कचऱ्याचे सोने करणारी ‘अमृता…’

कचऱ्याचे सोने करणारी ‘अमृता…’

Thursday October 22, 2015,

5 min Read

अमृता चॅटर्जी… कोलकात्यातील ‘साउथ आशियन फोरम फॉर दी एन्व्हायर्नमेंट’ (SAFE) योजनेच्या प्रमुख… झोपडपट्टीतील रहिवाशांना कचऱ्यातून भरीव कमाई करून देण्यात अमृता यांचे योगदान अमृततूल्य असेच आहे. त्यांच्या ‘रिझॉल्व्ह ट्रॅश टू कॅश’ या उपक्रमाच्या माध्यमातून कचऱ्याचे पृथ:करण केले जाते. रिसायकलिंग केले जाते. आणि हा कचरा पुनर्निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो. पर्यावरणाच्या दृष्टीने या उपक्रमाचे दीर्घकालीन फायदे आहेतच, पण त्यासह झोपडपट्टीतील गोरगरिबांना विशेषत: महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यातही याचा मोठा वाटा आहे. रद्दीपासून केलेल्या लगद्याच्या माध्यमातून महिलांना कलात्मक हस्तशिल्प तयार करण्याचे प्रशिक्षण या उपक्रमाच्या माध्यमातून दिले जाते. महिलांना पुढे स्वत:च्या पायावर उभे केले जाते. ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेंशन ऑन क्लायमेट चेंज’तर्फे लिमा (पेरू) येथे आयोजित ‘सीओपी २०’ या भव्य अधिवेशनात ‘मोमेंटम् फॉर चेंज लाइट हाउस पुरस्कार २०१४’ या उपक्रमाला नुकताच बहाल करण्यात आला.

महानगरांतून कचरा व्यवस्थापन हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. कचऱ्याचे ढीग लावणे, मोकळ्या जागेत विशेषत: खोलगट भागांतून कचऱ्याचा भर म्हणून वापर करणे वा कचरा जाळणे अशा मार्गांनी पर्यावरणाची मोठी हानी होते आहे. आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत. एकट्या कोलकाता शहरात दररोज ५००० टन कचरा निर्माण होतो. ‘सेफ’तर्फे २०१० मध्ये झालेल्या एका सर्व्हेक्षणानुसार एकूण कचऱ्यापैकी ८६ टक्के कचरा अनियमित रिसायकलिंग प्लांटद्वारे वापरला जातो आहे. कचरा व्यवस्थापनाच्या अशास्त्रीय धोरणांमुळे त्यांचे फावते आहे. शहरांती गरिबांपैकी ५० टक्के वर्ग हा कचरा गोळा करणे, त्याचे पृथ:करण करणे अशा कामांमध्ये गुंतलेला आहे. या वर्गाच्या आरोग्यालाच एक नवा धोका या व्यवसायामुळे निर्माण झालेला आहे. कामाचा मोबदलाही या वर्गाला योग्य पद्धतीने दिला जात नाही. एकुणातील या शोषणाविरुद्ध २०११ मध्ये ‘रिझॉल्व्ह ट्रॅश टू कॅश’ उपक्रमाला सुरवात झाली.

‘रिझॉल्व्ह ट्रॅश टू कॅश’ म्हणजे कोलकात्यातील रस्त्यांवरल्या आयुष्यांची कथा आहे. गरिबांची कथा आहे. नागरी विकास, वातावरणातील बदल, पर्यावरणाचा प्रश्न, बदलत असलेली सामाजिक रचना या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गरिबांनी अखेर यशस्वी व्यावसायिक म्हणून स्वत:च्या क्षमताच जणू सिद्ध केल्या.

image


झोपडपट्टीतील, फुटपाथवरील लोक वा इथली मुले पाहून हे सगळे कचराछाप जीवन जगणारे लोक आहेत, असाच समज सगळ्यांचा असतो. अमृता सांगतात, ‘‘‘रिझॉल्व्ह ट्रॅश टू कॅश’च्या माध्यमातून आम्ही झोपडपट्टीतील महिलांमधून आम्ही एकाहून एक सरस व्यावसायिक शोधून काढल्या. नव्या पिढीतील, नव्या दमाच्या लोकांप्रमाणेच यांनाही फक्त थोडे तांत्रिक सहकार्य आणि व्यवसाय सुरू करण्यासाठीची प्रारंभिक मदत तेवढी हवी आहे. उपक्रमाचे उद्दिष्टच मुळात ‘कचऱ्याच्या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय’ हे आहे. ऋतूबदलानुसार आपल्या उद्दिष्टाचा ताळमेळ बसवणे, हे आव्हान त्यात ओघाने आलेच. ‘रिसायकलिंग एक कला आहे आणि ही कला जीवन आणि उपजिविकेचे भरणपोषण करणारी आहे,’ हे महिलांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या कार्यक्रमाने महिलांना स्वावलंबी केलेच, पण महिलांना एक आई म्हणूनही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सक्षम केले. महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला.’’

‘जगाला स्वच्छ-सुंदर बनवा’ कार्यक्रमांतर्गत संयुक्त राष्ट्र पर्यावरण अभियानाने अमृता चॅटर्जी यांच्या प्रयत्नांना मान्यता प्रदान केलेली आहे. त्यांची कचरा व्यवस्थापन योजना हळूहळू एका लघुउद्योगाचे स्वरूप धारण करते आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये उद्योजकतेचा विकास करते आहे. समाजात बहिष्कृत मानल्या जाणाऱ्या या एका मोठ्या घटकाला समाज आता स्वीकारू लागलेला आहे.

image


सुरवातीच्या काळात ‘सेफ’ने कार्यशाळा आयोजिल्या. कचऱ्यातून पैसा कसा कमावता येतो, ते सांगितले. दहा सदस्यांनी मिळून सामूहिक जबाबदारी समूह (Joint Liability Groups, JLGs) अशी रचना केली गेली. रद्दीच्या लगद्यापासून सप्रेम भेट म्हणून द्यावयाच्या वस्तू तयार करणे हा पहिला उपक्रम ठरला. समूहाचे खाते सुरू करण्यासाठी बँकांशी संपर्क केला. समूहातील बहुतांश सदस्यांजवळ ओळखपत्रे नव्हती म्हणून खाते सुरू करणे अवघड बनले. शेवटी युको बँकेत खाते उघडले गेले. कुशल प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेतल्या. महिलांना भेटवस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. कॉर्पोरेट क्षेत्रातील काही उद्योजकांनी मदत केली. कचऱ्यातून रद्दी कागद वेगळे करून या उपक्रमासाठी देऊ केले. आपापल्या कार्यालयांतून कचऱ्यासाठी स्वतंत्र डबे ठेवले, जेणेकरून रद्दीकागद उपक्रमासाठी उपलब्ध व्हावेत. पुरुष मंडळींना इथून कचरा कागद संकलनासाठी खास तयार करण्यात आले. पुढे वेळोवेळी लागणारे आनंद मेळे, प्रदर्शने यातून रद्दीच्या लगद्यापासून तयार केलेल्या या भेटवस्तू विक्रीला ठेवल्या. सोशल मिडियाचा वापर त्याच्या प्रचारासाठी केला. कॉर्पोरेट घराण्यांचेही सहकार्य घेतले. घाऊक व किरकोळ खरेदी कशी वाढेल त्याची काळजी वाहिली. या उपक्रमात आता सर्वस्वी महिलांची एकाधिकारशाही चालते. विक्री प्रतिनिधी म्हणूनही महिला म्हणतील त्याचीच नियुक्ती केली जाते.

कार्यक्रमांतर्गत ३५० कचरावेचक व्यक्ती सहभागी आहेत. कोलकात्याच्या तीन मुख्य झोपडपट्टींतील रहिवाशांचा त्यात समावेश आहे. शहरभरचा कचरा जिथे आणून टाकला जातो, अशा मोक्याच्या ठिकाणांलगत या झोपडपट्टी आहेत.

गत वर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत या वर्षी उत्पन्नात तब्बल ३५ टक्के वाढ झालेली आहे. गरिब वर्गाचे आर्थिक सशक्तीकरण शक्य झालेले आहे. कार्यक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या ४०० जणांचा ‘मायक्रोफायनांस’च्या माध्यमातून विमा उतरवण्यात आलेला आहे. ‘टाटा ए आय जी लाइफ’ने या लोकांसाठी खास जोखीम-सक्षम विमा पॉलिसी तयार केलेली आहे. कचरा आपल्या मूळ जागेतूनच वेगवेगळा करून उचलला जाईल, असे तंत्र आता विकसित केले गेलेले आहे. जमिनींवर कचऱ्याचा भराव कमी होण्यात मदत झालेली आहे. कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूंमुळे होणाऱ्या प्रदूषणात घट झालेली आहे.

image


अल्लाउद्दिन शेख २० वर्षांपूर्वी सुंदरबनहून रोजगाराच्या शोधात कोलकात्याला आले होते. ‘रिझॉल्व्ह’चे ते आभारी आहेत. शेख यांची परिस्थिती सुधारण्यात ‘रिझॉल्व्ह’चा मोलाचा वाटा आहे. ते म्हणतात, ‘‘या मोठमोठाल्या इमारतींतून युनिफॉर्म घालून मला फिरता येईल, याचा विचारही मी कधी केलेला नव्हता. आयडेंटिटी कार्ड घेऊन या इमारतींतून मी ऐटीत फिरतो. कचरा गोळा करत असलो तरी मला मी सफाईचे पवित्र कार्य करतो आहे, हा अभिमान आहे. मला यादरम्यान एक पुरस्कारही मिळाला. मला माझी संस्था म्हणजे एक वरदान वाटते.’’

माया मंडल आधी एका मच्छिमाराकडे कामाला होत्या. जाळ्याने मासळी पकडत. महिन्याला ७५० ते १८०० रुपये कमाई व्हायची. खराब पाण्यात उतरावे लागत असल्याने त्वचेचे विकारही झालेले होते. आज त्या तंदुरुस्त आहेत. लगद्यापासून हस्तशिल्पे घडवतात. पहिल्या तुलनेत पाचपटीने पैसा कमवतात. मुलंही शाळेत जाऊ लागलेली आहेत. त्या स्वत:ही आता बंगाली भाषा लिहायला-वाचायला शिकत आहेत. माया म्हणतात, ‘‘कितीतरी पिढ्यांपासून आम्ही खराब पाण्यात मासळी पकडण्याच्या व्यवसायात होतो. मी चित्र काढणे, रंगवणे, कारागिरी करणे याचे कधी स्वप्नही पाहिलेले नव्हते. अमृताताईंनी माझी त्या विषारी आयुष्यातून सुटकाच केली.

कागदाच्या रिसायकलिंग उपक्रमाने ‘सेफ’चा उत्साह वाढलेला आहे. आता ‘सेफ’ आणखी नव्या योजना सुरू करते आहे. ओल्या कचऱ्याच्या रिसायकलिंगमधून कंपोस्ट खत तयार करण्याचा उपक्रम लवकरच सुरू होऊ घातलेला आहे. ‘प्रदूषणात घट आणि मोबदल्यात खत, असा दुहेरी लाभा या उपक्रमाद्वारे कचऱ्यातून होणार आहे. नैसर्गिक पद्धतीने प्लास्टिक कचरा नाहीसा करता येत नाही. म्हणून त्याचा पुनर्वापर आणि घरगुती उद्यानांसाठी त्यापासून खेळणी तसेच विविध वस्तू तयार करणे, असा उपक्रमही संस्थेतर्फे सुरू केला जात आहे.