जोधाने अकबरासाठी तयार केलेल्या मेजवानीची खरी सूत्रधार : फूड स्टायलिश शुभांगी धैमाडे

जोधाने अकबरासाठी तयार केलेल्या मेजवानीची खरी सूत्रधार : फूड स्टायलिश  शुभांगी धैमाडे

Wednesday February 10, 2016,

6 min Read

रस्त्यावरून जाताना खाद्यपदार्थांच्या जाहिरातींचे काही फलक खास तुमचे लक्ष वेधून घेतात का ? त्या जाहिराती पाहून निग्रहाने ठरवलेल्या डाएटचे पालन करणे तुम्हाला कठीण जाते का ? टिव्हीवर एकापाठोपाठ एक जाहिराती सुरू असताना पिझ्झाची जाहिरात पाहून, त्यावरील मोझरिला चीझ पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटते का ?पदार्थांना असे आकर्षकरित्या सादर करून तुमची भूक चाळवणारं, तुमची रसना जागृत करणारं कोण आहे याचा शोध आम्ही घेतला आहे. पदार्थांच्या चवीपेक्षाही ते पाहूनच त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी ही व्यक्ती आहे- शुभांगी धैमाडे. देशातल्या अग्रणीच्या पाच आंतरराष्ट्रीय फूड स्टायलिशपैकी एक.


image


वरवर पाहता त्यांचा व्यवसाय खूपच आकर्षक वाटतो किंवा कोणालाही करावासा वाटेल असा आहे. . एखादा चित्रपट असो, शो असो, पदार्थाचे पॅकेजिंग असो किंवा जाहिरात असो, त्यातला पदार्थ प्रेक्षकांच्या मनात भरेल असा सादर करण्यासाठी त्यांना लाखो रुपये मिळतात. यात बर्‍याचदा प्रत्यक्षात पदार्थाचे प्रमाण खूप कमी असते किंवा लहान असते पण सादर करताना तो त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात दाखवावा लागतो. आकर्षक स्वरूपात दाखवावा लागतो. टिव्हीवर चाॅकलेटची जाहिरात लागते. सुंदर मॉडेलच्या ओठांवरून ओघळणारे अर्धवट विरघळलेले चाॅकलेट सर्वांनाच मोहात पाडते. पण हे मोहक रूप दर्शवण्यासाठी बरेच कष्ट लागतात बरे का! आपल्याकरिता हे मोहक क्षण निर्माण करण्यासाठी पोत, अंतर, कोन, प्रकाशयोजना, रचना आणि इतर अनेक बाबी अचूकपणे साधण्यासाठी फूड स्टायलिशने तासनतास मेहनत घेतलेली असते.


image


सुरुवात:

पडद्यावरील चित्र आणि वास्तव यात एवढे अंतर का असते हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. उदाहरणच द्यायचे झाले तर टीव्हीवर पराठ्यावरचे बटर किती सुंदर आणि सहजपणे पसरताना दिसते. प्रत्यक्षात आपण लावतो त्यापेक्षा ते कितीतरी आकर्षक, मोहक आणि सहज भासते.पण टीव्हीवरच्या या मोहक सादरीकरणामागे तज्ज्ञांचे कौशल्य असते. या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात शुभांगीचा प्रवेश कसा झाला? त्यांना या क्षेत्राविषयी कसे कळले?

२३ वर्षांपूर्वी त्यांचे क्षेत्र पूर्ण वेगळे होते. फूड स्टाइलिंगशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नव्हता. "मोठ्या प्रमाणावर रासायनिक निर्यातीचे मूल्यमापन करणार्‍या एका जपानी अभियांत्रिकी कंपनीमध्ये माझ्या करिअरची सुरुवात झाली. माझ्या मुलाच्या शारंगच्या गर्भारपणापर्यंत मी तिथे नोकरी केली. प्रसूती, प्रसूतीनंतरचा काळ, बाळाचे संगोपन यात साधारण पाच वर्षे लोटली. मग मला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज भासू लागली. पण आता पूर्वीची नोकरी करणे मला शक्य नव्हते."


image


वेगवेगळे पर्याय शोधायला मी सुरुवात केली. मला पाककलेची आवड होती आणि कॉलेजमध्ये मी पाककलेचा कोर्स केला होता. माझे पती तेव्हा एका अॅड एजन्सीमध्ये काम करत होते. त्यांनीच माझ्यासाठी ही संधी शोधली. मी सुद्धा ही संधी घ्यायची असे ठरवले. फारफार तर काय आपल्याला जमणार नाही. नाही जमले तर देऊ सोडून, असा विचार मी केला.

