एकेकाळचा रेती, विटा, सिमेंट वाहक मजूर आज आहे वीस कंपन्यांचा मालक

एकेकाळचा रेती, विटा, सिमेंट वाहक मजूर आज आहे वीस कंपन्यांचा मालक

Tuesday May 10, 2016,

12 min Read


मधुसुदन राव यांच्या मेहनतीने लिहिली अनोखी कहाणी. . . . वडील वेठबिगार मजूर होते आणि आई तंबाखूच्या दुकानात मजूरीवर काम करत होती. . . .भुकेने पोटात होणारी आग आजही ते आठवतात. . .माणूस, साधने आणि पैसा यांच्या योग्य वापरातून झाले सफल उद्यमी.... . . आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून हजारोंना दिला आहे रोजगार. . . गावातून गरीबी हटवण्याचा संकल्प...... जेणेकरुन इतर कुणाला या झळा लागू नयेत.

लहानपणी एक बालक खूप बैचेन असायचे. त्याचे माता-पिता रोज अठरा तास काम करायचे. दिवस-रात्र मेहनत करुनही अनेकदा ते मुलांना पोटभर खायला घालू शकत नसत. आई-वडीलांनी एक दिवस कामावर न जाण्याचा अर्थ त्या दिवशी सर्वांचा उपवास घडणार असाच होता. आई-वडील आणि आठ मुले ज्यात हे बालकही होते. आठ जणांत याचा क्रमांक पाचवा. आठही भावंडे नेहमी फाटके-जुने डागाळलेले कपडे वापरत. अनवाणीच भटकत. ते स्वप्नही पाहात, पण ते असायचे रोज पोटभर अन्न मिळण्याचे. चांगले कपडे मिळावे, पायात सारख्या टोचणा-या काट्यांपासून रक्षण करणा-या चपला मिळाव्यात हे. इतरांसाठी या सा-या गोष्टी साधारण असतीलही मात्र या आठ जणांना मात्र त्या अशक्य वाटणाऱ्या जणू त्यांच्या नशिबातच नाहीत अश्या गोष्टी होत्या. परिस्थिती अशी होती की १०जण गावात छोट्या झोपडीत राहात होते. लहानग्याला हे समजत नसे की गावात सारे लोक चांगल्या आणि पक्कया घरात राहतात पण त्यांचा परिवार झोपडीत का राहात होता. तो या गोष्टीचाही विचार करी की त्याचे मात-पिता करतात तरी काय ? ते कुठे जातात? हा प्रश्न पडण्याचे कारण दर रोज त्याचे पालक तो सकाळी जागा होण्याच्या आधीच कुठेतरी निघून जात. ते पुन्हा येत तोवर खूप उशीर होई आणि लहानगा झोपी जात असे. जवळपास रोजचेच होते हे. त्यामुळे कधीतरीच त्याला पालकांचे दर्शन होई. जस तो मोठा होत होता त्याला सारे काही समजत गेले. त्याला माहिती झाले की त्याचा परिवार गरीब आणि अतिमागास समाजातला होता. त्याला हे सुध्दा समजले की त्याचे वडील जमिनदाराकडे वेठबिगार होते. त्याची आई तंबाखूच्या कारखान्यात मजूरीवर काम करत होती. घराच्या निर्वाहासाठी मोठी बहीणही आईच्या कामाला हातभार लावत होती.

image


त्याला शाळेत घातले तेंव्हा समजले की त्याचे पालक मात्र अडाणीच आहेत. एक भाऊ सोडुन इतरही भावंडे अशिक्षित होती. खूप प्रयत्नाने पालकांनी दोन मुलांना शाळेत घातले होते. घरची गरीबी इतकी होती की, कसेतरी दिवसातून एकदाच अन्न शिजल्याने मुलांना आनंद होत असे.

