अनाथ मुलींचे माहेरघर ठरले ‘परिवर्तन कुटूंब’

अनाथ मुलींचे माहेरघर ठरले ‘परिवर्तन कुटूंब’

Wednesday November 25, 2015,

4 min Read

विश्वातील समस्त जीवांच्या हिताचे पसायदान मागणार्‍या ज्ञानेश्वरांनी ‘विश्वची माझे घर’ मानून सगळ्या विश्वालाच एक कुटुंब मानले. काळानुसार कुटुंबाची संकल्पना आणि व्याख्याही बदलत गेली. ‘केवळ रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब’ असं म्हटलं तर ते चुकीचे ठरेल. असेच एक कुटूंब म्हणजे टिटवाळा परिसरात वसलेले ‘परिवर्तन कुटूंब’ होय. या कुटुंबात प्रत्येक सदस्याची आपुलकीने काळजी घेतली जाते, अगदी रक्ताच्या नात्याने एकत्रित नांदणाऱ्या कुटुंबाप्रमाणे. ही नाती रक्ताची नसली तर रक्ताच्या नात्यापेक्षा कमी निश्चितच नाही.

जन्मापासून निराधार, अनाथ असणार्‍या मुलींना कुटुंब म्हणजे काय याची जाणीवच नसते. कुटुंबातील नाती-गोती, समाजाच्या चाली-रूढी, परंपरा यापासून परिस्थितीने लांब ठेवलेल्या मुलींना समाज काय आहे हे देखील कळत नाही. लहानपणापासून या सर्व घटकांपासून लांब राहिलेल्या मुलींना जेव्हा समजू लागले तेव्हा ‘परिवर्तन संस्था हेच त्यांचे एक हक्काचे कुटूंब बनले. टिटवाळ्या स्टेशनपासून थोड्याच अंतरावर वसलेल्या या बालिकाभवनात रक्ताची नाती गमावणार्‍या या मुलींनी एकजुटीने वास्तव्य करीत आज ‘परिवर्तन कुटूंब’ तयार केले आहे. निरनिराळ्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या महिलांनी एकत्र येऊन ‘परिवर्तन महिला संस्थे’ ची स्थापना केली होती. २००० साली स्थापित झालेल्या या संस्थेचा मुळ उद्देश महिला व मुलींचे सक्षमीकरण हे होय. महिलांच्या विविध समस्या, त्यांच्याविषयीचे कायदे, पर्यावरण, किशोरवयीन मुला-मुलींचे संगोपन, घनकचरा, विल्हेवाट, पाण्याचे व्यवस्थापन अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करणे व मदत करणे अशा स्वरूपाचे उपक्रम सुरवातीला या संस्थेतर्फे राबविण्यात येत होते. भारतीय संस्कृतीतील स्त्रीः काल, आज आणि उद्या, स्त्री सक्षमीकरण, किशोरवयीन मुलींचे लैंगिक शोषण, विवाहः एक विचार मंथन व मैत्री यासारखे विविध विषय हाताळून २००० ते २००९ पर्यंत 'सखी सचिवा' हा दिवाळी अंक या संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आला. वेगवेगळ्या समस्या घेऊन येणार्‍या महिला, अडचणीत सापडलेल्या महिला-मुली यांना काही कालावधीसाठी निवासाची सोय होणे ही एक त्यावेळी महत्त्वाची गरज होती. यासाठी लायन्स क्बल ऑफ मुलूंड यांची इमारत त्यांना विविध सामाजिक कार्यासाठी देण्यात आली. समाजात कुटूंब नसलेल्या निराधार मुलींना राहण्याची सोय उपलब्ध होऊन त्यांचे पुर्नवसन व्हावे यासाठी परिवर्तन संस्थेने २००५ साली मुक्ता प्रकल्प सुरू केला.

image


येथे राहणारी प्रत्येक मुलगी एकमेकांमध्ये कोणी बहीण तर कोणी मैत्रीणीच्या रूपात पाहत असतात. निरनिराळ्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी एकत्र येऊन परिवर्तन महिला संस्थेच्यावतीने हे ‘बालिकाभवन’ सुरू केले. वेगवेगळ्या ठिकाणाहून घर सोडून, पोलिस स्टेशनकडून आलेल्या मुली यांना काही दिवस संस्थेमध्ये ठेऊन त्यांना समुपदेशन करून त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचवून त्यांचे पुर्नवसन करण्याचे कार्य या संस्थेद्वारे करण्यात येेते. तसेच ज्या मुलींच्या कुटूंबाचा अद्याप शोध लागला नाही अशा मुलींच्या जीवनात प्रकाशज्योत तेवत ठेवण्यासाठी ‘परिवर्तन संस्था’ कार्यरत आहेे.

