शब्दांच्या जगात रमणारी १२ वर्षांची अनिका शर्मा. तिच्या शब्दांचा साहित्य विश्वातही गवगवा

शब्दांच्या जगात रमणारी १२ वर्षांची अनिका शर्मा. तिच्या शब्दांचा  साहित्य विश्वातही गवगवा

Monday November 30, 2015,

6 min Read

वर्ड्स एंड वर्ड्स आय हॅव ( words and words I have ).... बीज गीजचं हे प्रसिद्ध गाणं. ज्याचा साधा अर्थ आहे , की आपल्यातले कित्येक जण आपल्या भावनांना , आपल्या स्वप्नांना, आपल्या कृतींना निव्वळ शब्दांनीच साज चढवत असतो. मोबाईल अंड एप्सच्या आधुनिक युगातही अनेक जण रोजनिशी लिहिणे किंवा ब्लॉग लिहून आपापल्या भावना व्यक्त करत असतात. म्हणजेच आपल्या भावना व्यक्त करायला शब्दांची गरज प्रत्येकाला भासते.

१२ वर्षांच्या अनिकाचंही असंच आहे. तिच्या भावनांना वाट करून देण्यासाठी तिला शब्दांनी कविता लिहिण्यावर प्रेरित केलं. तिच्या कविता या तिच्या भावना होत्या. जे काही तिच्या डोक्यात विचारचक्र सुरु असायचं, ते ती कागदावर उतरवत असे. दुबईत राहणाऱ्या या १२ वर्षांच्या अनिकाचं कवितांचं पुस्तकही आज बाजारात उपलब्ध आहे . आता ती तिच्या पहिल्या-वहिल्या कादंबरीच्या तयारीत आहे, जी तिच्या वयाच्या मुला-मुलींसाठी आणि पालकांसाठीही उद्‍बोधक ठरेल. तिच्याशी गप्पा मारताना तिचं शब्दांविषयीचं प्रेम आणि त्यामागची प्रेरणा याबद्दल ती भरभरून बोलते.


image


रिपल्स

अनिकाचे पालक इंजिनियर आहेत. आपल्या मुलीच्या अंगी असलेली शब्दांची किमया तिच्या पालकांनी फार लवकर ओळखली . तिच्या कवितांचं पुस्तकही छापून प्रकाशित केलं. 'रिपल्स ' हे तिच्या पहिल्या काव्यसंग्रहाच नाव! गेल्या वर्षी बालदिनाच औचित्य साधत हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला . अनिका सांगते की तिच्या या कवितापैकी एक कविता ही तिच्या पाळलेल्या आवडत्या लवबर्ड्सना उद्देशून लिहिली होती. जे पिंजर्यातून उडून गेले. त्यानंतर तिला झालेल्या दु:खाला तिने शब्दातून वाट करून दिली.

" माझा कवितासंग्रह मी अकरा वर्षांची असताना प्रकाशित झाला आणि त्यातील बऱ्याच कविता या मला सुचलेले विचार यावरच आधारित होत्या. त्यावेळी , माझ्यासाठी लिखाण म्हणजे माझ्या भावभावनांना आणि विचारांना शब्दात वाट करवून देण्याचं साधन होतं. माझं पुस्तक प्रकाशित झाल्यावर माझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यानंतर मग मी लिखाण या विषयाकडे गंभीरतेनं पाहू लागले आणि त्यामुळेच आता मी रोज योग्य लिखाण कसं असावं त्यासंबंधीचा तांत्रिक अभ्यास करते आहे." अनिका सांगत होती .