काही कामे केल्यानंतर हे आपले क्षेत्र असल्याचे त्यांना उमजले. पण १९९७ मध्ये खूपच कमी कंपन्या सादरीकरण आणि पॅकेजिंगसाठी स्टायलिशची सेवा घेत होत्या. तशी त्यांना गरज वाटत नव्हती."इंटरनेटची व्याप्ती आजच्या एवढी प्रचंड नव्हती. त्यामुळे काम मिळवणे अवघड होते. महिन्याला दोन तीन कामे मिळाली तरी आम्ही नशीबवान समजायचो."

जसजशी खाद्य क्षेत्राची व्याप्ती वाढली तसतसे आमचे क्षेत्रही बहरत गेले, मागणी वाढू लागली." आता आम्हाला महिन्यातले दोनतीन दिवसच मोकळे मिळतात!". बदललेल्या स्थितीबाबत शुभांगी आनंद व्यक्त करतात .

मागणी कायम:

सगळ्यात चांगली बाब म्हणजे मागणी जरी वाढली असली तरी त्या तुलनेत स्टायलिशचा पुरवठा, त्यांची संख्या कमीच आहे. गेल्या १८ वर्षांत पाच मुख्य स्टायलिश उदयाला आले. त्यांचे सर्वांचे बाजारात मोठे नाव आहे आणि सारखेच महत्त्व आहे.

कंपन्यांच्या गरजा बदलल्या आहेत आणि वाढल्याही आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वांना पुरेसे काम आहे. इंटरनेटमुळे आम्ही जागतिक समुदाय झालो आहोत आणि आता मला केवळ भारतीय क्लाएंटवर अवलंबून राहायची गरज नाही.


image


कला :

हा उद्योग संघटित करायला किंवा त्याचे व्यावसायिकरण करायला काही वाव आहे का?"आमच्या क्षेत्रात स्पर्धा आहे पण ती गळेकापू स्पर्धा नाही .हे क्षेत्र स्वतंत्र व्यावसायिकांचे आहे. प्रत्येकजण स्वतंत्रपणे काम करतो . याखेरीज फूड स्टाइलिंग ही एक कला आहे . ती शिकवण्यासाठी कुठलाही अभ्यासक्रम नाही . उपजतच त्याची जाण लागते आणि काम करताकरता शिकण्याची क्षमता लागते".

तर फूड स्टाइलिंग ही कला आहे. कलेचे कौशल्य पणाला लागलेले शुभांगीचे त्यांना स्वतःला वाटणारे उत्कृष्ट नमुने कोणते? तुमच्यापैकी अनेकजण त्यांच्या कामाचे चाहते आहेत. पण ही कामे त्यांची आहेत हे आपल्याला माहीत नाही . कुठली आहेत ही कामे? तुम्ही २००८ मधला जोधा अकबर पाहिला असेल. त्यात जोधा झालेली ऐश्वर्या राय अकबर झालेल्या ह्रितिक रोशन पुढे नाना चवींच्या आणि नाना रंगरूप यांनी निगुतीने सजवलेला आकर्षक मारवाडी थाळ अत्यंत प्रेमाने आणून ठेवते . थाळ पाहून तुमचेही डोळे दिपले असतील तुम्हालाही ते चाखून पहायची इच्छा झाली असेल. याचे श्रेय शुभांगी धैमाडे यांना आहे .

"माझ्या काही आव्हानात्मक कामांपैकी हे एक काम होते. त्या काळाबद्दल, पदार्थांबाबत, नीटनेटकेपणे त्यांचे सादरीकरण करण्याबाबत मला खूप संशोधन करावे लागले. पण माझ्या दृष्टीने या बारीकसारीक बाबी, कामातील वैविध्य खूप महत्त्वाचे आहे".

आणखी एक वेगळ्या प्रकारचे लक्षात राहिलेले काम शुभांगी सांगतात. काहीसा विक्षिप्त प्रकारात मोडणारा तो सीन होत. ड्रीम स्क्विनेन्स होता तो. त्यात नाटकातील पात्रे मोठ्या जेवणाच्या टेबलावर प्रचंड मोठ्या आकारातल्या खाद्यपदार्थांची कल्पना करत असतात.

मला सिन समजावून सांगितला होता. त्यासाठी मी टेबलवर काय आणू शकेन विचारले होते. फुटबॉलच्या आकाराचे लाडू मी त्यांना दिले. दोन किलो केकच्या आकाराएवढे मोठे बर्गर दिले आणि एक मीटर मासा दिला.

अर्थात वर उल्लेख केलेले सर्व मोठे प्रकल्प होते. अशा कामांना पाच ते सात दिवस लागतात. एरवी छोटी कामे एक ते तीन दिवसात होतात.

