"मी तुमच्यातलीच एक आहे" इति भारतातली आठवी श्रीमंत महिला अनू आगा

"मी तुमच्यातलीच एक आहे" इति भारतातली आठवी श्रीमंत महिला अनू आगा

Sunday April 03, 2016,

7 min Read


मध्यमवर्गीय घरात जन्म घेतल्यावर आपण कोणत्यातरी मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मोठे होत असतो. अभिनेता, पॉपस्टार्स, जागतिक नेते असं कोणीना कोणी आपल्या या यादीत असतं. आपण त्यांचं अनुकरण करत असतो. विसाव्या वर्षी काहीतरी जबरदस्त करण्याच्या दिशेने आपल्या जहाजाचं सुकाणू आपण हाकू लागतो. काही तरी बनण्याच्या प्रयत्नात आपण निरनिराळे मार्ग चाचपडत असतो. तोपर्यंत आपण तिशी गाठतो आणि मग लक्षात येत की, या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारण्यापेक्षा आता स्थिरस्थावर होण्याची वेळ आलीय.

थर्मेक्स लिमिटेडच्या माजी संचालिका आणि एकेकाळी भारतातल्या आठ श्रीमंत महिलांमध्ये गणल्या जाणाऱ्या अनू आगा यांना आपण भेटणार आहोत. अनू आगा यांचा जीवनपट आपल्याला सांगतो की, आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला घडवण्यात मोठ्या प्रमाणात जबाबदार असते. कोणीही जन्मतःच प्रसिद्ध किंवा महान नसतो. आपल्या आयुष्यात अचानक काहीतरी घडत आणि तेच क्षण आपले भाग्यविधाते ठरतात. साधेपणा आणि प्रामाणिकपणा आपली मूल्य असतात. त्यांच्या जोरावर तुम्ही जगाला सामोरे जाता, अडचणींवर मात करता, कधी कधी संताप उफाळून येतो, भीतीचा बागुलबुवा फोडता, अस्वस्थततेचा उद्वेग होतो अशा सर्व प्रकारच्या मिश्र भावना आणि अनुभवांमधून मग आपण यशाची चव चाखतो. अनू आगाही अशाच सर्व प्रकारच्या अनुभवांतून गेल्या.

अनू आगा  

अनू आगा  


मुंबईत माटुंग्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात अनू आगा यांचा जन्म झाला. दोन मोठ्या भावांच्या सोबतीनं बालपण मजेत व्यतीत झालं. सेंट झेविअर्स महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी संपादन केली. काहीतरी वेगळं आणि समाजाकरता भरीव काहीतरी करण्याची त्यांना उर्मी होती.

टाटा इन्स्टिट्यूट फॉर सोशल सायन्समध्ये त्यांच्या या उर्मीला वाट मिळाली. त्यांनी टीआयएसएसमध्ये वैद्यकीय आणि मानसिक सामाजिक स्वास्थ्य विभागात प्रवेश घेतला. अनू सांगतात, “टीआयएसएसमधील पदवीमुळे मला अमेरिकन विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. पण एक स्त्री असल्यामुळे मी लग्न करून मुलांना जन्म दिला पाहिजे हे सतत माझ्या मनावर बिंबवण्यात आलं”.

त्यांच्या मोठ्या भावाचा मित्र रोहिंग्टन याच्याशी त्यांची गाठ पडली. रोहिंग्टन केंब्रिजमध्ये शिक्षण पूर्ण करून बहुदेशीय कंपनीमध्ये काम करत होते. अनू सांगतात, “मोठ्या कंपन्यांनमध्ये पगार आणि भत्ते प्रचंड मिळत होते पण तरीही रोहिंग्टनना कामाचं समाधान मिळत नव्हतं. माझ्या मोठ्या भावाने त्यांना आमच्या कंपनीत काम करण्याविषयी विचारलं. त्यांच्याकरता हे जरा विचित्र होतं, कारण आमच्या कंपनीविषयी फारसं कोणालाही माहिती नव्हतं आणि आम्ही रोहिंग्टनना बाहेर मिळत असलेला पगारही देऊ शकत नव्हतो. माझे बाबा ए एस भाथेना यांनी थर्मेक्स लिमिटेडची स्थापना केली. ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्राकरता आवश्यक यंत्रसामग्री थर्मेक्समध्ये बनवण्यात येते. पण रोहिंग्टननी आमच्या कंपनीत काम करण्याच ठरवलं”. आज थर्मेक्सची उलाढाल ४ हजार ९३५ कोटी इतकी आहे.

अनू आणि रोहिंग्टन यांनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. पुण्यात कंपनीची चांगलीच भरभराट झाली. दरम्यान, अनू यांनी बाल मार्गदर्शन केंद्रात काम करायला सुरूवात केली. सोबतच कौटुंबिक जवाबदाऱ्याही पार पाडत होत्या. तर रोहिंग्टन यांनी थर्मेक्सला यशाच्या शिखरावर नेलं. अल्पावधीतच अनूच्या वडिलांच्या जागी कंपनीचे अध्यक्ष म्हणून रोहिंग्टन यांनी सूत्र स्वीकारली.

पण, त्यांच्या या सुखी जीवनात अचानक एक वादळ आलं. रोहिंग्टन यांना पन्नाशीच्या उंबरठ्यावर एक मोठा झटका आला. अनू त्या कठीण काळाविषयी सांगतात, “या प्रचंड हुशार माणसाला मूळाक्षर आणि संख्या सर्व काही परत शिकावं लागलं. तब्येत सुधारत असताना बऱ्याच जणांना नैराश्य येतं पण माझ्या पतीला संताप अनावर व्हायचा. पूर्ण जगाचा त्यांना राग येत होता. पण हळूहळू या रागाला वाट मिळाली. ते पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहिले. या काळात त्यांनी एक पुस्तकही लिहिलं”. या काळात अनूचे कुटुंबीय त्यांना कंपनीच्या कामात लक्ष द्यायला आग्रह करू लागले. त्यामुळे मग अनू यांनी ह्यूमन रिसोर्स विभागात काम करायला सुरूवात केली.

आपल्या कंपनीतल्या प्रवेशाबद्दल अनू सांगतात, “मी काम करायला सुरूवात केल्यावर माझ्यासमोर मुख्य आव्हान होतं, कंपनीची पत आणि ब्रँड इमेज कायम राखणे आणि त्याचा वापर करून कारभार वाढवणे. कामगार आनंदी कसे राहतील याकडे लक्ष ठेवणेही महत्त्वाचं होतं. कंपनीत ‘आगा’ या बिरुदाशिवाय मला एक व्यक्ती म्हणून कसं स्वीकारतात हे माझ्याकरता मोठं आव्हान होतं”.

अनू यांची मुलगी लंडनला राहत होती. लेकीच्या बाळंतपणाकरता त्या लंडनला साधारण सहा महिने होत्या. त्या तिथून परतल्यावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी रोहिंग्टन करत होते. पण अनू यांची आतुरतेने वाट पाहत असतानाच रोहिंग्टन यांना ह्रदयविकाराचा आणखी एक झटका आला. अनू यांची गाठ पडण्याआधीच रोहिंग्टन यांना मृत्यूने गाठलं. अनू आणि त्यांची भेटच होऊ शकली नाही.

त्यांचं आयुष्य आता एका सुंदर लयीत सुरू असताना हे घडलं. अनू यांनी आपला चांगला मित्र गमावला तर कंपनीने आपला प्रमुख. या धक्क्यातून सावरण्याआधीच कंपनीने लगेचच दुसऱ्या दिवशी संचालकांची बैठक बोलावून अनू यांना अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारायला लावली. त्या म्हणतात, “मी याकरता अजिबात तयार नव्हते. मी माझा आत्मविश्वास गमावत होते. हा आमच्या कुटंबाचाच व्यवसाय असल्याने या पदाकरता मीच दावेदार होते पण मला माझ्याच कुवतीवर शंका येत होती. सगळं काही धुसर दिसत होतं. मला माझ्या पतीची प्रचंड आठवण येत होती. सगळं बळ एकवटू लागले”.

