अंध कार्तिकची किर्ती, दृष्टीला ओलांडून जणू दृष्टिकोन दिगंतराला…

अंध कार्तिकची किर्ती, दृष्टीला ओलांडून जणू दृष्टिकोन दिगंतराला…

Friday November 13, 2015,

5 min Read

कार्तिक स्वत: जग बघू शकत नाहीत, पण जगाकडे बघू शकतात! कार्तिक यांनी कितीतरी लोकांना सरळ मार्ग दाखवलेला आहे. जगण्याचा मंत्र दिलेला आहे. बालपणीच त्यांची दृष्टी नियतीने हिरावून घेतली. नेत्रपटल निकामी झाले म्हणून नैराश्याचा अंधार मात्र त्यांनी मस्तिष्कपटलावर पसरू दिला नाही. मन सदैव उजेडात ठेवले. मनावरचा उजेड तसूभरही ढळू दिला नाही. अभ्यास सुरू ठेवला. शिकणेही अगदी चारचौघांसारखेच सुरू ठेवले. रंगांना तो आता पारखा झालेला होता, पण इतरांसाठी त्याला रंग पाखरायचे होते. स्वप्ने पाहणेही म्हणूनच त्याने सोडलेले नव्हते. ती पूर्ण करण्यात कुठलीही कसर त्याने सोडली नाही. अंधांसाठी जगभरात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या तांत्रिक सुविधांमध्ये तो तरबेज होत गेला. कार्तिक यांनी या बळावर पुढे जे काही प्राप्त केले, ते प्राप्त करणे हे एखाद्या डोळसासाठीसुद्धा निव्वळ स्वप्नवत ठरावे. कार्तिक साहनी यांचा जन्म २२ जून १९९४ रोजी नवी दिल्ली येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडिल रवींद्र साहनी यांचे लाजपतनगरात दुकान आहे. आई इंदू साहनी या गृहिणी आहेत. कार्तिकला एक जुळी बहिण आहे आणि एक भाऊही आहे.

जन्मानंतर काहीच दिवसांनी कार्तिकला ‘रॅटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’ नावाचा आजार निष्पन्न झाला. या आजारात कार्तिकचे डोळे कायमचे निकामी झाले. तो आई-वडिलांच्या विशेष लाडाचा होता. त्याच्या शिक्षणात कधीही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. लहान असतानाच त्याला ‘नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड’मध्ये प्रशिक्षणासाठी पाठवून दिले.

image


‘नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड’मध्ये कार्तिकला प्रोत्साहन मिळाले. शिकण्याची जिद्द आणखीच वाढली. आत्मविश्वास दुणावला. कार्तिकची हुशारी, गुणवत्ता आणि अभ्यासातला त्याचा कल लक्षात घेऊन पालकांनी त्याला दिल्लीतील प्रसिद्ध दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये टाकले. कार्तिकचा या शाळेतला प्रवेश म्हणजे एक असमान्य गोष्ट होती. एकतर ही फार प्रसिद्ध शाळा आणि दुसरे म्हणजे कार्तिक अंध विद्यार्थी. एखाद्या अंध विद्यार्थ्याचा या शाळेतील प्रवेश ही अशा स्वरूपाची पहिलीच घटना असावी. शालेय व्यवस्थापनही कार्तिकच्या हुशारीने भारावले. सामान्यत: खुल्या शाळेत अंध विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यांच्यासाठी खास शाळा असतात. पण कार्तिकने आपल्या कर्तृत्वाच्याबळावर या शाळेतील सर्वांचीच मने जिंकली. बऱ्याच बाबतीत इतर अंध मुलांशी त्याची तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, तो तर डोळसांशी स्पर्धेतही अनेक बाबतींत बराच पुढे असायचा. दिल्ली पब्लिक स्कूलच्या ‘इस्ट ऑफ कैलास’ शाखेत कार्तिक होता. इतर मुले पुस्तके वाचत. कार्तिक ती वाचू शकत नव्हता.

