‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’..फूड चेन विश्वातलं आत्मविश्वासाचं पाऊल !

‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’..फूड चेन विश्वातलं आत्मविश्वासाचं पाऊल !

Saturday December 05, 2015,

4 min Read

उत्तम खाद्यपदार्थ बनवण्याची मनापासून इच्छा..खाद्यपदार्थ आणि बेवरेज अर्थात विविध प्रकारची पेय बनवण्याचा भरपूर अनुभव.. संदीप श्रीनिवा नायक आणि थॅश्विन मकॅटिरा या दुक्कलीची ही ओळख. त्यांच्या याच ओळखीतून २०१० साली जन्म झाला ‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’ या मेगाब्रॅण्डचा ! या नावाखाली आज तीन मोठे ब्रॅण्ड कार्यरत आहेत. त्यामध्ये पहिला आहे ‘प्लॅन बी’, दुसरा आहे ‘मदर क्लकर्स’ आणि तिसरा ब्रॅण्ड आहे ‘वन नाईट इन बँकॉक’. या तीनही ब्रॅण्ड्सची मिळून बेंगलुरु आणि चेन्नईमध्ये ५ रेस्टॉरंट्स आहेत. आणि आपल्या ग्राहकांना उत्तम प्रकारची आणि दर्जाची सेवाही देतायत..

image


संदीप पूर्वी काही चायनीज रेस्टॉरंट्सची फ्रॅन्चायजी चालवायचा. यामध्ये काही चायनीज ब्रॅण्डच्या हॉटेल्सचा समावेश होता. तर थॅश्विन एका अमेरिकन इलेक्ट्रॉनिक कंपनीसाठी काम करायचा. ही कंपनी इलेक्ट्रॉनिकशी संबंधित विविध उपकरणं बनवते. पण संदीपला तो करत असलेल्या कामात रस वाटत नव्हता. त्याला दुस-या कुणाच्यातरी फ्रॅन्चायजी चालवण्यात रस नव्हता. त्याला काहीतरी स्वत:चं उभं करायचं होतं. जिथे नव्या कल्पना, प्रयोग आणि त्यांच्या अंमलबजावणीचं पूर्ण स्वातंत्र्य त्याला असेल.

...आणि प्रवास सुरु झाला

२०१० मध्ये संदीप आणि थॅश्विन या दोघांनी मिळून बेंगलुरुच्या कासल स्ट्रीटवर त्यांच्या ब्रॅण्डचं पहिलं आऊटलेट सुरु केलं..’प्लॅन बी’. सुमारे १२०० स्क्वेअर फूटांच्या या जागेत ५८ ग्राहकांची बसण्याची व्यवस्था होऊ शकत होती. ’प्लॅन बी’ हा एक अमेरिकन पद्धतीचा पब होता, जिथे तिथल्या पबप्रमाणेच खाद्यपदार्थ मिळत होते. यामध्ये चिकन विंग्ज, स्मोक्ड रिब्ज, स्टीक्स अशा पदार्थांचा समावेश होता. ‘प्लॅन बी’च्या आतली रचना अनोखी आणि आकर्षक आहे. आतमधून ते एखाद्या गोदामासारखंच दिसतं. भिंतींवर विटांचं बांधकाम आणि छताला वेगवेगळे अनेकविध पाईप. हळूहळू ‘प्लॅन बी’चा प्रसार होऊ लागला आणि २०१२ मध्ये बेंगलुरुमधल्या रिचमंड टाऊनमध्ये आणखी एक ‘प्लॅन बी’ उघडलं गेलं.

image


संदीप सांगतो, की ‘भरपूर प्रकारचे खाद्यपदार्थ आणि कॉकटेलसाठी उत्तम दर्जाचे ड्रिंक्स यासाठी ‘प्लॅन बी’ प्रसिद्ध आहे. इथला उत्तम दर्जाच याला इतरांपेक्षा वेगळं आणि सरस ठरवतो.’ या सुरुवातीच्या यशानंतर ‘प्लॅन बी’नं मागे वळून पाहिलंच नाही. ‘प्लॅन बी’ स्थिरस्थावर होताच बेंगलुरुच्या इंदिरानगरमध्ये २०१३ साली ‘मदर क्लकर्स’ या नव्या ब्रॅण्डची सुरूवात झाली. ‘मदर क्लकर्स’मध्ये मुख्यत: गॉर्मेट बार फूड दिलं जातं.