कमी वयातच संगोपन

तिच्या पालकांचा तिला अगदी लहानपणापासून आधार आणि प्रोत्साहन मिळत आलं आहे. "माझ्या पालकांनी माझ्यातलं लिखाणाचं प्रभुत्व ओळखलं आणि मला प्रोत्साहन दिलं. अनेक गोष्टी माझ्या लहानपणापासून उपलब्ध करुन दिल्या, ज्यामुळे माझ्या सर्जनशील विचारांना पाठबळ आणि चालना मिळाली. उत्तम ज्ञान मिळवण्याची सवय त्यांनी माझ्यात रुजवली. खूप वाचन आणि माझ्या पालकांशी , नातेवाईकांशी सुसंवाद हा सुद्धा माझ्या विचारप्रक्रियेला चालना देणारा ठरला आहे. " अनिकाने हे सांगतानाच तिच्या आवडीच्या लेखकांची यादीच सांगितली . तिच्या आवडीच्या लेखकांमध्ये एनिड ब्लिटन , जे . के. रोलिंग , सी.एस. लुईस , लुईस करोल आणि टोल्केन आदी नामवंत लेखकांचा समावेश आहे .

" मला सर्व प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात, पण त्यातही , काल्पनिक साहित्य मला अधिक भावतं . माझ्या या आवडत्या लेखकांच्या सुरस काल्पनिक कथा मला वाचायला आवडतात. त्यांच्या लिखाणात अशी काही जादू आहे की ते वाचकांचं मन गुंतवून ठेवतात आणि एका दुसरयाच काल्पनिक जगात वाचकाला घेऊन जातात. " अनिका खूप उत्साहानं सांगत होती.

image



समतोल साधणे

दुबईमधल्या जेम्स इंटरनेशनल शाळेत शिकणारी अनिका सध्या स्पॅनिश ,हिंदी , अरेबिक , फ्रेंच अशा भाषा शिकतेय. तिला प्राण्यांची आवड आहे आणि ती पियानोही सहजपणे वाजवू शकते, अनिकाची आई आपल्या लेकीच कौतुक करत होती .

अनिकाला नवनवीन वाद्य वाजवण्याचाही छंद आहे म्हणूनच ती अनेक नवीन वाद्य शिकतेय. हे थोडं म्हणून की काय तर अनिका ही आणखी खूप गोष्टी शिकतेय. मग ते पोहणं असो की नृत्य, नाट्य, गाणं, व्यायाम, नवीन तंत्रज्ञान , हे सगळ ती आताच शिकतेय . तिच्याच मते , तिला नवनवीन गोष्टी शिकण्याची प्रचंड आवड आहे. अन्य मुलांप्रमाणेच अनिकालाही , आपल्या आजी आजोबांकडे विशेष ओढ आहे, ते कानपूर इथं राहतात पण प्रत्येक संध्याकाळी त्यांच्याशी दिवसभरातल्या घटनांची चर्चा केल्याशिवाय तिचा दिवस संपत नाही.


तिच्या शाळेचा अभ्यासक्रम खूप वेळ खाऊ आहे, पण तिला ज्या गोष्टींची आवड आहे, त्यासाठी ती वेळ काढतेच. पण पाहिलं लक्षं ती अभ्यासक्रमावर केंद्रित करते आणि वाचन हा तिचा छंद प्रवास करताना किंवा फावल्या वेळात पूर्ण करते. " मी लिखाणाच्या तंत्राचा अभ्यास करते आहे . म्हणजे माझ्या अभ्यासक्रमाचा तो एक भागही आहेच आणि कधीतरी मी मुद्दाम वेळ काढून तो सराव करते."


जर्नी टू अक्रोपोलीस

अनिका सध्या तिच्या कादंबरीवर काम करते आहे. ' जर्नी टू अक्रोपोलीस '. ही कथा आहे चार गरीब मुलांची , ज्यांचा साहसपूर्ण प्रवास तिने शब्दबद्ध केला आहे . कादंबरी तयार होतेय आणि ती मनासारखी व्हावी यासाठी ती खूप मेहनत घेते आहे. सुरुवातीच्या काही पानांमध्ये अनिकानं आपल्या लहानपणीच्या आठवणी कथारुपात मांडत, कथानकाची सुरेख सांगड घातली आहे .

image


काही शहाणपणाचे शब्द

अत्यंत संवेदनशील , प्रगल्भ आणि सौहार्द असणाऱ्या १२ वर्षांच्या अनिकाला मित्र मैत्रिणी जमवणं तसं कठीण जातं कारण तिच्यासारखी विचारशैली असणारी मुलं विरळाच !

