छोटया पडद्यावर काम करण्याची एक वेगळीच मजा - अभिनेत्री सुकन्या मोने

छोटया पडद्यावर काम करण्याची एक वेगळीच मजा - अभिनेत्री सुकन्या मोने

Thursday December 17, 2015,

3 min Read

गेली अनेक वर्ष मराठी टेलिव्हिजनमध्ये सातत्याने काम करणाऱ्या कलाकारांमधले एक नाव म्हणजे अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतल्या आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या माई म्हणजे सुकन्याताई सध्या सेल्फि या मराठी नाटकात व्यस्त आहेत. रंगभूमीवर एका छोट्याशा अंतराळानंतर त्या परत सक्रीय झाल्या असल्या तरी त्यांना टेलिव्हिजनचा छोटा पडदा अधिक रंजक वाटतो.

image


“कलाकार म्हणून मी स्वतःला नेहमीच नशिबवान समजते, बालनाट्य, हिंदी तसेच मराठी सिनेमा, टेलिव्हिजन, नाटक, जाहीराती अशा विविध माध्यमातनं आम्हाला आमची कला दाखवता येते, ज्याचे मोलही आम्हाला मिळते असते म्हणजे मग ते मिळणारे मानधन असू दे किंवा रसिकांचे अमुल्य असे प्रेम, खरेतर हेच कारण आहे की सतत नवनवे काम करण्यासाठी आम्हाला उद्युक्त करत असते.

आज सोशल नेटवर्किंगचा वाढता प्रभाव पहाता, त्या त्या कलाकृतीबद्दल रसिकांचे अभिप्राय, त्यांच्या प्रतिक्रिया या आम्हाला फार वेगाने मिळत असतात पण पूर्वी असे नव्हते, प्रेक्षकांची पत्रे, त्यांचे फोन क़ॉल्स, त्यानी सेटवरुन येऊन भेटणे किंवा अगदी कुठेतरी समारंभात, रस्त्यात भेटल्यावर चाहते भेटून त्यांचे त्यांचे विचार आम्हाला कळवायचे, यातली मजा काही औरच होती.”

image


चाहत्यांसंदर्भातल्या अनेक आठवणी आजही त्यांच्या मनात घर करुन आहेत.

“मला आठवतंय मी टेलिव्हिजनवर एक मालिका करत होती, ज्यात मी हॉस्पिटलचा स्टाफ बनले होते, एकदा असेच शुटिंग सुरु असताना मध्येच ब्रेक झाला, मी त्याच गेटअपमध्ये होते आणि अचानक तिथल्या एका व्यक्तीने मला खरेच हॉस्पिटल स्टाफ समजवून काम करायला सांगितले, मी ही न बोलता काम करायला सुरुवात केली, आमच्या प्रॉडक्शन टीमला हे समजले तेव्हा त्यांनी लगेच येऊन हस्तक्षेप केला आणि माझी ओळख करुन दिली, त्या व्यक्तीनेही माझी क्षमा मागितली, आजही हा किस्सा आठवला की हसायला येते.”

सुकन्याताई आभाळमाया या टेलिव्हिजनवरच्या हिट मालिकेचा संदर्भही आवर्जुन देतात. “आभाळमाया या मालिकेतनंही मला रसिकांचे भरभरुन प्रेम मिळाले, खरेतर छोट्या पडद्यावरच्या या मालिकेने माझ्या करिअरला अत्यंत महत्वाचे वळण दिले असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही. दिवंगत कलाकार विनय आपटे, मी, हर्षदा, संजय, मनोज, मनवा, श्रेयस, संज्योत अशी आमची कलाकारांची एक उत्तम टीम यात जमली होती. यानंतर मी केलेल्या प्रत्येक मालिकांमुळे मला नवनवी कुटुंब मिळालीत.

image


अगदी आत्ता आत्ताच निरोप घेतलेल्या आमच्या जुळून येती रेशीमगाठी ही मालिकाच पहा ना. यातनं आमची कलाकारांची एक मस्त टीम बनली होती, मालिकेची सांगता झाली पण आम्ही अजूनही एकत्र आहोत, वेळ मिळेल तेव्हा भेटतो, गप्पा मारतो ”

सुकन्या ताईंच्या मते टेलिव्हिजन हे इतर माध्यमांच्या तुलनेत अधिक प्रभावी माध्यम आहे. कारण नाटक, सिनेमा हे पहाण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडावे लागते, तिकीट काढा, मग बघा किंवा तो सिनेमा टेलिव्हिजनवर येईपर्यंत थांबा पण मालिका या टेलिव्हिजनवर कधीही पहाता येतात, घरातल्या गृहिणी, आबालवृद्धांसाठी, आजारी व्यक्तिंसाठी टेलिव्हिजन हा उत्तम विरंगुळा बनतो.

गेली वीस बावीस वर्षे सुकन्याताई टेलिव्हिजनच्या या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि यापुढेही राहतील. जुळून...मधली त्यांची माई त्यांचे चाहते मिस करतायत. पण याहीपेक्षा चाहत्यांना उत्सुकता आहे की त्या कोणत्या नव्या भूमिकेत भेटायला येणारेत याची.