या लहानग्याला धक्कादातक वाटणारी गोष्ट तर ही होती की, गावातील लोक घरच्यांसोबत फारच वाईट वागणूक दते असत. गुडघ्यावर जमिनीवर बसवायचे, दोन्ही हात पसरले तरच पाणी द्यायचे. गावच्या ठरलेल्या नियमांनुसार त्याला पण गुडग्याच्या खालीपर्यंत धोतर परिधान करता येत नसे. स्त्रियांना जॅकेट वापरण्यास मनाई होती. आपल्या मनाने त्यांना वावरता येत नसे. त्यांची कुणाची सावली पडली तरी गावचे काही लोक अपशकून मानायचे आणि त्याची त्यांना शिक्षा दिली जात असे. अशा स्थितीत जेंव्हा हा लहानगा शाळेत शिकू लागला. तर त्याला शिकताना जाणवले की, त्याच्या कुटूंबाला वेठबिगारी आणि गरीबीतून बाहेर जाण्यासाठी इतके शिकायला हवे की चांगली नोकरी मिळेल अणि गावापासून दूर मोठ्या शहरात रहायला मिळेल. लहानग्याने शाळेत मेहनत केली. चांगला अभ्यास केला. शिक्षकांनी जे सांगितले ते केले. आधी दहावी नंतर बारावी उत्तिर्ण झाला. त्यानंतर तंत्र महाविद्यालयात प्रवेश मिळवला. पदविका अभ्यास पूर्ण केला.

image


तोच मुलगा आता तरुण झाला होता. शिक्षित होता. त्यामुळे घरची जबाबदारी त्याच्यावर होती. पण पदविका करूनही जेंव्हा नोकरी मिळाली नाही तेंव्हा त्यालाही आई-वडीलांसारखी मजुरी करावी लागली. शहरात रक्षकाचे काम केले. नंतर एक निर्णय घेतला. निर्णय होता उद्यमी बनण्याचा. त्यासाठी खूप मेहनत केली. धक्के खाले आणि एक दिवस गावात दलित परिवारात जन्मलेल्या या तरुणाने उद्योजक बनून दाखवले. आज या माणसाच्या २० कंपन्या आहेत. त्यात हजारोंना रोजगार मिळतो. त्यांचा समावेश देशातील आदर्श आणि यशस्वी उद्योजकांत केला जातो. ज्यांच्याबद्दल आपण इतका वेळ माहिती घेतली ते आहेत मन्नम मधुसूदन राव!

एम एम आर ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि संचालक त्यांनी टेलीकॉम, आयटी इलेक्ट्रिकल तांत्रिक, अन्नप्रक्रिया सारख्या अनेक क्षेत्रात काम सुरू केले आणि त्यांच्या कंपन्या चांगल्या नफा कमावत आहेत. ७ मे २०१६ रोजी अत्यंत ह्रदयस्पर्शी चर्चे दरम्यान मधुसूदन राव यांनी आपल्या जीवनातील सा-या महत्वाच्या घटनांच्या बाबत अवगत केले. अपमान आणि संघर्षाच्या नंतर यश आणि सन्मान कसे मिळाले त्याचे कि्स्से सांगितले.

त्यांचा जन्म आंध्रप्रदेशात प्रकाशम जिल्ह्यात झाला. कंदकुरु तालुक्यात पलकुरू हे त्यांचे गाव. वडिलांचे नाव पेरय्या आईचे रामुलम्मा होते. अनेक अडचणी अपमान आणि गरीबीच्या थपडा यांनी परिपूर्ण अश्या आपल्या बालपणातील आठवणी सांगताना मधुसूदन राव सांगतात, “ जेंव्हा मी लहान होतो, आई वडीलांना पाहू शकत नसे, कारण ते कामावर निघून जात आणि रात्री उशीरा येत. ते येत तेंव्हा मी झोपून जात असे. त्या दिवसांनी मला त्यांचे प्रेमही दिले नाही.” ते पुढे म्हणाले की, “ माझे वडील वेठबिगार होते. वर्षानुवर्षे ते एका जमिनदाराकडे काम करत. मला समजले की माझे आजोबा आणि पणजोबाही हेच काम करत. तेथे १८ तास काम चाले. त्या काळात जमीनदारांच्या जनावरांची देखभाल शेतावर जाउन करावी लागे. स्वच्छता करावी लागे, ही कामे ते करत. कामावर गेले तरच पैसे मिळत. घरात आठ मुले त्यामुळे आईलाही काम करावे लागे. स्थिती इतकी वाईट की लहान वयातच मोठ्या बहिणीला तंबाखू कारखान्यात आईसोबत काम करावे लागले. त्या दोघी १२ किमी पायी चालत जात आणि दिवसभर काम करत पुन्हा पायी परत येत. त्या मेहनतीनंतरही अनेकदा आम्हाला उपास घडे. “ भुखेने पोटातली आग आणि अशक्तपणा यामुळे अंग दुखायचे ते राव यांना आजही आठवते.

image


मधुसुदन यांच्या जीवनात बदल त्यावेळी झाले ज्यावेळी त्यांनी शिकायला सुरुवात केली. विवश आई वडिलांनी ठरवले होते की केवळ दोन मुलांना शिकवायचे. त्यानुसार त्यांच्या मोठ्या भाऊ माधव यांना शाळेत पाठवण्यात आले. त्या नंतर मधुसूदन यांची निवड झाली. दोघे भाऊ सरकारी शाळेत जाऊ लागले. दोघांनीही मन लावून अभ्यास केला. चांगले गुण मिळवले त्यामुळे हळू हळू स्थिती बदलत गेली.