आइस्क्रीम आणि कुस्करलेला बटाटा:

सौंदर्यप्रसाधन कंपन्या ज्याप्रमाणे माॅडेल अधिकाधिक आकर्षक दिसावी, त्यांचे केस सुंदर, चमकदार, दाट, सळसळते दिसावेत यासाठी हर प्रकारच्या युक्त्या वापरतात. त्याचप्रमाणे फूड स्टायलिशसुध्दा पदार्थ अधिक आकर्षक दाखवण्यासाठी त्याचे आकारमान, पोत वगैरे जाहिरातानुरूप गरजा पूर्ण करण्यासाठी काही युक्त्या योजतात का? पण यामुळे काही नैतिक प्रश्न उपस्थित होतात. आपल्या निर्मितीचा खरेपणा जपण्यावर शुभांगीचा भर असतो.

एक लोकप्रिय गैरसमज म्हणजे जाहिरातीत दाखवला जाणारा आइस्क्रीमचा स्कूप म्हणजे कुस्करलेला बटाटा असतो. हे विचित्र आहे. खराखुरा पदार्थ वापरावा असे माझे मत आहे आणि त्यासाठी मी आग्रही असते. याखेरीज सध्याचे प्रेक्षकही खूप हुशार आहेत. जेवढे आपण खरेखुरे दाखवू तेवढे ते विश्वसनीय ठरते, असे मला वाटते.

हे क्षेत्र का आवडते:

आपल्या क्षेत्रात शुभांगी कायम अव्वल स्थानावर असल्या तरी कुटुंबाला जेव्हा गरज असते तेव्हा त्या त्यांच्यासाठी वेळ देतात. त्यात त्यांना समाधान वाटते. "एक स्वतंत्र स्त्री व्यावसायिक म्हणून नाही म्हणायची जी ताकद आहे ती वापरायला मला आवडते." शुभांगी विनोदाने सांगतात.

मात्र आतापर्यंतच्या प्रवासात त्यांच्या वाट्याला कुटुंबाकडून कधीच अडवणूक आलेली नाही. कामानिमित्त जगभरात कुठेही प्रवास करावा लागतो. पण कुटुंब नेहमीच त्यांच्या पाठीशी असते. काम आणि घर यातील संतुलन शुभांगी स्वतःच्या पध्दतीने राखू शकतील अशी मुभा कुटुंबाकडून त्यांना मिळाली.

कुटुंबाकडून किंवा माझ्या क्षेत्रातल्या व्यक्तींकडून स्त्री म्हणून भेदभावाची वागणूक कधीच माझ्या वाट्याला आली नाही. या क्षेत्रात पुरोगामी विचारांच्या व्यक्ती आहेत. या क्षेत्रात तुमचे कामच बोलते. त्यातूनच तुमची पारख केली जाते.

"चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या बळावरच आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. याखेरीज आणखी एक गुण मी माझ्यामध्ये विकसित केला जो या क्षेत्रात आवश्यकच आहे तो म्हणजे संयम. दिवसाला किमान बारा तास चित्रिकरण चालते. जे शारीरिकदृष्टय़ा थकवणारे असतेच शिवाय तुमच्या मनोबलाचा कसही लागतो. यासाठी प्रचंड संयमाची आवश्यकता भासते." शुभांगी सांगतात .

पाश्चात्यांचे उदात्तीकरण:

हे क्षेत्र मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठी अडचण जर असेल तर ती म्हणजे आपल्या भारतीयांचा दृष्टिकोन. आपल्याकडे जी खाद्यपदार्थांची वैविध्यता आहे तिला आपण फारसे महत्त्व दिलेलेच नाही. "आपल्या प्रादेशिक पदार्थांचे मोल आपल्याला नाही. मॅकडोनाल्ड आणि डाॅमिनोज प्रसिद्धीसाठी पाण्यासारखे पैसे खर्च करतात आणि आपले स्थानिक मात्र प्रसिद्धीपरांङगमुखतेतच धन्यता मानतात . आपल्याकडे चेन्स नाहीत. आपण आपल्या समृद्ध वारशाबाबत गर्व बाळगणे सोडाच पण त्याचा आदरही करत नाही." या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून भरपूर कमाई करण्याचे महत्त्व जोपर्यंत स्थानिकांना समजत नाही तोपर्यंत ग्लॅमर फक्त पश्चिमेपुरताच मर्यादित राहिल .

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

'द ग्रीन स्नॅक्स': आरोग्याशी नाही तडजोड, स्वादालाही नाही तोड

विज्ञान अन् जगाच्या आकलनासाठी एका ‘आई’चे ‘स्टेलर चिल्ड्रेन्स म्युझियम’

किरण मुझुमदार शॉ, भारतीय उद्योगजगतातील एक प्रेरणादायी नाव


लेखिका : बिन्जल शहा

अनुवाद : सोनाली कुलकर्णी