भारतीय महिला क्रिकेटचा चमकता तारा : मिताली राज!

भारतीय महिला क्रिकेटचा चमकता तारा : मिताली राज!

Saturday May 07, 2016,

12 min Read

त्या मुलीच्या वडिलांनी वायूसेनेत काम केले होते. स्वाभाविक होते की घरात शिस्त ही असणारच. मुलीची आई आणि तिचा भाऊ देखील शिस्तबद्ध होते. मात्र मुलगी घरात सर्वात वेगळी होती. ती सुस्त आणि आळशी होती. शाळेची पहिली घंटा वेळ साडे आठ असेल तर मुलगी आठ वाजता उठायची. म्हणजे घरात सर्वात उशिरा. वडिलांनी आपल्या मुलीला क्रिकेटर बनविण्याचा निश्चय केला. सुरुवातीस मुलीने क्रिकेट अकादमीत जाऊन आपल्या शाळेचा घरचा अभ्यास केला, मात्र वडिलांच्या म्हणण्यावर आपल्या भावाच्या देखरेखी खाली क्रिकेटचे धडे गिरवले आणि नेट सराव सुरु केला. भावाप्रमाणेच मुलगी देखील नेट वर खूप घाम गाळू लागली. हळू हळू मेहनत रंगू लागली.

क्रिकेट मुलीचे पहिले प्रेम बनले. आणि मुलीने देखील अशाप्रकारे क्रिकेटवर प्रेम केले आहे की, क्रिकेटलाच आपले आयुष्य आणि आयुष्यालाच क्रिकेट मानले. कारण मेहनत आणि करण्याची जिद्द होती, सोबतच सक्षमता होती, मुलगी क्रिकेटच्या मैदानावर आपली खेळी दाखवू लागली. तिने असा काही खेळ केला की, अनेक लोक तिचे चाहते झाले. आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या बळावर त्या मुलीने मैदानावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आपल्या देशाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. आपल्या देशात महिला क्रिकेटला प्रसिद्ध बनविले. तिच्या कामगिरीमुळे आणि यशामुळे जगात त्यांना “महिला क्रिकेटचा तेंदुलकर” म्हटले जाऊ लागले. आम्ही येथे ज्या मुलीबाबत सांगितले आहे, ती भारतीय महिला क्रिकेटची “सुपरस्टार खेळाडू” मिताली राज आहे.

image


मिताली राज या केवळ भारताच्या आतापर्यंतची सर्वात यशस्वी महिला क्रिकेटर तर आहेतच, शिवाय त्यांचे नाव आज जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू मध्ये आहे.

मिताली यांच्याशी संबंधित अजून एक मनोरंजक कहाणी आहे. लहानपणी क्रिकेट शिकण्याआधी मिताली भरतनाट्यम शिकत होत्या. त्यांना नर्तिका बनायचे होते. देश – विदेशात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या नृत्य कलेचे प्रदर्शन करून कलेचे प्रदर्शन करून लोकांना आपले चाहते बनविण्याची इच्छा होती. मिताली यांनी लहान वयापासूनच मंचावर नृत्य करण्यास सुरु केले होते. मंचावर त्यांचे नृत्य खूपच आकर्षक असायचे. लयीत आणि ते देखील शास्त्रीय नृत्याला मंचावर सादर करायच्या तेव्हा सर्व प्रेक्षकांचे मन जिंकायच्या. मात्र, जेव्हा त्या क्रिकेट स्पर्धा खेळायला लागल्या आणि प्रवास करावा लागला, ते देखील खूप लांब. तेव्हा नृत्याचा अभ्यास जवळपास होतच नव्हता. त्यांचा नृत्य अभ्यास सुटतो आहे, हे बघतानाच एक दिवशी त्यांच्या गुरुंनी त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा केला. गुरुंनी मिताली कडून क्रिकेट किंवा नृत्य या दोघांमधून एकाला निवडण्यास सांगितले. खूप विचार केल्यानंतर मिताली यांनी नृत्य कला आणि मंचाला सोडून क्रिकेट आणि मैदानालाच आपले आयुष्य बनविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयाचा क्षण आठवताना मिताली सांगतात की, “निर्णय कठीण होता. मात्र मी क्रिकेटशी अशाप्रकारे जुळले होते की, क्रिकेटला सोडून काहीतरी करणे, माझ्या हातून निसटल्यासारखे होत होते.”

