शिक्षणातून वंचित मुलांचं आयुष्य बदलणाऱ्या कुमारी शिबुलाल

शिक्षणातून वंचित मुलांचं आयुष्य बदलणाऱ्या कुमारी शिबुलाल

Saturday April 23, 2016,

5 min Read

अगदी लहान वयापासून कुमारी शिबुलाल या शिक्षणाचं महत्त्व जाणून होत्या. एका छोट्याशा खेड्यात शेतकरी आईवडिलांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचं आणि त्यांचे भावाचे शिक्षण तिथल्याच एका स्थानिक शाळेत झाले. शिक्षणाबाबत त्यांच्या आई खूपच आग्रही होत्या. अगदी लहान वयातच शिक्षणाची ताकद समजून आल्यामुळेच त्यांनी १९९९ मध्ये सरोजिनी दामोदरन फाऊंडेशन आणि २००४ मध्ये अद्वैत फाऊंडेशनची स्थापना केली. तसेच २००७ मध्ये स्थापन झालेल्या 'संहिता अॅकेडमीच्याही त्या विश्वस्त आहेत.


कुमारी शिबुलाल

कुमारी शिबुलाल


केरळमधल्या राममंगलम या छोट्याशा खेड्यात मध्यमवर्गीय घरात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण घेण्यासाठी त्यांना त्यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतर दूर जावे लागे. माध्यमिक आणि भौतिकशास्त्रातील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोचीनच्या केरळ विद्यापीठातून घेतले. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांचा विवाह एस.डी. शिबुलाल यांच्याशी झाला. शिबुलाल इन्फोसिसच्या सात संस्थापक सदस्यांपैकी एक आणि माजी मुख्य कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

image


त्यांच्या विवाहानंतर त्या मुंबईला स्थलांतरित झाल्या. त्यानंतर इन्फोसिस स्थिरस्थावर होईपर्यंत त्यांचा मुंबई ते अमेरिका असा प्रवास सुरु होता. संस्थापक सदस्यांपैकीच एकाची पत्नी असल्याने हा संघर्षाचा काळ त्यांनी खूप जवळून पाहिला. त्यावेळेस त्यांना अगदी मंगळसूत्रही गहाण ठेवावे लागले. संस्थापकांनी कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचा पगार होण्यासाठी स्वत:चे पैसेही अनेक वेळेस टाकले. पण नंतर या सगळ्या संघर्ष आणि मेहनतीचे चीज झाले.

ऐंशीचे ते दशक ते नव्वदच्या सुरुवातीपर्यंत त्यांचा असाच भारत-अमेरिका प्रवास सुरु होता. याच दरम्यान त्यांच्या मुलीचा भारतात आणि मुलाचा अमेरिकेत जन्म झाला. अगदी सुरुवातीपासूनच गरजूंना मदतीचा हात देण्यात शिबुलाल दांम्पत्य कायमच तत्पर असायचे. आर्थिकदृष्ट्या स्थिरावल्यावर त्यांनी शिक्षणावर भर देण्यासाठी काहीतरी करायचे ठरविले. शिक्षणाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी त्यांनी सरोजिनी दामोदर फाऊंडेशनची स्थापना केली. केरळ आणि कर्नाटकमधील गुणवान विद्यार्थ्यांना १० वीनंतरच्या शिक्षणासाठी ही संस्था शिष्यवृत्तींच्या माध्यमातून मदत करते. विद्याधन या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ५,००० पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या आहेत.


image


कुमारी स्वत: प्रवास करून दरवर्षी शिष्यवृत्तीसाठी मुलांच्या मुलाखती घेतात. सुरुवातीला त्यांनी फक्त दोन मुलांना शिष्यवृत्ती देण्यापासून सुरुवात केली होती. पण त्यानंतर दरवर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक मदतीसाठी विचारणा करू लागले, तेव्हा त्यांना सर्वोत्तम आणि खरोखर गरजू मुलांसाठी निवड प्रक्रिया ठरवावीच लागली. अशाप्रकारे दुर्बल स्तरांतल्या मुलांना शिक्षणासाठी मदत करतानाच त्यांनी स्वत:चे एक मॉडेल तयार केले. याअंतर्गत त्यांनी या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्यांना आमूलाग्र बदल घडवायचा आहे,अशा इच्छुकांनाही सहभागी करून घ्यायचे ठरविले. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना स्पॉन्सर मिळू शकत नाहीत, त्यांना फाऊंडेशनच्या वतीने मदत मिळणे शक्य झाले.

केरळमध्ये एस.डी.फाऊंडेशनच्या अंतर्गत २०६२ शिष्यवृत्त्या दिल्या जाताता आणि कर्नाटकमध्ये विद्याधन अंतर्गत १७२ मुलांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या शिष्यवृत्ती मिळालेले बहुतेकजण नंतर इंजिनीअर आणि डॉक्टर्स झालेत. केरळमध्ये १७ डॉक्टर, १५३ इंजिनीअर, ११७ पदवीधारक आहेत. तर या शैक्षणिक वर्षात केरळमध्ये ५२ डॉक्टर, १९१ इंजिनीअर आणि १३८ पदवीधारक आहेत. सध्या विद्याधन अंतर्गत ९०७ विद्यार्थी आहेत. अंकुर या उपक्रमांतर्गत अद्वैत फाऊंडेशन जवळपास १२३ विद्यार्थ्यांना 'द संहिता अॅकेडमी' इथं निवासी शिक्षण देते. कुमारी या संस्थेच्या विश्वस्त आहेत.

शाळा सुरु करावी, असे आपण कधीही ठरविले नव्हते. पण त्यांच्या लक्षात आले की अनेक मुलांना त्यांच्या शाळांमध्ये भेदभावाला सामोरे जावे लागते. यामुळे त्या खूप अस्वस्थ झाल्या. या मुलांना मला माझ्या स्वत:च्या मुलांप्रमाणे वागवायचं होतं. पण तसं होत नव्हतं. त्यामुळेच जिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही अशी स्वत:ची शाळा सुरु करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, कुमारी सांगतात.


image



विद्याधन शिष्यवृत्तीच्या वेळेस त्यांच्या लक्षात आले की १४-१५ व्या वर्षी शाळा सोडण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मुलं १४-१५ वर्षांची झाल्यावर त्यांचे पालक त्यांच्याकडून घरासाठी पैसे कमावण्याची अपेक्षा करायचे. केरळमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलींचं प्रमाण फक्त ४० टक्के आहे. इतर राज्यांमध्ये तर हे प्रमाण आणखी कमी आहे. त्यामुळे मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि मुलांचं शिक्षण सोडण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी संहिता अकादमी सुरु करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पाच शाळांच्या माध्यमांतून दरवर्षी एक हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा निश्चय आहे. गेल्याच महिन्यात 'द कोईमतूर स्कूल' सुरु झाली आहे आणि येत्या काही वर्षांत आणखी चार शाळा सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. कुमारी यांच्यासाठी या शाळांमधलं प्रत्येक मूल महत्त्वाचे आहे. त्यांच्याबाबतच्या घडामोडी आणि त्यांच्या विकासावर कुमारी यांचं बारीक लक्ष आहे. या संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या आणि स्थिरस्थावर झालेले अनेकजण आता या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत, कुमारी सांगतात.

शाळेतील मुलांना वीकएंडला चित्रपट दाखवले जातात किंवा बाहेर फिरायला नेले जाते. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीपासून वंचित आहोत अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होत नाही. मुलांना करिअर निवडीसाठी मार्गदर्शन करणारे, त्यांना आयुष्यात काय मिळवायचं आहे हे जाणून त्याप्रमाणे मार्गदर्शन करणारे अनेक तज्ज्ञ त्यांच्याकडे आहेत. शाळेबाबत म्हणाल तर कुमारी स्वत: शाळेच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतात आणि कोणतीही समस्या आली तरी त्याच्याशी दोन हात करायला त्या नेहमीच तत्पर असतात.

शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे सेंद्रिय शेती कुमारी यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांचे आईवडिल शेतकरी असल्याने कुमारी यांनाही फावल्या वेळात शेती करणे आवडते. त्यांच्या बंगळुरुच्या कार्यालयाखाली त्या एक दुकान चालवतात. या दुकानात पूर्ण सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली उत्पादने मिळतात. त्यांनी सेंद्रिय शेतीसाठी अक्षय श्री पुरस्कारही केरळमध्ये सुरु केला आहे. ६१ वर्षांची ही तरूणी शिक्षणापासून आरोग्य, महिलांचा आणि मातांचा पोषण आहार, निवृत्तीवेतन योजना आणि सेंद्रिय शेती अशा विविध प्रकारच्या कामांमध्ये प्रचंड व्यस्त असते.

येत्या काही दिवसांत त्या आणखीनच व्यग्र होतील...कारण येत्या काही वर्षात देशभरातील विद्यार्थ्यांसाठी विद्याधन सुरु करण्याचे त्यांनी ठरविले आहे. तसेच जास्ती जास्त मुलांना शिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी आणखी शाळा सुरु करण्याचाही त्यांचा मानस आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारे शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात : 'आयटीच'

कॉर्पोरेट कारकीर्द सोडून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवण्यास झटणारा अभियंता 'मधूकर बानुरी'

अंधाने उघडली गरिबांसाठी शिक्षणाचे कवाडे

लेखक- तन्वी दुबे

अनुवादक- सचिन जोशी