कथा कल्पक उद्योजकाची...

कथा कल्पक उद्योजकाची...

Friday January 08, 2016,

5 min Read

स्टार्टअप्सचे जग असंभवनीय अशा यशोगाथांनी भरलेले आहे... उद्योग क्षेत्रात ताज्या दमाच्या आणि काहीतरी सकारात्मक बदल घडविण्याच्या इच्छेने काम करणाऱ्या नायकांचे हे जग.... सर्वसामान्यांच्या रोजच्या आयुष्यात नैराश्य आणणाऱ्या एखाद्या समस्येची जाणीव करुन देणारी तीक्ष्ण नजर असेलेले आणि त्यापासून दूर न पळता ती सोडविण्याचे कल्पक मार्ग शोधणारे हे आजचे उद्योजक... सहाजिकच त्यांच्या कथाही तेवढ्याच रंजक आणि प्रेरणादायी असतात... अशीच एक कथा आहे अनुपम अत्री यांची...

अनुपम यांच्या कुटुंबातील सर्व लोक हे नोकरीपेशातील... त्यामुळे चांगली नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने स्वतःला तयार करण्याचे ध्येय समोर ठेवूनच अनुपम लहानाचे मोठे झाले. कारकिर्दीच्या सहाव्या वर्षात, रिलायन्स पॉवरमध्ये एक अभियंता म्हणून काम करत असताना, त्यांचे आयुष्य एका अपेक्षित मार्गावरुनच सुरु होते. मात्र अनुपम यांच्या आयुष्यात उद्योजगतेची बीजे तेंव्हाच रोवली गेली होती, जेंव्हा रोजच्या आयुष्यातील एका समस्येशी त्यांची नित्याची झुंज सुरु होती, एक अशी समस्या जी तंत्रज्ञानात बऱ्यापैकी आघाडीवर असलेल्या या देशातही कोणी सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत नव्हते.

“ दिल्लीत माझ्या घरी पाण्याच्या पंपाच्या समस्येने मला चांगलेच हैराण केले होते. पाणी आल्यावर पंप सुरु करायला आणि पाणी गेल्यावर तो बंद करायला मी विसरुन जात असे आणि पाणी गेल्यावरही पंप सुरुच राहिल्यास तो जळून जाई. एकूणच यामुळे माझ्याकडे नेहमीच गोंधळ उडे. भारतातील बहुतेकजणही असेच जगत असतात, पण मी मात्र यापासून माझे डोके बाजूला काढू शकत नव्हतो. या उपद्रवामधूनच माझ्या विचारांना खाद्य मिळाले. हे पंप आपोआप अर्थात स्वयंचलनाने चालू किंवा बंद का होऊ शकत नाहीत, असा विचार मी केला,” अनुपम सांगतात.

image


थापर इन्स्टीट्यूटमध्ये इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीच्या केवळ दुसऱ्याच वर्षाला असताना ही कल्पना त्यांना सुचली. मुख्य म्हणजे त्यावर काम करण्याच्या दृष्टीने ती त्यांना व्यवहार्य वाटली आणि पुढे ती चांगलीच यशस्वीही ठरली. नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत) आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात अनुपम यांच्या प्रकल्पाची नाविन्यपूर्ण आणि व्यावहारीकदृष्ट्या पात्र प्रकल्प म्हणून निवड झाली. अशा प्रकारे निवडला गेलेला तो एकमेव विद्यार्थी प्रकल्प होता. त्यामुळे त्यांना या उत्पादनाच्या संशोधन आणि विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून ग्रॅंटचा चेक मिळाला आणि त्यापाठोपाठ पेंटटसाठी अर्जही झाला. भविष्यातील त्यांच्या उज्ज्वल प्रवासातील हा पहिलाच मैलाच दगड होता.

अनुपम यांनी त्यांचे बंधू अमित अत्री यांच्यासह अत्री एटंरप्राईजेस लिमिटेडची स्थापना केली आणि २००९ मध्ये ‘ईडब्ल्यूएएस वॉटर ऑटोमेशन सिस्टीम’ (‘eWAS® Water Automation System’) या नावाखाली व्यावसायिक स्तरावर उत्पादन सुरु केले.

