पारंपरिक कलावस्तूंचे जागतिक दालन ‘exqzt’

पारंपरिक कलावस्तूंचे जागतिक दालन ‘exqzt’

Sunday November 22, 2015,

4 min Read

कोल्हापुरी चप्पल, चंदेरी कॉटन, चन्नपट्टणाची खेळणी, कांचिपुरमचे सिल्क, महेश्वरी साडी या सगळ्याच वस्तू कमालीच्या लोकप्रिय आहेत आणि आपापल्या गावाच्या, उत्पादन केंद्राच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून हस्तकौशल्याने साकारलेल्या, कलाकुसरीच्या आणि त्या-त्या मातीच्या परंपरेचे प्रतीक बनलेल्या या कलात्मक वस्तू आहेत. ‘exqzt’ ची मुहूर्तमेढ अशाच पारंपरिक हस्तकौशल्यातून साकारलेल्या कलात्मक वस्तूंचे एक दालन म्हणून करण्यात आली.

कलावंतांशी वैयक्तिक पातळीवर संलग्न होणे, एवढाच हेतू या दालनाच्या प्रारंभामागे नव्हता. हस्तकौशल्याशी निगडित उभे वर्तुळ व्यापण्याचा व्यापक हेतू उराशी बाळगूनच या संस्थेच्या प्रवर्तकांनी वाटचाल सुरू केलेली होती. कलावंतांना अर्थार्जनाच्या माध्यमातून पाठबळ देणाऱ्या अशासकीय सेवाभावी संस्था, संघटना तसेच कारखानदारही ‘exqzt’ च्या रचनेतील महत्त्वपूर्ण घटक ठरले.

image


कल्पनेचा जन्म

बंगळुरूत रस्त्यावर सहज म्हणून भटकत असताना ‘exqzt’ ची कल्पना अविनाश वनपाल यांच्या डोक्यात आली. एक हस्तकारागिर कुटुंब तागापासून बनवलेल्या कलात्मक वस्तू विकत होते. अत्यंत सुंदर अशा या वस्तू होत्या. अविनाश यांच्या डोक्यातून हे दृश्य निघत नव्हते आणि अशात ते आपल्या गावी, पुण्यासाठी म्हणून निघत असताना कुणीतरी त्यांना येताना कोल्हापुरी चपला घेऊन ये म्हणून सांगितले. अविनाश सांगतात ‘‘हे दोन्ही प्रसंगच ‘exqzt’च्या कल्पनेच्या मुळाशी आहेत. तागाच्या अत्यंत सुंदर कलात्मक वस्तू रस्त्यावर ग्राहकांची प्रतीक्षा करताहेत. त्या वस्तूंचा खरा रसिक जेव्हा नेमका त्या रस्त्यावरून येईल, तेव्हाच या वस्तूचे नशीब फळफळेल. दुसरीकडे एक जण आपणास पुण्याहून कोल्हापुरी चप्पल आण म्हणून सांगतो आहे. इथेच मला एका ऑनलाइन व्यासपीठाची कल्पना सुचली. हस्तकलावंत, हस्तकला व्यापारी आणि लोकांच्या (ग्राहक) गरजा पूर्ण करण्यासाठी आपण ‘exqzt’ सुरू करावी का म्हणून अविनाश यांनी त्यांचे मित्र अनिल कदम यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. दोघांच्या चर्चेचे फलित म्हणजे ‘exqzt’चे अस्तित्वात येणे.

‘exqzt’चे मॉडेल

‘exqzt’ने नुकतेच एक नवेच मॉडेल शोधून काढलेले आहे आणि हे ‘मार्केटप्लेस मॉडेल’ पुढल्या दोन महिन्यांत क्रियान्वित होणार आहे. पुढे लगेचच ‘exqzt’ला हस्तकला केंद्र म्हणून नावाजलेल्या एखाद्या ठिकाणी आपले स्वत:चे सर्व सुविधांनी सज्ज असे केंद्र सुरू करायचे आहे. ऑनलाइन सेंटरही सुरू केले जाईल. ‘exqzt’चे हे सेंटर म्हणजे नुसतेच व्यवसायाचे केंद्र नसेल, तर तिथे हस्तकला प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. वस्तूंचा पुरवठा याद्वारे सोयीचा केला जाईल. हस्तकला उद्योगातील भौगोलिक अंतरही एका वेगळ्या अर्थाने या केंद्रामुळे कमी होईल. अविनाश सांगतात, ‘‘डिजिटल कौशल्यही इथे शिकवले जाईल. मार्केटिंगचे धडे दिले जातील. ऑनलाइन विक्रीतील महत्त्वाचे बारकावे शिकवले जातील. हस्तकलेतून शंभर टक्के पर्यावरणपूरक कलावस्तू साकारण्याला प्रोत्साहन दिले जाईल.’’

