एक गाव पडले अनेक शहरांना भारी - हिवरेबाजारची यशोगाथा!

एक गाव पडले अनेक शहरांना भारी - हिवरेबाजारची यशोगाथा!

Sunday November 01, 2015,

4 min Read

आपल्या देशातील अनेकांनी समाज आणि देशाच्या गौरवात भर घालणारे काम केले आहे. ज्यामुळे देशाचा फायदा तर झालाच पण हे लोक इतरांसाठी आदर्शवत ठरले. त्यांना पाहून लोकांना प्रेरणा मिळते की, आपणही जीवनात काही ना काही असे काम करावे ज्यातून समाज आणि देश दोघांचेही भले व्हावे.

आपण आज अशा कित्येक सामाजिक उद्यमींबाबत जाणतो, ज्यांनी फारच छान काम केले आहे. त्यामुळे गरीब लोकांच्या जीवनात परिवर्तन आणले आहे; त्यांचे जगणे सुकर झाले आहे. यापैकी काहींनी ग्रामीण भागातील गरीबांना रोजगार उपलब्ध करून दिला तर काहीनी नवे तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे यांच्या मदतीने ग्रामिणांच्या शेतीला नवे पर्याय उपलब्ध करून दिले. आपल्या समोर असे अनेक दाखले आहेत. परंतू आज आपण ज्यांच्याबाबत जाणून घेत आहोत त्यांनी आपल्या मेहनत आणि बांधिलकी या गुणांनी आपल्या गावाला आदर्श गाव बनविले आहे. एक असे परिपूर्ण गांव जे पाहून महाराष्ट्र सरकारनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली, आणि त्यांच्या या कार्याची सा-या राज्यात अंमलबजावणी करण्याची तयारी केली आहे.

गावक-यांसोबत पोपटराव पवार

गावक-यांसोबत पोपटराव पवार


देशातील लोकसंख्येचा मोठा भाग गावांतून राहातो. असे असले तरी शहरांच्या दिशेने ग्रामीण तरुणांचे पलायन थांबलेले नाही. अजूनही ग्रामीण भारतात राहणा-यांची संख्या मोठीच आहे. कोणत्याही देशाच्या विकासात आवश्यक आहे ते गावातून शहरांकडे जाणारे लोंढे नियंत्रित करणे आणि गावातच रोजगाराच्या आणि आवश्यक सुविधांच्या संधी निर्माण करणे जेणेकरून चरितार्थासाठी गावातील लोकांना शहरात जावे लागू नये.

महाराष्ट्रात एक गांव होते, जे दुष्काळी म्हणून ओळखले जात होते. जवळपास दरवर्षीच येथे दुष्काळ पडत होता आणि गरीब लोकांचे जगणे अवघड झाले होते कारण त्यांच्याजवळ दोन वेळेच्या अन्नाची देखील भ्रांत असायची. खूपच कठीण स्थितीत या लोकांचे जगणे सुरू होते. पण गावाचे सरपंच पोपटराव पवार यांना लोकांचे हे दु:ख पाहवले गेले नाही. त्यांनी सरकारला अनेकदा यासाठी अर्ज-विनंत्या केल्या परंतू त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग त्यांनी विचार केला की आपण स्वत:च गावातील नागरिकांच्या मदतीने गावाची दशा आणि दिशा बदलली पाहिजे. त्यांनी मग कार्याची सुरूवात केली. अविश्रांतपणाने ते काम करत राहिले. त्यांना गावक-यांची देखील चांगली साथ मिळाली. आणि परिणाम असा झाला की, दुष्काळी असलेल्या या गावाचा आदर्श सा-या राज्यासमोर नव्हे देशासमोर उभा राहिला.

मागील वीस वर्षात हिवरेबाजार एक गरीब गावाचा समृध्द गाव बनला आहे. येथे सारी कडे हिरवेगार दिसते आहे. एक असे गांव जे दुष्काळासाठी ओळखले जात होते, तेथेच हिरवळ पाहिली की स्पष्टपणे कळून चुकते की, या गावाचा विकास किती नियोजनपूर्वक करण्यात आला असेल?

