‘हिंडन’ नदीच्या पुनरुज्जीवनासाठीचा भगीरथ प्रयत्न म्हणजेच विक्रांत शर्मा

‘हिंडन’ नदीच्या पुनरुज्जीवनासाठीचा
भगीरथ प्रयत्न म्हणजेच विक्रांत शर्मा

Wednesday October 14, 2015,

5 min Read

गंगा नदीला प्रदूषण मुक्त करण्याचा विषय गेल्या कितीतरी वर्षांपासून गाजतोय. निर्मळ गंगेसाठीच्या उपाययोजनांवर सध्या कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, याबद्दलही सगळ्यांनाच माहिती आहे. गंगेला धार्मिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि त्या अनुषंगाने एक राष्ट्रीय महत्त्व आहेच, हे कुणीही नाकारत नाही… नाकारणार नाही, पण एक प्रश्न मनात तरळून जातोच… मोठ्या संख्येने देशभरात ज्या छोट्या नद्या आहेत, त्यांच्या अस्तित्वाचे काय? फार थोडे लोक या छोट्या नद्यांचा विचार करतात. छोट्या नद्यांकडे लक्ष देतात. लुप्त झालेली सरस्वती ही एकटीच नदी नाही. अगदी अलीकडच्या काळात अनेक छोट्या नद्या लुप्त झालेल्या आहेत. आणि अनेक लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या नद्यांना कसे वाचवायचे… त्याचा विचार कुणी करणार आहे, की नाही?

‘‘माझ्या दृष्टीने नदी म्हणजे केवळ वाहत्या पाण्याचा एक मार्ग नव्हे. नदीचे महत्त्व यापेक्षा खचितच अधिक आहे. नद्या या आमच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहेत. नद्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत गंभीरपणे विचार आणि कृती करण्याची हीच वेळ आहे. आता जर आम्हाला जाग आली नाही, तर आमच्याहून अधिक दुर्दैवी कुणीही नाही’’, गाझियाबादचे रहिवासी विक्रांत शर्मा पोटतिडिकीने बोलत असतात.

image


विक्रांत शर्मा व्यवसायाने वकील आहेत. नद्या आणि एकुणच पर्यावरणाबद्दलच्या आत्मियतेमुळे अवघ्या गाझियाबाद परिसरात ते ओळखले जातात. मॅगेसेसे पुरस्कार विजेते ‘जोहड’कार जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या ‘जलबिरादरी’शी ते संलग्न आहेत. पाणी, वने आणि पर्यावरण अशा त्रिसूत्रीतच ते सतत गुरफटलेले असतात.

पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग शेतीच्याबाबतीत समृद्ध मानला जातो. हिंडन नदी ही पश्चिम उत्तर प्रदेशची जीवनदायिनी म्हणून ओळखली जातो. हिंडनलाच हरनंदी म्हणूनही ओळखले जाते. प्रदूषणामुळे या नदीलगतची ‘इकोसिस्टिम’ बिघडलेली आहे. ती सावरायची तर हिंडन नदीला प्रदूषणमुक्त करायलाच हवे म्हणून विक्रांत शर्मा यांनी तसा विडा उचलला. मोहीम सुरू केली. ‘हिंडन जल बिरादरी’ची स्थापना केली. आपला लढा ते एका आगळ्याच शैलीने पुढे नेताहेत. आजचे युग हायटेक. आणि विक्रांत यांचे आदर्श गांधीजीच. नदीबाबत परिसरातील लोकांत जागरूकता यावी म्हणून बापूंच्या पावलांवर चालत ते पदयात्रा वगैरे काढत असतात. ‘हिंडन वाचवा’ हा मंत्र देत असतात.

image


विक्रांत यांचे वडील ‘सीआरपीएफ’मध्ये वरिष्ठ अधिकारी होते. विक्रांत यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदवी घेतली. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे एलएलबी केले आणि २००२ मध्ये गाझियाबाद कोर्टात वकिली सुरू केली.

