणि मुख्य म्हणजे ऐकत नाहीत. त्यामुळेच त्यांची इंग्रजी भाषेची भीती अधिकाधिक गडद होत जाते. पण खरंतर या भीतीचे अवडंबर करण्याऐवजी ती इंग्रजी अवगत करणे गरजेचे आहे. इंग्रजीचा न्यूनगंड बाळगल्याने कितीतरी हुशार विद्यार्थी कोशात जातात. आपल्याला हे जमणारच नाही, एखादा विषय कळणारच नाही ही संकुचित वृत्ती निर्माण होते. इंग्रजी भाषेला वाघिणीचे दुध असेही म्हटले जाते...गरीब विद्यार्थ्यांना हेच वाघिणीचे दुध प्यायला शिकविण्याचे शिवधनुष्य पेलले आहे डोंबिवलीतील सहा शिक्षिकांनी....इंग्रजीबाबतीत कोणतीही भीती न बाळगता यावर तोडगा काढण्यासाठी उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजीचे धडे देणार्‍या डोंबिवली वेल्फेअर सोसायटीच्या त्या सहा शिक्षिकांचे कार्य अनोखे आहे.

image


मराठी माध्यमातील विद्यार्थांना इंग्रजी भाषा हा तितकासा आवडीचा विषय नसतो. त्यात ही भाषा अतिशय अवघड...अशी भीती मनात बाळगणारे अनेक विद्यार्थी आहेत. अशा विद्याथार्ंसाठी त्यातल्या त्यात ते गरीब घरातील विद्यार्थी असतील तर त्यांना इंग्रजी भाषा शिकण्यासाठी खाजगी क्लासेस लावणे परवडण्यासारखे नसते. अशा विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीतील सहा शिक्षिका गरीब व गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा मोफत शिकविण्याचे समाजकार्य करीत आहे. विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी भाषा शिकविण्याचे कार्य शिक्षिकांची ही टीम गेल्या सहा वर्षांपासून करीत आहेत.

image


डोंबिवली वेल्फेअर सोसायटीच्या शैक्षणिक विभागाच्या नेहा नारकर यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या कार्यात प्रिया पाटील, रंजन शानभाग, सुवर्णा जोशी, अलका आणावकर, अमित फाटक आणि त्या स्वतः हे शिक्षणातील समाजकार्य करीत आहे. इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने ती लिहिता-वाचता आली पाहिजे, असे नुसते विद्यार्थांना सांगून काहीही होणार नाही. त्याकरिता मराठी माध्यमांतील विद्यार्थांच्या मनातील इंग्रजी भाषेची भीती दूर करणे आवश्यक आहे, असा विचार करून डोंबिवलीतील या शिक्षिकांनी हे समाजकार्याचे व्रत हाती घेतले. डोंबिवली पश्चिमेकडील सखाराम कॉम्पेल्स मधील अल्पतरू टॉवर येथील २०१ आणि २०५ या दोन रूममध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजीचा वर्ग भरतो. यामध्ये येणारे काही विद्यार्थी ही अशिक्षित घरातून असतात, तर काही इंग्रजीला घाबरणारे असतात. परंतू या शिक्षिका या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या इतक्या जवळ सहजपणे नेतात की अखेरीस या सर्व विद्यार्थ्यांची इंग्रजीशी मैत्री होते. इंग्रजी भाषा शिकविताना घरी अभ्यास करण्यासाठी काही नोट्स ही विद्यार्थांना दिले जातात. इयत्ता १ ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थांना ही भाषा शिकविण्याचे हे समाजकार्य कायम सुरु राहील, असे नेहा नारकर अतिशय आत्मविश्वासाने म्हणाल्या. डोंबिवली या शहरात मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या संख्येने राहतात. या शहरात अनेक आंतरराष्ट्रीय शाळा देखील आहेत. परंतू गरीब व मध्यमवर्गीय घरातील मुला-मुलींना इंग्रजी भाष येत नसल्याने ते इंग्रजी शाळांमधील प्रवेश टाळतात. तसेच या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा घरीच शिकविण्यासाठी घरातील कुटूंबीय देखील तितके शिक्षित नाहीत. मग असे विद्यार्थी हे इंग्रजीच्या दुनियेपासून वंचितच राहतात. हे विद्यार्थी मोठे झाल्यानंतर त्यांच्या करियरमध्ये इंग्रजी भाषा येत नसल्याने मागे पडतात. म्हणून डोंबिवली शहरातील गरीब विद्यार्थ्यांवर भविष्यात ही वेळ येऊ नये म्हणून शालेय दशेपासूनच गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे शिकविले जातात. हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. नेहा नारकर यांच्या प्रयत्नाने आज डोंबिवलीतील गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे गिरविता येणे शक्य झाले आहे. इंग्रजी शिकविणे हे या सहा शिक्षकांचा व्यवसाय नाही. परंतू कठीण वाटणारा इंग्रजी विषय सोप्या पद्धतीने, कमी वेळेत कसा आत्मसात करता येतो यासाठी हे शिक्षक इंग्रजी भाषा शिकवित आहेत. २० हजार शब्द व त्यांची ३८० विभागात मांडणी, वाक्यरचनेची नवीनच अभिनव मांडणी, देवनागरी लिपीत इंग्रजी शब्दांचा उच्चार, वाक्यरचनेचे प्रकरण असलेला शब्दकोश त्यांनी तयार केलेला आहे.

image


त्यांच्या या कार्याबद्दल डोंबिवलीतील काही जाणकार व्यक्तींकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अनिता ढगे म्हणतात की, ‘‘ माझा मुलगा आदित्य हा स्वामी विवेकानंद शाळेत शिकतो. शाळा मराठी माध्यमाची असल्याने पूर्वी त्याला इंग्रजी भाषा लिहिता सुद्दा येत नव्हती...बोलता येणं तर दूरची गोष्ट होती. परंतू या शिक्षकांच्या टीममुळे त्याला आता इंग्रजी भाषेची भीती वाटत नाही. या सर्व शिक्षिकांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.’’

image


डोंबिवलीतील या सहा शिक्षकांच्या उत्तम उपक्रमामुळे डोंबिवलीतील प्रत्येक विद्यार्थी हा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून त्याचे उज्ज्ल भविष्य घडवील व डोंबिवली शहराचे नाव रोशन करेल, अशी अपेक्षा नेहा नारकर यांनी व्यक्त केली आहे.

image