ʻ'कैंडिड्ली कचूअर'ʼ इशिता यांचा छंदापासून व्यवसायापर्यंतचा प्रवास

ʻ'कैंडिड्ली कचूअर'ʼ इशिता यांचा छंदापासून व्यवसायापर्यंतचा प्रवास

Monday November 02, 2015,

6 min Read

ʻमला खरेदीची प्रचंड आवड होती आणि आताही आहे. मी तासनतास दुकानांमध्ये फिरण्यात, ऑनलाईन संकेतस्थळे तपासण्यात घालवते. जेव्हा एखाद्याला विशिष्ट कपडे परिधान करायचे असतात आणि त्यावेळेस जर ते त्याला मिळाले नाहीत तर त्याच्या मनाची काय अवस्था होते, याचा मला अंदाज आहे. त्यामुळे मी एक फेसबूक पेज तयार केले. जिथे काही निवडक कपडे विकण्यासाठी ठेवण्यात आले. सुदैवाने मी निवडलेले कपडे अनेक लोकांना पसंत पडले आणि लोकांनी त्या पेजबद्दल माहिती ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर माझे दुसरे पाऊल म्हणजे सदर कपडे लोकांना खरेदी करता यावे, याकरिता सहजसोपा मार्ग तयार करणे हे होते. त्यामुळे आम्ही संकेतस्थळाची निर्मिती केली.ʼ, असे इशिता सांगतात. इशिता शर्मा या ई-कॉमर्समध्ये वेगाने वाढणाऱ्या फॅशन पोर्टल 'कैंडिड्ली कचूअर' (Candidly Couture) च्या संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. खरेदीचा छंद बाळगणाऱ्या इशिता शर्मा यांच्या या छंदाचे रुपांतर कालांतराने रिटेल क्षेत्रातील स्टार्टअपमध्ये झाले.

image


'कैंडिड्ली कचूअर' च्या प्रवासाबाबत बोलताना इशिता सांगतात की, ʻदिल्ली विद्यापीठात माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर एमबीएचे शिक्षण घेण्याचा विचार करत होती. मात्र माझ्या द्विधा मनःस्थितीमुळे मी एका मिडिया हाऊसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेथे मी वेळ घालवण्यासाठी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि फॅशन ब्लॉग्स पाहत राहायची. कंपनीचे सह-संस्थापक देवी त्यावेळेस वाल स्ट्रीट येथे काम करत होते. गेल्या वर्षी त्यांनी आपली नोकरी सोडली आणि ते 'कैंडिड्ली कचूअर' सोबत जोडले गेले.ʼ

image


भारतीय महिलांच्या वेशभूषेशी संबंधित संकेतस्थळांची आज कमतरता नाही. या स्पर्धेत आपला ब्रॅंड उठून दिसावा, याकरिता इशिता यांनी बरेच प्रयत्न केले आहेत. कपड्यांबाबत बोलताना इशिता सांगतात की, ʻकोणतीही डिझाईन निवडताना आम्ही काही गोष्टींकडे विशेष लक्ष देतो. जेव्हा ग्राहक आमचे कपडे परिधान करुन चारचौघांमध्ये जाईल, तेव्हा इतर लोक त्याच्या पेहरावाचे कौतुक करतील, याकडे देखील आम्ही लक्ष पुरवतो.ʼ 'कैंडिड्ली कचूअर'चे सर्वात मोठे प्रेरणास्थान बॉलिवुड आणि हॉलिवुडचे रेड कार्पेट फॅशन आहे. आपल्या डिझाईनबाबत बोलताना इशिता सांगतात की, ʻवर्तमानकाळात कोणती फॅशन सुरू असून, माझ्या ग्राहकांसाठी काय योग्य असेल, याचा विचार मी करते. कित्येकदा माझ्या डिझाईन्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत. याचा अर्थ असा होत नाही की मी माझ्या कल्पकतेवरच संशय करेन. दीड वर्षांच्या चांगल्या वाईट अनुभवांवरुन आमचे काही डिझायनर्ससोबत चांगले नाते तयार झाले आहे. ते डिझायनर्स आम्हाला उच्च गुणवत्तेच्या कपड्यांसोबतच चांगली डिझाईनदेखील देतात. आम्ही 'कैंडिड्ली कचूअर'मध्ये कोणत्याही प्रकारची सूट देत नाही. ९५ टक्के आमचा माल पूर्ण किंमतीमध्येच विकला जातो. आमच्या ग्राहकांचा जास्तीत जास्त फायदा करुन देण्याचा आमचा मानस आहे. उत्पादनाच्या किंमतीत सूट देण्याऐवजी आम्ही त्याला अधिक चांगले बनवू इच्छितो.ʼ

