‘कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला’? मुंबईच्या रस्त्यावरच्या कलादालनात कलावंताची ‘चित्तरकथा’!

‘कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला’?  मुंबईच्या रस्त्यावरच्या कलादालनात कलावंताची ‘चित्तरकथा’!

Friday January 15, 2016,

5 min Read

असे म्हणतात की, कलेला किंवा कलावंताला धर्म, देश, भाषा, प्रांत, लिंग, गरीब-श्रीमंत अशा भेदांचा लवलेश नसतो. काही अंशी ते खरे देखील आहे. पण मायानगरी मुंबईत जिथे देशा-विदेशातून अनेकजण केवळ आपली कला घेऊन आले आणि जीवनातील सारे मान-सन्मान, पैसा-प्रसिध्दी मिळवून जगात किर्तीमान झाले, त्याच मायानगरीत जिथे पंचतारांकीत हॉटेल्स आणि वातानुकूलीत कलादालनांत कलावंतांच्या कलाकृतींना नावाजले जाते; आणि दोन-दोन वर्षांच्या प्रतिक्षायादी करून कलाकृतींना कलादालनात संधी दिली जाते त्याच जगप्रसिध्द कलादालनांच्या बाहेर रस्त्यांवरही आपल्या चित्रकलांचे प्रदर्शन रस्त्यांवर मांडून उदरनिर्वाह करता करता कलेची साधना करणारे कलाकारही पहायला मिळतात.

image


होय, आपण आज ‘भारतीय कलाकृतींच्या मुंबईच्या पदपथांवरील या कलादालनां’विषयी आणि त्यातील कलावंताच्या जीवनाविषयी जाणून घेऊया. मुंबईतील जगप्रसिध्द कलादालन म्हणजे ‘जहांगीर आर्ट गँलरी’ या ठिकाणी देशा-विदेशातून दररोज हजारो पर्यटक तसेच स्थानिक कलाप्रेमी भेट देत असतात. त्यात अनेक नामवंत चित्रकार, हस्तकलाकार किंवा आधुनिक चित्रशैलीतील कलाकारांच्या कलाकृतींना वाखाणले जाते. इतकेच नाहीतर काही हजार रुपयांपासून लाखांपर्यंत तेथील कलाकृतींना किंमत दिली जाते. पण याच कलादालनाच्या बाहेर पदपथावरही काही कलाकार केवळ २००रुपयांत तुमचे पोर्टेट तयार करून देताना दिसतात.

image


फेरीवाल्यांच्या गर्दीत झाडाखाली एक खुर्ची टाकून बसणा-या आणि कलादालनाच्या तारेच्या कुंपणालाच आपला ‘आर्टस्टँड’ बनवून कला सादर करणा-या, विदर्भातील वर्ध्यातून दहावर्षापूर्वी येथे आलेल्या सुदिप कांबळे या कलाकाराला भेटा. त्यांच्या हाती पेन्सिल घेऊन ते तुमचे छान पोर्टेट तयार करून देतात आणि त्याचे त्यांना दोनशे रूपये मिळतात. आज गेल्या दहावर्षांपासून याच कलेला आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ऊन-वारा-पाऊसातही याच पदपथावर साकारणा-या या कलाकाराने बीएससी करून फाईन आर्टचे शिक्षण जेजे स्कूल ऑफ आर्टमधून घेतले आहे. छंद म्हणून याच क्षेत्रात जीवनाची सुरूवात करताना दोन मुली पत्नी आणि कुटूंबाचीही त्यांच्यावर जबाबदारी आहे. पण कोणतीही तक्रार न सांगता ‘जीवनासाठी कला’ की ‘कलेसाठी जीवन’ असा प्रश्नही न विचारता हा कलाकार जगण्याची आशा घेऊन उभा आहे.

image


सुदीप हे काही येथे एकटे कलाकार नाहीत. ‘युवर स्टोरी’ने त्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की त्यांच्यासारखे आणखीही काहीजण येथे हेच काम करतात. कलादालनाच्या बाहेर मोकळ्या आकाशाखाली त्याची ही कला बहरली आहे. त्यांच्याच बाजुला असेच कोणतेही कलांचे शिक्षण न घेता पाहून पाहून चित्रकला शिकल्याचे सांगणारे कपिल कांबळे भेटतात. ते येथे लँडस्केप चित्रांचे प्रदर्शन करतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात. केवळ बारावी कॉमर्सपर्यंत शिक्षण घेतेलेल्या या तरूण कलाकाराचेही जीवन गेल्या आठवर्षांपासून याच पदपथावर कलेच्या भरवश्यावर आज चालले आहे. ‘काळाघोडा ओपन गँलरी’ या संकल्पनेत ते समन्वयकाचेही काम करतात. त्यांना ‘कालाघोडा महोत्सवा’सारख्या कलेच्या आश्रयदात्यांनी, आयोजकांनी तारांचेस्टँड कलाप्रदर्शन करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यावर दिवसभर लँडस्केप चित्र लटकवून त्यांचे जाणा-या येणा-यांना खुले प्रदर्शन करून मिळेल त्या किमतीत चित्र विकण्याचा त्यांचा हा व्यवसाय आहे. या व्यवसायाची कोणतीही हमी नाही. कधी-कधी चित्र विकली जात नाहीत पण मित्र-दोस्तांच्या मदतीने अशावेळी दिवस ढकलायचे असे ते निर्विकारपणाने सांगतात.

image


पण असे असलेतरी या कलाकारांच्या मनात भविष्यात मोठे कलाकार म्हणून नांव-पैसा कमविण्याची स्वप्न जीवंत आहेत. संधी मिळाली तर मोठे प्रदर्शन करण्याची त्यांची आस आहे.

