मॅथ्यूसरांच्या ‘मॅजिक बस’मधून झोपडपट्टीतील मुले ‘कॉर्पोरेट’ला

मॅथ्यूसरांच्या ‘मॅजिक बस’मधून झोपडपट्टीतील मुले ‘कॉर्पोरेट’ला

Friday November 13, 2015,

5 min Read

डोक्याखाली छत नाही, अशा मुलांची संख्या भारतात कमी नाही. फुटपाथवरले जिणे या मुलांच्या नशिबी असते. अशी मुले नेहमीच शोषणाची बळी ठरतात. भाकरतुकड्यासाठी वणवण भटकण्यात या मुलांचा दिवस जातो. झोपडपट्टीतील मुलांचे जगणे यापेक्षा थोडे बऱ्यापैकी असले तरी हालअपेष्टा त्यांच्याही ललाटी कमी नसतात. दारिद्रयामुळे धड शिकणे होत नाही, की अभ्यास होत नाही. अशाच वंचित आणि शिक्षणाच्या सर्व सोयी-सुविधांना मुकलेल्या मुला-मुलींसाठी एक जण उभा राहतो आणि एक अशी योजना आखतो, की सगळेच थक्क होतात. वंचित मुलांना शिकले-सवरलेले करून सोडत चांगले काम करण्यालायक बनवणे, हा त्याच्या या योजनेचा मुख्य उद्देश. पाहता-पाहता देशभरातील विविध राज्य सरकारांनी ही योजना उचलून धरली. अनेक अशासकीय स्वयंसेवी संस्थांनीही हीच योजना आपल्या उपक्रमांतर्गत लागू करून अनेक मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यालायक करून सोडले. ‘हसत-खेळत शिक्षण’ हा या योजनेचा मूलभूत मंत्र आहे. योजना देशभर लागू व्हावी, कार्यान्वित व्हावी म्हणून योजनेच्या प्रवर्तकाने आपल्या तगड्या पगाराच्या नोकरीचीही या ज्ञानयज्ञात, त्यागयज्ञात आहुती दिली. गरिब मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी स्वत:चे आयुष्य झोकून दिले. आज ते आपल्या या योजनेमुळे आणि त्यागामुळे जगभरात ओळखले जातात. मॅथ्यू स्पेसी असे त्यांचे नाव आहे. कितीतरी सन्मान त्यांचे झालेले आहेत आणि कितीतरी पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत.

image


मॅथ्यू स्पेसी १९८६ मध्ये पहिल्यांदा भारतात आले होते. कोलकात्यात ‘दि सिस्टर्स ऑफ चॅरिटी’मध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून कार्य केले. इथूनच ते समाजसेवेत रुळले. पदवीपर्यंत शिक्षणानंतर त्यांना नोकरीही मिळाली. इंग्लंडमध्ये अनेक महत्त्वाच्या हुद्द्यांवर त्यांनी काम केले. मॅथ्यू यांची प्रतिभाशक्ती आणि त्यांचा कल पाहून त्यांच्या कंपनीने त्यांना भारतात पाठवले. ‘कॉक्स अँड किंग्स’ नावाच्या कंपनीचे सीईओ म्हणून त्यांची इथे नियुक्ती करण्यात आली. मॅथ्यू तेव्हा २९ वर्षांचे होते. ‘कॉक्स अँड किंग्स’ त्या काळातली भारतातली सर्वांत बडी ट्रॅव्हल एजंसी होती. मॅथ्यू यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

मॅथ्यू यांना रग्बी खेळात कमालीचा रस होता. खेळातील कौशल्याच्या बळावर भारताच्या राष्ट्रीय संघातही त्यांची निवड झाली. मुंबईतील फॅशन स्ट्रिटवर टिमचा सराव चालायचा. इथे खेळ बघायला म्हणून फुटपाथवरली मुले गोळा होत. मुले खेळाडूंना प्रोत्साहन देत. मुलांचा जोश बघून मॅथ्यू त्यांना आपल्यासमवेत खेळायला म्हणून बोलावून लागले. मॅथ्यू या मुलांचे साहजिकच लाडके बनले. यादरम्यान मॅथ्यू यांनी एक नोंद घेतली. रग्बी खेळत-खेळत या मुलांच्या वागण्यात बऱ्यापैकी फरक पडलेला होता. याआधी ते एकमेकांना घाणेरड्या शिव्या देत असत. भांडत असत. हे सगळे बंद झालेले होते. खेळत-खेळतच ही मुले खूप काही शिकलेली होती, ही बाब मॅथ्यू यांच्यापासून लपून राहिली नाही. मुलांमधल्या या परिवर्तनातूनच मॅथ्यू यांच्या डोक्यात शिक्षणासंबंधीचा हा परिवर्तनवादी विचार तरळून गेला.

मॅथ्यू यांनी साप्ताहिक सुटीला एक बस भाड्याने घ्यायला सुरवात केली. ही बस घेऊन ते धारावी आणि इतर झोपडपट्टींतून जात. मुलांना मिठाई देत. खेळणी देत. फुटपाथवर राहणाऱ्या काही मुलांना ते आपल्यासह सहलीवरही नेत. मुलेही सहलीचा आनंद लुटत. एकवेळचे जेवण, चांगले कपडे आणि खेळण्यांना तरसणारी ही मुले मॅथ्यूमामांच्या गाडीची चातकासारखी वाट बघत. मॅथ्यू आता या मुलांसाठी खरेखुरे हिरो बनलेले होते. हीच बस पुढे जाऊन ‘मॅजिक बस’ नावाने एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा पाया बनली.