आपल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला त्यांनी बाजारपेठेच्या संशोधनाचीही साथ दिली. अनुपम सांगतात की सुमारे ६० ते ७० टक्के लोकांना असे कोणतेही यंत्र माहित नाही, ज्यामुळे त्यांचे पाण्याचे पंप स्वयंचलित होऊ शकतात. याशिवाय २०२० पर्यंत १७.७३ बिलियन डॉलरपर्यंत पोहचण्याचा अंदाज असलेल्या या जागतिक बाजारपेठेत कोणतेही मोठे भारतीय खेळाडू नाहीत.

अनुपम सांगतात, “ वॉटर ऑटोमेशन क्षेत्र हे केवळ ठराविक उत्पादन निर्मितीचे क्षेत्र असू नये, तर त्यामध्ये सातत्याने संशोधन आणि विकास व्हायला हवा आणि अभियांत्रिकीचे कामही नियमितपणे सुरु रहायला हवे, जेणेकरुन ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेत, सध्याच्या उत्पादनांमध्ये सुधारणा करणे शक्य होईल. याबरोबर अतिशय समर्पित सेवा देणेही गरजेचे आहे आणि नेमकी ही दोन्ही वैशिष्ट्ये सध्या या क्षेत्रात असलेल्या छोट्या खेळाडूंकडे नाहीत.”

या अभ्यासानंतर, आपल्या वेगळेपणामुळे आपले तंत्रज्ञान बाजारपेठेत स्वतःची जागा निर्माण करण्यात यशस्वी होईल, असा आत्मविश्वास अत्री बंधूंना वाटला.

ईडब्ल्यूएएसचे व्यावसायिकरित्या बाजारपेठेत पदार्पण झाले ते एप्रिल २०११ मध्ये...... हे एक असे उत्पादन आहे, ज्याची रचना पाणी आणि वीजेची बचत करण्याच्या दृष्टीने करण्यात आली असून ते एक परिपूर्ण वॉटर ऑटोमेशन सोल्युशन आहे. इंडीयन पेटंटस् च्या जर्नल्समध्येही या नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयी मजकूर प्रकाशित झाला. हे उपकरण बसविल्यानंतर पाण्याचे पंप, झडपा आणि पाण्याशी संबंधित व्यवस्था ही कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आपोआप सुरु आणि बंद होते. आत, बाहेर, घरगुती वापरासाठी, व्यावसायिक किंवा उद्योगांसाठी, अर्थात जेथे कोठे पाणी वापरले जाते, अशा प्रत्येक ठिकाणी ते उपयुक्त आहे. मुख्य म्हणजे सध्याच्याच व्यवस्थेमध्ये ते चालू शकत असल्याने, ग्राहकांना त्यांच्याकडे असलेले पाण्याचे पंप किंवा एकूण व्यवस्था बदलण्याची किंवा नव्याने बसविण्याची काहीच गरज नसते.

ऑटोमेशन प्रक्रियेद्वारे हे उत्पादन पाणी आणि वीजेची बचत तर करतेच पण त्याचबरोबर पाण्याच्या पंपांच्या टेन्शन फ्री ऑटोमेशनचीही खात्री देते. या उपकरणाच्या बाहेरची बाजू ही एबीएस प्लॅस्टीकने बनविलेली असल्याने वीजेचा धक्का लागू शकत नाही, तर मॅग्नेटीक सेन्सर्समुळे ते गंजत नाही आणि देखभाल खर्च कमी होतो. संगणकाप्रमाणेच ते मायक्रो कंट्रोलरवर आधारीत आहे, ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे काम करु शकते.

