भारतीय तरुणांमधली सकारात्मता आणि जिज्ञासाच चांगला बदल घडवेल : ओमर बिन मुसा

भारतीय तरुणांमधली सकारात्मता आणि जिज्ञासाच चांगला बदल घडवेल : ओमर बिन मुसा

Wednesday February 10, 2016,

4 min Read

माय जनरेशन.... युट्युबवर असं सर्च केलं की पहिल्या काही व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियन रॅपर ओमर बिन मुसा दृष्टीस पडतो. ओमर बिन मुसा फक्त ऑस्ट्रेलियातच नव्हे तर जगभरात त्यांच्या कवितांसाठी प्रसिध्द आहे. ऑस्ट्रेलियातली पोएट्री स्लॅम स्पर्धा जिंकून तो जगभरात प्रसिद्ध झाला. पोएट्री स्लॅमचा इतिहास तसा जुना नाही. पोएट्री स्लॅम म्हणजे आपली कविता सादर करण्याची स्पर्धा. जिथं कवी आपली कविता सादर करतात आणि प्रेक्षकांमध्ये बसलेले काही तज्ज्ञ त्याचं मुल्यांकन करतात. १९८४ मध्ये अमेरिकेत मार्क स्मिथ या कवीनं ही स्पर्धा सुरु केली आणि काही अवघ्या काही वर्षांतच जागतिक पातळीवर या पोएट्री स्लॅमचा प्रसार धडाक्यात झाला. ओपन स्लॅम आणि इनविटेशन स्लॅम अशा दोन प्रकारात ही स्पर्धा जगभरात अनेक ठिकाणी होते. ओपन स्लॅममध्ये कुणीही आपली कविता सादर करु शकतं. तर इनविटेशन स्लॅम या प्रकारात काही खास आणि महत्वाच्या कवींना आपली कविता सादर करण्यासाठी बोलवण्यात येतं. खरंतर कविता सादर करणं म्हणजे कविता परफॉर्म करणं. यातच ओमार बिन मुसाचा हातखंडा आहे. भारतात पोएट्री स्लॅमची पाळंमुळं घट्ट होत जातायत. यावरच लक्ष ठेवून ओमर बिन मुसानं भारतातल्या तरुणांमधली ही कला समोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.


image


ओमर ऑस्ट्रेलियन-मलेशियन कवी आहे. म्हणजे आई हेलन ऑस्ट्रेलियन आणि वडील मुसा बिन मोसरान मलेशियन. आई कला पत्रकार आणि कवी. यामुळं लहानपणापासून ओमरवर कवितेचे संस्कार झाले हे नव्यानं सांगायला नको. पण ओमरच्या बाबतीत एक गोष्ट इथं सांगणं फार गरजेचं आहे. वडिलांचं मलेशियन मुळ ओमारला अनेक गोष्टी शिकवून गेलं. मलेशियात कायमचं वास्तवं नसलं तरी अनेकदा केलेल्या छोट्या-छोट्या फेऱ्यांमुळं तिथलं सामाजिक वास्तव समजलं. कवी मनाच्या बापाने आपल्या या मुलावर लहानपणापासून शब्दांचे संस्कार केले आणि यातूनच माय जनरेशन सारखी कविता लिहणारा ओमर बिन मुसा हा नव्या दमाचा कवी तयार झाला.

हेही वाचा :

बियॉन्ड ऑस्ट्रेलिया – भारतीय डॉक्युमेन्ट्रीच्या शोधात

३२ वर्षांचा ओमर सध्या जगभरात फिरतोय. जगभरातल्या कविता, त्यांचं सादरीकरण करण्याची ढब यांचा अभ्यास करतोय. अगदी १६ व्या वर्षांपासून एका मित्रानं त्याला आपली कविता सादर करण्यासाठी आमंत्रण केलं. त्यानं जे सादर केलं त्याला रॅपींग म्हणतात असं नंतर समजलं. रॅपींग अर्थात कविता खास गायनाच्या शैलीत सादर करणे. यातूनच ऑस्ट्रेलियात रॅपींग आणि कृष्णवर्णीय लोकांची अशी एकत्र झालेली सांगडही समोर आली. पण इथंही तो वेगळा होता. त्याची सर्वाधिक गाजलेली ‘माय जनरेशऩ’ ही कविता २००८ ची. त्या कवितेत पौगंडावस्थेतून तरुणाईत प्रवेश करणाऱ्यांचं प्रतिबिंब दिसतं. त्यांच्या अपेक्षा दिसतात. जगाकडे बघण्याचा त्यांचा वेगळा दृष्टीकोन दिसतो. या पिढीचे स्वत:चे असे आयुष्य जगण्याचे नियम आहेत. कुठल्या बंधनात त्यांना अडकायचं नाही पण तरीही आजूबाजूच्या परीस्थितीवर त्यांचं लक्ष आहे आणि त्यातूनच ते घडतायत आणि त्यांची पिढी घडतेय, असं काही भावविश्व उलगडणारी ही ओमारची कविता इंटरनेटवर चांगलीच गाजली.

image


ओमर मुंबईत आपल्यासारखे कवी आणि रॅपर शोधायला आलाय. यापूर्वी त्यानं दिल्लीतल्या एका रॅपींग ग्रुप बरोबर आपली कला सादर केलीय. पण आता त्याला मुंबईनं खुणावलंय. तो इथं धारावीतल्या रॅपींग आणि हिपहॉप ग्रुपबरोबर आपल्या कविता सादर करण्याचा प्रयत्न करतोय. कालाघोडा फेस्टीवल ओमरनं गाजवला. ओमर सांगतो “ रॅपींग या कलेची एक खासियत आहे. फक्त आपले शब्द, आवाज आणि शरीराच्या विशिष्ट हालचालीनं एक माहोल तयार करता येतो. याकडे करीयर म्हणूनही पाहता येऊ शकतं. रॅपींगला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे. भारतात याकडे बघण्याचा दृष्टीकोन तेवढा विस्तृत नाही. पण कालांतराने यात फरक पडेल असा विश्वास मला वाटतो.”

image


ओमरला भारतीय खासकरुन मुंबईतल्या तरुणांमधली सकारात्मकता आवडली. तो म्हणतो “ इथल्या तरुणांमध्ये स्वत:ला आणि जगाला प्रश्न विचारण्याची धमक आहे आणि हे सर्व सकारात्मकरीत्या करण्यात त्यांना जास्त रस आहे. ही सकारात्मकताच चांगला बदल घडवेल असं मला वाटतं.” ओमार सध्या भारतातल्या रॅपींग ग्रुपशी कनेक्ट होण्यासाठी उत्सुक आहे. जागतिक पातळीवर रॅपींगसाठी असलेली विशिष्ट अशी मागणी त्यातून तयार होणारं नवं करीयर दालन भारतीयांसाठी खुलं व्हावं असं त्याला वाटतं. यासाठीच तो प्रयत्न करत असल्याचं त्यानं युवर स्टोरीशी बोलताना सांगितलं.

image


ओमरनं तीन वर्षांपुर्वी एक पुस्तक लिहिलं. ‘हिअर कम्स डॉग’ असं या पुस्तकाचं नाव. तीन मित्रांची ही गोष्ट जगातल्या कुठल्याही भागात घडली तरी ती अशीच असती असा दावा तो करतोय. आता तो नव्या पुस्तकावर काम करतोय. त्यासाठी रिसर्च करणं सुरु आहे. यासाठीच जगाची भ्रमंती सुरु झालीय. ओमार शब्दांचा बादशहा आहे. त्याच्या कवितेत जगातल्या सर्व वाईट गोष्टींवर आघात करण्याची ताकद आहे. यामुळंच शब्दांना घेऊन जग जोडण्याचं काम ओमरनं हाती घेतलंय.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.