विक्रांत म्हणतात, ‘‘मी लहानपणापासून पर्यावरणप्रेमी. पानाफुलांची मला भारी ओढ. पुढे नद्यांपर्यंत ती गेली. २००४ मध्ये वकिली ऐन भरात असताना परिसरातल्या हिंडन नदीची दूरवस्था मला सारखी बोचत होती. गाझियाबादमधूनही ही नदी जाते. नाल्यासारखी तिची अवस्था पाहून मी कमालीचा अस्वस्थ होत असे. नदीचीच वकिली करायची असे मी ठरवून टाकले. बरेच दिवस एकटाच त्या दिशेने प्रयत्न करत होतो. नंतर अन्य युवकांची आणि पर्यावरणप्रेमींची साथ मिळत गेली. २००४ मध्ये ‘हिंडन जल बिरादरी’ची स्थापना झाली.

image


सुरवातीच्याच काळात त्यांच्या लक्षात आले, की नदीला प्रदूषणमुक्त करायचे असेल आणि वाचवायचे असेल तर नदीच्या काठावर राहणाऱ्या ग्रामस्थांना या नदीचे महत्त्व समजवून सांगावे लागेल. नदीच्या संरक्षण आणि संवर्धन कार्यात त्यांनाही सहभागी करून घ्यावे लागेल. हे करायचे तर ग्रामस्थांपर्यंत आपण पोहोचायला हवे. दुसरा पर्याय नाही.

विक्रांत सांगतात, ‘‘हिंडन नदीची ओळख अगदी जवळून व्हावी म्हणून पदयात्रा काढायला मी सुरवात केली. पदयात्रेच्या माध्यमातून दोन्ही बाजूंनी नदीची परिक्रमाच केली म्हणा. मला वाटते नदी जाणून घ्यायची तर पदयात्रेशिवाय गत्यंतर नाही. पदयात्रेच्या माध्यमातून नदीलगतच्या वनस्पती, वन्यजीव आणि या शिवाय तिच्या काठावर फुललेल्या संस्कृती, लोकजीवन सगळ्यांच्याच आपण अगदी समोरासमोर येतो. नदीकाठच्या निसर्गाला जवळून पाहायचे आणि पानाफुलांशी संवाद साधायचा तर दुसरे कुठलेही साधन नाही.’’

image


हिंडन नदीचा उगम सहारनपूर जिल्ह्यातील पुरकाटांडा येथे होतो. नोएडालगत मोमनाथनपूर गावात ती दुसऱ्या एका नदीत विलिन होते. अशी २०१ किलोमिटरची पदयात्रा विक्रांत कितीतरी वेळा केलेली आहे. पदयात्रेदरम्यान नदीकाठच्या जवळपास ४०० गावांतील रहिवाशांशी त्यांनी संवाद साधलाय. ओळखही बनवलीय. नदीला प्रदूषणमुक्त कसे ठेवायचे, त्याचे मंत्र आणि तंत्रही ग्रामस्थांना दिले.

विक्रांत सांगतात, ‘‘आम्ही हिंडनसह तिच्या कृष्णी आणि काली या उपनद्यांच्या काठी राहणाऱ्या ४०० हून जास्त गावांचा आणि त्यातल्या १०० हून अधिक नाल्यांचा असा एक नकाशा तयार केलेला आहे. फोटोग्राफी आणि भित्तिफलकांच्या माध्यमातून नदीप्रदूषण-मुक्तीचे मार्ग समजावले गेले आहेत. लहान मुलांपर्यंतही हा विषय पोहोचावा म्हणून त्यांच्यासाठी विविध स्पर्धाही आयोजिल्या गेल्या. चित्रकला स्पर्धा आम्ही प्राधान्याने घेतो. कारण मुलांना ती आवडते. मुले रमतात. मुले कच्चा मातीप्रमाणे असतात, जसे घडवले तसे ते घडतात. या वयातच नद्यांचे महात्म्य त्यांच्यात रुजले, तर ते अधिक उपयोगाचे. पुढे तेही नद्यांची काळजी वाहतील. अशा उपक्रमांतून आम्ही नदीचे आणि या मुलांचेही भविष्य एकप्रकारे सुरक्षित करीत आहोत.’’ ‘हिंडन वाचवा’ अभियानांतर्गत ‘नदी संरक्षण’ या विषयावर विक्रांत यांनी आजपावेतो १५ हून अधिक चर्चासत्रे यशस्वीपणे पार पाडली आहेत.

image


शिवाय अलीकडेच त्यांनी जल बिरादरीच्या फलकाखाली ‘पावसाचे पाणी वाचवा’ या विषयावर एक निबंध स्पर्धाही आयोजिली होती. ४०० हून अधिक निबंध त्यासाठी प्राप्त झाले.