image


त्या क्रिकेटपटू नसत्या तर त्या नर्तिकाच असत्या का, हा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, हो मी नर्तिकाच असती. मी क्रिकेट खेळत नसते तर मंचावर नृत्य केले असते. जेव्हा मी नृत्याशिवाय क्रिकेटला निवडले तेव्हा मी आपल्या “अरंगनेत्रम” (शास्त्रीय नृत्य औपचारिक प्रशिक्षणाच्या समाप्ती नंतर मंचावर केले जाणारे पहिले नृत्य प्रदर्शन) पासून दोन टप्प्यावर होते.” मिताली नर्तिका बनू शकल्या नसल्या तरी, त्यांनी आपल्या शानदार क्रिकेटने मैदानावर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना खूप नाचवले आहे. क्रिकेटच्या मैदानावर मिताली यांची उपलब्धी इतकी मोठी आहे की, भारताच्या दुस-या महिला क्रिकेटर तिच्याबरोबरीला देखील उभ्या राहू शकत नव्हत्या. एक महत्वाची गोष्ट ही आहे की, मिताली राज आजही आपल्या यशाचे श्रेय वडील दोरई राज यांनाच देतात. मितालींच्या मते, त्यांच्या वडीलांची इच्छा होती की त्यांनी लहान वयातच क्रिकेटच्या संघात जागा बनवावी त्यासाठी ते मेहनत करत होते. वडील आणि मुलगी यांच्या दोघांच्या मेहनतीचा परिणाम अस झाला की, केवळ चौदा वर्षे वय असतानाच त्यांना भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून घेण्यात आले. सोळाव्या वर्षी त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. २६ जून १९९९ रोजी मिल्टन किनेस च्या कँम्पबेलपार्क मध्ये खेळ्ण्यात आलेल्या या सामन्यात मिताली यांनी रेश्मा गांधी यांच्या सोबत डावाची सुरुवात केली. त्यात त्यांनी नाबाद ११४ धावा केल्या. रेश्मा यांनी देखील शानदार १०४धावा केल्या. भारताने हा सामना १६१धावांनी जिंकला. आणि या सामन्यानंतर भारताला एक नवा स्टार खेळाडू मिळाला. पुढे जात मिताली यांनी महिला क्रिकेटच्या एक दिवसीय प्रकारात पाच हजार धावा करणा-या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान मिळवला. आता पर्यंत केवळ दोनच महिला खेळाडूंना हा बहुमान मिळवता आला आहे. मिताली यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना २००२मध्ये खेळला. १४ ते १७ जानेवारीच्या दरम्यान लखनौ येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात मिताली शुन्यावर बाद झाल्या. पण पुढे जाऊन त्या महिला कसोटी सामन्यात दुहेरी शतक करणा-या पहिला खेळाडू ठरल्या!

image


असे एक नाही अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत.

असेही नाही की त्यांचा प्रवास एकदम सोपा झाला. त्यांनी जेंव्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, त्यावेळी खूप कमी लोकांना माहिती होते की, महिला देखील क्रिकेट खेळतात. एक असा देश जिथे क्रिकेटची लोकप्रियता सातत्याने वाढत होती, क्रिकेटची जादू लोकांच्या डोक्यावर स्वार होती, कित्येकांनी तर क्रिकेट हाच धर्म बनविल्यासारखे होते, त्याचवेळी कितीतरी लोक असेही होते की, त्यांच्यासाठी विश्वास ठेवणे कठीण होते की, महिला सुध्दा क्रिकेट खेळतात. आणि महिला-पुरुषांच्या खेळात काहीच फरक नाही. सारे नियम तेच आहेत. मैदानही तेच आहे. तीच आव्हाने आहेत आणि तीच गळा कापू स्पर्धा आहे.

मिताली सांगतात की, ज्यावेळी त्यांनी भारतीय संघात जागा मिळवली, त्यावेळीही त्यांना स्वत:ला हे माहिती नव्हते की भारताच्या मोठ्या क्रिकेटपटू कोण आहेत? त्या कशा दिसतात? कश्या खेळतात? त्यांच्या नावे काय विक्रम आहेत? कनिष्ठ संघात जागा मिळाल्या नंतरच त्यांना त्यावेळच्या महान महिला खेळाडू शांतारंगास्वामी, डायना एदलजी यांच्याबद्दल माहिती मिळली. हा तोच काळ होता ज्यावेळी भारतात प्रत्येक घराघरात पुरुष संघातील प्रत्येक नव्या खेळाडूलाही ओळखत होते.

image


मिताली सांगतात की, त्या काळात महिला क्रिकेटला इतके प्रोत्साहनही मिळत नव्हते जितके आता मिळते. त्या काळी जेंव्हा क्रिकेटर रेल्वेत प्रवास करत होते, त्यावेळी त्यांच्या मोठ्या कीट पाहून लोक विचारत की काय हॉकी खेळता काय? जेंव्हा त्यांना उत्तर मिळायचे की क्रिकेटर आहेत तेंव्हा त्यांनाही कुतूहल वाटायचे. इतकेच काय लोक त्यांना विचित्र प्रश्न करत असत. जसे की, मुली सुध्दा क्रिकेट खेळतात का? महिला टेनिसच्या चेंडूने खेळतात का? त्यांच्यासाठी वेगळे काही नियम आहेत का?

मिताली यांना ते दिवस आजही आठवतात जेंव्हा त्या मुलांसोबत सराव करायच्या तेंव्हा अनेकजण खूपच बोच-या टिपण्या करून हिणवत असत. मुले सहजपणे म्हणायची, ‘अरे मुलगी आहे हळू चेंडू टाक तिला जखम होईल’ अश्या विसंगती मधूनही मिताली यांनी क्रिकेटची निवड केली. आता पर्यंतच्या प्रवासात धीर सोडला नाही. हिम्मत हारल्या नाहीत. आव्हानांचा सामना केला. परिस्थितीला अनुकूल केले. आपल्या प्राविण्यातून आणि यशातून महिला क्रिकेटला भारतात सन्मान जनक बनविण्यात महत्वाची भूमिका बजावली.

image


मिताली यांनी जेंव्हा क्रिकेट सुरू केले होते तेंव्हा समोर मोठे काही लक्ष्य नव्हते. त्यांचा मानस भारतीय क्रिकेटमध्ये जागा मिळवणे इतकाच होता. जागा मिळवल्यानंतर त्यांचा पुढचा मानस ती पक्की करणे हाच होता. त्यांनंतर त्यांना मुख्य खेळाडू बनायचे होते. मिताली यांनी संघाचा मुख्य खेळाडू होण्यासाठी जीवतोड परिश्रम घेतले. त्यांना माहिती होते की टिकून रहायचे असेल तर आणि ते ही मुख्य खेळाडू म्हणुन तर कामगिरी चांगली हवीच. प्रत्येकवेळी संघाला विजयी करण्यासाठी योगदान द्यायला हवे.

त्यांचा दबदबा इतका वाढला की, त्या संघाच्या कर्णधारही झाल्या. त्यांचे म्हणणे आहे की, कर्णधारपद सा-यांना नाही मिळू शकत. ज्यांना नशिबाचीही साथ मिळते त्यांनाच ते मिळते. त्यांनी सांगितले की, मी हळुहळू पुढे सरकत गेले. आणि जसे पुढे जात राहिले जबाबदा-या मिळत गेल्या. तश्या संघाच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षाही वाढत गेल्या. खेळातील जीवनात वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळे उद्देशही राहिले. आपला खेळाचा दर्जा उच्च राहावा यासाठी नेहमी माझ्यासमोर आव्हान राहिले.”

image


३ मे २०१६ रोजी एका खास मुलाखती दरम्यान मिताली राज यांनी आपल्या जीवनातील अनेक महत्वाच्या न सांगितलेल्या गोष्टी उघड केल्या. अनेक मुद्दे नव्याने समोर मांडून मत जाहीर केले. ज्या क्रिकेट अकादमी मध्ये त्यांनी खेळाची सुरुवात केली होती तेथेच झालेल्या या खास मुलाखती मधील चर्चेत समोर आलेल्या काही गोष्टी अशा :

प्रेरणा: मिताली यांना आजही आपले वडिल दोरई राज यांच्यापासून प्रेरणा मिळते. त्या सांगतात की, ‘ त्यांच्यामुळेच मी खेळायची सुरुवात केली. कमी वयातच मी देशासाठी खेळावे असे त्यांचे मत होते. जेंव्हाही मी चांगल्या धावा करते त्यांना फोन करून सांगते. ते खुश होतात. त्यांचा आनंद मला प्रेरणा देतो.