‘‘आम्ही परके नाही, आमच्या आनंदात सहभागी होणार्‍यांमध्येच आम्हाला आई-वडील, जवळचे नातेवाईक दिसतात’’ अशी प्रतिक्रिया जेव्हा बालिकाभवनात राहणार्‍या मुली देतात, त्यावरून बालिकाभवनाने मुलींना दिलेल्या प्रेमाची पोचपावती मिळते. लहानपणापासूनच पंख हरवलेली ही पाखरे कोणी हिंदु आहेत तर कोणी मुस्लिम. पण येथे कोणत्याही धर्माचा भेदभाव न बाळगता वर्षातील प्रत्येक सण एकत्रितरित्या साजरा करण्यात येतो. चौकोनी कुटुंब सांभाळतांना भल्याभल्यांची गाळण उडते. तर मग मानवता विसरत चाललेल्या आजच्या जगात ही पाखरं गुण्यागोविंदाने नांदतात, हे नवलच आहे. इतकंच नाही तर या सार्‍याजणी ‘परिवर्तन कुटुंबा’चे जेवण, कपडे, धुणी-भांडी ही जबाबदारी प्रत्येक दिवशी वाटून घेऊन ती चोखरित्या पार पाडतात. पहाटे लवकर उठून घरातील कपडे, धुणी-भांडी व जेवण करून या मुली शाळेसाठी घराबाहेर पडतात. सायंकाळी ६ वाजता बालिकाभवनात येतात. ३ मजली इमारत असलेल्या या बालिकाभवनात सायंकाळच्या वेळी या सर्व मुली दिवसभर आपण काय-काय केले हे जेव्हा एकमेकींना सांगतात, तेव्हा या बालिकाभवनात एक मेजवानीच बनते. येथील प्रत्येकजण आपल्याला आवड असलेली प्रत्येक गोष्ट करीत असतात, शिकत असतात आणि शिकवीत असतात. या बालिकाभवनात एकूण ४० मुली व ४ महिला आहेत. तसेच अनेक सामाजिक उपक्रमातही ते हिरीहिरीने भाग घेत असतात. या बालिकाभवनामध्ये अगदी पहिलीपासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या तरूणी गुण्यागोविंदाने राहत असून एका मुलीने एमबीए पर्यंतचे शिक्षण घेऊन आज ती चांगल्या पदावर कार्य करीत आहे. मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या भावनिक विकासासाठी देखील ही संस्था विशेषत्वाने कार्य करते. त्यासाठी संगीत, नृत्य, पथनाट्य यांच्या माध्यमातून मुलींच्या भावनांचा विकास करण्यासाठी त्यांना योग्य ती दिशा देण्यासाठी या थेरपींचा उपयोग करून त्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले जाते. बालिकाभवनातील मुलींसाठी कथ्थक नृत्य व शास्त्रीय संगीत शिकविण्यासाठी तज्ञ मंडळी येत असतात.

image


image


आई-बाबांचा आधार हरपल्याने हडबडलेल्या या मुलींसमोर मोठा प्रश्न आहे तो त्यांच्या भविष्याचा...परिवर्तन संस्थेने त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना विविध व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून दिले आहेत. याच्याच आधारे एका मुलगी नर्सिंग कोर्स पुर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. एकीने ब्यूटिशियन कोर्स करून आज ती कोणाचाही आधार न घेता जीवन जगत आहे. तर एका मुलीने फॅशन डिझायनिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करून प्रगतीच्या अवकाशात झेप घेत आहे. एका मुलीने आयटीआय नंतर कला शाखेच्या पदवीबरोबरच एमपीएससी परिक्षेची तयारी करीत आहे. एका मुलीने तर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करून मोठ्या हॉटेलमध्ये काम करून ती स्वावलंबी जीवन जगत आहे. इतकेच नाही तर संस्थेकडून आजपर्यंत ५ मुलींचा विवाह करून त्यांनी आपला संसार थाटला आहे. त्यामुळे ‘परिवर्तन कुटूंब’ हे येथील प्रत्येक मुलीसाठी माहेरघर ठरले आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही.