ध्येय आयुर्वेदाला मुख्य प्रवाहात आणण्याचे...

ध्येय आयुर्वेदाला मुख्य प्रवाहात आणण्याचे...

Wednesday December 16, 2015,

5 min Read

इक्सआयएम बॅंकेच्या एका पहाणी अहवालानुसार सध्या अंदाजे ४,२०५ कोटी रुपये एवढा असलेला भारतीय हर्बल उद्योग २०२० पर्यंत ७,००० कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहचण्याचा अंदाज आहे. जरी हे आकडे मुख्यत्वे आयुर्वेदीक उत्पादनांबाबतचे असले, तरी एकूणच या विज्ञानाकडे अनेक जीवघेण्या आजारांवर उपचार करु शकतील असे उपाय उपलब्ध आहेत.

रुग्णांना आजारातून मुक्त करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा परिणामकारक वापर करणारे एक नाव म्हणजे डॉक्टर रोहित साने यांचे साने केअर ग्रुप... महाराष्ट्रात माधवबाग ही रुग्णालयांची एक साखळीच साने केअरतर्फे चालवली जाते. मुख्य म्हणजे या ठिकाणी आयुर्वेदाचा वापर करुन, ऍलोपथीच्या एक चतुर्थांश एवढ्याच खर्चात, रुग्णांवर उपचार तर केले जातातच, पण त्याचबरोबर आयुर्वेदाची यशस्वी सांगड आधुनिक विज्ञानाशी घालून तयार केलेल्या विशेष रोग निवारण उपचारपद्धतीद्वारे गंभीर हृदयरोगावरही उपचार होत असल्याचा साने केअरचा दावा आहे. आयुर्वेदाचा उत्तम वापर करुन रुग्णसेवा करणाऱ्या आणि त्याचबरोबर आयुर्वेदाला मुख्य प्रवाहात आणणाऱ्या या उद्योजक-डॉक्टरची कथा जाणून घेण्याचा युवरस्टोरीचा हा प्रयत्न.

आजपर्यंतचा प्रवास

डॉक्टर रोहित यांनी औरंगाबाद विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी घेतली. त्याचबरोबर त्यांना अपोलो हॉस्पिटल्सकडून कार्डीऍक रिहॅबिलिटेशन या विषयात त्यांना फेलोशीप मिळाली असून ते रॉयल सोसायटी ऑफ हेल्थ (युके)चे माजी फेलो आहेत. खरं म्हणजे, त्यांनी त्यांची वैद्यकीय कारकीर्द सुरु केली ती मुंबईसारख्या महानगरातून... तेथे घाटकोपरमध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला, मात्र लवकरच आपले हे ज्ञान अधिक पुढे नेण्याच्या हेतूने ते महाराष्ट्रातील छोट्या शहरांच्या दिशेने वळले. वैद्य साने आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र, या त्यांच्या पहिल्या उपक्रमाची सुरुवात झाली १९९९ साली.... या केंद्राला उत्तम प्रतिसाद तर मिळालाच पण त्याचबरोबर डॉक्टरांना आपल्या या व्यवसायात पुढे जाण्याचा आत्मविश्वासही यातूनच मिळाला.

image


साध्या आयुर्वेदिक उपचारांपासून सुरुवात करत, आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती ते कॉपीराईटेड आयुर्वेदिक कार्यपद्धती निर्माण करण्यापर्यंत... साने ग्रुपने खऱ्या अर्थाने उत्तम प्रगती केली आहे. २०१२ मध्ये या ग्रुपची उलाढाल ३५ कोटी रुपयांची होती आणि सुमारे ४५० कर्मचारी त्यांच्याकडे काम करत होते. माधवबागच्या – या ब्रॅंडनेम अंतर्गत साने केअर ग्रुपची चिकित्सालये आहेत – महाराष्ट्र, गोवा, इंदोर आणि लंडन येथे १६५ चिकित्सालये आणि तीन रुग्णालये आहेत.

डॉक्टर आणि उद्योजक यांच्यामधील रोहित यांची आवडती भूमिका कोणती, हा प्रश्न सहाजिकच यावेळी उपस्थित झाला. त्यावेळी आपण दोन्ही भूमिकांमध्ये सारख्याच प्रकारे रमत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. “ जेंव्हा मी रुग्णांसमोर असतो, तेंव्हा मी माझ्या डॉक्टरच्या भूमिकेचा पूर्ण आनंद घेतो, कारण त्यावेळी बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टी मी करु शकतो. तर जेंव्हा मी माझ्या कर्मचाऱ्यांबरोबर आणि व्यावसायिक सहकाऱ्यांबरोबर असतो, तेंव्हा मी उद्योजकाप्रमाणेच वागतो आणि त्यातदेखील मी तेवढाच आनंदी असतो,” ते सांगतात. आजपर्यंच साने ग्रुपने केलेली प्रगती पाहून ते खूश आहेत. १९९९ साली सुरु केलेले एक लहानसे पंचकर्म केंद्र आता एक मोठे कार्डिऍक रिहॅबिलिटेशन केंद्र झाले आहे. आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी उत्पादन सुविधा तयार करणे असो, माधवबाग इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल एज्युकेशन ऍन्ड रिसर्च (एमआयएमईआर) ची स्थापना असो – १९९९ साली बीजारोपण केलेला हा वृक्ष आज चांगलाच बहरला असून, त्यांच्या मुख्य व्यवसायाला पूरक अशा संबंधित क्षेत्रातही ते स्थिरावले आहेत आणि सर्वंकष प्रगतीसाठी हे निश्चितच मदतगार आहे.

