गृहिणींच्या कलेला ऑनलाईन व्यासपीठ मिळवून देणारं ‘मॉम्जबिझ’

गृहिणींच्या कलेला ऑनलाईन व्यासपीठ मिळवून देणारं ‘मॉम्जबिझ’

Monday November 02, 2015,

2 min Read

माधवी पाटील आणि प्राची पाटणकर.... दोन मैत्रिणी... उच्चशिक्षित... माधवी पाटील आयटी क्षेत्रात तर प्राची पाटणकर ग्राफिक्स डिजायनर... दोन अडीच वर्षांपुर्वी त्याचं आयुष्यही सर्वसामान्य गृहिणींसारखं होतं. दोघी संसार सांभाळून नोकरी करत होत्या. अगदी तारेवरची कसरत. इतर गृहीणींसारखी. मुलं मोठी होत होती आणि संसारातल्या जबाबदाऱ्या वाढत होत्या. मग दोन्ही करणं शक्य नव्हतं. सहाजिकच नोकरी सोडावी लागली. पण इतकं शिकल्यानंतरही फक्त घरी बसून राहणं या दोन्ही मैत्रिणींच्या मनात कधीच नव्हतं. आपल्यासारख्या इतर माता ही असतीलच की ज्यांना याच परिस्थितीतूबन जावं लागत असेल. याच विचारातून मग ‘मॉम्जबिझ’ची संकल्पना पुढे आली. घरी बसल्या बसल्या ‘मॉम्स’ ना एक व्यासपीठ मिळालं.

माधवी पाटील आणि प्राची पाटणकर

माधवी पाटील आणि प्राची पाटणकर


माधवी पाटील सांगतात “ आम्ही दोघींनी नोकरीतून ब्रेक घेतला होता. काही दिवसांनी नोकरी कायमस्वरुपी सोडली. मग पुढे काय करायचं असा विचार सुरु होता. दोघींकडे आपआपल्या क्षेत्राची कसब होती. आम्ही विचार केला की आपल्या सारख्या अनेक जणी असतील. अनेकींच्या उपजत काही कला असतात. काही जणी कलागुण शिकतात. मग अश्या आपल्या सारख्या मॉम्ससाठी काही तरी करुया असं मनात आलं. पहिल्यांदा आम्ही अशा महिलांच्या उत्पादनांचं प्रदर्शन सुरु करण्यावर विचार करत होतो. पण ते फक्त काही कालावधीसाठी असेल असं ही मनात आलं. मग या मॉम्सनं तयार केलेल्या उत्पादनांना ब्रान्ड आयडेंटीटी मिळायला हवी आणि ते एका क्लिकवर उपलब्ध व्हायला हवं असं ठरलं आणि आम्ही ही वेबसाईट सुरु केली. मॉम्जबिज”

image


फक्त वेबसाईट सुरु करुन चालणार नव्हतं. त्याला एका बिझनेसचं स्वरुप आलं पाहिजे असं प्राची आणि माधवी यांना वाटत होतं. त्यातूनच या वेबसाईटला मॉमप्रेन्युअल्स आणि एनजीओशी जोडण्यात आलं. त्यामुळे या वेबसाईटची व्याप्ती वाढली. मे २०१५ मध्ये या वेबसाईटला सुरुवात झाली. आत्तापर्यंत वेगवेगळ्या कलाकुसर असलेल्या ५० हून अधिक मॉम वेबसाईटशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांनी तयार केलेले प्रोडक्ट या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेत. माधवी सांगतात “ खाण्यापिण्याच्या गोष्टींव्यतिरिक्त बाकी सर्व गोष्टींची काही आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री करतो आणि हळूहळू त्याला प्रतिसादही वाढतोय हे विशेष.“

image


ज्यांना आपले प्रोडक्ट विकायचे आहेत. त्यांनी नोंदणी करायची आणि आपले प्रोडक्ट वेबसाईटवर अपलोड करायचे. अनेक महिलांना इंटरनेट वापरता ही येत नाही. अशा महिलांना माधवी आणि प्राची मदत करतात. त्यांना फक्त आपल्या प्रोडक्टचे फोटो पाठवायचे असतात. या दोघी ते प्रोडक्ट वेबसाईटवर अपलोड करता. प्रत्येक विक्रीमागे कमिशन मिळतं त्यातून वेबसाईटचा खर्च निघतो. मॉम्जबिझ डॉटकॉमची व्याप्ती आता वाढत जातेय. आपल्या कलागुणांना फक्त शौक म्हणून न पाहता त्याच्याकडे बिजनेस म्हणून पाहण्याची दृष्टी या महिलांना माधवी आणि प्राची यांनी दिलीय.