मधुसूदन राव म्हणाले की, त्याकाळात गावाच्या जवळच सरकारी समाजकल्याण वसतीगृहाचे अधिक्षक लक्ष्मी नरसय्या यांच्या मदतीने जीवनात नवी दिशा मिळाली. मधुसूदन यांनी एका गोष्टीसाठी वडिलांचे मन वळविले होते की, त्यांना वसतिगृहात प्रवेश द्यावा. कारण तेथे मोफत खाणे-पिणे याची सोय होती त्यामुळे वडिलांनी मान्य केले. मोठे बंधू माधव यांच्या प्रमाणेच मधुसूदनही वसतिगृहातच राहिले.

त्या दिवसांच्या आठवणी सांगताना ते म्हणाले की, “ तेथे वसतिगृहात सारे काही छान होते. दिवसातून तीनदा पोटभर जेवण, जरी ते दर्जेदार नसले तरी खायला मिळे. त्याशिवाय काही अडचणी नव्हत्या. वसतिगृहाचे अधिक्षक लक्ष्मी नरसय्या आणि एक शिक्षक जेके यांनी मला खूप मदत केली. ते नेहमी प्रोत्साहन द्यायचे. चांगले गुण मिळवावे म्हणून प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे मी नेहमी पहिल्या पाचात येत असे कधी व्दितीय श्रेणीत कधी तृतीय श्रेणीत”

याच वसतिगृहात त्यांनी बारावी पर्यंतचा अभ्यास केला. मोठे बंधु माधव यांनी बिटेकचा अभ्यास सुरू केला. मधुसूदन यांनाही तेच करायचे होते. पण भाऊ आणि इतर काही जणांनी पॉलिटेक्निक करण्याचा सल्ला दिला. त्यामागेही खास कारण होतं. त्यावेळी लोकांची धारणा होती की इतर शिक्षणाने मिळो न मिळो पॉलिटेक्निक केले की हमखास नोकरी मिळणार. मधुसूदन यांनाही हा सल्ला मिळाला त्यावर विश्वास ठेवावा लागला. त्यांनी मग तिरुपती येथील श्री वेंकटेश्र्वरा विद्यापीठात प्रवेश घेतला. दोन वर्ष तिरुपती आणि एक वर्ष ओंगोल येथे शिक्षण घेतले. आणि पदविका मिळवली. जशी पदविका मिळाली घरच्यांना अपेक्षा होत्या की त्यांना चांगली नोकरी मिळणारच आणि घरचे दारिद्रय कायमचे नाहीसे होणार. मधुसूदन यांच्यावर लवकर नोकरी मिळवण्यासाठी आणि कुटूंबाला मदत करण्यासाठी दबाव वाढत गेला. नोकरी साठी अनेक अर्ज केले. भटकंती केली आणि नोकरी शोधली. अनेक प्रयत्नांनंतर ती मिळालीच नाही. त्यामुळे घरच्यांच्या अपेक्षा संपत चाल ल्या होत्या. मला हे विचारले की पॉलोटेक्निक केल्यावरही नोकरी का नाही मिळाली ? मधुसूदन म्हणाले की, “ मी जेथे जाई लोक संदर्भ विचारत होते. जो माझ्याजवळ नव्हता. ग्रामीण भागातील असल्याने मला निराशा हाती लागे. अनेकदा तर मला यासाठी नाकारण्यात आले की घरात निरक्षर लोक आहेत.”

image


जीवनातील कठोर दिवसांच्या आठवणी सांगताना मधुसूदन म्हणतात की, “ मी शांत बसू शकत नव्हतो, मला शिकवण्यासाठी सा-यांना त्रास झाला होता. त्याग करावे लागले होते. त्यांना मला नोकरी मिळाल्यावर त्रास संपेल ही आशा होती. माझ्यावरच त्यांचा भार होता. मी त्यांना निराश करू शकत नव्हतो. अशावेळी मी काहीही करुन पैसे कमवायचे असा निर्णय घेतला”