संकट मोचक आहे आई : मिताली यांच्या आईला क्रिकेटचे जास्त कळत नाही जितके वडीलांना कळते. पण आईनेही मिताली यांना करियर साठी खूप मदत केली. त्यांच्यासाठी त्यांनी अनेक त्याग केले. जीवनातील सारे महत्वाचे निर्णय घेताना त्यांनी आईचाच सल्ला घेतला आहे. त्या सांगतात की जेंव्हाही त्या मानसिक दृष्ट्या तणावात असतात त्यावेळी आईच्या सल्ल्यानेच त्यांचा त्रास कमी होतो. त्या कुठे का असेनात समस्या असली की त्याच्या समाधानासाठी आईलाच फोन करुन विचारतात.

टीका: २०१३मध्ये मितालीच्या नेतृत्वातील संघाची सुपर सिक्स साठी निवड झाली नाही त्यावेळी वडीलांचा रागाचा पारा चढला होता. त्यांनी मितालीवर खूप टीका केली. आणि काही कटू शब्दही सांगितले होते. वडिलांनी स्वत:च त्यांच्या कर्णधारपदाचरुन हाकालपट्टी करण्याची मागणी केली होती. काही लोकांनी तर क्रिकेट संन्यास घेण्याचा सल्ला दिला होता.

त्याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की त्यांचे वडीलच त्यांचे सर्वात मोठे टीकाकारही आहेत आणि हे गरजेचे नाही की सा-यांनीच त्यांचे कौतुक करावे. त्यांनी वडिलांच्या टीकेतूनही चांगल्या गोष्टी शोधल्या आणि पुढे जायचे ठरवले. त्या मानतात की, मोठा खेळाडू होण्यासाठी टीकाकारही सोबतच असावे लागतात. ते तसे नसतील तर खेळाडू निष्काळजी आणि बेदरकार होण्याचा धोका असतो. त्या म्हणाल्या की, उगाच टीका करणारेही असतात. आपण कुणाला खेळ आवडलाच पाहिजे अशी सक्ती नाही करु शकत. प्रत्येकवेळी सर्वाना खूशही नाही करता येत.”

महिला क्रिकेट मध्ये राजकारण : मिताली न डगमगता आणि निसंकोचपणाने हे सांगतात की, महिला क्रिकेट मध्ये राजकारण होते. जसे अन्य क्षेत्रात ते असते तसच इथेही असते. कारण मिडिया महिला क्रिकेट मध्ये जास्त रस दाखवत नाही त्यामुळे राजकीय बातम्या बाहेर येत नाहीत. त्यांनी खळबळजनक खुलासा केला की, घाणेरड्या राजकारणामुळे अनेक चांगल्या खेळाडू संघात जागा मिळवू शकल्या नाहीत. त्यांच्यामते जे खेळाडू मानसिक दृष्ट्या सक्षम असतात तेच राजकारणाचा मुकाबला करु शकतात. पण कमजोर असतात ते शिकार होतात.

त्या सल्ला देतात की, प्रत्यकाने विशेषत: खेळाडूने मानसिकदृष्ट्या इतके सक्षम असायला हवे की, राजकारणाचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही.

यशाचा दृष्टिकोन: मिताली यांच्या नजरेतून वाईट प्रसंगातून स्थिर आणि शांत राहून लक्ष्य गाठणे म्हणजेच यशस्वीता आहे. खेळाडू म्हणून त्या मानतात की, कठीण प्रसंगातून संघाला बाहेर काढणे हीच यशस्विता आहे. त्या म्हणतात की, कर्णधार म्हणून माझी व्यक्तिगत कामगिरी चांगली नसेल तरीदेखील मी इतरांना प्रोत्साहित करत चांगली कामगिरी करून घेऊ शकत असेन तर कर्णधार म्हणून ही माझी सगळ्यात मोठी कामगिरी असेल.”