आव्हाने आणि योजना

त्या-त्या भागातील स्थानिक कलावस्तूच्या शोधात देशभर प्रवास करत असताना सर्वच हस्तकलावंतांची एक सामान्य समस्या अविनाश यांना जाणवली आणि ती म्हणजे त्यांच्यातल्या माहिती तंत्रज्ञानविषयक जागरूकतेचा अभाव. ‘डिजिटल ॲअॅडॉप्शन’ कशाशी खातात, हे बहुतांशांना माहितीही नव्हते. आपली उत्पादने त्यामुळेच ते जागतिक बाजारात उतरवू शकत नाहीत. परिणामी एका चांगल्या जीवनमानाला आणि राहणीमानाला ते मुकतात. ‘‘कलावंतांना हे ज्ञान देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे, हे यातूनच माझे ध्येय बनले’’, अविनाश सांगतात. ते पुढे म्हणतात, ‘‘पुढल्या महिन्यापासून आम्ही आमच्या टिम उभारणीला सुरवात करत आहोत. चार ते सहा असे लोक आम्ही आमच्यासोबत घेणार आहोत, जे ग्राहकांचे पाठबळ वृद्धिंगत करतील, वितरकांचे जाळे निर्माण करतील आणि ज्या योगे विक्री वाढेल.’’

आगामी योजना

सप्टेंबर २०१५ मध्ये ‘exqzt’चा श्रीगणेशा झाला. २० हून अधिक क्राफ्टस् ‘exqzt’च्या शोकेसमध्ये आहेत. साइटला भेट देणाऱ्यांची संख्या दरमहा ४० टक्क्यांनी वाढते आहे, असा ‘exqzt’टिमचा दावा आहे. अर्थात त्याचे प्रत्यक्ष व्यवसायात रूपांतर करण्यासाठी टिम आपल्या परीने झटते आहे.

अविनाश म्हणतात, ‘‘आजच्या घडीला आमचे मुख्य लक्ष प्लॅटफॉर्मच्या मजबुत उभारणीवर आहे. कलावंतांना डिजिटल तंत्र अवगत करून देणे आणि त्यायोगे भारतीय हस्तकला आणि पारंपरिक कलात्मक वस्तू जगभरात पोहोचाव्यात.’’ थोडक्यात वितरकांचे जाळे विस्तृत करणे, कलावस्तूत वैविध्य आणणे, ऑनलाइन हबची उभारणी आणि आक्रमक मार्केटिंग आणि तशीच ब्रँडिंग या सगळ्या ‘exqzt’च्या दृष्टीने पहिल्या पायऱ्या आहेत.

ईकॉमर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. ईकॉमर्सच्या माध्यमातून खरेदीला प्रतिसादही वाढतो आहे. Jaypore वा Tjori किवा Kashmiri Box प्रत्येक प्रतिष्ठान आपापल्या प्रदेशाची परंपरा आणि सौंदर्य कलावस्तूंच्या माध्यमातून बाजारात उतरवत आहे.

‘एसबीआय’च्या एका संशोधन अहवालानुसार ई-रिटेलिंगचे बाजारातील प्रस्थ दिवसेंदिवस वाढते आहे. २००९-१४ या कालावधीत ५६ टक्के ‘सीएजीआर’ इतके या प्रस्थाचे प्रशंसनीय म्हणावे, असे प्रमाण आहे. चालू वर्षातही ई-रिटेल बाजार हा या क्षणापर्यंत ६ बिलियन डॉलरला भिडलेला आहे. ‘एसबीआय’चा हा अहवाल म्हणतो, ‘‘सवलतीचे दर आणि तेही काही ठराविक उत्पादनांपुरतेच विचारात घेता वास्तविक निदेशांकापेक्षाही महागाई निदेशांकात २५ अंकांची घसरण इथे आम्हाला आढळून आली.’’


लेखिका : सिंधू कश्यप

अनुवाद : चंद्रकांत यादव