त्यांनी निर्णय घेतला की भावंडाप्रमाणे ते ही मजूरी करतील. त्यांचा एक भाऊ हैद्राबाद मध्ये गवंडी काम करत होता. त्याच्यासोबत त्यांनी पण मजूरी केली. इमारत बांधकामाच्या विटा माती दगड वाह्मू नेऊ लागले. ते सारे काम केले जे मजूर करत होते. मजुरी जास्त मिळत नसे म्हणून त्यांनी दुसरी कामे शोधण्यास सुरुवात केली. मधुसूदन म्हणतात, “दिवसभर काम करून मला पन्नास रुपये मिळत. जेंव्हा मला समजले की रात्री काम केल्याने एकशेवीस रुपये मिळतात तेंव्हा मी रात्री कामे सुरू केली. मी वॉचमन म्हणूनही काम केले.” निश्चय पक्का होता आणि प्रामाणिकपणे सारी शक्ती लावून काम करत होते त्यामुळे जीवनात त्यांना आणखी एक संधी मिळाली.

जीवनातील अस्पर्श अश्या त्या गोष्टी आणि कुणाला माहिती नसलेल्या घटनांबाबत बोलताना मधुसूदन म्हणाले की, “ एक दिवस मी टेलीफोनचा खांब गाडण्यासाठी खणत होतो. एक अभियंता आला आणि म्हणाला की तुम्ही शिकला आहात. मी म्हणालो की मी पॉलिटेक्निकही केले आहे. त्यावर तो म्हणाला की तुझ्या कामाच्या पध्दतीवरूनच हे समजत होते की तू शिकलेला आहेस, कुणी दुसरा असता तर असे माप घेऊन खोदकाम केले नसते. मी फक्त तुलाच पाहिले आहे, ज्याने माप घेऊन शास्त्रीय पध्दतीने खोदकाम केले”

कौतुक करुन त्या अभियंत्याने विचारले की, “नोकरी करतोस का ?” हा प्रश्न ऐकूनच मधुसूदन यांना आनंद झाला. आनंदने ते त्याची गयावया करू लागले. म्हणाले की, “ काही करा मला खूप गरज आहे हो. बस त्याच प्रतिक्षेत मी आहे.” अभियंता त्यांना कार्यालयात घेऊन गेला. मुलाखत सुरू होती. एकीकडे मुलाखत सुरू होती, दुसरीकडे ठेकेदार आणि उपठेकेदार यांच्यात वाद सुरू होता. उपठेकेदार जास्त पैसे सांगत होता. ते पाहून मधुसूदन यांनी त्या ठेकेदाराला म्हटले की हा ठेका मला का नाही देत. त्यांनी त्याला भरोसा दिला की ते काम करवून घेण्यात तरबेज आहेत. त्यांचे सारे कुटुंब तेच काम करत होते. आधीतर त्या मोठ्या ठेकेदाराने त्यांना मुलाखतीवर लक्ष द्यायला सांगितले. पण जेंव्हा उपठेकेदाराशी व्यवहार झाला नाही त्यावेळी त्यांने मधुसूदन यांना तो ठेका दिला.

ठेका तर मिळाला पण मजूरांना आगाऊ रकम देऊन आणायचे आणि काम सुरू करायचे यासाठी पाच हजार रुपयेही त्यांच्याजवळ नव्हते. त्यांनी भावंडाना मदत मागितली. त्या मदतीला अमुल्य मदत असल्याचे सांगत ते म्हणतात की, “ माझ्या एका बहिणीने मला नऊशे रुपये दिले. तेच घेऊन मी मजूरांकडे गेलो आणि कामासाठी तयार केले. काम नऊशे रुपयांनी सुरू केले. पहिल्याच दिवशी वीस हजार रुपये मिळाले. माझे भाग्यच पालटले”

