डॉक्टर लेखनातून चक्क व्यवसायाकडे : जेरोनिमो हेल्थकेयर

डॉक्टर लेखनातून चक्क व्यवसायाकडे :  जेरोनिमो हेल्थकेयर

Monday December 28, 2015,

5 min Read

अमित डांग हे एक डॉक्टर आहेत आणि कुटुंबातले पहिले व्यावसायिक आहेत. ते गायकही आहेत आणि गिटारिस्टही. दिल्लीतच शिकले वाढलेले. एमबीबीएसनंतर गोवा मेडिकल कॉलेजमधून पुढे औषध विज्ञान या विषयात एमडी केले. मुंबईत मुख्यालय असलेल्या जेरोनिमो हेल्थकेयर (Geronimo Healthcare ) चे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय आशय, मेडिको मार्केटिंग, क्लिनिकल रिसर्च आणि हेल्थकेअर संवाद अशा विविध सेवा विविध फार्मास्युटिकल्स कंपन्यांना ही व्यावसायिक संस्था नियमितपणे देते. आधी या संस्थेचे नाव फार्माकीज (Pharmakeez) असे होते, पुढे लवकरच ते जेरोनिमो हेल्थकेयर असे करण्यात आले. मुक्ततत्वावर अमित करत असलेले एक काम पुढे त्यांना या नव्या व्यवसायाची मुहूर्तमेढ करण्याच्या टप्प्यापर्यंत कसे घेऊन गेले, त्याची वाटचाल मोठी रंजक आहे.

अमित यांनी एमडीसाठी म्हणून औषध विज्ञान ही विद्याशाखा निवडली तेव्हा त्यांच्या अनेक मित्रांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अमित सांगतात, ‘‘त्याला कारणही तसेच होते. माझ्यासमोर क्लिनिकल ब्रँचेसचे ढिगभर पर्याय असताना मी औषध विज्ञान निवडलेले होते आणि फार थोडे लोक या शाखेकडे वळतात.’’ अमित यांना एमडीनंतर संशोधन कार्य करायचे होते. लवकरच आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर होते. औषध विज्ञान हा विषय त्यांच्या आवडीचाही होता आणि एमबीबीएस करतानाच या विषयात ते खोलवर गेलेले होते. अमित सांगतात, ‘‘औषध विज्ञान हा माझा आवडता विषय असला तरी मी पुढे जाऊन एक व्यावसायिक होईन, असे काही मनात नव्हते. एमडीनंतर एक जॉबही मी मिळवला. सहा हजार रुपये विद्यावेतन दरमहा होते. अधिक पैसे मिळावेत म्हणून मी विविध प्रकाशनांसाठी मुक्त वैद्यकीय लेखक म्हणून काम करू लागलो. आठवड्याच्या उत्तरार्धात मी लेखन करत असे. काम करत असतानाच वैद्यकीय संवाद आणि वैद्यकीय लेखनाला व्यावसायिक दृष्ट्या किती वाव आहे, हे माझ्या लक्षात आलेले होते. आणि हाच खरंतर जेरोनिमो हेल्थकेयरचा आरंभबिंदू होता. ड्रगच्या विकासात, बढतीत आणि जीवनचक्र वृद्धीत या सगळ्याच विषयांशी निगडित सगळ्याच समस्यांचे समाधान आमच्याकडे होते.’’

