‘चिल्ड्रन ऑफ टुमॉरो’च्या माध्यमातून दोन क्रिएटिव्ह एक्स-टेकीजने जगासमोर आणले समाजातील भयाण वास्तव

‘चिल्ड्रन ऑफ टुमॉरो’च्या माध्यमातून दोन क्रिएटिव्ह एक्स-टेकीजने जगासमोर आणले समाजातील भयाण वास्तव

Wednesday December 23, 2015,

5 min Read

जेव्हा स्थानिक सर्विस स्टेशनमध्ये नरेंद्रजींच्या बाईक रिपेअरमध्ये घोळ घालण्यात आला तेव्हा ते खूप रागावले. ते आत गेले आणि ज्यांनी हे खराब काम केले आहे त्या व्यक्तीशी बोलायचे असल्याचे सांगितले. घाबरुन जी व्यक्ती वळली ती म्हणजे थरथर कापणारा अकरा वर्षांचा मुलगा होता. ज्याचे लहान लहान हात टार आणि गॅसोलीनने माखलेले होते. आता आपल्याला शिक्षा होणार या विचाराने तो घाबरलेला होता.

त्यानंतर काहीच दिवसात नरेंद्र आणि त्यांचे मित्र गोमतेश यांनी बंगळुरु येथील आयटी क्षेत्रातील चांगली नोकरी सोडली आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या कहाण्या सांगण्यासाठी प्रतिबद्ध असलेली एक छोटी फिल्म कंपनी ‘सिम्फनी फिल्म्स’ सुरु करण्याच्या कामाला लागले.

image


बालकामगारांच्या आयुष्यावर दृष्टीक्षेप टाकणारा चित्रपट ‘चिल्ड्रन ऑफ टुमॉरो’ ही त्यांनी नुकतीच दिलेली फिल्म. यापूर्वी युअरस्टोरीने रस्त्यावरील अशा मुलांच्या अनुभवांबद्दल लिहिले होते, ज्यांनी मार्गातील अनुल्लंघनीय अडथळे पार करुन आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करुन दाखविले आहे. अशा कहाण्या प्रेरणादायी असतात, मात्र हे ही लक्षात घेण्याजोगे आहे की करोडो लोकांमधून एखाद-दुसराच असे आयुष्य जगणे शक्य करुन दाखवतो. इतर जण अंधाऱ्या गर्तेत खितपत पडतात, जिथे आपण त्यांना ढकललेले असते. ‘चिल्ड्रन ऑफ टुमॉरो’च्या माध्यमातून फिल्म मेकर्स आशा करतात की लोकांचे डोळे उघडावे, त्या मुलांचे जीवन बदलावे आणि आपण कृती करण्यासाठी पुढे यावे. सुरुवात कशी झाली, हा चित्रपट बनविण्याला पर्याय का नव्हता, ही प्रक्रिया किती कठीण होती आणि ‘सिम्फनी फिल्म्स’ आणि ‘चिल्ड्रन ऑफ टुमॉरो’ या दोघांचही भविष्य काय याबाबत नरेंद्र यांनी युवरस्टोरीशी बातचीत केली.

‘सिम्फनी फिल्म्स’ कशी अस्तित्वात आली ?

जेव्हा मी कोर्पोरेट कंपनीमध्ये (आयटी) नोकरी करायचो, तेव्हा मी माझा सहकारी गोमतेश उपाध्येबरोबर आमच्या ऑफीसच्या ट्रान्सपोर्टच्या गाडीतून रोज प्रवास करायचो. बंगळुरुचं ट्रॅफिक आणि घरापासून ऑफीसपर्यंतचं अंतर यामुळे दर दिवशी आम्हाला येऊन-जाऊन जवळपास ३ तास प्रवासाला लागायचे. या दरम्यान आमची बऱ्याच विषयांवर चर्चा व्हायची. तो फोटोग्राफीही करत असल्याने आणि मी प्लेरायटींग आणि थिएटर करत असल्यामुळे आम्ही फिल्म्स, फिल्म मेकिंग आणि त्यासंदर्भातील क्रिएटिव्ह गोष्टींबाबत चर्चा करायचो.