भविष्यात आयुर्वेदाचा प्रसार अधिकाधिक राज्यांमध्ये करण्याची आणि ऍलोपथी आणि आयुर्वेदामधील वास्तव जगातील तफावत दूर करण्याची डॉक्टर रोहित यांची इच्छा आहे. “ माझ्या मते अजूनही आयुर्वेद हा ऍलोपथीच्या शंभर वर्षे मागे आहे आणि उपलब्ध पर्यायांचा अभाव, हे यामागचे प्रमुख कारण आहे. माझे दीर्घकालीन ध्येय आहे ते खेड्यापाड्यांत आयुर्वेद उपलब्ध करुन देण्याचे, जेणेकरुन ही सेवा तेथे उपलब्ध होईल आणि लोकांना आयुर्वेद किंवा ऍलोपथीपैकी एकाची निवड करण्याचा निर्णय घेता येऊ शकेल,” ते सांगतात.

कॉपीराईटेड उपाय

डॉक्टर रोहित यांचा असा दावा आहे की, माधवबाग ही या प्रकारची पहिलीच निवासी वैद्यकीय सुविधा आहे आणि हृदयरोगांवर उपचार करणारे जगातील पहिले आयुर्वेदिक कार्डीऍक रुग्णालय आहे, ज्या ठिकाणी आयुर्वेदाचा वापर केला जातो. या ठिकाणी कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय, ‘संपूर्ण हृदय शुद्धीकरण ’ या कॉपीराईट असलेल्या उपचाराचा वापर करुन रुग्णांवर उपचार केले जातात. ही आयुर्वेद उपचारपद्धती दररोजचा नियमितपणा, योगसाधना, व्यायाम, पंचकर्म उपचार आणि काही जीवनशैलीविषयक बदल यांच्या एकत्रिकरणातून बनलेली आहे.

image


मग असा सामान्य विज्ञानाचा वापर असूनही त्यासाठी कॉपीराईट कसा, हा प्रश्नही सहाजिकच पडतो. त्यावर डॉक्टर सांगतात, “ संपूर्ण हृदय शुद्धिकरण या उपचार पद्धतीमध्ये आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या स्तरावर ठिकठिकाणी स्पष्ट केलेल्या विविध उपचारपद्धतींचे एकत्रिकरण आहे. जर तुम्ही रोधा रोग वाचलात, जो आयुर्वेदामधील हृदयरोगाशी संबंधित मजकूर आहे, तर तुम्हाला कुठेही संपूर्ण हृदय शुद्धिकरण प्रक्रियेचा उल्लेखही सापडणार नाही. ही संपूर्ण प्रक्रिया या विज्ञानाबाबतचे आमचे ज्ञान आणि कौशल्य यांचा वापर करुन, आम्हीच तयार केली आहे, जी हृदय रोगासाठी मदतगार ठरु शकते.” चार वर्षांच्या अथक संशोधनानंतरच त्यांनी ही प्रक्रिया विकसित केली आहे. या उपचारांद्वारे मिळत असलेल्या यशाचे प्रमाण पाहूनच, कार्डिओलॉजी या विषयातील आघाडीचे जर्नल असलेल्या लॅन्सेट अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नल अर्थात सर्क्युलेशनमध्ये या उपचारपद्धतीवरील एक शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे.

त्याचबरोबर साने केअर ग्रुपने सुमारे १५० आयुर्वेदिक उत्पादनेही विकसित केली आहेत – १०० वैद्यकीय तर ५० सौंदर्य उत्पादनांचा यामध्ये समावेश आहे, जी अनेक आजारांसाठी दिली जातात, ज्या आजारांसाठी इतरवेळा आपल्याला ऍलोपथीकडे वळावे लागू शकले असते. मधुमेह, पित्त, मूळव्याध आणि संधीवात यासारख्या आजारांवर साने केअरची उत्पादने एक चांगला उपाय ठरत आहेत.

मात्र आयुर्वेदाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या या प्रवासात अनेक आव्हानेही होतीच. सर्वात पहिला अडथळा होता, तो म्हणजे साने केअर ग्रुपने घेतलेल्या डॉक्टरांचा, ज्यांचा स्वतःचाच आयुर्वेदिक उपचारांच्या संभाव्य ताकदीवर विश्वास नव्हता. त्यामुळे अर्थातच आयुर्वेदाचा वापर परिणामकारक करु शकण्याचे आव्हान पेलू शकतील असे व्यावसायिक डॉक्टर्स मिळविणे हे पुढील आव्हान होते. आणि शेवटचे आव्हान होते ते म्हणजे आयुर्वेदिक उपचारांची आरोग्यदायी अंमलबजावणी करण्याचे.. हे काही सहजसोपे काम नाही, याची डॉक्टर रोहित यांना चांगलीच जाणीव आहे मात्र त्यांचीदेखील यासाठी वाट पहाण्याची तयारी आहे. ते सांगतात की, आयुर्वेदाला मुख्य प्रवाहात आणणे हे त्यांचे ध्येय आहे आणि हे प्रत्यक्षात आणण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत.

त्यामुळे पुढच्या वेळी जेंव्हा तुम्ही आजारी पडाल, तेंव्हा त्या गोळ्या खाण्यापेक्षा या औषधी वनस्पतींचा वापर तर करुन पहा – त्या दोन्हीचा परिणाम सारखाच असेल.

लेखक – प्रीती चामीकुट्टी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन