'गेमिंग' विश्वात पुरुषांच्या मक्तेदारीला मात देणाऱ्या : अनीला अँद्रादे

‘99गेम्स’च्या नवनव्या कल्पनांचं गुपित

'गेमिंग' विश्वात पुरुषांच्या मक्तेदारीला मात  देणाऱ्या : अनीला अँद्रादे

Wednesday October 14, 2015,

5 min Read

भारतातल्या बहुतांश घरांमध्ये मुलांसाठी अभ्यास आणि खेळ यापैकी कशाची निवड करायची झाली, तर ती होते अभ्यासाची. खरंतर भारतात आजपर्यंत अनेक चांगले खेळाडू झाले. पण अजूनही खेळ आणि अभ्यास यामध्ये अभ्यासालाच प्राधान्य दिलं जातं. पण तरीही अभ्यास केला तरच प्रगती होऊ शकते या समजुतीला शेकडो भारतीय खेळाडूंनी आजवर खोटं ठरवलंय. आता परिस्थिती झपाट्याने बदलत आहे . ज्या वेगाने भारतात खेळांचा विकास होतोय, ते पहाता भविष्याचं मोठं आशादायी चित्र डोळ्यांसमोर उभं रहातं.

आज क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन,नेमबाजी , बुद्धिबळ, गोल्फ अशा अनेक खेळांमध्ये भारतीय खेळाडू जगभरात उत्तम कामगिरी करत आहेत. देशाच्या विकासासाठीही ही चांगलीच बाब म्हणावी लागेल. काळानुसार खेळांचा आवाकाही खूप मोठा झालाय. आज खेळ फक्त मैदानांपुरतेच मर्यादित राहिले नाहीयेत, तर थेट तुमच्या हातातल्या मोबाईलपर्यंत पोहोचले आहेत. नेमबाजी शिवाय मोबाईल आणि कम्प्युटरवरच्या गेम्समध्ये तरुणांसाठी उत्तम रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

अशाच हजारो तरुणांपैकीच अनीला अँद्रादे एक आहेत, ज्यांनी मोबाईल गेमिंग कंपनी ‘99गेम्स’च्या माध्यमातून फक्त भारतच नव्हे, तर जगभरातल्या गेमिंग विश्वात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलंय. खरंतर लहानपणापासून अनीला अँद्रादे यांना खेळायची आवड होती. विशेषत:, जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळायचा, तेव्हा कम्प्युटरवर गेम खेळणं हा त्यांचा आवडता छंद होता. मोबाईलवरच्या गेमची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणत्याही वयोगटातल्या व्यक्ती या गेम खेळू शकतात. आणि प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींसाठी इथे गेम्स उपलब्ध असतात.

अनीला अँद्रादे

अनीला अँद्रादे


अनीला यांचा जन्म मस्कत मध्ये झाला. त्यांची आई एक प्राध्यापिका आहे तर वडिल एक चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. लहानपणीच अनीला त्यांची आई आणि भावंडांसोबत मस्कतहून भारतात मंगलोरला आल्या. त्यांचे वडिल मात्र नोकरीमुळे मस्कतमध्येच राहिले. आपलं शालेय शिक्षण अॅनिलांनी मंगलोरमध्येच घेतलं आणि त्यानंतर एमआयटी मणिपालमधून इंजिनिअरिंगही केलं. पुढे त्यांनी आयसीएफएआयमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासून आईच्या शिकवण्याचा अनीलांच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव होता. आयुष्यात स्वावलंबी होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा कधी संधी मिळेल, ती सोडू नका अशी त्यांच्या आईची शिकवण. शाळेत होणा-या वक्तृत्व स्पर्धेसाठीही अनीलांची आई त्यांची तयारी करुन घ्यायची. अनेकदा तर स्वत: भाषण लिहून त्यांच्याकडून वदवून घ्यायची. या सगळ्यामुळे अनीलांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झळाळी मिळाली. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. याच आत्मविश्वासाने अनीला यांना एक अष्टपैलू व्यक्तिमत्व मिळवून दिलं. अभ्यासाबरोबरच त्या वाद-विवाद चर्चा, संगीत आणि खेळातही अग्रेसर होत्या.

अनीला यांच्या करिअरची सुरुवात ‘रोबोसॉफ्ट’ कंपनीपासून झाली. ‘रोबोसॉफ्ट’मध्ये अनीला क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर अर्थात गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी सांभाळत होत्या. पण अनीला यांना ‘रोबोसॉफ्ट’मध्ये नोकरी मिळण्याचीही मोठी रंजक कथा आहे. जेव्हा ‘रोबोसॉफ्ट’ कंपनी त्यांच्या महाविद्यालयात उमेदवारांच्या चाचपणी घेण्यासाठी आली, तेव्हा त्यांना या गोष्टीविषयी माहितीच नव्हती. पण फार प्रयत्न केल्यानंतर त्यांना ही परिक्षा देण्याची परवानगी देण्यात आली. आणि त्या चक्क परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. ‘रोबोसॉफ्ट’मध्ये अनीला यांना खूप काही शिकायला मिळालं. जसजसा वेळ जात राहिला, अनीला यांची गणना कंपनीतल्या वरिष्ठांमध्ये होऊ लागली. याच दरम्यान ‘रोबोसॉफ्ट’ने आपल्या ‘99 गेम्स’ या प्रोजेक्टसाठी कंपनीतल्या काही लोकांची निवड केली. यामध्ये अनीला यांचाही समावेश करण्यात आला. आणि जन्म झाला अनीला यांच्या पहिल्या गेमचा..’वर्ड्सवर्थ’चा. हा एक अक्षरांशी खेळण्याचा गेम होता. खास आयफोनसाठी त्यांनी हा गेम बनवला होता. ‘वर्ड्सवर्थ’ खूप यशस्वी झाला. लोकांची त्याला चांगली पसंती मिळाली. एवढंच नाही, तर गेमिंगमध्ये अक्षरांच्या श्रेणीत ‘वर्ड्सवर्थ’ने थेट दुस-या क्रमांकावर झेप घेतली. यानंतर अनीला यांना डिजाईनरवरुन थेट प्रोड्युसर पदावर बढती देण्यात आली.