पण, थोड्याच दिवसांनी मॅथ्यू यांना जाणवले, की बस घेऊन ते येतात तेव्हाच मुले आनंदी असतात. एरवी बाकी सगळे दिवस मुलांचे जगणे म्हणजे भाकरीसाठीची भटकंती असते. झोपायला या मुलांना घर नाही की काही नाही. खेळायला काही नाही. अनेकदा ही मुले गुंड-बदमाशांच्या शोषणाला बळी पडतात. म्हणून मग मॅथ्यू यांनी ठरवून टाकले, की मुलांना फुटपाथच्या या गर्तेतून काढायचे. त्यांच्यासाठी कायमस्वरूपी उपाय आपण शोधून काढायचा, जेणेकरून ही मुले शिकावीत, त्यांनाही पुढे एखादी चांगली नोकरी मिळावी. वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांतून मग आपल्या मित्रांच्या मदतीने मॅथ्यू यांनी या मुलांना नोकरी मिळवून दिली. मुलांमध्ये शिस्त, शिष्टाचार आणि कुठलेही कौशल्य नसल्याने ती या कंपन्यांतून जास्त दिवस टिकू शकली नाहीत. या कटू अनुभवातून मॅथ्यू यांना नवा धडा शिकवला. आता मुलांमध्ये नवी पद्धत घेऊन जाण्याचे मॅथ्यू यांच्या मनाने धाटले. रग्बीच्या काळातला अनुभव मॅथ्यू यांच्या गाठीला होताच. मुलांना आपण हे सगळे शिकवू आणि त्यासाठी खेळण्या-हुंदडण्याचीच मदत घेऊ, असे मग त्यांनी ठरवले.

image


१९९९ मध्ये मॅथ्यू यांनी आपली एनजीओ ‘मॅजिक बस’ औपचारिकपणे सुरू केली. मुलांच्या सेवेला वेग देता यावा म्हणून पुढे २००१ मध्ये त्यांनी नोकरीला राजीनामा दिला. सरकारी शाळांतून दाखल होणारी झोपडपट्टीतील मुले शाळेत जात राहायला हवीत आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीत मधूनच शिक्षण सोडता कामा नये, हे आधी मॅथ्यू यांनी आपले एक मुख्य ध्येय म्हणून निश्चित केले. सरकारी शाळांतून खेळणे-बागडणे हा सुद्धा अभ्यासक्रमाचाच एक भाग म्हणून लेखला जावा, यासाठी मग मॅथ्यू यांनी प्रयत्न सुरू केले. मॅथ्यू यांनी स्वत: ‘शिक्षण-नेतृत्व-उत्पन्न’ अशी साखळी साधणारा एक नवा अभ्यासक्रम तयार केला. ‘एकावेळी एक काम’ ही मॅथ्यू यांची घोषणा होती. शिक्षणाबद्दल जागरूक करण्यासह कौशल्य आत्मसात करण्याची वृत्ती मॅथ्यू यांनी मुलांमध्ये रुजवली. शिक्षणासह एखादे कौशल्य असले म्हणजे एक चांगली नोकरी मिळवणे सोपे जाते, हा मॅथ्यू यांचा होरा होता. मॅथ्यू यांची योजना सफल झाली. त्यांनी रचलेला अभ्यासक्रम आता या शाळांसाठीही जणू यशाचा नवा मंत्रच होता. मॅजिक बसच्या यशात सर्वांत मोठा वाटा या उपक्रमाला सर्वस्व वाहून देणाऱ्या तरुण स्वयंसेवकांचा आहे.

‘मॅजिक स्कूल’ इफेक्ट...

१) ‘मॅजिक स्कूल प्रोग्रॅम’मुळे आता ९५.७ टक्के शाळांमध्ये प्रत्यक्ष पटावर हजर असणाऱ्या मुलांची संख्या ८० टक्क्यांवर गेलेली आहे.

२) ९८ टक्के मोठ्या मुली (ज्यांना शाळेत घातलेच नव्हते, किंवा मग ज्यांनी शाळा मधूनच सोडून दिली अशा) शाळेत पूर्ववत येऊ लागलेल्या आहेत.

३) झोपडपट्टीतील तसेच फुटपाथवरील हजारो मुलांना आता शिक्षण आणि कौशल्याच्या बळावर नोकऱ्या मिळू लागलेल्या आहेत.

४) मॅजिक बस कार्यक्रम आता देशातील १९ राज्यांतून लागू झालेला आहे.

५) देशभरातील अनेक राज्यांतून गरीब आणि गरजू मुलांच्या मदतीसाठी सरकारी कार्यक्रमांतून ‘मॅजिक बस’कडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.

६) मॅजिक बस कार्यक्रमाच्या मदतीसाठी कितीतरी मोठ्या कार्पोरेट कंपन्या पुढे सरसावल्या आहेत.