डुडलच्या माध्यमातून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी आधुनिक रयतेची ऑनलाईन मोहिम

डुडलच्या माध्यमातून शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी आधुनिक रयतेची ऑनलाईन मोहिम

Wednesday February 17, 2016,

4 min Read

‘डुडल’ या शब्दाचा शब्दकोषानुसार अर्थ आहे, ‘एखादयाचे लक्ष दुस-या एखादया बाबीकडे केंद्रीत असताना त्याने नकळतरित्या कागदावर काढलेल्या रेघोटया वा चित्र’. मात्र ‘डुडल’ हा शब्द आजकाल सर्रासपणे सगळ्यांना सुपरिचित झाला आहे तो गुगलमुळे. ‘गुगल’ हे आजच्या घडीचे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन. किंबहुना सर्च इंजिन म्हणजेच गुगल आणि गुगल म्हणजेच सर्च इंजिन असे समीकरण बनावे एवढी जनमानसात या सर्च इंजिनची लोकप्रियता आहे. या गुगलनेच 1998 मध्ये पहिल्यांदा ‘बर्निंग मॅन’ या विषयावरचे डुडल प्रदर्शित केले. गुगल या सहा अक्षरी इंग्रजी शब्दामध्ये काही प्रभावी बदल करुन गुगल त्यांचे डुडल सादर करत असते. आजवर गुगलने जवळपास 2000 डुडल प्रदर्शित केली आहेत. गुगलच्या या डुडल्समध्ये भारतीय विषयावर आधारित डुडलने 9 मार्च 2001ला हजेरी लावली. या दिवशी होळी सणावर आधारित डुडल गुगलने प्रदर्शित केले. गुगलने त्यानंतरही भारतीय व्यक्तिमत्त्वांना आणि विविध घटनांना महत्त्व देत आजपर्यंत साधारणतः 50 हून अधिक डुडल प्रदर्शित केली आहेत. मात्र अद्यापही देशातील काही महान व्यक्तिमत्त्वांवर आधारित डुडल साकारण्यात आलेली नाहीत. यापैकीच एक थोर, कर्तबगार, आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

image


यावर्षी शिवरायांच्या जयंतीदिनी महाराजांवर आधारित डुडल प्रदर्शित व्हावे यासाठी काही शिवप्रेमींनी ऑनलाईन मोहिम उभारली आहे. “वर्षभरापूर्वी म्हणजे 12 जानेवारी 2015 ला सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय जिजाऊ महोत्सवा’दरम्यान ‘मराठा सेवा संघा’चे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्याशी चर्चा सुरु होती. गुगलवर वेगवेगळे डुडल बघायला मिळतात. मात्र यामध्ये अभारतीय डुडल जास्त असतात याविषयी आम्ही बोलत होतो आणि या चर्चेतूनच शिवरायांचे डुडल त्यांच्या जन्मदिनी असावे ही कल्पना पुढे आली,” असं या मोहिमेतील अग्रणी शिवप्रेमी, अमरावतीचे सचिन चौधरी सांगतात.

image


ते पुढे सांगतात, “त्या दिवसानंतर डुडलसंदर्भात अधिक माहिती करुन घेणे सुरु झाले. त्यातच 14 एप्रिल 2015ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी गुगलने त्यांचे डुडल सादर करुन त्यांना मानवंदना दिली. मी याबाबत फेसबुकवर गुगलला धन्यवाद दिले आणि अशाच प्रकारे शिवरायांचे आणि इतर महामानवांचे डुडल प्रकाशित व्हावे याकरिता एक पोस्ट लिहिली. ही यासंदर्भातील माझी पहिली पोस्ट. त्याचदरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या डुडलसाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु झाले होते. त्यांना बांद्रा येथील गुगलच्या भारतातील मुख्यालयातून दिलेल्या माहितीवरुन आमच्या लक्षात आले की गुगलचे अधिकारी नवीन डुडल निवडण्याकरिता ऑनलाईन सर्चच्या विषयांची संख्यावारी, ट्विटरवरील विवीध हॅशटॅग किंवा त्यांना लोकांनी पाठविलेल्या ईमेलच्या मजकुराची मदत घेतात. त्यानंतर आम्ही गुगलबरोबर काही पत्रव्यवहारही केले. 22 डिसेंबर 2015 ला मी गुगलला [email protected] या त्यांच्या अधिकृत ई-मेलवर रितसर प्रस्ताव मेल केला. यामध्ये पुराव्यादाखल गुगलवर शिवाजी महाराज म्हणून सर्च केल्यावर 2 लाख पेजेस दिसतात हे दाखवून देणारा स्क्रीन शॉटसुद्धा पाठवला.”