आम्ही दोघेही पूर्ण वेळ नोकरी करत होतो. मात्र यामध्ये आमचे क्रिएटिव्ह स्कील्स वापरले जात नसल्यामुळे आम्ही या नोकरीमध्ये समाधानी नव्हतो. खूप विचार केल्यानंतर काही वर्षांनी मी हिंमत दाखवायचं ठरवलं. मला पूर्ण कल्पना होती की हे खूप मोठं आव्हान असेल, दर दिवशी धोका पत्करावा लागेल आणि नियमितपणे पैसा देणारी नोकरी नसल्याच्या विचाराने मला त्रास होईल. मला वाटतं सत्याचा सामना करुन निर्णय घेण्याची हीच वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते आणि त्यांचे करिअर किंवा संपूर्ण आयुष्य या क्षणी घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते. काहीतरी क्रिएटीव्ह करण्याच्या माझ्या इच्छेसाठी मी धैर्य एकवटून कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि त्यानंतर मी पुढचं पाऊल काय टाकायचं हे ठरवायला सुरुवात केली. काही महिन्यांनंतर गोमतेशनेही असाच निर्णय घेतला आणि त्यानंतर आजपर्यंत आम्ही दोघांनी मागे वळून पाहिले नाही.

image


सध्या आसपास अस्तित्वात असलेली परिस्थिती ‘चिल्ड्रन ऑफ टुमॉरो’ची प्रेरणा आहे का?

हो. काही वर्षांपूर्वी मी एका स्थानिक सर्विस स्टेशनमध्ये दिलेली माझी बाईक परत आणण्यासाठी गेलो होतो. बाईक पाहिल्यानंतर त्यांच्या कामाचा दर्जा पाहून मी खूप निराश झालो. ज्या माणसाने ते काम केले त्याच्याशी बोलण्यासाठी म्हणून मी गेलो आणि त्यांनी एका अकरा वर्षाच्या लहानग्याकडे बोट दाखविले. मी त्याच्याकडे पाहिलं आणि एवढ्या लहान वयात इथे काम करणाऱ्या या मुलाने आपलं लहानपण गमावलं आहे याची जाणीव देणाऱ्या त्या क्षणाने मला आतून हेलावून टाकलं. त्याच्या या अवस्थेला समाज म्हणून आपण जबाबदार आहोत असं वाटलं.

‘चिल्ड्रन ऑफ टुमॉरो’ तयार करताना ज्या आव्हानांचा सामना करावा लागला त्या आव्हानांपैकी कठीण आव्हाने कुठली आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्याग करावा लागला?

चित्रपटासाठी पैसा उभा करणं हे आमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान राहिलं आहे. या चित्रपटात गाणी, डान्स इत्यादी नेहमीचे कमर्शिअल एलिमेंट्स नसल्यामुळे आम्हाला चित्रपटासाठी निर्माता मिळू शकत नाही. अनेकांना अशा प्रकारच्या चित्रपटामध्ये गुंतवणूक करणं परताव्याच्या दृष्टीने धोक्याचं वाटतं.

सोशल मीडियावर चित्रपटाला कसा प्रतिसाद आहे? समिक्षकांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत का?

आमच्याकडे मार्केटिंगसाठी बजेट नाही. पण तरीही लोकांकडून सोशल मीडियावर आम्हाला खूप प्रेम आणि सपोर्ट मिळाला आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे.

सुप्रसिद्ध कन्नड दिग्दर्शक पवन कुमार यांनी आम्हाला चित्रपटाच्या शुटींगसाठी त्यांची जागा उपलब्ध करुन देऊन खूप मदत केली. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया साईटवर आमचे कॅम्पेन प्रोमोट केले. कन्नड सिनेअभिनेत्री स्मृती हरिहरन हिने उदार मनाने आमच्या कॅम्पेनसाठी देणगी दिली आणि सोशल मीडिया साईटवर त्याचं प्रमोशनही केलं.