सुदिप यांनी सांगितले की भावाला मुंबईत यूटिव्ही सारख्या चांगल्या संस्थेत नोकरी मिळाली. कालांतराने त्याची ती नोकरी सुटली आणि त्याने सुरुवातीला येथे रस्त्त्यावर अशा प्रकारच्या कलाकृतींचे प्रदर्शन आणि सादरीकरणाचे काम सुरू केले. त्याच्यानंतर आपणही हेच काम गेल्या दहा वर्षांपासून करतो आहोत. या कलेच्या प्रेमासाठी इतर कुठली नोकरी धंदा करण्याचा विचारही करता आला नाही असे सांगताना सुदिप म्हणाले की, “त्यात कलेसाठी हवा तितका वेळ देता आला नसता आणि जी बांधीलकी कलेसाठी देता येते ती अन्य गोष्टींना द्यावी लागली असती.” या कलादालनात जेंव्हा तुमच्यासारखेच इतर कलाकार येतात. प्रदर्शने मांडतात, नांव लौकीक पैसा मिळवतात त्यावेळी आपणही असे काही करावे असे वाटत नाही का? असे विचारता सुदिप सांगतात की, “आमच्या सारख्या कलाकारांना तेथे जागा नाही.” तेथे नोंदणी करून आपल्या कला सादर करण्याची मनातून त्यांना इच्छा असलीतरी तेथील परिस्थितीचा विचार केला तर सामान्य पार्श्वभुमीच्या कलाकारांना ते शक्य नाही. संघटीत आणि असंघटीत कलाकार अश्या कलावंताच्या पोटजाती येथे पहायला मिळतात. कलादालनाच्या बाहेरच्या खुल्या कलादालनातही प्रस्थापित आणि विस्थापित असा भेद पुन्हा पहायला मिळतो. बाहेर पूर्वी पोलिसांकडून किंवा पालिकेच्या अधिका-यांकडून फेरीवाल्यांवर होते तशी हाकलून देण्याची कारवाई होत असे, पण गेल्या काही वर्षांपासून कलादालनाच्या परिसरात पोलिसांचा हा उपद्रव करण्याचा प्रकार काही कलाप्रेमींच्या माध्यमातून जवळपास नामशेष झाला आहे असे त्यांनी सांगितले. नव्याने कुणी कलाकार या बाहेरच्या जागेत आला तर त्याला मात्र पुन्हा इथल्या आधीच्या लोकांकडून त्रास सहन करावा लागतो कारण बेभरवश्याच्या या व्यवसायात आधीच्यांनाच हमी नसल्याने नव्याने कुणी येऊन वाटेकरी व्हावे याला इथल्या प्रस्थापतांचा आक्षेप असतो! अगदी रेल्वेच्या डब्यात आधी आलेल्या प्रवाश्यांत आणि नंतर येणा-यांत जे नाते असते तसे या कलेच्या प्रातांतही असते.

image


कलेच्या विस्ताराच्या तसेच उद्याच्या भविष्याच्या योजना काय आहेत? ते सांगताना सुदिप म्हणाले की, “२३मे पासून ओबेराय हॉटेल येथे होणा-या कलाप्रदर्शनात माझ्याही चित्रांचे प्रदर्शन मांडणार आहे. ही कला इतरांना शिकवण्यासाठी शिकवण्या का घेत नाही त्यातून आर्थिक हातभार लागू शकतो अशा सूचना काही लोक करतात पण त्यावर अदयाप विचार करायचा आहे” असे ते म्हणाले. कपिल यांनी सांगितले की, “कालाघोडा महोत्सव किंवा कुठल्या प्रदर्शनात चार-आठ दिवसांचे कार्यक्रम असतात तेंव्हा काही चिंता नसते, पण इतर दिवसांत कलाप्रेमींच्या येण्याची आणि पैसे खर्च करून चित्र विकत घेण्याची वाट पहात बसणे एवढेच आमच्या हाती असते.”

जहांगीर कलादालनाच्या बाहेरही खुल्या पदपथावरच्या या कलावंताच्या कलाकृती येणा-या-जाणा-यांना खुणावतात आणि नकळत या कलांवंताची देखील चित्तरकथा मांडल्याचे सांगत असतात. पण तेथून जाणा-यांना किंवा पर्यटक म्हणून पहायला येणा-यांना या सा-यांकडे पहाण्याची दृष्टी असतेच असे नाही. मात्र येथे येणा-यांकडून कलाकारांना आश्रय मिळतो कलाकारांचा आदरच केला जातो असेही या कलाकारांनी सांगितले त्यांच्या भरवश्यावरच आजवर ही खुल्या आकाशाखालच्या ‘रस्त्यावरची भारतीय चित्रकला’ जीवंत राहिली आहे.

image