१५ लाखापासून आरंभ केलेल्या अनुपम यांनी आपला व्यावसायिक प्रवास सुरु केला तो अर्धवेळ व्यवसायिक म्हणून...त्यामुळे ईडब्ल्यूएएसमध्ये सुरुवातीला केवळ एकच कर्मचारी होता, जो त्यांना उत्पादनाच्या कामात मदत करत असे आणि काही काळानंतर आणखी एकाची नेमणूक करण्यात आली, जो उपकरणे बसविण्यासाठी मदत करत असे. तर त्यांच्या वेबसाईटच्याच माध्यमातून मार्केटींग केले जाई. व्यवसायाचे एवढे साधेसरळ मॉडेल होते आणि वॉटर ऑटोमेशनच्या समस्येवर उपाय देणारे एक उत्पादन त्यांच्याकडे होते. आज चार वर्षांनंतर कंपनीकडे ८० उत्पादने आहेत आणि त्यांनी या बाजारपेठेत त्यांचे स्थान पटकावले आहे. ही एक अशी बाजारपेठ आहे ज्यामध्ये प्रामुख्याने स्थानिक स्पर्धक आहेत, जसे की अरिहंत वॉटर कंट्रोल, श्री सविता आणि भारती इलेक्ट्रॉनिक्स. पॅन-इंडीया नेटवर्कची उभारणी करुन आघाडीवर रहाण्याची ईडब्ल्यूएएसची योजना आहे. “ सध्या आमच्या देशभरात १५ फ्रॅंचायजीज असून पुढील दोन वर्षांत हाच आकडा १००-१५० पर्यंत नेण्याचे आमचे ध्येय आहे,” अनुपम सांगतात.

एका टॅंक-पंप कोम्बिनेशन ऑटोमेशन युनिटची रिटेल किंमत ही ४००० ते ५००० च्या मध्ये आहे. तर कंपनीत झालेल्या फेरबदलानंतर त्यांच्या प्रकल्पांची किंमत २ लाख ते २० लाख या रेंजमध्ये आहे.

ऑटोमेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन बाजारपेठेतील पाणी उद्योगातील प्रमुख खेळाडू आहेत, अमेरिकन जनरल इलेक्ट्रीक, इमर्शन इलेक्ट्रीक आणि रॉकवेल ऑटोमेशन, जर्मन सिमेन्स एजी, स्वीस एबीबी आणि इतर... “ आम्ही अशा जागांना लक्ष्य करत आहोत, जेथे या कंपन्यांचे प्रकल्प नाहीत, जसे की घरे, शाळा आणि महाविद्यालये, रुग्णालये, व्यावसायिक परिसर, हॉटेल्स, रिअल इस्टेट प्रकल्प, आरडब्ल्यूए, इत्यादी. जेथे प्रकल्पाचा आकार हा पाच हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत आहे आणि तेथील ग्राहक हे बेभरवशाच्या स्थानिक खेळाडूंवर अवलंबून आहेत,” अनुपम सांगतात.

जागतिक पातळीवर वॉटर ऑटोमेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन बाजारपेठ ही २०१४ ते २०२० या काळात सीएजीआर ११.७५ टक्के एवढी वाढण्याचा अंदाज आहे. तर आशिया-पॅसिफीकमध्ये याच काळात हीच वाढ सर्वाधिक म्हणजे १२.०७ एवढी अपेक्षित आहे. भारतामध्ये वॉटर ऑटोमेशन बाजारपेठ ही अगदी नविन आहे. भारतात या क्षेत्रासाठी सेकंडरी डेटा उपलब्ध नसला, तरी अनुपम यांच्या मते हे अंदाजे दोन बिलीयन डॉलर्स एवढे आहे.

दर वर्षी शंभर टक्के या दराने या स्टार्टअपची महसूली वाढ झाली आहे. पहिल्या वर्षात त्यांचे उत्पन्न बारा लाख होते, तर पुढच्या वर्षी २४ लाखांवर गेले आणि उत्तरोत्तर त्यात वाढ होत जाऊन गेल्या वर्षी ते ५० लाखांवर पोहचले आहे, म्हणजे सरासरी दर महा पाच लाख एवढा महसूल आहे.

अनुपम सांगतात, “ आम्ही आता अशा टप्प्यावर पोहचत आहोत, की आता आम्हाला बाहेरुन निधी उभारण्याची गरज आहे, जेणेकरुन आम्ही वाढीचा वेग आणखी वाढवू शकू.”

लेखक – बिंजल शाह

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन