मदर तेरेसांकडून मिळाला समाजसेवेचा वारसा - पलक मुच्छल

मदर तेरेसांकडून मिळाला समाजसेवेचा वारसा - पलक मुच्छल

Thursday November 05, 2015,

3 min Read

१९९९ ला भारत-पाकिस्तान दरम्यान कारगिल युध्द झालं तेव्हा पलक मुच्छल फक्त ७ वर्षांची होती. कारगिल युध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी जो तो आपआपल्या पध्दतीनं प्रयत्न करत होता. पलकनंही मनात विचार केला की आपण ही मदत करायला हवी. इंदौर शहरातल्या एकही रस्ता असा राहिला नाही जिथं पलक जाऊन गायली नाही. सात वर्षांच्या या चिमुरडीचं ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं ऐकताना लोक हेलावत. अगदी काही दिवसांत पलकनं कारगिर फंडासाठीसाठी २५ हजार रुपये उभे केले. त्यानंतर ओरीसात आलेल्या महाभंयकर चक्रिवादळातल्या पीडितांच्या मदतीलाही ती धावली. त्यांच्यासाठीही असे गाण्याचे कार्यक्रम करुन तिनं निधी गोळा केला.


पलक मुच्छल

पलक मुच्छल


आज पलक फक्त २३ वर्षांची आहे पण तिचं सामाजिक काम फार मोठं आहे. अनेकांना कित्येकवर्षे बॉलीवुडच्या चमचमत्या जगात राहून जे जमलं नाही ते पलकनं इतक्या लहान वयात केलंय. तिनं ८२१ हृदयविकार असलेल्या लहान मुलांच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला आहे. या कामासाठी गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक रेकॉर्डमध्ये तिची वर्णी लागलीय. याची सुरुवात कशी झाली असं विचारलं असता पलक सांगते “ मला लहानपणापासून सामाजिक कामाची सवय होती. गाणं शिकता शिकता मी अनेक कार्यक्रम करत होते. इंदौरच्या शाळेत लोकेश नावाच्या एका मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी ५५ हजार रुपयांची गरज होती. आम्हाला वर्गात त्याबद्दल सांगण्यात आलं. मी लोकेशला ओळखत होती. दुसऱ्या दिवशी मी आणि लोकेश दोघांनी मिळून राजवाडा रस्त्यावर एक छोटा स्टेज उभारला. तिथं मी दिवसभर गात होते. संध्याकाळपर्यंत शस्त्रक्रियेसाठी जेव्हढ्या पैशांची गरज होती त्यापेक्षा जास्त पैसे जमले. लोकेशचं ऑपरेशन यशस्वी झालं. तो अजूनही माझा चांगला मित्र आहे.”

image


पलक बॉलुवडमध्ये गायिका म्हणून करियर करण्यासाठी मुंबईला आली. नशीबानं चांगली साथ दिली. बॉलीवुडच्या चकाचौंद जगात ती हरवली नाही तर तिची सामाजिक जाणिवा आणखी प्रगल्भ झाल्या. ती म्हणते “ लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया खुप महाग असतात. अनेकदा त्यांच्या आई-वडिलांकडे पैसेही नसतात. हे आमच्या लक्षात आलं होतं. मी आणि माझा भाऊ पलाश दोघांनी मिळून अशा मुलांना मदत करायचं ठरवलं. आम्ही स्टेज शो करु लागलो आणि त्यातून जे पैसे जमा व्हायला लागले त्यांनी आम्ही या लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रियांसाठी देऊ लागलो. एखाद्याला मदत केल्यावर मला खुप बरं वाटतं. माझ्या आई-बाबांकडून हे मला मिळालंय. ते ही असेच लोकांच्या मदतीला धावून जायचे.”

image


आत्तापर्यंत पलकनं ८२१ हृदय शस्त्रक्रियांचा खर्च केलाय. तिनं आता अशा शस्त्रक्रियांना मदत करण्यासाठी ट्रस्टची स्थापना केलीय. जिथं हृदयरोग पीडितांची मदत केली जाते. तिच्या कमाईतला बहुतांश भाग या ट्रस्टकडे जातो. या ट्रस्टतर्फे वेटींग लिस्टमध्ये असलेल्या आणखी ४१५ बालकांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. अगोदर प्रत्येक शस्त्रकियेला ती स्वत: हजर असायची. पण ते आता ते शक्य नसतं. पण ती या दरम्यान एकदा तरी डॉक्टरांशी बोलते. पलक म्हणते “ मदर टेरेसा माझी आदर्श आहे. त्यांनी ज्याप्रकारे नि:स्वार्थी मनानं जगाची सेवा केली त्याच्या एक टक्के जरी समाजाची सेवा आपल्याला करता आली तर मी माझं भाग्य समजेन.”