कार्तिकच्या आईने खुप मेहनत घेतली. ब्रेल लिपीतून पाठ्यपुस्तके उपलब्ध केली.

ब्रेल ही अंधांसाठी खास विकसित करण्यात आलेली एक जागतिक लिपी आहे. स्पर्शाच्या आधारे या लिपीतील अक्षरे वाचायची असतात. फ्रांसमधील एक अंध लेखक लुई ब्रेल यांनी १८२१ मध्ये या लिपीची रचना केली.

कार्तिकने ब्रेल लिपीच्या बळावर पाठ्यपुस्तकातील सर्व ज्ञान आत्मसात करायला सुरवात केली. पुढे एक्सेस टेक्नॉलॉजीच्या मदतीने तो कॉम्प्युटर हाताळायलाही शिकला. प्रशांत रंजन वर्मा यांनी यात कार्तिकला मोलाची मदत केली. थोड्याच महिन्यांत कार्तिक आपली सगळी शालेय कामे कॉम्प्युटरवर करू लागला. दुसरीची परीक्षाही त्याने कॉम्प्युटरवर दिली. कॉम्प्युटर आणि ब्रेल लिपीच्या माध्यमातून कार्तिकची शैक्षणिक वाटचाल सुरू झाली. दरवर्षी तो पास होत गेला आणि दहावीच्या परीक्षेतही त्याने उत्तम यश संपादन केले.

कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशाची वेळ आली तेव्हा कोणती विद्याशाखा निवडायची हे आता कार्तिकवर होते. आपल्या आवडीचा पर्याय त्याने निवडला. गणित, विज्ञान आणि कॉम्प्युटरची निवड त्याने केली. कार्तिक स्वत: ठरवून सायन्सला जातोय म्हटल्यावर सगळेच थक्क झाले. कार्तिकचा निर्णय मात्र अटळ होता. अंतिम होता. केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळही कार्तिकच्या या निर्णयाने दंग झालेले होते. सुरवातीला तर मंडळाचे अधिकारी कार्तिकच्या प्रवेशाला नकार देत होते, पण नंतर कार्तिकची क्षमता पाहून, तपासून ते तयार झाले. कार्तिकला विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली. हा प्रवेशही कार्तिकचे मोठे यश होते.

सामान्यपणे अंध विद्यार्थ्यांचा कल कला शाखेकडे असतो. इतर लोकही अंधांना कला शाखेचाच सल्लाही देतात.

विज्ञान शाखेतील प्रवेशानंतर कार्तिकने स्वत:वर काय तर कुणावरही पश्चातापाची वेळ येऊ दिली नाही. उलट सगळ्यांनाच, अगदी विशेष बाब म्हणून त्याच्या विज्ञान शाखेतील प्रवेशाला परवानगी देणाऱ्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही अभिमान वाटावा, असे यश मिळवले.

अकरावीत त्याला ९३.४ तर बारावीत त्याहूनही जास्त म्हणजे तब्बल ९५.८ टक्के गुण मिळाले. असे यश मिळवणारा तो भारतातील पहिला अंध विद्यार्थी ठरला. दिल्ली पब्लिक स्कूल रामकृष्णापुरममधून अकरावी आणि बारावी करणाऱ्या कार्तिकने कॉम्प्युटर सायन्समध्ये ९९, गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात प्रत्येकी ९५ गुण मिळवलेले होते. अनेक डोळस मुलेही जे यश मिळवू शकत नाही, ते यश कार्तिकने मिळवून दाखवले होते.

लाखो डोळस मुलांना वळसा घालून मागे टाकत कार्तिक असा पुढे उभा होता.

