‘अर्बन क्लायंबर्स’च्या माध्यमातून साहसी खेळांना दारोदारी पोहचविणारी आस्था

‘अर्बन क्लायंबर्स’च्या माध्यमातून साहसी खेळांना दारोदारी पोहचविणारी आस्था

Friday December 11, 2015,

5 min Read

कुठल्याही उद्योजकाला ‘आयुष्यात कुठली गोष्ट अनुभवायची इच्छा आहे?’ असा प्रश्न विचारल्यास अनेक जण उत्तर देतील, “क्लाइम्बिंग, ट्रेकिंग, बन्गी जम्पिंग, मॅरेथॉनमध्ये धावणे किंवा इतर साहसी खेळ.” वेळेचा अभाव, किंमत आणि सुरक्षेच्या कारणास्तव क्लाइम्बिंगसारख्या चित्तथरारक साहसी खेळांचा अनुभव खूप कमी वेळा घेतला जातो.

‘वाईल्डक्राफ्ट’ला मिळालेला निधी आणि ‘थ्रीलोफिलीया’सारख्या स्टार्टअप्समुळे साहसी खेळांकडे लक्ष वेधले गेले. ‘अर्बन क्लायंबर्स’ची संस्थापिका आस्था चतुर्वेदी साहसी खेळ सुरक्षितरित्या खेळता यावे या उद्देशाने एक सुसंघटित व्यासपीठ तयार करीत आहे.

image


वेळेअभावी आऊटडोअर ऍक्टीव्हिटीजना मुकलेल्या आजकालच्या पिढीसाठी आस्थाला काम करायचे आहे. ‘अर्बन क्लायंबर्स’ स्वतः ग्राहकांपर्यंत जाऊन त्यांना सेवा पुरविते.

साहसी खेळांचे विश्व आस्थाला नवीन नाही. तिने लहानपणापासून कायाकिंग, ट्रेकिंग आणि क्लाइम्बिंग केले आहे. २००५--२००९ दरम्यानच्या तिच्या अमेरिकेतील वास्तव्यामध्ये व्यावसायिक दृष्टीकोनातून क्लायंबिंगचा वापर करता येईल हे तिच्या लक्षात आले. त्यानंतर ‘अर्बन क्लायंबर्स’ची संकल्पना तिला सुचली.

२०१२ च्या शेवटी काही कारणास्तव आस्थाला तिची कॉर्पोरेट क्षेत्रातली चांगली नोकरी सोडावी लागली. तोपर्यंत ‘अर्बन क्लायंबर्स’ सुरु करुन तिला मोठं करण्याची तिची इच्छा शिगेला पोहचली होती. आस्थाने त्या दिशेने कामाला सुरुवात केली. एका मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाली असताना आस्थाच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली. काही दिवस नैराश्यामध्ये गेल्यानंतर आस्था पुन्हा कामाला लागली. त्या अवधीमध्ये अंथरुणावर पडून असलेल्या आस्थाने ‘अर्बन क्लायंबर्स’चा संपूर्ण प्रोजेक्ट डिझाईन केला. २०१३ मध्ये ‘अर्बन क्लायंबर्स’ अस्तित्वात आली.

image


‘अर्बन क्लायंबर्स’ने बहुआयामी धोरण स्विकारले आहे. ही कंपनी मोठमोठ्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील रहिवाशी, शाळा तसेच क्लब आणि रिसॉर्टला सेवा पुरविते. “आम्ही ‘वॉल ऑफ लाईफ’ नावाचा उपक्रम राबवितो. ज्यामध्ये आम्ही ट्रेनर्सच्या सहाय्याने मोठमोठ्या कॉर्पोरेट ग्रुप्सना या उपक्रमामध्ये सहभागी करुन घेतो. हा क्लाइम्बिंग करतानाच सांघिक भावना निर्माण करुन संघ बांधणी करणारा उपक्रम आहे,” असं आस्था सांगते.

आस्था सांगते,“एका स्त्रीसाठी हा व्यवसाय करणे खरंच कठीण आहे.” फॅब्रिकेटर, लाकडासाठी सप्लायर शोधणे इत्यादी वेंडर मॅनेजमेंटची कामे हे तिच्यासमोरचे महत्त्वाचे आव्हान असते. ही पुरुषप्रधान क्षेत्र आहेत. तुमचे काम पूर्ण करुन घ्यायचे असेल तर या विक्रेत्यांबरोबर काळजीपूर्वक व्यवहार करावा लागतो.

“येल्लागिरीमधील ‘इन्डस स्कूल ऑफ लिडरशीप’मध्ये क्लायबिंग वॉल बसवताना आलेला अनुभव खूप काही शिकविणारा होता. या शाळेसाठी एका हील स्टेशनवर क्लाइम्बिंग वॉल बसवायची होती. जवळपास २० कठीण वळणं पार करुन माणसं आणि सामान वर घेऊन जायचं होतं.”

आस्था पुढे सांगते, “मला वाटतं वेळेचं नियोजन करणं हे कोणत्याही उद्योजकापुढचं सर्वात मोठं आव्हान असतं. एकाच वेळी तुम्हाला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं. कामांची यादी न संपणारी असते.”