जर समिक्षकांना किंवा प्रेक्षकांना चित्रपट पहायचा असेल तर आम्हाला आनंद आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे कुठले शॉर्ट टर्म गोल साध्य करता येतील अशी तुम्हाला आशा आहे?

बालकामगार आणि सुशिक्षित, सुसंस्कृत समाजामध्ये ही मुलं जगत असलेलं भयंकर जीणं याबद्दल आम्हाला चर्चा घडवून आणायची आहे. त्याचबरोबर कोणीही चित्रपट बनवू शकतं हा संदेश आम्हाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. या क्षेत्रावर प्रस्थापित फिल्ममेकर्सची मक्तेदारी नाही. जर तुमच्याकडे सांगण्यासाठी कथा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ती कथा सांगण्यासाठी हे योग्य माध्यम आहे, तर मग तुम्ही कुणीही असाल, कुठूनही आला असाल तुम्ही चित्रपट बनवू शकता.

आम्हाला अशा एका विचाराच्या लोकांना एकत्र आणायचं आहे, जे एकत्र येतील, एकत्रितरित्या काहीतरी निर्माण करतील, त्यांचे कौशल्य आणि स्रोत यांची एकमेकांबरोबर देवाण-घेवाण करतील. ज्यामुळे सुंदर, अर्थपूर्ण आणि उद्देश्यपूर्ण अशी एक अर्थव्यवस्था उभी राहिल.

चित्रपट इंग्लिशमध्ये का बनविला?

बालकामगार ही जागतिक समस्या आहे आणि या जगतव्यापी विषयावर घेतलेल्या परिश्रमांना दाद देणाऱ्या जगभरातील सर्व लोकांपर्यंत हा चित्रपट पोहचावा अशी आमची इच्छा आहे. त्याचबरोबर सध्या स्थानिक भाषांमध्ये अशा प्रकारच्या सत्य परिस्थितीवर आधारित चित्रपटांना दाद मिळत नाही. त्या ‘आर्ट फिल्म्स’ म्हणून दुर्लक्षिल्या जातात. आम्हाला वाटतं ‘चिल्ड्रन ऑफ टुमॉरो’ इंग्लिशमध्ये असल्याने तो देशभरातील प्रेक्षकांकडून वाखाणला जाईल. त्याचबरोबर आम्हाला हा चित्रपट जगभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचलेलाही आवडेल.

जर तुमचे कॅम्पेन यशस्वी झाले नाही तर तुमच्याकडे पर्यायी योजना काय आहे?

आमच्या चित्रपटाला कोणी प्रायव्हेट निर्माता उपलब्ध नसल्यामुळे आम्ही जितके पैसे उभे करु शकू त्यामध्येच आम्हाला काय ते करायचे आहे. पण मग ज्या दर्जाचं काम आम्ही करायचं ठरवलं होतं ते कदाचित त्या दर्जाचं नसेल. त्यामुळे आमचे कॅम्पेन यशस्वी व्हावे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.

चित्रपट किंवा एखाद्या प्रोजेक्टसाठी आणखी कुठल्या कल्पना ‘सिम्फनी फिल्म्स’कडे आहेत?

आम्हाला सत्य परिस्थितीवर आधारित, सामाजिक, बौद्धिक आणि जीवनचरित्रांवर आधारित विविध विषयांवर जास्तीत जास्त वास्तवतावादी फिचर फिल्म बनवायला आवडतील.

या चित्रपटावर काम सुरु करण्यबाबत सर्वात चांगली गोष्ट कुठली?

‘चिल्ड्रन ऑफ टुमॉरो’ बनवितानाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला एकत्र काम करायला मिळालं. अशा एका कारणासाठी विविध क्षेत्रातील लोक एकत्र आले ज्यापासून त्यांना काहीही विशेष उपलब्धी नाही. आपण प्रामाणिकपणे, एकत्रितपणे सामाजिक हिताचा प्रयत्न केल्यास एकाच उद्देशाने एकत्र येणारे लोक आपापसात आपोआप जोडले जातात हे आश्चर्यकारक आहे.

लेखक : राखी चक्रवर्ती

अनुवाद : अनुज्ञा निकम