कार्तिकने बारावीच्या परीक्षेआधीच आपल्याला आयआयटीत जायचेय, हे ठरवलेले होते. जेईईच्या तयारीलाही तो लागलेला होता. पण आयआयटीच्या नियमावलीनुसार अंध विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाऊ शकत नाही. कार्तिकचे या नियमालाही आपण अपवाद ठरू म्हणून प्रयत्न सुरू राहिले. माझी क्षमता वाटल्यास तुम्ही तपासून बघा म्हणून कार्तिकने अधिकाऱ्यांना विनवले, पण इथल्या नियमांना कार्तिक अपवाद ठरू शकला नाही.

आयआयटीत त्याला प्रवेशाची संधी मिळू शकली नाही. कार्तिक त्याच्या आजवरच्या आयुष्यात पहिल्यांदा निराश झाला, पण फार दिवस नाही. त्याने आता आपले उद्दिष्ट बदलले.

आपल्या प्रतिभेच्या बळावर त्याने अमेरिकेतील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवला. कार्तिकने त्यासाठीच्या परीक्षेत ‘संपूर्ण शिष्यवृत्ती’ संपादन केली, हे आणखी विशेष! शिक्षणासाठी त्याला इथे कुठलेही शुल्क द्यावे लागले नाही. कार्तिकच्या अनेक यशांत हे आणखी एक मोठे यश सहभागी झाले. कार्तिकच्या वडिलांची छाती अभिमानाने फुलली. कार्तिकने इथून बीएस केले.

अंधांच्या उन्नतीसाठी आपण आयुष्य समर्पित करूयात हे ध्येय त्याने ठरवलेले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अंधांच्या आयुष्यात उजेड आणू शकतो, हा विश्वास त्याला होता. अंधांना तंत्रज्ञानाच्या आधारे स्वावलंबी करता येऊ शकते, हा विश्वासही जोडीला होताच. कार्तिकने आता आपली वाटचाल या ध्येयाच्या दिशेने सुरू केलेली आहे.

कार्तिकची गोष्ट ही खरोखर एक असामान्य अशी गोष्ट आहे. याबद्दल दुमत असण्याचे कुठलेही कारण नाही. परिस्थिती कशीही असो… प्रतिकुल वा अनुकुल यश हे तुमच्या मनस्थितीवरच अवलंबून असते. तुमच्यात जिद्द असेल तर प्रतिकुल परिस्थितीतही तुम्ही पराभव स्वीकारत नाही आणि तुमच्यात जिद्द नसेल तर अनुकुल परिस्थितीतही तुम्ही पराभूत होता, हा संदेश कार्तिकने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर अवघ्या जगाला दिलेला आहे. कार्तिकच्या यशाची मोहिनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरला पडली. त्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जगभरात त्याची गोष्ट एक प्रेरणेचा झरा म्हणून मान्यता पावली.

कार्तिकच्या यशात त्याच्या आई-वडिलांची मोलाची भूमिका आहे. त्यांना जेव्हा हे पहिल्यांदा कळले, की आपले बाळ आता कधीही पाहू शकणार नाही, तेव्हा त्यांच्यावर डोंगरच कोसळला होता. आयुष्यभर आपल लेकरू इतरांवर अवलंबून राहील. आपण आहोत तोवर ठिक, पण आपल्यानंतर त्याचे कसे होईल, या चिंतेने दोघांना तेव्हा चितेसारखे जाळलेले होते.

...पण जसजसे कार्तिक आपल्या मेहनतीच्या बळावर कीर्ती मिळवत गेला, तसतशी त्यांची ही चिंता मिटत गेली आणि पुढे तर कार्तिक त्यांच्या अस्मितेचा विषय बनला. कार्तिकवर त्यांना गर्व वाटू लागला. कार्तिकची कीर्ती दिगंतराला गेली… अंध कार्तिक आणि इतर डोळस यांच्यात अंतर असे उरलेच नाही. दृष्टीला ओलांडून दृष्टिकोन कितीतरी पुढे निघून गेलेला होता…