विक्रांत म्हणतात, ‘‘या निबंध स्पर्धेची सर्वांत मोठी फलनिष्पत्ती ही की जिल्हा कारागृहातूनही कैदी बांधवांच्या ६० प्रवेशिका आम्हाला प्राप्त झाल्या. निवड झालेल्या उत्कृष्ट निबंधांमध्ये एक जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने लिहिलेला आहे, हे विशेष! कारागृहातले कैदीही नदीचे महत्त्व ओळखू लागलेले आहेत, हे आमच्यासाठी आनंददायीच.’’

हिंडन नदीच्या विषयावर एक डॉक्युमेंटरीही तयार केलेली आहे. नदीकाठच्या शंभराहून अधिक गावांमधून तिचे वितरण झालेले आहे. नदीवर एक गाणेही संगीतबद्ध केलेय. ‘हिंडन साँग’ नावाने ते ऐकले जाऊ शकते.

image


विक्रांत एक दाखला देतात, ‘‘काही वर्षांपूर्वी हिंडन नदीकाठी वसलेल्या एका गावात सुठारीमध्ये पदयात्रेदरम्यान हडाप्पाकालीन तसेच महाभारतकालीन अवशेष आढळले. अवशेषांच्या संरक्षणासाठीही आम्ही चळवळ उभारली. परिणाम असा झाला, की गावात आणखी काही ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गोष्टी आढळल्या.’’ नद्या या आमच्या संस्कृतीच्या वाहक असल्याचेच हे द्योतक.

नदी संरक्षणाच्या या लढ्यादरम्यान विक्रांत यांनी विविध ठिकाणी नदीशी संबंधित शंभराहून अधिक 'आरटीआय' दाखल केलेल्या आहेत. यातून त्यांना नद्यांशी निगडित महत्त्वाच्या गोष्टी माहित झाल्या. खूप अनुषंगिक माहितीही मिळाली. नॅशनल ग्रिन ट्रिब्युनलमध्येही (राष्ट्रीय हरित प्राधिकरण) विक्रांत यांनी हिंडन नदीवर वाढत चाललेल्या अतिक्रमणांबद्दल आणि प्रदूषणाबद्दल दोन याचिका दाखल केलेल्या आहेत. हरित प्राधिकरणाने विक्रांत यांच्या याचिकेची दखल घेऊन कठोर आदेशही जारी केलेले आहेत.

नदी बचाव चळवळ बऱ्यापैकी मार्गी लागल्यानंतर विक्रांत यांनी पुन्हा वकिलीत लक्ष घातले आहे. आता त्यांचा बराच वेळ कोर्टातही जातो, पण समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून स्वत:साठी जराही वेळ शिलकी ठेवत नाहीत. चहाच्या टपरीवर कपबशा विसळणाऱ्या मुलांना ‘अबकड’चे धडे देत असलेले विक्रांत, अनाथ व निराधार मुलांना दोन चांगल्या गोष्टी सांगत असलेले विक्रांत, त्यांना प्रसंगी मदतीचा हात देत असलेले विक्रांत इथे अनेकांनी पाहिलेले आहेत.

image


विक्रांत त्यांच्यासोबतच्या या संवादाची अखेर हिंडन गीतातल्या काही ओळी ऐकवून करतात… ‘वर्षानुवर्षे मी (हिंडन नदी/हरनंदी) वाहते आहे. आता तुम्हीच मला सांभाळा. जीवनाचा एक थेंब माझ्या पात्रात तुमच्याकडून अर्पण करा. हरनंदीची तुम्हाला विनवणी आहे, मला वाचवा हो’, या आशयाच्या त्या ओळी.

सदियों से बहती हूँ अब तो संभालो तुम,

एक बुँद जीवन की मुझमें तो डालो तुम,

कहती है हरनंदी (हिडन) मुझ को बचा लो तुम.

तुम्हीही विक्रांत शर्मा यांच्याशी त्यांच्या फेसबुक पेज वर संपर्क साधू शकता.