आतापर्यंतचे सर्वात मोठे यश : ‘कन्सिस्टन्सी’ सातत्यपूर्णता हेच माझे सर्वाधिक मोठे यश आहे. मी एक दिवसीय प्रकारात जर ४९ च्या सरासरीने पाच हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत तर हा सातत्यांचा परिणाम आहे.

सचिन तेंडुलकरशी तुलना केल्यावर : मिताली म्हणतात, “ जेंव्हा लोक मला महिला क्रिकेटचा तेंडुलकर म्हणतात तेंव्हा खूप आनंद होतो. क्रिकेटसाठी तेंडुलकर यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या उपलब्धी खूप महत्वाच्या आहेत, ते महान खेळाडू आहेत. अशा मोठया खेळाडूशी तुलना केल्याने आनंदच होतो. पण मला वाटते की लोकांनी मला माझ्या नावानेच ओळखावे, माझ्या योगदान आणि उपलब्धी हीच माझी ओळख असावी.

यशाचा मंत्र : मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. जर मुलींना भारतीय महिला संघात जागा मिळवायची असेल तर वर्षांनुवर्ष मेहनत करावीच लागेल. यशासाठी आपले प्राधान्यक्रम ठरवावे लागतील. मिताली यांच्या मते अनेकांना प्राथमिकताच ठरवता येत नाहीत. त्या सल्ला देतात की, लोकांनी आपले प्राधान्यक्रम ठरवून केवळ त्यावर लक्ष दिले पाहिजे.

सर्वाधिक आवडते पुरुष क्रिकेटर : मिताली यांच्या मते त्या कोणाही पुरुष क्रिकटपटूने फारश्या प्रभावित नाहीत, परंतू त्यांना राहूल द्रविड आणि सचीन तेंडुलकर यांची मानसिक शक्ती आणि सामन्याच्या तयारीने प्रेरणा मिळते.

सर्वाधिक आवडती महिला खेळाडू : नितू डेविड मुळे मिताली जास्त प्रभावित आहे. नितू डेविड मिताली यांची सर्वकालिक आवडती खेळाडू आहे. नीतू डेविड डावखुरी फिरकीपटू आहेत आणि त्यांनी अनेक वर्षांपर्यंत भारतासाठी क्रिकेट खेळल्या आहेत. मिताली म्हणाल्या की कर्णधार म्हणून त्या संघाला जेंव्हा संकटात पाहतात त्यावेळी त्यांना नितू डेविडच आठवतात. नितू यांनी आपल्या शानदार गोलंदाजीने संघाला संकटातून बाहेर काढले आहे.

कोणत्या खेळाडूशी सामना करताना भिती वाटते : मिताली म्हणाल्या की, जेंव्हा त्यांनी आंतर राष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती तेंव्हा लुसी पियरसन नावाच्या वेगवान गोलंदाज इंग्लडकडून खेळायच्या. सुमारे सहा फूट उंचीच्या त्या खेळाडूची गोलंदाजी भेदक असायची. मिताली यांना त्यांची भिती वाटायची. चेह-यावर हासू आणून आता त्या सांगतात की, “ मी नशिबवान आहे कारण लुसी यांनी जास्त दिवस क्रिकेट खेळले नाही आणि त्या लवकर निवृत्त झाल्या.”

जीवनाचे सर्वात मोठे स्वप्न : खेळाडू म्हणून किंवा कर्णधार म्हणून विश्वचषक जिंकणा-या भारतीय संघाचा सद्स्य असणे.

जीवनातील सर्वाधिक मोठा आनंद : इंग्लडमध्येच इंग्लडविरोधात कसोटी सामना जिंकणे. मिताली सांगतात की, त्या कर्णधार होत्या आणि त्यांच्या संघात अकरा पैकी ८ अशा खेळाडू होत्या ज्या पहिल्यांदा कसोटी सामना खेळत होत्या. इंग्लड एक अनुभवी संघ होता आणि ऑस्ट्रेलियाला नमवून ऍसेज मालिकेवर कब्जा केल्याने त्यांचा अात्मविश्वास दुणावला होता. पण आम्ही इंग्लडला हरविले. माझ्यासाठी कर्णधार म्हणुन ही मोठी कामगिरी होती.