ʻ२०१३ साली जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. त्याकाळी ऑनलाईन पैसे देण्याच्या पद्धतीची सुरुवात होत होती. आज ऑनलाईन पेमेंट पद्धतीने ई-कॉमर्सला एका नव्या स्तरावर नेऊन ठेवले आहे. असे असले तरी, जेव्हा मी सुरुवात केली होती. तेव्हा ग्राहक ऑनलाईन पैसे भरण्याबाबत साशंक असायचे.ʼ, असे इशिता सांगतात. तरुण उद्योजिका इशिता पुढे सांगतात की, ʻएम-कॉमर्सची (मोबाईल कॉमर्स) सवय करुन घेणे, हे या क्षेत्रातील पुढचे आव्हान आहे. मोबाईलच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे येणारे मोबाईल अॅप ग्राहकांना कशा प्रकारे प्रभावित करते, हे पाहण्याची आम्हाला उत्सुकता आहे.ʼ इशिता यांनी ई-कॉमर्समध्ये योग्य वेळी आपला जम बसविला असून, याबाबत बोलताना त्या म्हणतात की, ʻवैश्विक स्तरावर पारंपारिक रिटेल ऐवजी ई-कॉमर्सची अधिक वाढ होत आहे. मला वाटते की, अमेरिकेऐवजी भारतात ई-कॉमर्स अधिक प्रभावी ठरेल. भारताची सामाजिक संरचना वेगाने बदलत आहे. आज ई-कॉमर्सकरिता अनुकूल परिस्थिती भारतात निर्माण होतेय. आमची फॅशन दिवसेंदिवस अधिक सुधारत आहे. आम्हाला विश्वास आहे की, लवकरच आम्ही संपूर्ण देशातील महिलांकरिता फॅशनबाबत चांगल्या सुविधा उपलब्ध करू.ʼ 'कैंडिड्ली कचूअर' एका मोठ्या यशाचा साक्षीदार आहे. इशिता सांगतात की, ʻआम्ही आमच्या कंपनीची प्रगती पाहून खूप आनंदी आहोत. आमचे आमच्या ग्राहकांशी चांगले नाते तयार झाले आहे, ही गोष्ट सुखद आहे. ग्राहकांना खुश करण्यासाठी आम्ही त्यांना सर्वोत्तम डिझाईन देतो. त्या बदल्यात ते आमचे कौतुक करतात, आमच्या ब्रॅंडवर विश्वास दाखवतात. आमचा रिटर्न बायर रेट ३० टक्के एवढा आहे आणि आम्ही तो वाढवण्याकडे लक्ष देत आहोत. आमची सर्वात मोठी प्राप्ती म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही आमच्या उत्पादन विक्रीमध्ये सहा आकडी अंक गाठला. यापेक्षा अधिक प्रगती करण्यासाठी आम्ही दर दिवशी कठोर मेहनत करतो.ʼ

इशिता आणि त्यांचे सह-संस्थापक देवी यांच्याकरिता विपणनासाठीच्या जुन्या उपाय योजना प्रभावी ठरत नव्हत्या. विपणनाबाबत आपल्या नव्या योजनांबद्दल बोलताना इशिता सांगतात की, ʻगेल्या वर्षी कंपनीसोबत जोडले गेलेल्या देवी यांनी नव्या कल्पना कंपनीच्या भविष्याकरिता अंमलात आणल्या आहेत. जसे की आम्ही जाहिरातींकरिता अल्प पैसा खर्च केला आहे. फेसबूक हे एकमेव व्यासपीठ आम्ही जाहिरातीकरिता वापरले. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की, आम्ही जेवढे प्रयत्न केले त्यापेक्षा अधिक प्रमाणात आम्हाला यश मिळाले. आता आम्ही बॅग, चपला, दागिने आणि अन्य प्रकारांमध्ये उद्योग विस्तारण्याचा विचार करत आहोत. तसेच विपणनावर अधिक पैसे खर्च करण्याची आम्ही मानसिक तयारी करत आहोत. आम्हाला आमचा ब्रॅंड मोठ्या स्तरावर प्रस्थापित करायचा आहे.ʼ गुंतवणुकीबाबत बोलताना इशिता सांगतात की, ʻमी अल्प गुंतवणुकीच्या सहाय्याने ही कंपनी सुरू केली आहे. त्यातुन मिळणाऱ्या फायद्याच्या आधारावरच मी या कंपनीला चालवले आहे. देवी यांच्या येण्याने कंपनीचा आलेख अधिक उंचावला आहे. त्यांनीदेखील या कंपनीत आपला वेळ आणि पैसे गुंतवले आहेत. येत्या काही महिन्यात कंपनीमध्ये सक्रिय स्वरुपात गुंतवण्यात आलेल्या रकमेत वाढ करण्याचा आम्ही विचार करत आहोत.ʼ

