कोकणातील जांभूळपोळीला परदेशवारी घडविणाऱ्या छाया भिडे

कोकणातील जांभूळपोळीला परदेशवारी घडविणाऱ्या छाया भिडे

Thursday December 31, 2015,

3 min Read

कोकण म्हटलं की निसर्गाची सर्वोत्तम कलाकृती. निसर्गाचे भरभरुन वरदान लाभलेल्या या कोकणातील हापूस आंबे, काजू यांना आंतरराष्ट्रीय बाजारात फार मोठी मागणी असते. या फळांच्या तुलनेत अत्यंत कमी किंमत असलेल्या आणि कोकणातील रानमेवा समजल्या जाणाऱ्या जांभूळ या फळाला परदेशवारी घडवली आहे ती छाया उदय भिडे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख या गावातील छाया भिडे यांनी या जांभळाना फक्त परदेशवारीच घडवली नाही, तर स्थानिकांना रोजगारदेखील उपलब्ध करुन दिला आहे. छाया भिडे या जांभूळ या फळाची पोळी तयार करुन बाजारपेठेत विकतात. मधुमेह या रोगावर अतिशय गुणकारी असलेल्या या जांभूळपोळीला देशभरातून मागणी आहे. २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या व्यवसायाच्या इतिहासाबद्दल बोलताना छाया सांगतात की, ʻआमच्या एका नातेवाईकाला मधुमेहाचा त्रास होता. मी कोठेतरी ऐकले होते की जांभूळ हे फळ मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे. योगायोगाने तो जांभळाचा हंगामदेखील होता. त्यामुळे मी आमच्या त्या पाहुण्याला जांभूळ खायला देत असे. पण जांभूळ खाण्याचे प्रमाण काही माहित नव्हते. एक दिवस त्याला चक्कर आल्याने आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. तेव्हा त्यांना तो त्रास शरीरात साखरेचे प्रमाण कमी झाल्याने होत असल्याचे आम्हाला डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांनी इन्शुलिन जास्त घेतले का किंवा एखादी गोळी जास्त घेतली का, अशी चौकशी केली. मात्र त्यापैकी काहीही नव्हते. जेव्हा डॉक्टरांनी त्यांच्याकडे त्यांच्या आहाराबद्दल विचारणा केली, तेव्हा त्यांनी जांभूळ खाण्याबद्दल त्यांना सांगितले. मात्र त्याचे प्रमाण जास्त झाले होते. तेव्हा माझी खात्री झाली की, जांभूळ फळ हे खरंच मधुमेहावर गुणकारी आहे. जांभूळ हे फळ हंगामी असल्याने उर्वरित महिने काय करायचे, असा प्रश्न आमच्यासमोर होता. त्यामुळे मग आम्ही त्यावर संशोधन करुन, वेगवेगळे प्रयोग करुन जांभूळपोळीची निर्मिती केली, जी बारमाही टिकू शकते.ʼ छाया भिडे यांचा हा व्यवसाय दहा वर्षांपूर्वी नोंदणीकृत करण्यात आला आहे.


image


सुरुवातीच्या काळात त्या स्वतःच जांभुळपोळी तयार करत होत्या. गावातील जांभळे गोळा करुन, ती स्वच्छ करुन त्याचा रस काढून ते पोळी तयार करुन सुकवेपर्यंत सर्व कामे माणसांद्वारे केली जात असत. सुरुवातीच्या काळात तर जांभळांचा रस मिक्सरवर काढण्यात येत होता, त्यामुळे या कामाला वेळ फार लागत असे. कालांतराने आम्ही एक यंत्र तयार करुन घेतले, ज्यावर जांभळांचा रस काढता येत होता आणि त्याची आम्ही पोळी तयार करू लागलो, असे त्या सांगतात. सध्या ते देवरुख गावासोबतच शेजारील गावांमधील जांभळेदेखील विकत घेतात. छाया भिडे यांच्या या व्यवसायामुळे कोकणातील या रानमेव्याला चांगला दर मिळू लागला आहे. पूर्वी अल्पदर मिळत असलेल्या जांभळांना आता भिडे कुटुंबीय २० ते २२ रुपये प्रतिकिलोने विकत घेतात. त्याशिवाय भिडे यांच्या या उद्योगामुळे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधीदेखील मिळाली आहे. हवाबंद पॅक केल्याने ही जांभूळपोळी वर्षभर टिकते, असे छाया सांगतात.


image


भिडे यांच्या या व्यवसायात आजवर अनेक अडचणी आल्या. पूर्णतः नैसर्गिक असलेल्या या उत्पादनाला आजवर अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. प्रत्येक वर्षी नवी अडचण आमच्यासमोर येत असते. मात्र त्यावर मात करत अविरतपणे आम्ही आमचा व्यवसाय सुरू ठेवला असल्याचे त्या सांगतात. कधीकधी जांभळांचे प्रमाण कमी असते, कधी जास्त असते, तसेच ती उन्हात सुकवण्यात येत असल्याने हवामानावरदेखील अवलंबून रहावे लागते, असे त्या सांगतात. भिडे यांची ही सुमधूर जांभूळपोळी संपूर्णतः नैसर्गिक आहे. ती टिकवण्यासाठी तिच्यात कोणत्याही कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यात येत नाही. तसेच जांभूळ सुकवण्यासाठीदेखील ड्रायर यंत्राचा वापर केला जात नाही. सुर्य़प्रकाशातच ती वाळवण्यात येतात. पूर्णतः नैसर्गिक असलेली ही जांभूळपोळी भारतातील अनेक राज्यात विक्रीकरिता पाठवण्यात येते शिवाय तिने ऑस्ट्रेलियाची वारीदेखील केली आहे. या जांभूळपोळीला सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.


image


जांभूळपोळीशिवाय त्या जांभूळाच्या बियांची पावडर तसेच जामून चिप्सदेखील तयार करतात, जे औषधी आहेत. सध्या त्या कोकणची काळी मैना समजल्या जाणाऱ्या करवंदांवर तसेच आवळ्यांवरदेखील संशोधन करत आहेत. या दोन फळांचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन त्यापासून काही उत्पादने तयार करता येऊ शकतात का, याचा त्या विचार करत आहेत. त्यांच्या या व्यवसायात त्यांना त्यांच्या कुटुंबाची मोलाची साथ मिळते, असे त्या सांगतात. कोकणातील या रानमेव्यांना बाजारात चांगली किंमत मिळवून देण्यासोबतच स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याचा छाया भिडे यांचा हा अभिनव उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.