बचत गटही झाले ऑनलाईन

बचत गटही झाले ऑनलाईन

Thursday November 05, 2015,

2 min Read

क्राऊडसोर्सिंग, स्टार्टअप हे शब्द सध्या खुप प्रचलित आहेत. अशा व्यवसायांची सध्या चलती ही आहे. कल्पनेच्या जोरावर एखादा व्यवसाय सुरु करायचा आणि ऑनलाईन व्हायचं असा नवीन फंडा सुरु झालाय. जग एका क्लिकवर आल्यानं अश्या व्यवसायांना भरभराट आलीय. महाराष्ट्रात किंबहुना देशभरातले महिला बचत गट अजूनही या व्यासपीठापासून वंचित होते. पण आता ती ही प्रतिक्षा संपलेय. मुंबईतल्या दहा बचत गटांच्या वस्तू नुकत्याच फ्लीपकार्टवर उपलब्ध झाल्यात. ' हॅन्ड टू हार्ट ' नावाखाली या वस्तू फ्लीपकार्टवर मिळतायत. याचं श्रेय जातं मुंबईच्या दिप्ती ताम्हणे यांना.

image


दिप्ती ताम्हणे चार्टर्ड अकाऊंटट आहेत. लहानपणापासून त्यांना समाजसेवेची आवड होती. परदेशात उच्च शिक्षण घेतांनाही त्यांनी समाजसेवेची कास धरली होती. मुंबईत आल्यावर मोठ्या चार्टर्ड अकाऊंट फर्ममध्ये नोकरीही लागली. पण लग्न आणि त्यानंतर मुलं झाल्यावर प्राथमिकता बदलली. मुलांचं संगोपन करत असताना समाजसेवा आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टी करण्यावर भर होताच. मुंबईतल्या महिला बचत गटाशी त्या आधीपासूनच जोडल्या गेल्या होत्या. या बचत गटांसाठी काहीतरी करता येईल का याचा विचार मनात सुरु होता. दिप्ती म्हणतात, ”बचत गटाच्या वस्तू काही प्रदर्शनं आणि स्टॉलपर्यंत मर्यादित राहतात. खरंतर याकडे फक्त महिला सबलीकरण म्हणून पाहिलं न जाता त्याकडे एक व्यवसाय म्हणून पाहणं गरजेचं आहे. तेच आपल्याकडे होत नाहीए. यामुळंच आजच्या ऑनलाईनच्या जगात हे बचतगट मागे राहिलेत”

image


आठ मार्चच्या आसपास त्यांनी या बचत गटांच्या वस्तू मुंबईतल्या फिनिक्स मिलमधल्या मॉलमध्ये प्रदर्शनार्थ मांडल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. याचवेळी या सर्व गोष्टी ऑनलाईन उपलब्ध झाल्यातर त्यांना चांगली मागणी मिळू शकेल असा विश्वास दिप्ती ताम्हणे यांना होता. याकामात त्यांना मदत मिळाली तात्कालिन मुंबई महानगरपालिका उपायुक्त प्राची जांभेकर यांची. बीएमसीच्या सीएसआरसंदर्भातली जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मग या महिलांना मोठं व्यासपीठ मिळवून देण्याची कल्पना वाढीला लागली.

image


जवळपास दोन-दीड महिन्यांभरापूर्वी दिप्ती यांनी फ्लीपकार्डवर या वस्तूंची नोंदणी करुन विकता येईल का याची चाचपणी केली. त्यांनी स्वत: बचत गटांच्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी ‘हॅन्ड टू हार्ट’ असा ब्रँड तयार केला आणि या वस्तूं ऑनलाईन अपलोड करायला सुरुवात केली. काही गोष्टी पटापट विकल्याही गेल्या. सध्या मुंबईतल्या १० महिला बचत गटांच्या वस्तू ‘हॅन्ड टू हार्ट’ अंतर्गत विकल्या जातायत. यात प्रामुख्यानं जॅकेट्स, रांगोळी, स्कर्ट्स, बॅग्स आणि अन्य हॅन्डमेड वस्तू इथं आहेत. अनेक वस्तूंचं पॅकिंग दिप्ती स्वत: आपल्या घरी करतात. फ्लीपकार्डच्या महाजालात त्यांना शोधणं थोडसं कठिण असलं तरी हे बचतगट ऑनलाईन झालं हे काय कमी आहे.

image


दिप्ती म्हणतात ” मुंबईतल्या बचत गटांना ऑनलाईन व्यासपीठ देण्यात यश आलंय. आता महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या बचत गटांना ऑनलाईन करण्याचा आमचा प्रयत्न आहेत. यातून समाजसेवेबरोबरच या बचत गटांची आर्थिक प्रगती साधायला मदत होईल हे मात्र निश्चित.”