पण ती मात्र आपल्या वयाच्या मुलांना एक सल्ला देऊ इच्छिते , " हल्लीच्या मुलांकडे खूप नवनवीन कल्पना असतात आणि त्यांना जे हवंय ते सर्व ही मुलं करू शकतात, पण सगळ्यांना खुश ठेवायचं म्हणून कोणती गोष्ट करू नका, तर आपल्याला ज्यात आवड आहे तेच करा , तुमचा अभ्यास हा तुमचं सर्वप्रथम प्राधान्य असू द्या आणि चांगल्या सवयी जोपासण्याकडे तुमचा कल असू द्या. मला नेहमी असं वाटत की " आपण ध्वनी असावं, प्रतिध्वनी नाही. म्हणजेच जे काही कराल ते स्वत:चं असू दे, दुसऱ्याची नक्कल नको. "

तर पालकांना तिचा सल्ला आहे तो म्हणजे ," पालकांनी अन्य मुलांशी आपल्या पाल्याची तुलना करू नये . प्रत्येक मुलात स्वत:चे काही खास गुण असतात . मुलांना स्वत:च त्यांची आवड ओळखू द्या . त्यांना तर्क लावून विचार करू द्या आणि स्वत:चे मत बनवू द्या. मग परिस्थिती कोणतीही असो. तुमच्या स्वत:च्या आवडीनिवडी आणि मत त्यांच्यावर लादू नका. मुलाच्या आवडी निवडींना मान देताना तो किंवा ती एक वेगळी व्यक्ती आहे हे लक्षात असू द्या." या अत्यंत संवेदनशील मनाला खूप काही सांगायचं आणि सध्याचं जग ज्या दिशेन चाललं आहे , ते चित्र आगामी पिढीसाठी आशावादी नाही , असं तिला वाट्त . " जगात सुरु असणाऱ्या अशांततेमुळे खूप विचलित व्हायला होत , आणि त्यावरही , मला काही संदेश द्यावासा वाटतो "

'संदेश' 'द मेसेज '

लोकांना असतात भावना

पण जग आहे भावनाशुन्य

मनुष्यजात, लहान असो किंवा ज्येष्ठ

बाहेर दाखवतात प्रेम,पण आतून असतात रुक्ष

जग त्यांना म्हणत,

तंत्रज्ञ, डॉक्टर, किंवा इंजिनियर फक्त

श्रीमंत, गरीब यातला फरक

पण मला मात्र जाणवत नाही कुणीच परकं

सगळे सारखेच जन्माला आले ना,

मग काहीच्या नशिबी सुख आणि काहींच्या दुख: का ?

स्पर्शू शकाल का तुम्ही तो सूर्य

जर कोणाला दुखवणं हा असेल तुमचा धर्म?

कुठेतरी कुणीतरी त्रासात आहे आणि आहे एकटं,

मग कसला आनंद आणि कसला स्वत:बद्दल विचार

ही धरित्री खरंच आहे का हरित ,

जिथे माणसांची मनं आहेत काळी आणि कृत्य आहेत स्वार्थी

मला वाटते भविष्याची चिंता

मग का नाही सोडवत आपण निसर्गाला वेढलेला गुंता

आपण सारीच जर निसर्गाची निर्मिती आहोत, तर का प्रत्येक राष्ट्र करतात भेदभाव ?

पण अजूनही आशा आहे,

की सगळ्या समस्यांचं होईल निराकरण , सहानुभुति आणि काळजीनं ,

आम्ही सगळे एक होऊ आणि जग होईल सुंदर उजळल्यानं.



मुळ लेखिका – तन्वी दुबे

अनुवाद – प्रेरणा भराडे