image


इशिता यांना 'कैंडिड्ली कचूअर' साठी सह-संस्थापक देवी यांचा आधार आहे. सर्वसामान्य लोकांसोबतच अनेक प्रसिद्ध लोकदेखील त्यांच्या कपड्यांचे कौतुक करतात. इशिता सांगतात की, ʻनुकतेच ʻबेबीʼ चित्रपटातील अभिनेत्री मधुरीमा तुली यांनी आमच्या कपड्यांचे छायाचित्र सोशल मिडियावर प्रसिद्ध केले. हे खुप आश्चर्य़कारक होते. कारण काही दिवसांपूर्वीच त्या मला माझ्या कपड्यांच्या निवडीबाबत विचारत होत्या. काही दिवसांपूर्वीच बॉलीवुड आणि टीवी कलाकार आमच्या बंगळूरू येथील दुकानात खरेदी करण्यासाठी आले होते.ʼ इशिता यांच्याकरिता या सर्व गोष्टी सोप्या नव्हत्या. जेव्हा इशिता यांनी फेसबूक पेजची निर्मिती केली तेव्हा त्यांच्याकडे स्वतःचा संगणकदेखील नव्हता. सायबर कॅफे आणि आपल्या मित्रपरिवाराच्या लॅपटॉपवर त्या आपले फेसबूक पेज पाहत होत्या, असे त्या सांगतात. इशिता म्हणतात, ʻतो माझ्यासाठी सर्वात कठीण काळ असूनही, मी माझ्या परिवाराकडूनदेखील काहीही मदत घेतली नाही. सोप्या मार्गावर चालणारे लोक कुठे मोठ्या यशाची प्राप्ती करतात. त्याकाळी मी हे शिकले की, जर तुम्ही ग्राहकांच्या वेळेचा मान राखला आणि कठीण वेळेकरिता काही पैसे जमवून ठेवले, तर व्यवसाय उभारता येऊ शकतो.ʼ

image


'कैंडिड्ली कचूअर'ने आता आपल्या ब्रॅंडकरिता एक कार्यालय उघडले आहे. याबाबत आपला आनंद व्यक्त करताना इशिता सांगतात की, ʻआम्ही इंदिरानगरमध्ये एक कार्यालय उघडले असून, आता मी माझे सर्व लक्ष कार्यालय सजवण्यात केंद्रीत केले आहे. ऑफिसपेक्षा मी मोबाईल एप्लीकेशनबाबत अधिक उत्साही आहे. मोबाईल एप्लीकेशन देवी एकटे सांभाळणार आहेत. ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. लवकरच आम्ही ब्लॉग सुरू करणार आहोत, ज्यात स्टाईलसोबतच त्वचेसंबंधीच्या गोष्टीदेखील असतील.ʼ ʻतुम्ही कोणत्याही स्तरावर असलात, तरी लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची चिंता करू नका. तुम्ही यामुळे बराच वेळ वाचवू शकता. आयुष्यात जेवढ्या लवकर तुम्ही हे समजून घेऊ शकता, तेवढेच तुमचे उर्वरित आयुष्य सुकर होते.ʼ सोफीया अमोरुसो यांच्या या विचाराने प्रभावित असलेल्या इशिता यांना आयुष्यातील सर्वात चांगले सल्ले टोनी सियाइ आणि सोफीया अमोरुसो यांच्या विचाराने मिळतात. याशिवाय देवी यांचे सल्लेदेखील उपयोगी ठरत असल्याचे इशिता सांगतात.

मोठी स्वप्ने पाहणाऱ्यांना इशिता सल्ला देतात की, ʻनशीब मेहनत करणाऱ्यांना साथ देते. जर नावडत्या ठिकाणी नोकरी करत असताना तुम्ही माझ्याबद्दल वाचत असाल. तर दिवास्वप्ने पाहणे बंद करा आणि स्वप्नांना सत्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करा.ʼ