image


माहितीने ठासून भरलेल्या विश्वात किंवा पुढे जाऊन म्हणायचे तर माहिती ओसंडत असलेल्या विश्वात फार्मा कंपन्यांना डॉक्टरांना नेमकी माहिती देण्याची कसरत विविध माध्यमांद्वारे करावी लागते. अगदी अलीकडल्या माहितीशी याद्वारे डॉक्टरही संलग्न असतात. त्यांची अद्ययावत माहिती थेट त्यांच्या प्रॅक्टिसवर परिणाम करणारी असते. रुग्णाची काळजी वाहण्यात वापरलेले अद्ययावत तंत्र डॉक्टर म्हणून प्रतिमा उजळवणारे असते. जेरोनिमो हेल्थकेयर ही या अर्थाने वैद्यकीय संवाद संस्था आहे. सुधारित शास्त्रीय माहिती देणारी संस्था. अमित सांगतात, ‘‘विविध वैद्यकीय साहित्य तसेच शास्त्रीय आकडेवारी धुंडाळून संदर्भांसह अद्ययावत आणि संबंधित माहिती असलेला तंतोतंत अहवाल तयार करणे हे आमचे काम आहे. औषधी आणि पूरक खाद्य उद्योगातील कंपन्यांना आम्ही ही सेवा मोठ्या प्रमाणावर पुरवतो.’’

नेमकेपणाने सांगायचे तर जेरोनिमो हेल्थकेयर कंत्राटी संशोधन पुरवणारी व्यावसायिक संस्था आहे. रुग्णालयीन चाचणी, नियमन सेवा, वैद्यकीय लेखनसेवा, क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट सेवा इत्यादींचा लाभही कंपनीकडून आपल्या ग्राहकांना दिला जातो. हे मार्केट खचितच एक व्यापक आणि गतीने वाढत असलेले मार्केट आहे. आगामी पाच वर्षांत ते ६५ अब्ज अमेरिकन डॉलरला भिडेल, असा एक अंदाज आहे. भारतही हळुवारपणे या सेवांचे एक केंद्र होत चाललेला आहे. विशेषत: वैद्यकीय लिखाणाच्या बाबतीत तर हमखास होत चाललेला आहे. Karmic Lifescience, Sorento Healthcare, Cactus Communications, Publicis Healthcare Communications, Medulla, Point Blank आणि Bioquest अशा भारतातील कितीतरी व्यावसायिक संस्था या क्षेत्रात प्रस्थापित म्हणून समोर आलेल्या आहेत. अमित म्हणतात, ‘‘हो हे खरे आहे, पण आमची साधीसरळ SOP, आमचा सत्वर प्रतिसाद आणि आमच्या सेवांचा वाजवी दर आम्हाला भारतीय क्लायंट्सच्या सोबतीने दिवसेंदिवस पुढेच पुढे नेत आहे. स्वतंत्रपणे आम्ही राबवत असलेले उपक्रम आणि काही सातत्यपूर्ण उपक्रमांतून आम्हाला उत्पन्न मिळते. २०१० मध्ये जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तेव्हा मला फक्त एका लॅपटॉपची आणि एका इंटरनेट कनेक्शनची गरज होती. टिम जसजशी वाढत चाललेली आहे, तसतसे उपक्रम वाढत चाललेले आहेत. येणाऱ्या पैशांतून सगळा खर्च भागवणं त्यामुळेच जमून येतंय. आज आमच्या टिममध्ये १२ जण आहेत. पूर्णवेळ, मुक्त, सल्लागार मिळून ही टिम आहे. आम्ही अगदी तत्पर आहोत. देशांतर्गत व विदेशी क्लायंटसह धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टिकोनातून आम्ही भविष्याकडे बघत आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारातही आम्ही लवकरच दाखल होणार आहोत. आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यात ही बाब आम्हाला उपयुक्त ठरेल. अधिक अनुभवी लोकांना आमच्या टिममध्ये सहभागी करून घेण्यातही याच जोरावर आम्ही यशस्वी होऊ. एक अधिक सशक्त टीमची उभारणी आम्हाला करायची आहे. वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे विभाग अशी रचना करण्याचाही आमचा मानस आहे. नियमित लेखन, क्लिनिकल रिसर्च, व्यावसायिक लेखन, फार्मा डिजिटल, हेल्थ इकॉनॉमिक्स अँड आउटकम रिसर्च अशा वेगवेगळ्या विंग असतील.’’