हिवरेबाजारला आदर्श गांव बनविताना पोपटरावांनी अनेक सूचना केल्या-

१) गावक-यांनाच सशक्त केले जावे- साधारणत: सरकार दिल्लीच्या बंद खोल्यातून ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना तयार करते. आणि तेथेच बसून अंमलबजावणी देखील केली जाते. परंतू गरज आहे ती गावाचे निर्णय गावातील लोकांशी चर्चा करून घेतले जावेत याची. बंद खोल्यातून नाही. गावांच्या गरजा काय आहेत? याबाबत सूचना घ्याव्यात आणि त्यानुसार विकासाच्या योजनांबाबत निर्णय घेतला जावा. बहुतांश बंद खोल्यातून घेण्यात आलेल्या निर्णयात वास्तविक स्थितीचे आकलन नसते त्यामुळेच ग्रामीण भागाला त्यातून काहीच लाभ मिळत नाहीत. जर तेच निर्णय गावातील लोकांच्या सहभागातून घेण्यात आले तर गावक-यांना त्यांच्या भागीदारीची देखील जाणीव राहते आणि स्थानिकपातळीवरील अडचणी ते समोर मांडू शकतात.

२) गावात पाणी हेच जीवनवाहिनी असते. कारण जवळपास सा-याच गावांतून शेती केली जाते. त्यामुळेच गावांतून पाण्याची चांगली व्यवस्था असणे आवश्यक आहे. भारतात हिवरेबाजार सारखी अनेक गांव आहेत, जेथे पाणीटंचाई आहे किंवा दुष्काळ पडतो. हिवरे बाजारच्या गावक-यांना त्यामुळेच ऊस आणि केळीची शेती बंद करावी लागली. कारण या पिकांना खूपच पाण्याची गरज असते. त्यामुळे गावात पडणा-या पावसाचे पाणी एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या परिणामस्वरुप आज हिवरेबाजारात आता इतके पाणी राहते की, आपल्या गरजा भागवून शिल्लक राहिलेल्या पाण्याची विक्री बाजूच्या गावांना देखील करणे शक्य झाले आहे.

३) शिक्षण – शिक्षणावरील खर्च हा एक प्रकारची गुंतवणूकच असते. पोपटरावांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन गावातील लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रेरित केले. वीस वर्षापूर्वी ज्या हिवरे बाजार गावात केवळ तीस टक्केच लोक शिक्षित होते तेथेच आता पंच्याण्णव टक्क्यापर्यंत साक्षरता पोहोचली आहे. हे समजून घेतले पाहिजे की, जितके लोक शिक्षित होतील तितके त्यांच्यात नव्या तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल.

४) गावातच जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी – गरीबी हटवायची असेल तर रोजगाराच्या संधी वाढायला हव्यात. जितके अधिक लोक रोजगार करतील तितक्या प्रमाणात गांवातून बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल त्यातून लोकांचे राहणीमानही सुधारण्यास मदत होते. आज हिवरे बाजार गावातील केवळ तीन कुटूंबाची गणना दारिद्रयरेषेखाली केली जाते. कोणत्याही गावासाठी ही खूपच मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. पोपटरावांनी गावाच्या लोकांना वेगवेगळ्या कार्यात प्रोत्साहन दिले त्याचा परिणाम आज सा-यांच्या समोर आला आहे.

५) स्वच्छता – पोपटरावांनी मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेवर इतके लक्ष दिले की, रोगांच्या साथींना कारणीभूत जीवजंतूची वाढच होऊ दिली जात नाही. हे गांव आता इतके स्वच्छ झाले आहे की ते पाहण्यासाठी नेते आणि पर्यटक नेहमी येत असतात. त्याचप्रमाणे लग्नाआधी येथील नागरिक आता वर आणि वधु यांची एचआयव्ही चाचणी देखील करून घेऊ लागले आहेत.