त्यानंतर मधुसूदन यांनी मागे वळून पाहिलेच नाही. कामाने खुश होऊन मोठ्या ठेकेदाराने एक लाख रुपये आगाऊ देखील दिले. मग त्यांनी एका मागे एक ठेके घेण्यास सुरूवात केली. जेंव्हा हाती लाखभर रुपये आले तेंव्हा गावाच्या दिशेने कूच केले. गावी परतल्यावरच्या त्या घटनेची आठवण सांगताना ते म्हणतात की, “ नोकरी नव्हती, पैसे नव्हते, काय तोंडाने गावी जायचे? लाजेने दोन वर्षापासून गावी जाणे बंद केले होते. जेंव्हा लाखभर रुपये मिळाले तेंव्हा गावी जायचे ठरवले. त्या आधी मी कधी लाख रुपये पाहिले नव्हते. मी खूश होतो. कुणाला विश्वास बसला नाही, सा-यांनी कौतुकाने विचारले, इतके पैसे मिळाले कसे? काय केले ? कसे आणले? मधुसूदन म्हणाले की या पैश्यातूनच त्यांच्या एका बहिणीचे लग्न करता आले. त्यानंतर ते पुन्हा हैद्राबादला आले आणि पुन्हा मनापासून काम सुरू केली. ठेके मिळत गेले, कमाई वाढत गेली. आता सारे काही बदलत होते. गरीबी पळाली होती. प्रगती साधली जात होती.

पण याचवेळी अशी एक घटना झाली ज्याने मधुसूदन यांना खाली हात व्हावे लागले. या घटनेने त्यांना हलवून टाकले सारी कमाई झटक्यात निघून गेली. त्याबद्दल सांगताना मधुसूदन म्हणाले की, “मी ज्या लोकांवर विश्वास ठेवला होता त्यांनी धोका दिला. विश्वासघात केला. आम्ही काही जणांनी मिळून एक कंपनी सुरू केली होती. कंपनीने कामही चांगले कले होते. पण मित्रांनी दगा दिला होता” मधुसूदन यांनी याबाबत जास्त सांगितले नाही पण इतके मात्र म्हणाले की, हा सुध्दा जीवनातील मोठा धडा होता. ते म्हणाले, “ बरे झाले ही घटना झाली, मला अधिक समजूतदार व्हायला मिळाले ज्यामुळे मी वेगाने पुढे जाऊ शकलो.”

पण हा धक्का त्यांना इतका लागला होता की त्यांनी ठेकेदारी न करता नोकरी करणेच चांगले असे ठरवले होते. त्यांनी एका अभियांत्रिकी संस्थेत नोकरी सुरू केली. त्याच दरम्यान त्यांनी लग्न केले. महत्वाची गोष्ट ही की मधुसूदन यांच्या पत्नी पद्मलता आणि बहिणींना ही गोष्ट माहिती होती की त्यांच्याशी ठेकेदारीत विश्वासघात झाला होता. म्हणूनच पत्नीने त्यांना व्यवसाय न करता नोकरीच करतील अशी अट घातली होती. त्यांनी ती मान्य केली होती. पण त्यांचे मन धंदा-व्यवसायात ओढले जात होते. त्यांना माहिती होते की यशस्वी उद्यमी होण्यासाठी आवश्यक सारे काही त्यांच्यात होते जे नोकरीत वाया जात होते.

त्यांनी पत्नीला न सांगताच कंपनी सुरू केली. कंपनीला ठेके मिळू लागले कामे सुरू झाली. त्याच दरम्यान पत्नीने घरी आलेले एक पत्र वाचले. त्यातून त्यांना समजले की मधुसूदन व्यवसायात आहेत. नाराज आणि रागाने त्यांनी त्यांना सारे प्रश्न केले. आपला राग व्यक्त केला. व्यवसाय बंद करून नोकरी करण्याचा सल्ला दिला. पण मधुसूदन यांनी त्यांची समजूत घातली की, माझा पगार २१हजार आहे. तुमचा १५ हजार आहे, घरात महिना ३०हजार रुपयेपेक्षा जास्त पैसे येत नाहीत, तू मला व्यवसाय करायला दिला तर दर महिना तीन लाख देईन.म्ह णजे वर्षभराच्या दोघांच्या पगाराइतके पैसे एका महिन्यात देण्याचे सांगितल्यावर तिने मान्य केले” आपल्या पत्नीचे कौतुक करताना ते म्हणाले की, तीने प्रत्येकवेळी मला मदत केली. त्याचा मला फायदाच झाला आणि मी मजेत राहिलो तीच माझी शक्ती होती”

त्यानंतर मधुसूदन यांनी आपली यशाची कहाणी ज्याप्रकारे रचली ती आदर्शच म्हटली पाहिजे. त्यांनी एका मागे एक करत २० कंपन्या सुरू केल्या. आय टी पासून, अन्न प्रक्रियेपर्यंत त्यांच्या कामाचा विस्तार झाला. मधुसूदन राव या यशाच्या मुळे देशातच नाहीतर जगात प्रसिध्द पावले आहेत. ते दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष देखील आहेत.