२०१५ च्या सुरुवातीला ‘प्लॅन बी’चं आणखी एक आऊटलेट चेन्नईमध्ये सुरु झालं. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात हा पसारा अजून वाढला. ‘वन नाईट वुईथ बँकॉक’ या अशाच प्रकारच्या थायलंडच्या फूड-रेस्टॉरंट चेनसोबत बेंगलुरुमध्ये अजून एक आऊटलेट सुरु झालं. (उत्तम दर्जाचे थाय पद्धतीचे कॉकटेल्स आणि मूळ थाय फिंगर फूडसाठी ‘वन नाईट वुईथ बँकॉक’ प्रसिद्ध आहे.) बँकॉकमधल्या अशा प्रकारच्या इतर प्रसिद्ध आऊटलेट्सपासून प्रेरणा घेऊन याची सुरुवात केली गेली.

image


थॅश्विन सांगतो, “आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचू याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. आमच्या कल्पनेचा इतका विस्तार होईल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. अगदी सुरुवातीला फक्त एक अशी जागा सुरु करण्याचा आमचा विचार होता, जिथे चांगल्या प्रतीचं जेवण आणि बिअर मिळेल. त्यानंतर हळूहळू आम्ही सर्व सुखसोयी आणि सेवा पुरवणा-या बार आणि रेस्टॉरंटच्या कल्पनेवर काम करायला सुरुवात केली. अगदी तेव्हापासूनच कोणतीही नवी सेवा किंवा नवं आऊटलेट सुरु करताना आणि ते पूर्णपणे स्थिरस्थावर करताना आम्हाला प्रचंड उत्साह वाटू लागला.”

थॅश्विन सांगतो की पहिल्या सहा महिन्यांचा काळ मोठा कठीण गेला. मुळात ही संकल्पना रूजवणं अवघड होतं. त्यात सुरुवातीला त्यांच्याकडे ८० लाखांचं भांडवल होतं ही त्यांची जमेची बाजू. कारण इतकं भांडवल अशा प्रकारच्या सुरुवातीसाठी पुरेसे मानले जाते. तो म्हणतो की, “गॅस्ट्रोपब किंवा डाईव्ह बार ही संकल्पनाच मुळी बेंगलुरुसाठी नवीन होती.”

आवाका वाढतोय..

‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’ची सुरुवात बेंगलुरुमधल्या एका आऊटलेटपासून झाली. मात्र तेव्हापासून आजपर्यंत या ब्रॅण्डचे तब्बल५ आऊटलेट आता सुरु झालेत. आणि त्यांच्या व्यवसायामध्ये तब्बल ४०० टक्क्यांची वाढ झालीये. ‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’मध्ये आजघडीला २०० कर्मचारी काम करतायत. यामध्ये कायम आणि तात्पुरते अशा सर्व कर्मचा-यांचा समावेश आहे. ‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’चे एकूण ५ आऊटलेट्स असून त्यातले ४ बेंगलुरुमध्ये आणि एक चेन्नईमध्ये आहे. याशिवाय त्यांचं एक मध्यावर्ती किचनही आहे.

image


संदीप सांगतो की ते कोणत्याही इतर फ्रँचायजी किंवा कंपनीच्या मॉडेलचा वापर करत नाहीत. त्यांचे सर्व आऊटलेट्स हे सर्वस्वी त्यांच्या मालकीचे असून त्यांच्याकडूनच चालवले जातात. ‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’ त्यांच्या स्वत:च्याच अर्थपुरवठ्याच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलंय. गेल्या आर्थिक वर्षात ‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’ने तब्बल १० कोटींचा नफा कमावला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात हा आकडा २० कोटींवर नेण्याचा कंपनीचा मानस आहे. पुढचा विस्तार करण्यासाठी ‘होली काऊ हॉस्पिटॅलिटी’ने हैद्राबाद, मुंबई आणि भारतातली इतर पहिल्या दर्जाची शहरं हे लक्ष्य ठेवलंय. या शहरांमध्ये येत्या डिसेंबर २०१६ पर्यंत ५ नवी आऊटलेट्स सुरु करण्याचं कंपनीचं ध्येय आहे.

लेखिका : अपरजिता चौधरी

अनुवाद : प्रवीण एम.