या सर्वावर तोडगा म्हणून त्यांना विपश्यनेचा मार्ग सापडला. त्या दहा दिवसांत त्यांनी स्वतःला खूप न्याहाळलं. त्या सांगतात, “मी सगळ्या परिस्थितीकडे डोळसपणे पाहू लागले. सर्व गोष्टींचा पुर्नविचार केला. माझ्या पतिसोबत मी माझी तुलना करू लागली. ही काही खूप चांगली खेळी नव्हती. पण माझी सर्व शक्ती पणाला लावून या जहाजाचं सुकाणू हातात घ्यायचं ठरवलं”.

अनू यांच्या आयुष्यातल्या कठीण प्रसंगांमध्ये विपश्यना त्यांची सोबती बनली. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या १४ महिन्यांनंतर त्यांचा २५ वर्षांचा मुलगा एका कार अपघातात वारला. एकावर एक धक्के बसत होते पण विपश्यनेमुळे हे धक्के त्यांनी पचवले. अनू आपल्या या कठीण काळाविषयी म्हणतात, “मला कळून चुकलं होत की या गोष्टी माझ्या आवाक्यातल्या नाहीत. मृत्यू हा अटळ असतो. या गोष्टींचा मी आता स्वीकार केलाच पाहिजे. या वास्तवाचा स्वीकार केला तरच मी त्यातून बाहेर पडू शकते”.

त्यांनी वादळात सापडलेल्या त्यांच्या जहाजाचं सुकाणू परत हातात घेतलं. त्या कठिण काळात अनू यांनी त्यांच्या मनातल्या सर्व शंकांना तिलांजली देत आव्हानांना सामोरं जायचं ठरवलं. त्या म्हणतात, “मला व्यवसायातल्या बारिकसारीक गोष्टींची माहिती नव्हती. आर्थिक बाबीही मला फारशा अवगत नव्हत्या. भांडवली मालाच्या व्यवसायात असल्यामुळे या गोष्टींची माहिती असणं अत्यावश्यक असतं. माझ्या अवतीभोवती मला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींचं मी जाळं विणलं. आणि त्यांच्याकडून या सर्व गोष्टी शिकण्याचा मी प्रयत्न करू लागले. मला यात काहीही कमीपणा वाटत नव्हता आणि या गोष्टींचा खूप फायदा झाला”. नेमकं त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा घरघरीच्या मार्गावर होती. रोहिंग्टन जाण्याच्या वर्षभर आधी थर्मेक्स पब्लिक लिमिटेड झाली होती. त्यावेळी ४०० रुपये भाव असलेला त्यांचा शेअर आता ३६ रुपयांवर घसरला होता.

अनू यांनी काही धाडसी निर्णय घेतले. त्यांनी कंपनीत काही नवे बदल करण्याचे ठरवले. सर्वांनी या गोष्टीला विरोध केला. त्यांना नुकसानाची भरपाई करण्याकरता बोस्टन कनस्लटंट ग्रुपचं (बीसीजी) सहाय्य घ्यायचं होतं. पण त्यांच्या टीमचं म्हणणं होतं की, अर्थव्यवस्थेत सुधार होईपर्यंत थोडा धीर धरुयात. त्या सांगतात, “मला वाटायचं की, मी आणि माझं कुटुंब या कारभाराचे मालक आहोत. पण एका शेअरहोल्डरच्या निनावी पत्राने मी हादरले. त्या पत्रात लिहिलं होतं की, आम्ही त्यांना देशोधडीला लावलं. माझे पती आणि माझ्यावर ही खूप घाणेरडी टीका केली होती. कित्येक रात्री मी झोपू शकले नव्हते”. मग त्यांनी बीसीजीला नियुक्त करण्याचा निर्णय पक्का केला. मुख्य व्यवसायासोबत त्यांनी दुसरे छोटे उद्योग सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी बाटलीबंद पाणी विकण्याचा निर्णय घेतला. पण दुसऱ्या छोट्या कंपनीकडून या पाण्याच्या बाटल्या घेण्याचं ठरवलं. त्या सांगतात, “यामुळे आमचा टर्नओव्हर वाढला. आम्हाला काही निर्णय युक्तीने घ्यावे लागले. आपल्या देशात आर्थिक सुरक्षिततेची हमी नसल्यामुळे काही गोष्टी कराव्या लागतात.”

