पुण्यातील सात हजार विद्यार्थ्यांचा पाणी वाचवण्याकरता अनोखा उपक्रम

पुण्यातील सात हजार विद्यार्थ्यांचा पाणी वाचवण्याकरता अनोखा उपक्रम

Monday April 18, 2016,

3 min Read

देशातल्या दहा राज्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दिवसागणिक उष्मा आणखीन वाढतच आहे. २०१४ आणि २०१५ असे लागोपाठ दोन वर्ष पाऊस कमी झाल्यामुळे जलस्त्रोत आटले गेलेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या अभ्यासानुसार, देशातल्या ९१ मुख्य जलसाठ्यांमध्ये केवळ 24 टक्केच पाणी साठा सध्या शिल्लक आहे.

image


पाणी आटून गेल्याचा सर्वात मोठा परिणाम शेतकऱ्यांवर झालाय. राज्यातले बहुतांश शेतकरी प्रामुख्याने जास्त प्रमाणात पाणी आवश्यक असणारी ऊस आणि कापूस हीच पिकं घेतातं. १९७२च्या दुष्काळापेक्षाही यंदाची स्थिती भयानक असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

पाणी नसल्यामुळे उत्पादन नाही, उत्पन्न नाही, कर्जाचा डोंगर या सर्वामुळे शेतकरी पिचून जात आहे. त्याची आता उपासमार होऊ लागलीय. सर्व गोष्टींचा प्रचंड ताण त्यांच्यावर येत आहे. या ताणाचा सामना न करू शकणारे शेतकरी नको ते पाऊल उचलत आहेत. गेल्या वर्षी केवळ मराठवाड्यातचं अकराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मराठवाडा गेले दशकभर दुष्काळाच्या झळा सोसतोय. पण यंदा ही परिस्थिती आणखी बिकट बनली.

सरकारी यंत्रणा दुष्काळग्रस्तांना मदत करत आहेच. भारतीय हवामान खात्याने यावर्षी पुरेसा पाऊस पडेलं असं भाकीत वर्तवलयं. हे भाकीत खरं ठरू देत, असचं सर्वजण म्हणत आहेत. यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के पाऊस जास्त पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर मानसून सामान्य असल्याची शक्यता ३० टक्के आहे.

या सगळ्या परिस्थितीत आशेचा आणखी किरण पुण्यातल्या शाळांमध्ये दिसून आला. सात हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्या बाटल्यांमधील उरलेलं पाणी फेकून न देता शाळेतल्या एका पिंपामध्ये जमा करत आहेत. या पाण्याचा उपयोग आवारातील झाडांना पाणी द्यायला, स्वच्छतागृह साफ करायला करण्यात येत आहे. पूर्वी याकरता ताज्या स्वच्छ पाण्याचा वापर करण्यात येत असे. या मोहिमेत आणखीही मुलं हौसेनं सामील होत आहेत.

वेदांत गोएल आणि युसुफ सोनी या युवकांना ही कल्पना सुचली. या आधी त्यांनी मुलांकरता एक आगळावेगळा कँप आयोजित केला होता. १,०११ विद्यार्थ्यांनी एकत्र दात घासून मर्यादीत पाण्यात स्वच्छतेचा धडा गिरवला होता. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. सध्या वेदांत आणि युसुफ पुण्यातल्या विविध शाळांमध्ये पाणी वाचवण्याकरता शिबीरांचं आयोजन करत आहेत.

वेदांत सांगतो, “दहा हजार मुलांपर्यंत पोहचण्याचं आमचं उद्दीष्ट्य आहे. आम्ही सात हजार मुलांपर्यंत पोहचलो आहोत. मुलांना पाण्याचं महत्व पटवून देण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. तसचं उपलब्ध साधनांचा मर्यादीतरित्या वापर कसा करावा जेणेकरून भविष्यातही या साधनांची कमतरता भासणार नाही. आणि आपल्याला ती उपभोगता येतील. दिवसाखेर उरलेलं पाणी पिंपात साठवल्यामुळे मुलांना पाणी संवर्धनाचा पर्याय आणि त्यांचा उपयोग कशा पद्धतीनं करता येईल हे सहजरित्या समजून घेता येईल”.

वेदांत गोएल, चंचला कोद्रे (माजी महापौर, पुणे), युसुफ सोनी

वेदांत गोएल, चंचला कोद्रे (माजी महापौर, पुणे), युसुफ सोनी


डॉ दादा गुजर हायस्कूल, साधना हायस्कूल आणि विद्यानिकेतन हायस्कूल या अनोख्या उपक्रमात सहभागी झाले आहेत. या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचारी त्यांच्याकडे उरलेलं पाणी शाळेच्या आवारातील पिंपात जमा करतात.

वेदांत आणि युसुफ या शाळांना दर शनिवारी भेट देतात. या भेटीत ते विद्यार्थ्यांना पाणी आणि पाणी संवर्धनाचं महत्व पटवतात. या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल या शाळांच्या प्रशासनांचे ते आभार मानतात. आणखीही शाळांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा मानस आहे.

वेदांत सांगतो की, “आम्हांला हा उपक्रम अविरत सुरू ठेवायचा आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद आहेत. पण उपक्रमात सहभागी विद्यार्थी पाणी संवर्धनाचा हा संदेश पालकांमध्ये, परिसरात, नातेवाईकांमध्ये पसरवत असतीलच अशी आम्हांला खात्री आहे. पाण्याची ही समस्या नेहमीच असणार आहे. आपण आताच मुलांना त्यादृष्टीने तयार केलं तर या समस्येतून काही अंशी तरी सुटका होऊ शकते”.

राज्यातल्या दुष्काळाशी सामना करायला अनेक प्रयत्न होत आहेत. पुण्यातल्या शाळांही त्यात हा खारीचा वाटा उचलत आहेत. मुंबईतले विद्यार्थी दुष्काळग्रस्तांकरता पैसे गोळा करत आहेत. काही कुटुंब त्यांच्या कौटुंबिक समारंभांवर जास्त खर्च न करता पैसे दुष्काळग्रस्तांना पाठवत आहेत. लातूरला रेल्वेने पाणी पुरवण्यात येतयं. हॉकी इंडिया आणि न्यायालयाच्या धाकानंतर बीसीसीआय व आयपीएललाही जाग येऊन, ते ही आता दुष्काळग्रस्तांना सहाय्य करणार आहेत.

लेखक – सौरव रॉय

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

    Share on
    close