आता कंपनी बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेली असली आणि भविष्याकडे मोठ्या आशेने पाहात असली तरी सुरवातीला अनेक आव्हाने या स्टार्टअपसमोर होतीच. अमित सांगतात, ‘‘औषध उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या काही ज्येष्ठश्रेष्ठांशी मी परिचय करून घेतला. उपक्रमाचा प्राथमिक दर्जा पुढे आमच्या दिमतीला राहिला. त्यानेच आम्हाला सावरले. पुढे नेले. आमची माउथ टू माउथ पब्लिसिटी होत गेली. आमची सेवा घेणारे क्लायंटच आमचा संदर्भ आमच्या इतर ग्राहकांना देऊ लागले. प्रकल्प आटोपताना आनंदी क्लायंट हाच माझा मुख्य उद्देश असायचा. इथं माणसे सारखी जॉब बदलत असतात, हा औषध उद्योगातील पायंडा आमच्या पथ्यावर पडला. अशा कंपन्यांचे मार्केटिंग आणि मेडिकल डिपार्टमेंट आम्हीच सहसा बघू लागलो. माणसाने जॉब बदलला रे बदलला की त्याची नवी कंपनीही आपोआपच आमची क्लायंट बनत असे. कारण तो या नव्या कंपनीत तरी किती दिवस काम करणार?’’

भारतीय तसेच विदेशी औषध आणि पूरक खाद्य कंपन्यांसाठी जेरोनिमो हेल्थकेयर काम करते आहे. रॅनबॅक्सी, डॉ.रेड्डी’ज, फ्रेसेनियस कबि, मर्क सेरोनो, सनोफी पाश्चर, बायर हेल्थकेयर, बेसिन्स हेल्थकेयर, बायोकॉन इ. अशी जेरोनिमो हेल्थकेयर च्या क्लायंट कंपन्यांची लांबलचक यादी आहे. क्लायंट कंपन्यांच्या नावांवरून जरी नजर फिरवली तरी जेरोनिमो हेल्थकेयरचे महत्त्व आपल्या लक्षात येते.

व्यवसाय म्हणजे नेमके काय तर अमित यांच्या मते स्वत:ला संपूर्णपणे झोकून देणे. अमित म्हणतात, ‘‘व्यवसाय म्हटले म्हणजे चुका घडणे ओघाने आलेच. चुका दररोजही होऊ शकतात, पण या चुकांतून तुम्ही शिकले पाहिजे. धडा घेतला पाहिजे. हेल्थकेअरच्या आमच्या सेक्टरमध्ये पडू इच्छिणाऱ्यांनी स्वत:ची चांगलीच तयारी करायला हवी. कारण एकतर अगदी कुठल्याही सेवेचा मोबदला म्हणून कंपन्यांकडून मिळणारे पेमेंट नव्वद दिवसांनी मिळते. ही बाब नव्या व्यावसायिकासाठी खचितच जिकिरीची ठरणार. भारतीय बाजारात स्पर्धा फार तीव्र आहे. क्लायंट तुम्हाला धोरणात्मक भागीदार समजण्याऐवजी एक भारवाही मजूर समजतो, हे स्वीकारणे आणखी अवघड. बाजारातली अव्यवसायिकता आणि क्लायंटचे तुम्हाला गृहित धरणे या कारणांमुळे नैराश्य येऊ शकते. हे सगळेच क्षेत्र अल्प अशा नफ्यावर काम करते. दराच्या बाबतीतही स्पर्धा आहे, पण कुणीही किमान दराखाली जाता कामा नये. व्यवसायात मूल्यांची भूमिका मोठी असते. क्लायंट काही नेहमीच बरोबर नसतो. क्लायंट चुकत असेल तर इथे तुमचे चुकते आहे, हे सांगण्याचे नैतिक धैर्य तुमच्यात असलेच पाहिजे. पण मी इथं जर सगळ्यात मोठी गोष्ट काही शिकलेलो असेल तर ती म्हणजे सगळे काही कागदावर उतरवून घेणे. सगळे करार वेळेत साइन करायला हवे आणि वेळा पाळायला हव्यात.’’

लेखिका : कीर्ती पुनिया

अनुवाद : चंद्रकांत यादव