अनू यांच्या एचआर मधल्या कामाचा कामगारांवर चांगलाच प्रभाव होता. त्या सांगतात, “माझ्या टीमला मला आणि कंपनीलाही यशस्वी झालेलं पाहायचं होतं. सगळ्यांचा मला खूप ठाम पाठिंबा मिळत होता. माझी मुलगी आणि जावईही त्यांच्या मुलांसोबत लंडनहून भारतात परतले.” त्यांच्या कंपनीची लंडनमधली घडी बसवण्याकरता मुलगी आणि जावई तिथे गेले होते. ट्रेनी इंजिनिअर म्हणून सुरूवात करत त्या दोघांनीही अवघ्या दोन वर्षातच कंपनीला यश प्राप्त करुन दिलं. अनू यांची मुलगी मेहेर केमिकल इंजिनिअर आहे आणि आर्थिक बाबींचही तिला चांगलं ज्ञान आहे. अनू यांनी आपल्या सर्व कामांची जबाबदारी मेहेरवर सोपवत आपल्या कामातून निवृत्ती घेतली.

अनूना आता स्वतःच्या मनासारखं काहीतरी करायचं होतं. आपला वेळ आणि पैशाचा सदुपयोग करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांनी आकांक्षा नावाची सामाजिक संस्था सुरू केली. त्यांच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. संस्थेचा व्याप त्या पुण्यात घेऊन आल्या. थर्मेक्सनी त्यांच्या आवारात काही जागा आकांक्षाला दिली. आकांक्षा आणि टिच फॉर इंडिया या दोन्ही संस्थांच्या विश्वस्त मंडळावर आहेत. या दोन्ही संस्था शिक्षणाचा दर्जा वाढवण्याकरता काम करत आहेत. टिच फॉर इंडियामध्ये त्यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाकरता ‘फिरकी’ नावाचा एक अभ्यासक्रम सुरू केला आहे.

त्या म्हणतात, “तुमच्या यशस्वी कथा लोकांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. कारण लोकांना त्यातून प्रेरणा मिळते आणि ते तुमचं अनुकरण करू लागतात. सध्या खूप नवनवे शोध लागत आहेत. शिक्षण आणि प्रशिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना फारसे पुरस्कार मिळत नाही, अपवाद मेरिको इनोव्हेशन फॉर इंडिया. पण जर या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपले अनुभव मांडले तर अधिकाधिक लोकांना प्रेरणा मिळेल आणि या क्षेत्रात भरीव कामगिरी करतील”. या दोन संस्थांच्या छत्रछायेत चार विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील महाविद्यालयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे तर पाच जणांना अझीम प्रेमजी विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. सामाजिक क्षेत्रातली कामाकरता २०१०मध्ये अनू आगा यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं. 

अनू म्हणतात, “मी सामान्य होते आणि सामान्यच आहे. मला डोक्यावर घेऊ नका”.

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

आत्मसंतुष्ट न होता, सतत नव्याचा ध्यास असलेल्या यशस्वी उद्योगिनीची कथा

सर्वसामान्यांपर्यंत कला पोहचवण्याकरता कलाकार, क्युरेटर आणि उद्योजिका सुरभी मोदींचे अथक प्रयत्न

अमीरा शाहः कथा यशोशिखरावरील तरुण उद्योगिनीची

लेखिका – बिंजल शहा

अनुवाद – साधना तिप्पनाकजे