ते एकटेच वीस कंपन्या कश्या चालवतात असे विचारले असता ते म्हणाले की, “ मी एकटा थोडाच आहे सारा परिवार माझ्यासोबत आहे. माझे भाऊ मदत करतात, प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी आहे. मी प्रत्येक ठिकाणी तज्ज्ञांना मुख्य बनविले आहे. सारे आपले काम योग्य पद्धतीने करतात. मी रोज सगळ्यांशी बोलतो, मी संधीच्या शोधात असतो. जेथे फायदा असेल तेथे तो मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्यासाठी वेळेचे नियोजन हा मोठा विषय नाही” मधुसूदन पुढे म्हणाले की, “ माझे आई-वडीलच माझी प्रेरणा आहेत. मी त्यांना रोज १८ तास काम करताना पाहिले आहे. मी सुध्दा तेच करतो आहे. माझे कर्मचारीसुध्दा मनापासून कामे करतात. कोणी हे नाही म्हणत की मी इतकेच तास काम का करू?सारे लक्ष्य पूर्ण होईपर्यंत काम करतात.”

आपल्या आई-वडिलांना आदर्श आणि प्रेरणा स्त्रोत असल्याचे सांगत मधुसूदन म्हणतात की, “मी असेन तोवर तेच माझे आदर्श आहेत. तेच प्रेरणा आहेत. जेंव्हा मी कोणत्याही संकटात सापडतो तेंव्हा त्यांची आठवण करतो. मला समजते की माझे त्रास त्यांच्यापेक्षा मोठे नाही. त्यांनी जे सहन केले त्याची तुलनाच होऊ शकत नाही.”

यशाचा मंत्र कोणता असे विचारले तर ते म्हणतात की, “ माणसे साधने आणि पैसा हे सारे आपल्या जवळ आहे आणि त्याचा योग्य वापर आपण करतो आहोत तर यश मिळणारच या तिन्हीमुळेच मी यशस्वी झालो आहे.”

जेंव्हा त्यांना विचारले की, या यशानंतर त्यांचे सर्वात मोठे लक्ष्य काय आहे? मधुसूदन म्हणाले की, “ येत्या पाच-सहा वर्षात ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण द्यायचे आहे, ज्यातून त्यांना रोजगार मिळेल, उद्योग सुरू करता येतील. ग्रामीण भागातील तरुणांच्या समस्या मला चांगल्या ज्ञात आहेत. त्यांच्याकडे संपर्काची साधने कमी आहेत. कौशल्य विकासाची त्यांना गरज आहे. मी निश्चय केला आहे की येत्या पाच वर्षात मी ग्रामीण भागातील पाच हजार तरुणांसाठी चांगल्या नोक-या किंवा उदयोग मिळवून देईनच”

आत्मविश्वासने मधुसूदन राव म्हणाले की, “ मला नाही वाटत की नंतरच्या पिढीतील मुलांनाही तेच कष्ट सहन करावे लागावे जे आम्ही सहन केले, मला वाटते गावातून गरीबी कायमची निघून जावी. मला माहिती आहे की एक माणूसही नोकरी करत असेल तर कुटूंबाला किती आधार मिळतो. माझ्याबाबत तेच झाले आहे. मी नोकरी केली तर परिवाराला संपन्नता मिळाली. माझ्या कुटुंबात सध्या ६५लोक आहेत. सारे काम करतात. मला वाटते सा-या तरुणांना रोजगार मिळावा. कुणी गरीब राहू नये’

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

उद्योजकतेच्या जगतात सांगलीचा ठसा उमटवणाऱ्या पयोद उद्योगसमूहाच्या देवानंद लोंढे यांची यशोगाथा

सर्व अडचणींवर मात करत अंध सिद्धूची कमाल, ९९ कोटीपर्यंत पाढे तोंडपाठ, आता तयारी आयएएसची...

कशाप्रकारे एक महिला झाली ‘बिजनेस वूमन’? मीरा गुजर यांच्या यशाची दुर्मिळ कथा !

    Share on
    close