लोकांना तुमच्याकडे आकर्षित करणे आणि त्यांना कायम तुमच्याशी जोडून ठेवणे हे दुसरे मोठे आव्हान असते. खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ट्रेनर्सना लक्ष्य केले जाऊ शकते. मात्र त्यांना भाषा कौशल्य आणि सॉफ्ट स्किल्सबाबत प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. ज्यांना काहीतरी वेगळे आणि रोमांचक करण्याची इच्छा असते अशा तरुण इन्टर्न्स आणि विद्यार्थ्यांना कामावर ठेवण्याकडे आस्थाचा कल आहे. चांगले आणि कुशल ट्रेनर्स घडविण्यासाठी येथे ट्रेनर मॅनेजमेंट प्रोग्रॅमही राबविला जातो.

image


‘अर्बन क्लायंबर्स’ साहसी खेळांसाठीचा संपूर्ण सेट अप आणि ट्रेनिंग पुरविणारी पहिली आणि एकमेव कंपनी असल्याने त्याचा त्यांना फायदा होईल याबाबत आस्थाला विश्वास वाटतो.

“एकदा लोकांना सुरक्षिततेबाबत, सर्विसविषयीच्या तुमच्या विश्वासार्हतेबद्दल खात्री पटली की ते खेळण्यासाठी पुढे येतात. गुंतवणूकदारांना आकर्षित करणे कठीण असते. विशेषतः बंगळुरुसारख्या शहरात, जिथे फुड आणि टेक स्टार्टअप्सचे राज्य आहे,” आस्था सांगते.

आस्थाने खूप कमी पैशामध्ये सुरुवात केली आणि दुबईतील ‘ऐंजेल इन्वेस्टर’ला आपल्या या संकल्पनेकडे आकर्षित करुन घेण्यात ती यशस्वी झाली.

आजकालची तणावपूर्ण जीवनशैली हे ‘अर्बन क्लायंबर्स’च्या अस्तित्वामागचे कारण आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. “आम्ही५ वर्षाच्या मुलांपासून, १३-१४ वर्षांपर्यंतच्या मुलांना यामध्ये सहभागी करुन घेतो. यासाठी पालकांना आणि शिक्षकांना समजावणं हे आमच्यासाठी मोठं काम असतं. त्यांना अशा खेळांचे फायदे माहिती असतात. मात्र हे फायदे त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत हे माहिती नसतं,” ती सांगते.

‘अर्बन क्लायंबर्स’ ओकरिड्ज स्कूल आणि ऑरिंको अकॅडमीच्या साथीने क्लायंबर्सना प्रशिक्षणही पुरविते. त्यांनी शाळांसाठीही प्रशिक्षण सामग्री विकसित केली आहे.

“ग्राहकाच्या स्वरुपात, मुलांबरोबर काम करणे समाधान देणारे असते. आम्ही त्यांना क्लायंबिंगच्या सूक्ष्म बारकाव्यांबाबत प्रशिक्षित करतो. खेळ म्हणून क्लाइम्बिंगच्या असलेल्या जुजबी ज्ञानापेक्षा कायमस्वरुपी ज्ञान देणारं प्रशिक्षण जास्त फायदेशीर ठरतं,” आस्था सांगते.

हा प्रवास आस्थासाठी खूप रोमांचक होता.“मी असं म्हणत नाही की हे सोपं होतं. पण ते आमच्यासाठी नेहमीच रॉकिंग होतं. आम्ही यामधून खूप काही शिकलो.”

ती सांगते की भारतामध्ये जागेचा अभाव हा कुठल्याही उद्योगाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. इमारतींमधील वापराविना पडून राहिलेल्या जागांचा वापर करुन ‘अर्बन क्लायंबर्स’ने या अडचणीवर मात केली आहे. त्यांनी क्लाइम्बिंगसाठी जागा तयार करण्याकरिता रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंटवर थोडा पैसा खर्च केला आणि त्यानुसार कोण चढणार आहे, क्लायंबिंगची जागा बनविण्यासाठी कशा कशाची गरज आहे हे पहाण्यासाठी एक नमुना तयार केला. आस्था सांगते, “ती एक भिंत म्हणजे योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल ठरले आणि तिने आमच्या यशाचे दरवाजे उघडले.”

मित्रमैत्रिणींनी, क्लायंबिंग करणाऱ्यांनी, याबद्दल ऐकलेल्यांनी तसेच देशाबाहेरुनही अनेक लोकांनी त्यांना मदत केली, त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढे जाण्यासाठी मौलिक सल्लेही दिले.

‘अर्बन क्लायंबर्स’ने आजपर्यंत १० भिंती उभारल्या आहेत आणि यापुढेही बरेच काम त्यांच्याकडे आहे. ते शाळांच्या सोबतीने काम करतात. यापुढे जाऊन ते क्लायंबर्सना एक स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहेत. ज्याची सुरुवात येत्या जानेवारीपासून ओकरिड्ज स्कूलमध्ये होणार आहे.

ग्राहकांच्या गरजेनुसार आणि त्यांना परवडेल अशा किंमतीत सेवा पुरविणे हे ‘अर्बन क्लायंबर्स’चे विशेष. आस्था सांगते, “आमच्याकडे असे तज्ज्ञ आहेत जे ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये भिंत उभारुन देतात. जर त्यांच्याकडे ग्राहक संख्या मोठी असेल तर आमच्याकडे ‘बिल्ड ऍण्ड ऑपरेट’ मॉडेलही उपलब्ध आहे.” यानंतर येते ते रोख केंद्रीत मॉडेल. या मॉडेल अंतर्गत ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ती पुढे सांगते, “आम्ही २ कोटींची गुंतवणूक करु शकणाऱ्या गुंतवणूकदाराच्या शोधात आहोत. मात्र गुंतवणूकदाराच्या तयारीनुसार कमी रक्कमेतही हा उपक्रम राबवायची आमची तयारी आहे.”

‘पार करण्यासाठी सर्वात कठीण डोंगर म्हणजे उंबरठा’ अशी एक डॅनिश म्हण आहे. मग वाट कसली पाहताय? शूज घाला आणि क्लायंबिंगसाठी तयार व्हा.

लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : अनुज्ञा निकम