सर्वात निराशेचा क्षण : एकदिवसीय आणि २०-२० प्रकारात चांगला संघ असूनही विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाद होणे हे दिवस सर्वात वाईट दिवस होते.

सर्वात वाईट काळ : मिताली म्हणतात की, २००७मध्ये जेंव्हा त्या सलग सात फे-यांमध्ये अपयशी झाल्या आणि तीसचा आकडा सुध्दा ओलांडू शकल्या नाहीत तेंव्हा त्या खूप हताश झाल्या. असाच एक काळ २०१२ मध्ये आला होता जेंव्हा त्या ऑस्ट्रेलिया विरुध्द सलग पाच फे-यांमध्ये काहीच कामगिरी करु शकल्या नाहीत.

निराश झाल्यावर काय करतात: मिताली मानतात की नकारत्मकता प्रत्येक ठिकाणी असते. प्रत्येकवेळी धीराने आणि शांतपणे स्थिती हाताळणे आवश्यक असते. त्या संयम आणि शांती राखण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. त्यामुळे निराशा दूर करण्यास मदत होते.

जीवनातील सर्वात मोठी भिती : मिताली यांना ही भिती सतावते की, त्या कधी बेपर्वा आणि निष्काळजी होणार नाहीत. असे झाल्यास त्यांचे सातत्य संपुष्टात येईल. आणखी एक भिती असते. . . . . क्रिकेटचे जे वेड आहे, जी महत्वाकांक्षा आहे ती संपून तर जाणार नाही. गंमतीची गोष्ट अशी की, आपली भिती घालवण्यासाठी त्या एक अनोखा उपाय करतात. जेंव्हा सामने खेळायचे नसतात तेंव्हा त्या क्रिकेटच्या बँटला हात सुध्दा लावत नाहीत. असे करताना पहाण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करतात की, त्या स्वत:ला किती वेळापर्यंत क्रिकेटपासून दूर ठेऊ शकतात. पण क्रिकेटचे प्रेमच असे काही आहे की त्या स्वत:ला मैदानापासून जास्त दूर ठेऊ शकत नाहीत.

मिताली यांच्या बाबतीत अन्य काही महत्वाच्या गोष्टी :

मिताली राज यांचा जन्म ३ डिसेंबर १९८२मध्ये राजस्थानात जोधपूर येथे झाला.

कुटूंब हैद्राबादला रहायला आले आणि मिताली हैद्राबादच्या झाल्या.

वडिल वायुसेनेत होते नंतर बँकेत अधिकारी होते.

मिताली यांच्या करिअरसाठी आईने नोकरी सोडली आणि घरची जबाबदारी घेतली.

लहानपणापासूनच मिताली यांनी आपला भाऊ आणि इतर मुलांसोबत सराव केला.

मिताली यांना क्रिकेट मधील योगदानासाठी अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.

महिलांच्या सक्षमतेचे त्या उदाहरण बनल्या आहेत आणि अनेकांसाठी प्रेरणा बनल्या आहेत.

एक नजर आकडेवारीवर : ३ मे २०१६ पर्यंत :

मिताली यांनी १६४ एक दिवसीय सामने खेळले आहेत.त्यात १४९ डावात ४९.च्या सरासरीने ५३०१ धावा केल्या आहेत.

त्या ४२ वेळा नाबाद राहिल्या आहेत, जो एक विक्रम आहे. मिताली यांनी एकदिवसीय खेळात पाच शतके केली आहेत.

मिताली यांनी ५९ ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळले आहेत आणि ३४.६च्या सरासरीने १४८८ धावा केल्या आहेत.

मिताली यांनी १० कसोटी सामने खेळले आहेत आणि ५१ च्या सरासरीने १६ डावात ६६३धावा केल्या आहेत. त्यांचा सर्वाधिक धावांचा विक्रम २१४ आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

वीटभट्टीवर मजुरी करून ‘मिस्टर दिल्ली’ चा पुरस्कार पटकावणा-या ‘विजय’ यांच्या संघर्षाची यशोगाथा 

कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर करणा-या अरूणिमा यांच्या इच्छाशक्तीला सलाम

गुंगा पहलवान: मूक साक्षीदार, सरकारी अनास्थेचा !

    Share on
    close