दरम्यानच्या काळात सचिन यांचे मित्र आणि शिवप्रेमींनी विविध ठिकाणाहून या मोहिमेबाबत जनजागृती करुन मोहिमेला हातभार लावला. “कर्नाटक, हरियाणा, दुबई अशा विविध ठिकाणांहून शिवप्रेमी या मोहिमेत सहभागी झाले. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होतो. प्रत्येकाने स्वतःला जमेल त्या पद्धतीने या मोहिमेबाबत जनागृती केली. जानेवारीपासून या मोहिमेला आणखी वेग आला. या मोहिमेबाबत लोकांना कळावे आणि डुडल काय आहे हे सोप्या भाषेत समजावे याकरिता मी 6 फेब्रुवारी 2016 ला फेसबुकवर आणखी एक पोस्ट लिहीली. त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला,” सचिन सांगतात.

image


ते पुढे सांगतात, “याचदरम्यान यवतमाऴ येथील आमचे मित्र अमित वानखेडे यांनी या मोहिमेकरिता change.org या वेबसाईटवर एक ऑनलाईन याचिका दाखल केली. या वेबसाईटचा खूप चांगला इतिहास आहे. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या वेबसाईटवरील ऑनलाईन याचिकांमुळे लागलेले आहेत. शिवरायांच्या डुडलसाठी अमित यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आजपर्यंत जवळपास 25 हजार लोकांनी स्वाक्षरी करुन या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. तर 71 हजार लोकांनी ही याचिका पाहिलेली आहे.”

शिवप्रेमींच्या या मोहिमेला देशभरातील विविध वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्धि दिली आहे. त्याचप्रमाणे डिजीटल न्यूजच्या माध्यमातूनही ही मोहिम हजारो लोकांपर्यंत पोहचली आहे. “डिजीटल न्यूजला जवळपास सात हजार शेअर्स आणि लाखो लाईक्स मिळालेले आहेत. वॉट्सऍप, फेसबुकवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरवर तर #DoodleofShivray या hashtag ने धुमाकूळ घातलेला आहे. गुगलला याविषयी मागणी करणारे अनेक मेल एव्हाना पोहचले असतील. विशेष म्हणजे या मोहिमेला केवळ भारतातूनच नाही तर जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेला समर्थन दर्शविणाऱ्यांमध्ये सर्व धर्माचे लोक आहेत. यामध्ये मुस्लिम लोकांचे प्रमाण जास्त आहे हे विशेष,” असं सचिन सांगतात.

या मोहिमेला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहता शिवराय सर्वार्थाने तमाम रयतेचे राजे होते आणि आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या रयतेच्या राजाला त्यांच्या जयंतीदिनी विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करण्यासाठी आपणही या मोहिमेत सहभागी होऊ शकता. याकरिता [email protected] या गुगलच्या अधिकृत ई-मेलवर चार ओळींचा विनंती करणारा मजकूर लिहून या डुडलकरिता गुगलकडे मागणी करु शकता किंवा #DoodleofShivray हा हॅशटॅग वापरुन ट्विटर, फेसबूक आणि व्हाट्सऍप वरूनसुद्धा या मोहिमेला पाठिंबा देऊ शकता. त्याचबरोबर change.org वरील ऑनलाईन याचिकेला goo.gl/FmTgNh या लिंकवरुन समर्थन देवू शकता. गुगलच्या नियमानुसार डुडलसाठी निवड होण्याकरिता त्या विषयाला लोकांची मोठी मागणी असणे गरजेचे आहे. शिवप्रेमींनी आरंभलेल्या शिवाजी महाराजांच्या डुडल मोहिमेला लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता या 19 फेब्रुवारीला गुगलचे डुडल शिवरायांवर आधारलेले असेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.