‘रेस्टोकिच’ : ‘आयआयटी रुडकी’चा पदवीधर पुरवतोय ‘शेफ’

‘रेस्टोकिच’ : ‘आयआयटी रुडकी’चा पदवीधर पुरवतोय ‘शेफ’

Monday December 28, 2015,

2 min Read

‘‘रेस्टॉरंट आणि पब्सपुरते मर्यादित नसतात ‘शेफ’, ते तर खरेखुरे हिरो असतात’’, मुकुल शर्मा यांचे हे म्हणणे. मुकुल आयआयटी रुडकीचे इंजिनिअर आहेत. यूआय इंजिनिअर म्हणून काही वर्षे त्यांनी कामही केलेले आहे. मुकुल यांना फुड इंडस्ट्रीमध्ये आधीपासूनच कमालीचा रस होता. अमित शर्मा या आपल्या महाविद्यालयीन (ज्युनिअर) मित्रासह मुकुलनी मग प्रतिभाशाली, नाविन्याचा ध्यास असलेले तसेच हाताला चव असलेले ‘शेफ’ आणि तशीच चवीने खाणारी मंडळी म्हणजे पट्टीचे खवय्ये असे मिळून एक कम्युनिटी मार्केटप्लेस उभारायला घेतले. मुकुल म्हणतात, ‘‘कुटुंबीय आणि इष्टमित्रांसह बरेचदा जेव्हा कुणी घरीच एक छोटेखानी गेटटुगेदर करते, तेव्हा आयोजकाला म्हणजेच यजमानाला किचनमध्ये गुंतून रहावे लागते. खरंतर इथेच ‘रेस्टोकिच’ने पाऊल टाकले.’’

image


स्थानिक कॅटरिंग सेवा आणि उत्तम शेफशी संपर्काचा अभाव या दोन्ही पातळ्यांवर ग्राहकांमध्ये कमालीचे असमाधान असल्याचे मुकुल व अमित या दोघांच्या लक्षात आले. अर्थात त्यांनी विविध पातळ्यांवर या बाजाराचे बारकाईने निरीक्षण तत्पूर्वी केले. स्थानिक कॅटरिंग सेवेबद्दल तर लोक टोकाचे नाराज असल्याचे मुकुल यांना आढळले. मुकुल सांगतात, ‘‘ग्राहक आणि शेफ या दोघांना एकत्रित आणून बाजारातील ही पोकळी आम्हाला भरून काढायाची होती.’’ ‘रेस्टोकिच’कडून पारंपरिक जेवण दिले जातेच. ग्राहकाच्या निर्देशाबरहुकूम मेनूही उपलब्ध करून दिले जातात. कॉकटेल पार्टीचे मेनूही तयार करून दिले जातात. नामांकित रेस्टॉरंट तसेच पबमधील शेफसह सहलीचा आनंदही रेस्टोकिचकडून उपलब्ध करून दिला जातो. पदार्थांच्या खरेदीपासून ते स्वयंपाक आणि पुढे वाढणे वगैरे अशा सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या जातात.

अमित सांगतात, ‘‘एका साध्या पद्धतीद्वारे शेफपासून ते कुकपर्यंत घरी स्वयंपाकासाठी उपलब्ध करून देणे, ही खरंतर रेस्टोकिचची मुख्य संकल्पना. पुणे आणि मुंबई या महानगरांमध्ये सध्या ही राबवली जाते आहे. रेस्टोकिचला खरंतर शेफसाठी म्हणून हक्काचा एक असा प्लेटफॉर्म उपलब्ध करून द्यायचाय, ज्यावरून शेफ आपले स्वत:चे ब्रँडिंग करू शकतील आणि नव्या लोकांमध्ये व्यवसायाचा वाव त्यांना मिळेल. दिल्ली, बंगळुरू, चंदिगड, गोवा, अहमदाबाद आणि हैदराबाद या महानगरांमध्ये रेस्टोकिचची व्यवसायविस्ताराची योजना आहे. शेफकडून ग्राहकाला आकारण्यात आलेल्या एकुण रकमेवर विशिष्ट प्रमाणात कमिशन रेस्टोकिच घेते. अर्थात हे वाजवी असते. कुकिंगनिगडित कार्यक्रम हे रेस्टोकिचच्या उत्पन्नाचे अन्य साधन आहे.

जागतिक पातळीवर पाहू जाता युनियन स्क्वेअर वेंचर्सचे पाठबळ असलेले किचनसफरिंग आणि किटचिट हे व्यवसाय अन्यत्र रेस्टोकिचच्या धर्तीवर चाललेले आहेत. रेस्टोकिचने व्यवसायाची ही अभिनव तऱ्हा भारतात आणली. देशात बंगळुरूत असाच एक प्लेटफॉर्म आहे. कुकुंबरटाउन नावाचा. विविध पाककृती प्रकाशात आणणे, हे या प्लेटफॉर्मचे कार्य आहे. पुण्यातील दिशूमितसारख्याच डोमेनवर तेच चालते.

डायनिंग टेबलावरील आस्वादाचा अगदी आगळा अनुभव लोकांना उपलब्ध करून देणे हेच मुकुल आणि अमितसाठी सारे काही आहे. रेस्टोकिचला एका विशिष्ट पातळीवर मान्यता जरूर मिळाली आहे, पण अजुन ही सुरवात आहे. रेस्टोकिचची पुढली वाटचाल पाहणे अधिक सुरस ठरेल. हृदयात शिरण्याचा रस्ता पोटाच्या वाटेने जातो, असे म्हणतात. हीच वाट त्यासाठी रेस्टोकिचला धरावी लागणार आहे.

लेखक : जुबिन मेहता

अनुवाद : चंद्रकांत यादव