गेमिंग विश्वात पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान..

गेमिंग विश्वात पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान..


परदेशात तर गेमिंग व्यवसायानं खूप मोठी भरारी घेतलीये. पण भारतात आत्ता कुठे या व्यवसायाची सुरुवात झालीये. भारतात तसं पहायला गेलं तर गेमिंग कंपन्यांची संख्या खूप कमी आहे, आणि नवनव्या, अनेक प्रकारच्या गेम्सची मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी आहे. थोडक्यात म्हणजे हे क्षेत्र इतर क्षेत्रांपेक्षा खूप वेगळं आहे. हे क्षेत्र जरी नवं असलं, तरी इथे एक विशेष गुणवत्ता तुमच्याकडे असणं नितांत आवश्यक आहे. ते म्हणजे, विविध वयोगटातल्या व्यक्तींना काय आवडेल हे तुम्हाला समजून घ्यावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला जगभरातल्या गेमिंग विश्वावरही सूक्ष्म नजर ठेवावी लागते. या क्षेत्रात महिलांचं प्रमाण खूपच कमी आहे. आणि अधिकाधिक महिला या क्षेत्राकडे वळल्या, तर नक्कीच या क्षेत्राचाच अधिक फायदा होईल.

गेमिंग विश्वाचा विचार केला, तर एका प्रोड्युसरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी तुमच्याकडे गेम तयार करण्याचं कसब तर असायलाच हवं, पण त्याचबरोबर तुम्हाला इतरांसोबत समन्वयही ठेवावा लागतो. तुम्हाला मार्केटिंगचंही ज्ञान असणं गरजेचं आहे. भारतात काही नावाजलेल्या शिक्षण संस्थांमध्ये गेमिंगचं प्रशिक्षण दिलं जातं.

‘99गेम्स’ची कल्पक टीम

‘99गेम्स’ची कल्पक टीम


‘99 गेम्स’चं ऑफिस उडुपीमध्ये आहे. आणि इथे गेमिंग विश्वातले नवनवे आविष्कार घडवणा-या टीमचं नेतृत्व करणा-या अनीला या महिलांसाठी एक आदर्श आहेत. यशाच्या शिखरावर असलेल्या अनीला यांना देश-विदेशातल्या विविध संस्था आमंत्रण देतात. आणि आजघडीला जगातली दोन कोटी माणसं अनीला आणि त्यांच्या टीमने बनवलेल्या गेम्स खेळतात. ‘99गेम्स’ने तयार केलेल्या गेम अॅपल, अँड्रॉईड आणि विंडोज अशा तीनही प्रकारच्या मोबाईल फोनवर उपलब्ध आहेत. यातले काही विकत घेता येतात तर काही मोफत आहेत.

तुम्ही घेता तो प्रत्येक निर्णय म्हणजे एक आव्हान असतं असं अनीला मानतात. आपल्याला या आव्हानाचं संधीत रुपांतर करायचं असतं असं त्या म्हणतात. ज्या व्यवसायामध्ये पुरुषांची मक्तेदारी असते, अशा व्यवसायात एका स्त्रीनं काम करणं आणि यशस्वी होणं हे तसं कठीण काम. पण त्यात एक गोष्ट अशीही आहे की तुम्ही योग्य समन्वय साधलात, तर सर्वकाही सोपं होऊन जातं. अनीला यांच्या टीममध्ये बहुतेक पुरुषच आहेत. पण आजपर्यंत अनीलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागलेला नाही. त्या स्वत: एक महिला असल्यामुळे सर्वांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्या सोडवणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. कारण असं म्हणतात की महिला या पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवल्या जातात. अशा सर्व परिस्थितीत एकदा तुम्ही कुणाचा विश्वास जिंकलात की मग पुढचं सगळं काम सोपं होतं.

अनीला यांना नवनव्या ठिकाणी फिरणं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं आणि वाचन करणं आवडतं. यातूनच त्यांना नवनव्या कल्पना सुचतात आणि नवी प्रेरणा मिळते असं त्या म्हणतात. पण आपल्या या यशाचं श्रेय त्या आपल्या कुटुंबाला देतात. कारण त्यांचं कुटुंब नेहमीच त्यांच्या पाठिशी उभं राहिलं आणि त्यांना सतत पुढे जाण्याची प्रेरणा दिली.